मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

खोया खोया चांद.... (अर्थात गिफ्टची देवाणघेवाण) माझ्या एका दीर्घांकातला भाग

भडकमकर मास्तर · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
( मनीष आणि माधवी मैदानावरती गप्पा मारत बसले आहेत) माधवी : ( एकदम उठत) चल निघूया.. मनीष : पण कुठे? माधवी : मला कॉफ़ी प्यायचीय.. मनीष : मग मागवूयात की इथेच... माधवी : नको.. मनीष : खरंच.. अगं या अण्णाची कॉफ़ी कसली उच्च असते , तुला माहित नाही... माधवी : काय रे तू? कॉफ़ी म्हणजे अगदी कॉफ़ी नकोय मला.. मनीष : अरे आत्ता पाहिजे म्हणतेस , मग नाही म्हणतेस.. माधवी : मला ना खरंतर शॉपिंगला जायचंय.. मनीष : कशाला? माधवी : आज काय आहे सांग? मनीष : म्हणजे? माधवी : आज काय घडलं होतं? मनीष : २७ जून... ( विचार करत पुटपुटतो).. माधवी : काय आठवतोय्स? मनीष : तुझा वाढदिवस नाहीये ना ते आठवून पाहिलं.. गेल्या वर्षी विसरलो होतो तर केवढा दंगा केलास ... माधवी : मग काय करणार? तू म्हणजे ना काहीही लक्षात ठेवतोस, या दिवशी अमकं घडलं आणि ढमकं घडलं..पण माझा वाढदिवस तुला... मनीष : यापुढे वाढदिवस नाही विसरणार... दुसरं काहीतरी विसरेन.. माधवी : ते दिसतंच आहे... आज काय झालं होतं सांग... मनीष : आज... ( विचार करत ) आज अनुष्का पहिल्यांदा दिसली होती.. माधवी : कोण? मनीष : होती एक..माझी चाइल्डहूड क्रश म्हण हवं तर... माधवी : असं? .. कितवीतली रे? मनीष : सेकंड इयर असेल... माधवी : याला तू चाईल्डहूड क्रश म्हणतोस? मनीष : हो, मी लहानच होतो तेव्हा.. माधवी : कशी होती रे ती? मनीष : जाउदे ना... कशाला आता तो विषय? माधवी : सांग ना.. मनीष : सद्गुणी, विचारी आणि सुंदर होती. माधवी : आधी कधी बोलला नाहीस ते? मनीष : तू तरी कुठे विचारलंस? माधवी : आता कुठे असते ती? मनीष : जाउदे ना... माधवी : ( ती आता वैतागलीय)... एकदा सांगूनच टाक सगळं.. मनीष : काही नाही लग्न झालंय तिचं... तिचा नवरा अदिस अबाबाला असतो .. कधी ताहिती, झैरे, मोझांबिक .. फ़िरतीची नोकरी आहे...बोटीवरची. आणि ती इकडेच असते एकटी... माधवी : ( खूप अपसेट होत) आठवण येत असेल ना खूप तिची? मनीष : खरं सांगू?... खूप... माधवी : ( तिला आता हे सहन होत नाहीये... डोळ्यांत पाणी...ती उठून जायला लागते...तो तिचा हात धरतो...). मनीष : बरोबर एका वर्षापूर्वी एका मूर्ख मुलीनं मला प्रपोज केलं... २७ जूनला... विसरणं कसं शक्य आहे? पहिल्यांदा मला खोटंच वाटलं..आपली लायकी आहे का ही असंही वाटलं...मलाच काय कॊलेजातही पुष्कळ लोकांना खोटंच वाटलं.. एखाद्याची इतकी थट्टा बरी नव्हे असंही कोणी म्हणाले. पण तिला खरंच तसं वाटत होतं.. मनापासून... मलाच समजायला उशीर झाला.... मला गिफ़्ट वगैरे काय घ्यावं ते कळत नाही.. पण आज मात्र आठवणीने तुझ्यासाठी हे आणलंय... ( गुलाबाचं फ़ूल काढतो)... माधवी : ( हात सोडवून घ्यायचा प्रयत्न करत ) दे जा तुझ्या अनुष्काला.. मनीष : दिलंही असतं पण प्रॊब्लेम असाय की ती अस्तित्त्वात नाहीये... माधवी : खरं?? मनीष : मग? तुला काय काहीही खरं वाटतं का गं?