रामायणातील ती एक सुवर्ण सकाळ होती... लंकाविजयानंतर अयोध्येत आनंदाचे साम्राज्य होते. माता सीता आपल्या महालात आरशासमोर बसून अत्यंत प्रेमाने आपल्या भाळी रक्तवर्णी शेंदुराचा टिळा लावत होत्या. तितक्यात तिथे प्रभू रामाचे परमभक्त, अथांग शक्तीचे सागर असणारे पवनपुत्र हनुमान आले. माता सीतेला कपाळावर तो लाल रंगाचा पदार्थ लावताना पाहून हनुमानाच्या निष्पाप आणि बालसुलभ मनाला प्रचंड कुतूहल वाटले. त्यांनी हात जोडून अत्यंत आदराने विचारले, "माते, हा कपाळावरील लाल बिंदू काय आहे? आणि तो तुम्ही का लावत आहात?"
माता सीतेने हनुमानाच्या चेहऱ्यावरील तो निष्पाप भाव पाहून मंद स्मित केले आणि म्हणाल्या, "हे मारुती, हा शेंदूर आहे. हा कपाळावर लावल्याने माझ्या स्वामींचे, म्हणजेच तुझ्या प्रभू श्रीरामांचे आयुष्य वाढते आणि त्यांच्यावर येणारे प्रत्येक संकट दूर होते."
'प्रभू रामांचे आयुष्य वाढते आणि संकट दूर होते' हे शब्द हनुमानाच्या कानात पडले आणि त्यांच्या अंतःकरणात भक्तीचा जणू एक प्रचंड कल्लोळ उठला! त्यांच्या मनात विचार आला, 'जर माता सीतेने लावलेल्या चिमूटभर शेंदुराने माझ्या प्रभूंचे आयुष्य वाढत असेल, तर मी माझ्या संपूर्ण शरीरालाच शेंदूर का माखू नये?' हनुमानासाठी प्रभू रामाच्या आयुष्यापेक्षा आणि सुखापेक्षा जगात दुसरी कोणतीच गोष्ट मोठी नव्हती.
ते तडक महालाबाहेर पडले. त्यांनी शेंदुराची मोठी भांडी घेतली, त्यात सुगंधी तेल मिसळले आणि आपल्या पायाच्या नखापासून ते डोक्याच्या शेंडीपर्यंत, संपूर्ण अथांग शरीराला त्या शेंदुराने माखून घेतले! त्यांचे रूप आता पूर्णपणे रक्तवर्णी, म्हणजेच धगधगत्या शेंदरी रंगाचे झाले होते. याच अवस्थेत, डोळ्यांत प्रभू रामाच्या नावाचा अश्रू आणि ओठांवर 'जय श्रीराम'चा गजर करत हनुमान थेट राजसभेत पोहोचले.
राजसभेत उपस्थित असलेले सर्व जण हनुमानाचे ते रूप पाहून थक्क झाले, काहींना हसू आवरेना. पण जेव्हा प्रभू श्रीरामांनी हनुमानाकडे पाहिले, तेव्हा त्यांच्या डोळ्यांतून प्रेमाश्रू वाहू लागले. रामाने विचारले, "मारुती, हे काय रूप धारण केले आहेस?"
हनुमान प्रभूंच्या चरणी साष्टांग दंडवत घालत गदगद आवाजात म्हणाले, "प्रभू, माता सीतेच्या चिमूटभर शेंदुराने जर तुमचे आयुष्य वाढणार असेल, तर तुमच्या या दासाने आज आपल्या संपूर्ण शरीरालाच शेंदूर अर्पण केला आहे. आता मृत्यूही तुमच्या वाटेला जाण्याचे धाडस करणार नाही!"
भक्तीची ही पराकाष्ठा पाहून साक्षात जगन्निवास प्रभू रामचंद्र भावुक झाले. त्यांनी पुढे होत हनुमानाला घट्ट मिठी मारली. रामाच्या स्पर्शाने हनुमानाचे शरीर पावन झाले. प्रभू रामांनी त्याच क्षणी संपूर्ण विश्वाच्या साक्षीने मारुतीला वरदान दिले: "हे अंजनीसुता, आजपासून जी कोणती व्यक्ती तुला अत्यंत श्रद्धेने शेंदूर अर्पण करेल, तिच्या आयुष्यातील सर्व दुःखे, संकटे आणि इडा-पिडा एका झटक्यात नष्ट होतील. तुझा हा शेंदरी रंग कलियुगात भक्तांच्या रक्षणाचे सर्वात मोठे कवच बनेल!"
...आणि इथूनच 'शेंदूर' आणि 'देवमूर्ती' यांचे अतूट नाते जोडले गेले! हनुमानाच्या या अथांग भक्तीच्या कथेने संपूर्ण समाजमनावर इतका मोठा प्रभाव टाकला की, पुढे चालून वीरश्री, पराक्रम आणि संहारक शक्ती असणाऱ्या मारुती, गणपती, काळभैरव यांसारख्या सर्वच जागृत आणि उग्र देवतांना भक्तांनी मोठ्या श्रद्धेने शेंदूर वाहण्यास सुरुवात केली. भक्तांच्या मनात असा दृढ विश्वास निर्माण झाला की, देवाला शेंदूर अर्पण केल्याने किंवा त्याच्या मूर्तीला शेंदूराचे लेपन केल्याने देव लवकर प्रसन्न होतो आणि आपल्या घरावरील सर्व संकटे दूर करतो.
