चॅप्टर - १ : द बॅकड्रॉप (The Backdrop)
SCKLM (Standard Chartered Kuala Lumpur Marathon) ही कौलालम्पूर, मलेशियामधली महत्त्वाची, फर्स्ट क्लास आणि मानाची मॅरेथॉन स्पर्धा आहे. ऑक्टोबर २०२२ मध्ये SCKLM हाफ-मॅरेथॉनमध्ये भाग घेतला होता. मॅरेथॉन स्पर्धेत भाग घेण्याची ती माझी पहिलीच वेळ होती. खूप उत्साहात मी ती हाफ-मॅरेथॉन पूर्ण केली. त्यावेळी, ती किती वेळात पूर्ण केली हा प्रमुख मुद्दा नव्हता; हाफ-मॅरेथॉन पूर्ण करणं हेच महत्त्वाचं आव्हान होतं. ते पूर्ण झाल्यावर प्रचंड आनंद झाला होता. अत्यंत उत्साही होऊन ज्या काही भावना उचंबळून आल्या होत्या त्यांचं शब्दांत वर्णन करणं कठीण आहे. त्या फसफसत्या उत्साहात मी फिनिश लाइनवर मेडल देणाऱ्या स्वयंसेवकाकडे माझं मेडल घ्यायला गेलो. त्याने फक्त मेडल आणि एक १०० प्लसची बाटली दिली. त्यावर मी त्याला विचारलं, "फिनिशर टीशर्ट कुठे आहे?
तो हसला आणि म्हणाला, "सर, फिनिशर टीशर्ट फक्त फुल मॅरेथॉन पूर्ण केल्यावर मिळतो, हाफ मॅरेथॉन फिनिशर हा मॅरेथॉन फिनिशर नाही!"
कौलालम्पूरमधल्या इतर दुय्यम मॅरेथॉन स्पर्धांसाठी फिनिशर टीशर्ट मिळतात. मी तसे बरेच बघितले होते म्हणून मला वाटले होते की ह्या SCKLM मध्येही हाफ-मॅरेथॉनसाठी फिनिशर टीशर्ट असेल. तो स्वयंसेवक काही मनात ठेवून नक्कीच बोलला नसणार, पण मला मात्र ते बोलणं बोचलं आणि त्याचा घाव बसला. मनात म्हणालो, "लेका, एके दिवशी हा फिनिशर टीशर्ट तुझ्याच हातातून घेईन. हक्काने मिळवेन आणि नक्की घेईन!"
मनात असं बोलून एके दिवशी फुल मॅरेथॉन पूर्ण करायचं असं ठरवलं. ते ठरवलं खरं पण ५-६ तास सतत पळत राहणं हे काही खायचं काम नाही हे माहिती होतं. त्यामुळेच फुल मॅरेथॉन पूर्ण करायचं असं ठरवलं पण नेमकं कधी ते ठरवलं नव्हतं.
चॅप्टर - २ : 'द ग्राइंड (The Grind)'
त्यानंतर नियमाने दरवर्षी वेगवेगळ्या हाफ मॅरेथॉन स्पर्धांमध्ये धावत होतो. २०२५ मध्ये तर प्रत्येक तिमाहीत एक अशा हाफ मॅरेथॉन धावत होतो. गार्मीन स्पोर्ट्स-वॉचमध्ये आभासी गार्मीन कोच असतो, तो ट्रेनिंग प्लान बनवून त्याप्रमाणे रोज सराव सुचवत असतो. ते फॉलो करत, सराव करत, धावत होतो. पण हाफ मॅरेथॉन पूर्ण करण्याच्या वेळेत सातत्य नव्हतं. प्रत्येक वेळी पूर्ण करण्याची वेळ २:२५ ते २:५८ तास ह्यामध्ये दोलायमान असायची. हाफ मॅरेथॉन पूर्ण तर व्ह्यायची पण शेवटच्या ६-७ किमीमध्ये पाय गळून जाणे, क्रॅम्प येणे, दम भरून येणे असं व्हायचं. त्यामुळे फुल मॅरेथॉनची दिल्ली अजूनही दूर आहे हे कळत होतं आणि फिनिशर टीशर्ट आवाक्यात येण्यास अजून बराच अवकाश आहे असं मनाला समजावून सांगायचो.