( हसत ) बोटीवर फ़िरतीची नोकरी.... अदिस अबाबा... माधवी : नेहमी असंच करतोस... मनीष : तरी तू गंडतेस नेहमी... हे घे... माधवी : थॆंक्स ... चल आता मनीष : कुठल्या मॊलमध्ये? माधवी : तू चल तर खरं.. मनीष : मग तू मला एक सरप्राईज गिफ़्ट घेशील आणि मी खरंच आश्चर्यचकित झाल्याची ऎक्टिंग करेन.. माधवी : ऎक्टिंग काय रे? चल ना.. काय घेउयात तुझ्यासाठी? मनीष : नको ..तू मला अमुकअमुक किंमतीचं गिफ़्ट घेणार आणि मग मला त्याच किंमतीचं गिफ़्ट तुला परत द्यावं लागणार. जरी मला कल्पना असणार की आपल्या प्रेमाची इमारत या गिफ़्टच्या अदलाबदलीच्या तकलादू पायावरती उभी नाहीये..पण हे तुझ्यासारखीला मान्य नसणार... म्हणून मग मी माझ्या गर्ल्फ़्रेंडसाठी एक खास गिफ़्ट घेऊन येणार..( खिशातून एक गिफ़्ट रॆपिंगवाली लाल डबी काढतो आणि तिला देतो...)कानातले आहेत..(ती खुश) माधवी : खरंच तू...? मनीष : करेक्ट... तुझ्यासारखीचा तर विश्वासच बसणार नाही...कोणी विचारेल, " कितीचे आहेत ?" मग मी म्हणेन, " हे तर अमूल्य आहेत कारण मी हे खास तुझ्यासाठी आणले आहेत. माधवी : ( ती उघडून पाहते) डायमंड्स? मनीष : ( हसत) समजा मी तुला हे सांगितलं की हे २५ रुपयांना जोडी असं लोकलमध्ये मिळालेलं आहे. माधवी : ( संशयाने) खरंच? मनीष : अगं मी समजा म्हणालो.. पण बघ ना... तुला संशय आला.. एखादीला रागच येईल.. कोणी तर हे गिफ़्ट तोंडावर फ़ेकून मारेल... आहे की नाही?म्हणजे बघ हं... गिफ़्ट तेच पण परसेप्शन बदललं की रीऎक्शन बदलली. माधवी : पण म्हणून काय झालं? तू मला असलं पपलू गिफ़्ट देणार? मनीष : पपलू? अगं पपलू म्हणू नये..सूज्ञ माणसं म्हणतात, गिफ़्ट देण्यामागची भावना महत्त्वाची, तो काही व्यवहार नव्हे. माधवी : मी नाहीये सूज्ञ वगैरे मनीष : पण मी आहे ना...म्हणून तर गिफ़्ट घ्यायला मी नको म्हणतोय... गिफ़्टच्या या खतरनाक अर्थकारणाचा पुढचा बळी नाही व्हायचंय मला.. माधवी : काही बळी जात नाहीये रे तुझा...चल रे... मनीष : (!) माधवी : प्लीज चल... मनीष : (तिच्या हातात हात देत ) चल.... ( पार्श्वभागी गाणं ऐकू येतं...)( गीतकार : स्वानंद किरकिरे) आज शब जो चांद ने है रुठने की ठान ली गर्दिशोमें है सितारे बात हमने मान ली अंधेरी स्याह जिंदगी को सुझती थी नहि गली के आज हाथ थाम लो की के हाथ की कमी खली blackout क्युं खोएं खोएं चांद की फिराक मे तलाश मे उदास है दिल् क्युं अपने आप से खफा खफा ज़रा ज़रा सा नाराज़ है दिल ये मंज़िले भी खुद हि तय करें, ये फासलें भी खुद हि तय करें क्युं तो रास्तों पे फिर सहेम् सहेम् संभल संभल के चलता है ये दिल क्युं खोएं खोएं चांद की फिराक मे तलाश मे उदास है दिल

वाचन 9127 प्रतिक्रिया 0