जिवासवे जन्मे मृत्यू
लेखनप्रकार
स्वर्गामधे देवांची वार्षिक सभा व स्नेहसम्मेलन भरले होते. कोट्यवधी देवांनी यंदाच्या सम्मेलनाला उपस्थिती लावली होती. संध्याकाळी नित्याप्रमाणे सौंदर्यावलोकन करायला विविध मार्गिकांतून आज सर्वजण बाहेर पडले होते. गर्दी टाळून यमदेव एकटेच नंदनवनाकडे वळले.
अतिशय सुंदर हवा पडली होती. नंदनवनात अनेक लतापल्लवी, लक्षावधी वल्लरी, रंगीबेरंगी आणि सुगंधी फुले बहरली होती, मोहक सडा पडला होता. सुगंधी वायू वाहात होता. पक्षी सुरेल सुस्वरामधे कूजन करत आनंदात विहरत होते. क्षणभर यमदेवांना परिपूर्ण शांतीचा आस्वाद घेता आला. समाधानाने त्यांचा ऊर भरून आला.
इतक्यात गरुडाचे तिथे आगमन झाले. एकांताची यमराजांची तंद्री भंग झाली. पण मिळालेले समाधान इतके विलक्षण होते, की त्या येण्याचा त्याना एक प्रकारे आनंदच झाला. कोणालातरी आपल्याप्रमाणेच एकांतवास प्रिय आहे, याचेही त्याना बरे वाटले. तसा त्यांचा आणि गरुड देवाचा स्नेह ही युगानुयुगांचा.
"राम राम यमराज" गरुडाने थोडी पृच्छा करत नंदनवनाकडे नजर वळवली. ते सौंदर्य पाहाण्यात दोघेही रममाण झाले. गरुडाने एकदम एका पक्ष्याकडे यमराजाचे लक्ष वेधले.
"किती सुंदर आहे नाही हा? काय सुरेख आहेत याचे निळे निळे पंख! आणि काय छान नाचतोय, बागडतोय! जीवनाच्या ऐन बहराला आला असावा असे भासते!"
"हो ना, मी ही पाहातोय त्याला मगापासून!" यमराज उत्तरले. "फक्त मला राहून राहून आश्चर्य वाटते आहे, की हा अजून इथे कसा!"
"म्हणजे? आपल्याला काय म्हणायचे आहे तरी काय?" गरुडाला बसलेला धक्का लपवता आला नाही. आपल्या मुळे गरीबाचा जीव धोक्यात आल्याची भावनाही त्या प्रश्नातून डोकावत होती.
"नव्हे तसे काहीच नाही;" यमराज सावरत म्हणाले, "पण मी इतकेच म्हणत होतो, की याचा खरेतर आता काळ जवळ आला आहे!" विषय पटकन आटोपत ते उत्तरले.
आता मात्र गरुडाला राहावेना. तो यमराजाला म्हणाला, "मी पाहातो कोण त्याला काय करतो ते!"
"अहो अहो!" यमराजाचे हे शब्द हवेतच विरले. क्षणार्धात गरुडाने उड्डाण केले, झपाट्याने त्या मनमोहक पक्षाला आपल्या डाव्या पंखाखाली घेतले आणि त्याच वेगाने खूप उंच आणि लांबवर त्याने अवकाशात भरारी घेतली. सप्त सागरांच्या ही पलिकडे, अशा ठिकाणी, की जिथे काळही पोचू शकणार नाही! त्या पक्ष्याला त्याला अशा स्थळी नेऊन पोचवायचे होते की जेथे त्याला कोणाचेही भय असणार नाही.
आपल्या ती़क्ष्ण नजरेने परिसर न्याहाळत प्रचंड वेगाने मार्गक्रमण करीत असताना गरुडाने खूप उंच असा एक सुळका पाहिला. सूर्यास्ताचा काळ नजीक येत होता. तो सुळका गरुडाला उत्तम भासला. अशी ही एक जागा होती की जिथे नजरही ठरत नव्हती. अन्य कोणाही जीवित प्राणी अथवा पक्ष्याचे तिथे अस्तित्व असणे शक्यच नव्हते अशी गरुडाने खात्री करून घेतली.
