आमच्या आर्ट किट्टीमध्ये सहभागी होऊन मला आता पाच महिने होऊन गेले. पहिले चार महिने वेगवेगळे कलाप्रकार शिकत-करत सप्टेंबर महिना आला आणि सगळ्यांना गणपतीचे वेध लागले. त्यामुळे आम्ही सप्टेंबर महिन्यात शाडूच्या मातीचा गणपती घडवायचा ठरवलं.
आर्ट किट्टी सुरू झाली, तेव्हा एका जागी बसून काही तरी सृजनात्मक करायला मनाचा खूप विरोध होत होता. त्यामुळे ऐनदिवशी बरं न वाटणे किंवा जावंसं न वाटणे असे प्रकार होत, रडतखडत माझी गाडी त्या जागी पोहोचायची. सुरुवातीच्या चार महिन्यांत जरा सवय झाल्याने मनातून होणारा हा विरोध जरा मावळायला लागला. पण शाडूच्या मातीची गणेश मूर्ती करायला मात्र एवढा उत्साह वाटत नव्हता.
कारण ह्याआधी युट्यूबवरचे व्हिडिओ बघून असं लक्षात आलं होतं की शिल्पकला हा जरा अवघडच प्रकार आहे. त्यात शाडूची माती जरा चिकट असल्याने घरातल्या कुंडीत वापरता येत नाही. तसेच मूर्ती जर acrylic रंगांनी रंगवली तर ती पर्यावरणपूरक होत नाही. त्यामुळे अट्टहासाने करून पाहावे असे काही वाटत नव्हते. पण आर्ट किट्टीमध्ये जे काही करायची संधी मिळेल ते करून पाहायचे असे ठरवले आहे. म्हणून गणपतीची मूर्ती करायची ह्यासाठी मनाची पूर्ण तयारी केली.
आमच्या कार्यशाळेची पूर्वतयारी म्हणून आदल्या दिवशीच आम्हाला घरी माती आणून, व्यवस्थित मळून ठेवायची होती. अगदीच पहिल्यांदा करत असल्याने लहान आकाराचा गणपती करायचे ठरवले. त्यामुळे एक किलो माती आणून घट्ट मळून ठेवली.
आमची कार्यशाळा २ दिवसांची होती. पहिल्या दिवशी मूर्ती घडवायची आणि दुसऱ्या दिवशी रंगवायची. आमच्या मॅमने तिथे गेल्यावर सर्वात आधी गणपतीची चित्रं दाखवली. साधारण कशा प्रकारचा गणपती करायचा हा संदर्भ मनात तयार झाला.
मळलेल्या मातीचे सहा गोळे केले. ह्या गोळ्यांमधून आधी पाय, त्यावर पोट, हात, सोंडेसहित डोके, कान असा गणपती आकार घ्यायला लागला. एका ओळीत जसं वर्णन केलं तेवढं सोपं हे काम नव्हतं. मातीच्या गोळ्यांना हवे ते आकार देणे, गणपतीची मूर्ती एकूण प्रमाणबद्ध होईल हे पाहणे ह्या सगळ्या गोष्टी अगदी कसोटी पाहणाऱ्या होत्या.
सुरुवातीला गणपतीचे पोट अगदीच सपाट दिसत होते. मग अजून माती वापरून त्याला लंबोदर केले. डोक्यासाठी घेतलेल्या मातीच्या गोळ्यातूनच सोंड काढायची ठरली. सुरुवातीला तिथे मॅमने जरा मदत केली. मग पुढे चेहरा, सोंड ह्यांना आकार देणे आणि डोळ्यांसाठी खाचा तयार करणे हे जमून आले. पण पायांना आकार देताना, मी घडवलेल्या गणपतीच्या मूर्तीची पावले मला बाहेर वळवता न आल्याने एकमेकांसमोर राहिली. म्हटलं असू दे, माझा गणपती बद्धकोनासनात बसून, योगासने करावीत असा संदेश देत आहे. गणपतीचे कान करताना ठरवले होते की कान सुपासारखे मोठे करायचे. तसे मोठ्ठे कान केले. जणू तो सांगत आहे की उत्तम श्रोता होता आले पाहिजे.