ह्या दरम्यान माझ्या हाफ मॅरेथॉनच्या फेसबुकवरच्या पोस्ट्स बघून आपले मिपाकर बिका, बिपीन कार्यकर्ते (अखिल भारतीय मराठी संस्थळ सल्लागार) याने फोन करून मला त्याच्या एका Whatsapp ग्रुपात मेंबर करून घेतलं. तिकडे फक्त रोज काय व्यायाम केला ह्याची पोस्ट टाकायची, बाकी काहीही नाही. ना गुड मॉर्निंगची फुलं ना हाय हेल्लो. तिकडे सगळ्यांचे मेसेजेस बघून दडपण यायचं. आपण किती अनियमित आहोत ह्याची जाणीव झाली. आपला आजपर्यंतचा सराव किती अशास्त्रीय होता ह्याचा अंदाज आला आणि हाफ मॅरेथॉनची अनियमितता का होती हे कळून चुकलं. एका कोचचा गंडा बांधायला हवा असं प्रकर्षानं वाटू लागलं.
बिकाने, माझ्या, ग्रुपवरच्या सरावाच्या पोस्ट बघून, मी फुल मॅरेथॉनसाठी सराव करून फुल मॅरेथॉन ह्या वर्षी टार्गेट करावी ह्याचा घोष सुरू केला. एक महिनाभर माझं डोकं खाऊन माझी मानसिक तयारी करून घेतली. एका कोचचा गंडा बांधायला हवा ह्या माझ्या मताला दुजोरा देऊन त्याच्या कोचचं नाव मला सजेस्ट केलं, प्रशांत हिप्परगी. ह्या सरांनी 'डेका आयर्नमॅन' होण्याचा भीमपराक्रम केला आहे. भारतात फक्त दोनच असे महारथी आहेत ज्यांनी ही कामगिरी केली आहे. आयर्नमॅन म्हणजे ४ किमी पोहणे + १८० किमी सायकल चालवणे + ४२.२ किमी पळणे अशी Triathlon. ही आयर्नमॅन सलग १० वेळा, सलग ११ दिवसांत करणे म्हणजे डेका आयर्नमॅन. अशा महारथीचा गंडा फेब्रुवारी २०२६ ला बांधून घेतला आणि ऑक्टोबर २०२६ च्या SCKLM फुल मॅरेथॉनसाठी नाव नोंदवलं.
कोचसरांच्या प्लॅननुसार सराव चालू झाला. सुरुवातीला सोपा वाटणारा सराव पुढे पुढे शारीरिक शक्तीची प्रचंड परीक्षा घेणारा होऊ लागला. विकेंडचे लाँगरन्स १०-१२ किमी वरून २४-२५ किमी झाले आणि खडतर प्रवासाची जाण येऊ लागली. २५ किमी चा सराव, घराजवळ असलेल्या मलेशिया युनिव्हर्सिटीच्या आवारात एक ५ किमीचं वर्तुळ आहे, त्यात करायला गेलो होतो. त्या वर्तुळात एक मिनी टेकडी आहे त्यामुळे चढ उताराचाही सराव होणार होता. २१-२२ किमीपर्यंत सगळं सुरळीत चालू होतं पण २३ किमीला अचानक पोटऱ्यांमध्ये गोळा आला आणि पायाच्या तळव्यांना मुरडा आला आणि धावता सोडा चालताही येईनास झालं. बराचा वेळ रस्त्यावर पडून झोपून राहिलो. जरा बरं वाटल्यावर खुरडत खुरडत गाडी पर्यंत पोहोचलो, पाणी प्यायलो आणि मुलाला फोन केला, घ्यायला ये म्हणून.