या धार्मिक भावनेला पुढे व्यावहारिकतेचीही साथ मिळाली. जुन्या काळी मंदिरे उघडी असायची, जिथे मूर्तींवर ऊन, वारा, आणि पाण्याचा थेट मारा व्हायचा. प्राचीन शिल्पकारांनी आणि पुजाऱ्यांनी पाहिले की, शेंदूर हा तेलात कालवल्यानंतर एक उत्तम संरक्षक रोगण म्हणून काम करतो. त्यामुळे मूर्तीचा पाषाण वर्षानुवर्षे सुरक्षित राहावा, त्याला तडे जाऊ नयेत आणि हवामानाचा त्यावर परिणाम होऊ नये, म्हणून मूर्तींना तेल-शेंदूराचे जाड कवच लावण्याची पद्धत रूढ झाली. अशा प्रकारे, हनुमानाच्या पवित्र भक्तीतून जन्माला आलेली ही शेंदूर लावण्याची परंपरा काळाच्या ओघात थेट देवमूर्तींच्या संरक्षणाचे आणि पूजेचे एक अविभाज्य अंग बनली!
सिंदूरं शोभनं रक्तं सौभाग्यं सुखवर्धनम्।
शुभदं कामदं चैव सिंदूरं प्रतिगृह्यताम् ॥
...ॐ श्री हनुमते नमः, सिंदूरं समर्पयामि।
हे देवा, हा शेंदूर अत्यंत शोभिवंत, लाल रंगाचा, सौभाग्य आणि सुख वाढवणारा आहे. शुभ फळ देणारा आणि सर्व मनोकामना पूर्ण करणारा हा पवित्र शेंदूर आपण माझ्याकडून स्वीकारावा आणि माझ्यावर कृपा करावी.
पण काही मूर्ती या शेंदुराच्या लेपात हरवल्या.....अनेक काळ मूळ स्वरूप लपवून लोक परंपरेच्या भाग होत राहिल्या.
विलोभन प्रकटीकरणाचा एक अद्भुत प्रवासशतकानुशतके मानवी श्रद्धेने आणि भक्तीच्या भावविभोर थरांनी ज्या पाषाणाला वेढून ठेवले होते, तो पाषाण एका रात्रीत आपले मौन सोडतो आणि त्या शेंदरी गर्भातून एक अलौकिक, सुबक आणि काळ्या पाषाणातील देखणी कलाकृती भूतलावर अवतरते. हा केवळ एका मूर्तीवरील शेंदूर निघण्याचा प्रवास नाही, तर काळाच्या उदरात दडलेला इतिहास आणि भक्तीचे आदिम रूप पुन्हा जिवंत होण्याचा सोहळा आहे. जेव्हा दोन-तीन पिढ्यांची जुनी आवरणे सुकतात, कडक होतात आणि मूर्ती व त्या शेंदरी कवचात एक सूक्ष्मातिसूक्ष्म पोकळी तयार होते, तेव्हा निसर्गाच्या एका अद्भुत नियमाने बाहेरची हवा आत वेगाने घुसते आणि एका मोठ्या आवाजासह ते संपूर्ण कवच गळून पडते. यालाच आपल्या लोकपरंपरेत 'खोळ पडणे' किंवा 'चोला छोडना' ,'वज्रलेप उतरणे 'म्हणतात. एकेकाळी या घटनेला अरिष्ट किंवा अपशकुन मानले जायचे, पण आज हेच प्रकटीकरण भक्तांच्या डोळ्यांत आनंदाश्रू आणणारे आणि इतिहासकारांना थक्क करणारे ठरत आहे.या दैवी प्रक्रियेतून ज्या मूर्ती भक्तांसमोर आल्या, त्यांचे रूप थक्क करणारे आहे.
नुकतेच धाराशिव जिल्ह्यातील भूम तालुक्यात माणकेश्वर येथे एका अशाच पुरातन मंदिरात शेंदुराखाली दबलेल्या सरस्वतीने मोकळा श्वास घेतला. हे ठिकाण १२ व्या ते १३ व्या शतकातील शिलाहार-यादवकालीन प्रगत शिल्पकलेचा एक उत्कृष्ट नमुना मानले जाते. रासायनिक संवर्धनानंतर मूर्तीवरील बारीक कोरीवकाम, मकरतोरण आणि कीर्तीमुख यांसारखी अद्वितीय मूर्तिशास्त्रीय लक्षणे स्पष्टपणे दिसून आली आहेत, जी प्राचीन ग्रंथांमधील महासरस्वतीच्या वर्णनाशी तंतोतंत जुळतात.पिढ्यानपिढ्या नवजात बालकांचे नशीब लिहिणारी उग्र 'सटवाई देवी' म्हणून पूजली गेलेली मूर्ती, जेव्हा शेंदूर आणि सिमेंटच्या पाशातून मुक्त झाली, तेव्हा १२ व्या शतकातील शांत, सात्त्विक आणि अद्वितीय कलाकुसर असलेली महासरस्वती म्हणून प्रकट झाली. हातात वीणा, अक्षमाला आणि पायापाशी हंस घेऊन अवतरलेल्या या ज्ञानदेवतेने संस्कृतीच्या एका विस्मृत पानावरील धूळ झटकून टाकली.