विचार करून झाला होता. गरुडाने हळूहळू खाली यायला सुरूवात केली. अत्यंत प्रेमाने त्याने अलगद पणे त्या सुंदर निळ्या पंखांच्या पक्ष्याला त्या सुळक्याच्या ठिकाणी उतरवले, आणि क्षणातच पुन्हा उड्डाण केले. त्याला आता यमराजाला विचारायचे होते, की इथे तर नाही ना पोचू शकले तुमचे दूत!
त्या पक्ष्याचे नृत्य पुन्हा एकवार मनमुरादपपणे पाहाण्यासाठी त्याने सहज आपली नजर त्या सुळक्याकडे वळवली, आणि पाहातो तो काय!
गरूडाला हा धक्का अनपेक्षित होता! ज्या सुळक्याला त्याने अति सुरक्षित जागा समजली होती, तिथे एका भयानक अजगराने त्या पक्ष्याला लक्ष्य केले होते!
निराशेने आणि खिन्न मनाने आपली हार मनातल्या मनात मान्य करून गरुड परत नंदनवनाकडे वळला.
दुसर्या दिवशी सकाळच्या पर्वात त्याला यमराजाचे दर्शन झाले नाही. आज सभेचा शेवटचा दिवस होता. दुपारच्या स्नेहभोजनाला गरुडाला खरेतर जावेसेही वाटत नव्हते. यमराजाला मात्र एकदा भेटावेसे जरूर वाटत होते. पण आश्चर्य म्हणजे, यमराज मात्र आपल्याला भेटायचे टाळत आहेत असे गरुडाच्या लक्षात आले. तेव्हा मात्र युक्ती करून तो यमराजाच्या जवळ जेवायलाच जाऊन ठाकला.
त्याची खिन्न मुद्रा पाहून यमराजाने त्याला नजरेनेच विचारले, "काय झाले?"
"तुम्ही म्हणालात तसेच झाले! मी त्याला इतक्या लांबवर घेऊन गेलो; याच विचाराने, की इथवर इतक्या वेगाने माझ्या शिवाय कोणीही पोचू शकणार नाही. अगदी निर्धास्त मनाने मी त्याला जमिनीवर सोडले, आणि माझी नजर वळताच तुमचा दूत अजगराच्या रूपाने तिथे हजर!"
यमराज उत्तरले, "बा गरुडा, मी जेव्हा म्हणालो, की हा अजून इथे कसा, तेव्हा मला अगदी हेच म्हणायचे होते; मीही आश्चर्य करत होतो की याचा काळ तर जवळ आला आहे, मात्र याला इथून खूप दूर वर जायचे आहे, आणि तो इतका दूर जाणार कसा? हा विचार माझ्या तोंडून फक्त प्रकटायला आणि तू झेप घ्यायला एकच गाठ पडली!"
"आता माझा दूत अजगर की कोण हे ज्याने त्याने ठरवायचे!
एक नि:शब्द शांतता त्या नंदनवनातही गरुडाला जिणे असह्य करीत होती. आपणच त्या पक्ष्याचे मृत्युदूत बनलो या भावनेची पीडा फार मोठी होती!
त्याच वेळी मृत्यूची सत्ताही त्याच्या मनात स्पष्टपणे अधोरेखित होत होती!
वाचने
2973
वाचनखूण
प्रतिक्रिया
13
खुप छान
सही..
खुप छान कल्पनाविस्तार!
एक शंका
In reply to एक शंका by परिकथेतील राजकुमार
गोष्ट छान
छान...
मित्रहो, ही कथा माझी नाही.
In reply to मित्रहो, ही कथा माझी नाही. by शशिधर केळकर
मला वाटतं...
In reply to मला वाटतं... by बिपिन कार्यकर्ते
+१
कल्पना
डेस्टनी
गोष्ट आवडली
अशा आशयाची