कोचसरांना सगळा किस्सा सांगितल्यावर त्यांनी इलेक्ट्रोलाईटचं पाणी, सॉल्टस्टीक आणि लिक्विड जेल वापरून करायच्या फ्युइलिंगबद्दल (Fueling) तासभर माहिती दिली. सतत ३-४ तास धावल्याने प्रचंड घाम गळतो आणि त्यातून शरीरातले मिनरल्स बाहेर टाकले जातात. त्यामुळे सोडियम, पोटॅशियम आणि मॅग्नेशियम यांची डेफिशियन्सी होऊन क्रॅम्प येणे, पायात गोळे येणे असले प्रकार होतात. त्यासाठी सॉल्टस्टीक अत्यंत महत्त्वाची असते एंड्युरन्स रनिंगसाठी, जी ही सोडियम, पोटॅशियम आणि मॅग्नेशियम यांची डेफिशियन्सी भरून काढते.
हे समजावून सांगितल्यावर कोचसरांनी पुढच्या ३० किमी प्रॅक्टिस रनसाठी फ्युइलिंग प्लान तयार केला आणि त्यानुसार धावायचं असं मनावर बिंबवून घेतलं. त्यानुसार ३० किमी प्रॅक्टिस रन कसलाही अडथळा ना येता पूर्ण झाला आणि मी फुल मॅरेथॉनच्या मुख्य इव्हेंटसाठी मी तयार झालो. शेवटचा एक आठवडाभर हलका व्यायाम आणि धावण्याचे सोपे सराव करत ४ ऑक्टोबर २०२६ ची वाट बघू लागलो. ह्या सगळ्या प्रवासात माझा रनिंग-पार्टनर जयप्रकाश (JP) माझ्या सरावांना मला साथ द्यायचा. मी त्याच्यामुळेच मॅरेथॉन्स धावायला लागलो होतो. तो एक एक्सपर्ट मॅरेथॉन रनर आहे, त्याचं टार्गेट मॅरेथॉन ५ तासात पूर्ण करणं असतं. माझं टार्गेट ६ तासांत पूर्ण करण्याचं होतं. ते बरंच धाडसाचं होतं पण, "जब सपना देखाही है तो बडा देखते है!' असं ठरवलं होतं.
चॅप्टर - ३ : द जजमेंट डे (The Judgement Day)
४ ऑक्टोबर २०२६ च्या भल्या पहाटे, सगळी तयारी करून मॅरेथॅानच्या ठिकाणी गाडी पार्क करून पोहोचलो. आणि माझ्या रनिंग पार्टनर JP चा फोन आला, त्याने विचारले, “गाडी कुठे पार्क केलीस? वार्म अप रन झाला का? वार्म अप एक्सरसाइज झाला का?” तो अनुभवी रनर असल्याने तो माझ्या २ स्टार्टिंग-पेन पुढे होता म्हणून फोनवर चौकशी करत होता. मी त्याच्या आधी ३० मिनिटं पोहोचल्याने मी सगळं वॉर्म-अप करून चार्ज्ड झालो होतो. मी झोकात त्याला, “सब सेट हो गया है अभी सिर्फ दौडना शूरु करना है!” असं म्हणालो.
त्याने सगळी चेकलीस्ट रिव्ह्यू करताना मला विचारले, “सॅाल्टस्टीक का १ या २ पॅकेट लिया है?” हा प्रश्न ऐकला आणि माझ्या पायाखालची जमीनच सरकली कारण मी सॅाल्टस्टीकचं पाकीट घरीच टेबलावर विसरून आलो होतो. माझं घर जवळचं होतं, पण आता परत जाणं शक्य नव्हतं, फ्लॅग ॲाफला ५-१० मिनिटंच बाकी होती. मी जरा पॅाझिटीवीटी आणून त्याला म्हणालो, “देखते है, लिक्विड जेल के साथ मॅनेज कर लुंगा.” त्याला म्हणालो खरं पण खूपंच टरकलो होतो. २५ किमीच्या सराव रनचा भयंकर अनुभव आठवत होता आणि आता कसं काय होणार ह्याची चिंता जीव खाऊन गेली.