मी घडवत असलेला गणपती जरा उंच दिसत होता. तेव्हा मॅम म्हणाल्या की साधारण आपलं प्रतिबिंब आपण घडवत असलेल्या मूर्तीमध्ये पडते. असेलही असं. असो.
मूळ मूर्ती तयार झाल्यावर गणपतीला मातीचेच सोवळं परिधान करवणे, अंगावर दागिने घालणे हे त्यामानाने जमून आले. पण गणपतीच्या डोक्यावरचा फेटा आणि उंदीरमामा काही केल्या जमेनात. मग मॅम मदतीला धावून आल्या. गणपती आणि उंदीर तयार झाले. पाण्याचा हात लावत मूर्तीचा पृष्ठभाग एकसारखा करून घेतला. आणि मूर्ती तिथेच ठेवून घरी आलो.
दुसरा दिवशी अर्थातच रंगकाम करायचे होते. शिल्पकला ह्या प्रकारातले एकूण नवखेपण पाहता, मूर्तीमध्ये काही त्रुटी नक्कीच असणार हे माहीत होते. मूर्ती रंगवताना वेगवेगळे रंग वापरले तर कदाचित त्या त्रुटी अधिक उठून दिसतील म्हणून पूर्ण मूर्तीला गेरूसारखा तांबडा रंग लावायचे ठरवले. त्यामुळे रंगकाम त्यामानाने सोपे झाले. पूर्ण मूर्तीला एकसारखा रंग लावल्यावर भुवया काळ्या रंगाने रंगवायच्या असं ठरलं. एक भुवई रंगवली आणि मला दूरदर्शनवर पूर्वी लागणाऱ्या चंद्रकांतामधला क्रूरसिंग आठवला. मग मॅमशी चर्चा करून ठरवलं की भुवया नाही रंगवल्या तरी चालेल. मूर्तीच्या हातातील कंकण रुपेरी रंगाने रंगवली. उंदीरमामाला काळा रंग दिला रंगकाम आणि मूर्ती दोन्ही पूर्ण झाल्याने हुश्श झाले.
असं वाटलं की ह्यावर्षी गणपतीची आमच्या घरी पार्थिवरूपात येण्याची इच्छा होती म्हणून माझ्याकडून ही मूर्ती घडवली गेली. (४-५ वर्षांपूर्वी आम्ही गणपतीची पितळी मूर्ती आणली आहे. ही मूर्ती दर्शनी असते. बसवताना सुपारीचा गणपती बसवतो आणि त्या सुपारीचे विसर्जन करतो.)

ह्यावर्षीची गणेशचतुर्थी आमच्यासाठी जरा वेगळी होती. इतक्या वर्षांत प्रथमच दोन्ही मुली असणार नव्हत्या. त्यामुळे जी काही सजावट करायची होती ती मी एकटीने करायची होती. त्याबाबत डोक्यात तसे बरेच महत्त्वाकांक्षी विचार होते. पण मग हातात असणारा वेळ, मागे असलेली कामे पाहता साधेच काहीतरी करायचे ठरवले. पण तेही करायला मुहूर्त आदल्या रात्रीचा मिळाला. ह्यावर माझ्या मोठ्या मुलीने विचारले की 'आई, तुझी अजून इंजिनीरिंगची कामं आदल्या रात्री करायची सवय गेली नाही?' मुलं मोठी झाली की असा आरसा दाखवतील ह्याची मानसिक तयारी ठेवायची असते. असो.
सजावट अर्थातच युट्युबवर व्हिडिओ पाहूनच केले. पण अर्थातच त्यातही श्रम कमी नव्हतेच. त्यात वर्षातून एखाद्या वेळी असं काम करायला हाती घेतल्यावर अडखळायला होणार, अपेक्षेपेक्षा जास्त वेळ लागणार हे अपेक्षितच होते आणि झालेही तसेच.
अशा रीतीने सगळं कोडकौतुक करवून घेत, गणपती आमच्याकडे दिमाखात विरजमान झाला.
शेवटी काय - तूच कर्ता आणि करविता!

| लेखनविषय: | |
|---|---|
| लेखनप्रकार |
मिसळपाव
प्रतिक्रिया
सुंदर मूर्ती आणि लेख
सुंदर मूर्ती आणि लेख