(विचार)मंथन!
काही दिवसांपुर्वी, बंगळूरात मित्रासमवेत राहत असतांना, एका दिवसभरात कमीत कमी ४ ते ५ अशा लोकांशी बोलणं झालं जे आपापल्या आयुष्यातल्या दु:खाला वैतागलेले होतेत. दोघा जणांनी तर जगण्यात काही राम नाही उरला असा निष्कर्षही काढून टाकला! अशावेळी शांतपणे समोरच्या व्यक्तीचे म्हणणे ऐकून घ्यायचे (व उगाच सांत्वन-प्रोत्साहनपर शब्द, त्यांना आलेल्या अडचणींवर उपाय शोधण्याचा प्रयत्न असले काहीही करायचे नाही !!) हे अनुभवाने आलेले शहाणपण वापरले व Be a Good Listener असाच वागलो! पण रात्री झोपण्याच्या प्रयत्नांत असतांना त्या सर्व गोष्टी परत आठवल्या अन् विचारांचे काहूर माजले. हे म्हणजे आपल्याच झोपेचं खोबरं होतंय असे जाणवलं अन् उठलो. चुपचाप एक टेक्नीकल पुस्तक काढून बसलो वाचायला. अपेक्षेप्रमाणे १५ मिनिटात झापड आली डोळ्यांवर.. मग झोपलो!!
दुसर्या दिवशी सकाळी पेपर उघडला वाचायला. नजर फिरवतांना एक गुन्ह्याची बातमी दिसली. कुणीतरी, एका अगदी लहान मुलीवर.... जीव नुसता कळवळून उठला. म्हटलं अरे काय हे, काय चाललंय काय... जवळपास अर्धातास त्याच मनस्थितीत होतो. पुन्हा आधल्या दिवशीचं संभाषण आठवायला लागलं. वाटलं आता दिवसभर आपले डोके असेच पकणार... शेवटी उठलो अन् हापिसाच्या तयारीला लागलो. मात्र त्या दिवशी रात्रीपर्यंत कसे कुणास ठाऊक डोके जास्त भणाणले नाही. कदाचित कामात गुंतलो असेन. रात्री घरी जेवण झाल्यावर अचानक दिवे गेले. म्हणजे झोप येण्यासाठी वाचायची सुद्धा काही सोय नव्हती! मनाला म्हटले किती वेळ पळणार..चल करूच आता यावर विचार.. चहा केला मोठा कप भरून अन् कप घेऊन गच्चीवर गेलो...
आभाळ मोठं सुंदर दिसत होतं. छान चांदणं पडलेलं. चुकार ढगही होते. मंद हवा सुटली होती. अगदी छान जमून आलेलं प्रसन्न वातावरण! म्हटले मला आत्ता हे अत्यंत प्रसन्न वाटणारं वातावरण कुणा दुसर्याला कितीतरी यातना देत असेल. किती दु:ख असावं आयुष्यात? सतत सर्वत्र फक्त अंधाराचंच साम्राज्य पसरलेलं. किती त्रागा-किती वैताग.. इतका की माणसाने मृत्यु शोधत फिरावे...
तेवढ्यात खाली रस्त्यावरून एक मरतुकडं कुत्रं फिरतांना दिसलं. ते नेहमीच गल्लीत रात्रीच्या वेळेस फिरायचं. त्याच्या अंगावर भयंकर खरूज झालेली होती. अन्न शोधत, काहीतरी हुंगत ते फिरत होतं. विचार आला, या कुत्र्याला मरावंसं वाटत नसेल काय? असं काय होतं, की ज्यासाठी त्यानं जगावं! पण तरीही ते जगत होतं. मग माणसाला का जगावंसं वाटू नये? लक्षांत आलं, प्राण्यांना जगण्यासाठी ध्येय लागत नाही; माणसाला लागतं! बुद्धी हे दुधारी अस्त्र आहे ना माणसाजवळ त्यामुळं एक तरी ध्येय लागतंच. नाहीतर जनावरं अन् माणूस यांत काही फार फरक नाही!
पुन्हा विचार आला, बर्याच जणांना तर ध्येय हवंय हेही माहित नसतं. तरीही ते जगतातच ना? त्यांना सुख-दु:ख नसतं असंही नाही. मग आपला विचार काही पूर्ण नाही! पण याचाच अर्थ असा की अशा लोकांनां (भगवंत न करो)असं हृदय पिळवटणारं दु:ख झालं तर ते मृत्यूचा मार्ग जवळ करू शकतील; नाहीतर एखादं ध्येय/कारण तरी शोधतील जगण्यासाठी... विचारचक्र चाललेलंच...
आता समजा अशा व्यक्तींपैकी कुणी ठरवलं की मी माझ्या मुलासाठी जगेन, कुणी ठरवलं आई-वडीलांसाठी जगेन तर? ते नक्कीच जगू शकतील. (भगवंत न करो)पण हे ध्येयच त्यांच्यापासून दूर गेलं तर? तो आघात तर ते कधीच सहन करू शकणार नाहीत. याचा अर्थ असा की ध्येयही अशाश्वत, नष्ट होणारं नको.
मग असं कोणतं ध्येय असावं की ज्यासाठी माणसानं अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही सर्व दु:ख सहन करत जगावं? लगेच काही दिव्य चरित्रं नजरेपुढं आलीत- कमलाताई होस्पेट, बाबा आमटे, कार्व्हर, बेडर, मदर तेरेसा, आबालाल रेहमान.
आपल्या संतांमधेही श्रीज्ञानेश्वर महाराज, श्रीचोखामेळा, श्रीतुकाराम महाराज, श्रीगाडगेबाबा यांना किती दु:खे सोसावी लागलीत... स्वतः येशूंना काय कमी त्रास झाला?
जाणवलं, ही सर्व माणसं एखाद्या अशा ध्येयासाठी जगलीत, जे शाश्वत, कधीही नष्ट न होणारं आहे. त्यांनी ते ध्येय शेवटपर्यंत सोडले नाही. श्रीज्ञानेश्वर महाराजांनी तर समाधी घेतली ती कृतकृत्यतेच्या समाधानात! अवघ्या एकअविसाव्या वर्षी हा महापुरूष कार्य पूर्ण झालं म्हणून समाधिस्थ झाला!
मन पुष्कळच शांतवलेलं होतं. बराचवेळ असा विचार चालू होता. गच्चीवर चकराही चाललेल्या. चहा केव्हा संपला तेही समजलं नव्हतं. खाली परत निघालो तर जिन्यात मला शेवटचा प्रश्न मला पडला, मी कशासाठी जगतोय? :)
शुभम्
वाचने
5047
वाचनखूण
प्रतिक्रिया
15
बुद्धी हे
चांगले
खुपच छान
In reply to खुपच छान by दशानन
जीवनात
In reply to जीवनात by लिखाळ
फरक कोण
In reply to खुपच छान by दशानन
संतांनी
छान आणि
बुद्धी हे दुधारी अस्त्र आहे
In reply to बुद्धी हे दुधारी अस्त्र आहे by मनीषा
>>ते
अंमळ
मुमुक्षु
चांगले लिहीले आहे.
In reply to चांगले लिहीले आहे. by प्रभाकर पेठकर
प्रत्येका
स्फुट आवडले.
सुंदर