धावायला सुरुवात करून झाल्यावर, ५ किमी पूर्ण होतात न होतात तोच JP चा फोन आला, “KK Mart ओपन है, सॅाल्ट-स्टिक नही है लेकीनं हिमायलयीन सॅाल्ट है, ले लेना.” माझ्या जीवात जीव आला, लगेच हिमायलयीन सॅाल्टचं पाकीट घेऊन टाकलं.
फ्युइलिंग प्लान आणि हिमायलयीन सॅाल्टमुळे ३० किमी पर्यंत सगळं आलबेल आणि प्लॅनप्रमाणे चाललं होतं. ३०-३५ किमीच्या रेंजमध्ये २-३ फ्लाय ओव्हर चढायचे होते. तेव्हा लक्षात आलं की हिमायलयीन सॅाल्टच्या सगळ्या टॅबलेट्स संपल्या आहेत. नेमकं गरजेच्या वेळी टॅबलेट्स नाहीत. तोवर माझा पेस चांगला होता अगदी प्लॅनप्रमाणे सुरळीत. पण हाय रे कर्मा, ३५ किमी नंतर हॅमस्ट्रींगमधे गोळे यायला लागले आणि पेस खूपंच कमी करावा लागला. गार्मिनने लगेच बोंबाबोंब करायला सुरुवात केली की Plan Deviation by 2 min 14 sec. कळत असूनसुद्धा पेस पकडता येत नव्हता, जरा पेस वाढला की गोळा यायचा आणि ३९ किमीनंतर पोटऱ्यांनीही बंड पुकारलं. त्यामुळे शेवटचे दोन किमी चालत-धावत पूर्ण करावे लागले. ह्या सगळ्या पायांच्या दशावतारात माझं ६ तासांचं टार्गेट कोलमडून ते सात तासांवर गेलं असणार असं वाटत होतं कारण गार्मीन वॉचने डेव्हीएशनचं नोटिफिकेशन दिल्यापासून त्याच्याकडे परत बघायचं धाडसच होत नव्हतं.

आणि अचानक "शेवटचे ५०० मीटर" असा फलक समोर दिसला. त्या शेवटच्या टप्प्यातल्या रस्त्यावर दुतर्फा लोकं उभी होती आणि प्रोत्साहन देत होती, टाळ्या देत होती, टाळ्या वाजवत होती. ते सगळं वातावरण इतकं भारलेलं आणि उत्साहवर्धक होतं की मला एक प्रचंड ऊर्मी येऊन मी जोरात धावू लागलो, आनंदाने ओरडू लागलो आणि सुसाट वेगात फिनिश लाइन क्रॉस केली. क्रॉस करताना डोक्यावरच्या टायमर इंडिकेटरकडे लक्ष गेलं तो वेळ दाखवत होता ६:११:३३! मूळ टार्गेट पासून फक्त ११ मिनिटांचं डेव्हीईशन. हे अद्भुत होतं, आनंद उरात मावत नव्हता.
आणि, पुढे मॅरेथॉन स्वयंसेवक उभा होता. त्याच्या हातात होतं मेडल आणि त्याबरोबर होतंफिनिशर टी-शर्ट, ज्यासाठी केला होता हा सारा अट्टाहास!

| लेखनविषय: | |
|---|---|
| लेखनप्रकार |
मिसळपाव


प्रतिक्रिया
जबरदस्त.
फुल मॅराथॉन पळणे तर दूर नुसता विचार करणे सुद्धा येरागबाळ्याचे काम नाही.
