Skip to main content

प्रहार- द अनटोल्ड स्टोरी ऑफ उज्वल निकम

लेखक आगाऊ म्हादया यांनी सोमवार, 26/10/2026 22:10 या दिवशी प्रकाशित केले.

हे नाव चित्रपटगृहात दिसलं आणि त्यानंतर फक्त उज्वल निकम दिसत राहिले. राजकुमार राव ने फार छान साकारली आहे ही भूमिका. आता मी इथे एक स्पष्ट करतो, अनेक लोक त्यांचं पर्सनल आयुष्य जास्त दाखवलं म्हणून बोंबा मारत आहेत, पण मला वाटतं आपण त्यांची कथा बघायला जातोय तर नीट बघावी. त्या माणसाच्या व्यक्तिमत्वाचे पदर त्यांच्या खाजगी आयुष्यामुळेच आहेत ही जाणीव असू द्यावी.

93 च्या स्फोटांची केस जिंकलेले उज्वल निकम ते 26/11 ची केस जिंकलेले उज्वल निकम असा हा चित्रपटाचा प्रवास आहे. त्यात राजकुमार राव ने उचललेली बोलण्याची, बसण्याची, चालण्याची ढब हे सगळं अफाट आहे. त्याच्या पाठोपाठ ललित प्रभाकर ने साकारलेला अजमल कसाब सुद्धा चीड आणणारा. अर्थातच उत्तम अभिनयाचं लक्षण. काही हत्याकांडाची दृश्य ललितला घेऊन पुन्हा चित्रित केलेली आहेत. त्यामुळे त्याची दाहकता नव्याने जाणवते. खरं तर ८-९ वर्षांची मुलगी असो वा, इतर कुणी, अभिनय ह्या कणखर आधारावर चित्रपट उभा आहे. वामीका गब्बीने 'ज्योती उज्वल निकम' ह्या ध्येयासक्त पुरुषाच्या ध्येयाची जाण आणि कदर असलेल्या स्त्रीची भूमिका छान साकारली आहे.

हल्ला, त्यानंतर कसाबचं पकडलं जाणं, मग कोर्टातले युक्तिवाद आणि फाशी हा सिनेमाचा मूळ गाभा आहे. तरी ह्या सगळ्याच्या भोवती हरामखोर (सांसदीय भाषेत लिहिलंय, इथे मनातील तीव्र शिवी घालून वाचणे) लोकांनी मग ते देशातले असो व देशाबाहेरचे ह्यांनी रचलेला भगवा आतंकवाद आणि तो सिद्ध करण्याची इथल्या बांडगुळांची चाललेली धडपड मात्र ह्यात कुठेच आलेली नाही. 
सिनेमा मुद्देसूद ठेवण्याच्या प्रयत्नात हा मुद्दा वगळावासा वाटणे ही चूक मात्र अक्षम्य आहे.

सिनेमात एकंच गाणं आहे, त्याचीही गरज नव्हती, पण ते छान जमलं आहे. मी हे परीक्षण लिहायला उशीर केलेला आहे. सिनेमा चित्रपटगृहात आहे की नाही ठाऊक नाही. असल्यास जाऊ शकता. OTT वर बघितलात तर मात्र शहिदांच्या बलिदानाची जाणीव ठेवून चित्रपट एका बैठकीत बघा. Snacker Watch म्हणून अनेक चित्रपट मिळतील, पण हा तो चित्रपट ठरू नये.

लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 19
प्रतिक्रिया 0

प्रतिक्रिया