दृढनिश्चय आणी अथक परिश्रम याला सलाम.
गुरूजीनां सादर प्रणाम. बिकां ना नमस्कार.
मैदानी खेळाचा पंखा-कर्नल,शिपाई.
चिकाटीचे अभिनंदन !!
चिकाटीचे अभिनंदन !!
बिका लोकाना असल्या…
बिका लोकाना असल्या उचापतिंसाठी पण उद्युक्त करतो हे माहीत नव्हते
😄 लाजवू नका हो विजुभाऊ!
In reply to बिका लोकाना असल्या… by विजुभाऊ
😄
लाजवू नका हो विजुभाऊ!
ब्रिजेश... You made us proud…
ब्रिजेश... You made us proud. That's all I want to say. मेहनत तुझी. श्रेय तुझे.
आता...... पुढचा मुक्काम!
कमाल...प्रेरणादायी!!ज्याच्या…
कमाल...प्रेरणादायी!!
ज्याच्या ज्याच्या लाइफमध्ये रनिंगचा चस्का येतो तो संपुर्ण बदलतो😇
मलाही असेच वेड लागले होते..माझी धाव ५ किमिपर्यंतच गेली.
सध्या पुन्हा ओवेर्वेट कडे काटा झुकल्याने जरा थांबले आहे...दिस वेटिंग पिरिॲड किल्लिंग मी🤕
क्या बात है....
अरे वाह क्या बात है, अभिनंदन. आपल्या चिकाटीचं मेहनतीचं कौतुक आहे. फूल मॅरेथॉन फिनीशरचा किताब मिळाल्याबद्दल मनापासून अभिनंदन. इकडे असते तर, पार्टीच दिली असती. कधी आलात तर, छ. संभाजीनगरला तर बसू.... जे होईन ते होईन लै कौतुक वाटलं. बीपीन कार्यकर्ते हे नाव ऐकल्यासारखं वाटतं, त्यांनी आपणास जे प्रोत्साहन दिलं, त्यांचेही मिपाकर मित्रमंडळाच्या वतीने आभार.
-दिलीप बिरुटे
( आनंद वाटलेला )
अभिमानास्पद. अभिनंदन...
अभिमानास्पद. अभिनंदन...
तुमचे आणि बिपिन कार्यकर्ते…
तुमचे आणि बिपिन कार्यकर्ते यांचेदेखील हार्दिक अभिनंदन!
विलक्षण प्रेरणादायी.अभिनंदन…
विलक्षण प्रेरणादायी.
अभिनंदन...!
तुमचे मनापासून अभिनंदन
तुमचे मनापासून अभिनंदन
छान प्रेरणादायी
छान तयारी केलीत तुम्ही, पण वर म्हटल्याप्रमाणे मॅरेथॉन धावणं येऱ्यागबाळ्याचं काम नाही. खूप मेहनत लागते. तुम्ही ती दाखवली.
अभिनंदन
अरे वा! अभिनंदन! तुम्हाला…
अरे वा! अभिनंदन! तुम्हाला प्रोत्साहित करणाऱ्या बिपिन कार्यकर्ते व तुमच्या प्रशिक्षकांचेही अभिनंदन!
मॅरेथॉन पूर्ण करणे येरागबाळ्याचे काम नाही. त्यासाठी आत्मविश्वास, परिश्रम व सराव आवश्यक आहे. मी प्रयत्नपूर्वक २५ मिनिटांत ४ किमी धावू शकत होतो. परंतु नंतर गुडघ्याचे लिगामेंट फाटल्याने धावणे कायमस्वरूपी थांबवावे लागले.
त्रिवार
अभिनंदन सोत्रि भाऊ!!!
अभिनंदन सोत्रि भाऊ!- (कधीतरी…
अभिनंदन सोत्रि भाऊ!
- (कधीतरी दोन किमी तरी सलग पळू शकू अशी इच्छा असलेला) कांदा लिंबू