ऐतिहासिक दृष्टीने हा शोध खूप महत्त्वाचा आहे, कारण याद्वारे मध्ययुगातील एक वैदिक देवतेचे रूप काळानुरूप लोकपरंपरेत आणि मातृदेवता पूजेच्या सटवाई देवी प्रवाहात कसे रूपांतरित झाले, याचा अभ्यास करण्याची एक नवीन दिशा इतिहासकारांना मिळाली आहे.तसेच ग्रामदैवत ,लोकपरंपरा यांचाही प्रवास या घटनांनी नव्याने अभ्यासला जातो .
आधी

https://www.loksatta.com/aurangabad/dharashiv-mankeshwar-temple-satwai-…
मध्ययुगात जेव्हा परकीय आक्रमणे किंवा राजकीय अस्थिरतेमुळे मुख्य मंदिरे दुर्लक्षित झाली, तेव्हा सामान्य लोकपरंपरेने या मूर्तींचे रक्षण केले. वैदिक संस्कृतीतील 'सरस्वती' ही ज्ञान आणि कलेची शांत देवतेच्या रूपात पूजली जाते, तर लोकपरंपरेतील 'सटवाई' प्रामुख्याने नवजात बालकांचे रक्षण करणारी आणि नशिबाचे लेख लिहिणारी उग्र किंवा मातृदेवता मानली जाते. या परिवर्तनामुळेच एका शांत आणि सात्त्विक देवतेच्या समोर कोंबड्या-बोकड्यांचा बळी देण्यासारखी उग्र लोकप्रथा सुरू झाली, जी मूळ सरस्वती पूजनात कधीही नसते.
या अशा अनेक मूर्ती या निमिताने आठवत राहतात.ज्या मूळ रूपाने नाही तर शेंदूर प्रक्रियाने हरवल्या होतात.
१.नागपूर जवळील रामटेक टेकडी ही प्राचीन काळी 'रामगिरी' म्हणून ओळखली जात असे.येथल्या राजसी केवळ नरसिंहानेदेखील अनेक काळ शेंदुराच्या घुसमाटाखाली काढले.तो नरसिंह ना जाणे किती शतके वाट पाहत होता.डॉ. अ. प्र. जामखेडकर या संशोधकाने त्याला अखेर जगासमोर पुन्हा नव्याने येण्याची संधी दिली .
(ही मुख्य मंदिरासमोर आणखी एक लहान मंदिर असून त्यातही नृसिंहाची मूर्ती आहे, परंतु या मूर्तीची हनुमान म्हणून पूजा केली जाते.)
हा तो राजसी नरसिंह
इ.स. ५ व्या शतकात या भागावर वाकाटक घराण्याचे राज्य होते. गुप्त साम्राज्याचे सम्राट चंद्रगुप्त द्वितीय (विक्रमादित्य) यांची कन्या प्रभावती गुप्त हिचा विवाह वाकाटक नरेश रुद्रसेन दुसरा याच्याशी झाला होता. प्रभावती गुप्त ही अत्यंत कर्तबगार आणि विष्णूची परम भक्त (परमवैष्णव) होती. तिने तिच्या शासनकाळात (इ.स. ४२० ते ४५० दरम्यान) रामगिरीवर विष्णूच्या विविध अवतारांची मंदिरे उभारली, ज्यामध्ये केवल नृसिंह मंदिराचा समावेश होता.परंतु, मध्ययुगानंतर राजकीय स्थित्यंतरे आणि आक्रमणांमुळे ही मंदिरे मुख्य प्रवाहातून दुर्लक्षित झाली. स्थानिक लोकपरंपरेने या वास्तू जतन केल्या, पण देवतेचे मूळ शास्त्रीय रूप काळाच्या ओघात विस्मरणात गेले. नृसिंहाच्या या मूर्तीचे उग्र रूप आणि त्यावर वर्षानुवर्षे चढवले जाणारे शेंदुराचे जाड थर यामुळे स्थानिक लोक तिला 'हनुमान मूर्ती' मानून तिची पूजा करू लागले.
१९८१-१९८३ च्या दरम्यान, पुरातत्व विभागाच्या देखरेखीखाली आणि इतिहासकार डॉ. अ. प्र. जामखेडकर तसेच कला अभ्यासक हान्स बेकर यांच्या संशोधनादरम्यान या मंदिराच्या वैज्ञानिक जतनाचे काम हाती घेण्यात आले.शेंदूर कवच उतरवणे: जेव्हा मूर्तीवरील शेंदुराचे शेकडो वर्षांचे जाड लेप अत्यंत काळजीपूर्वक, शास्त्रीय आणि रासायनिक प्रक्रियेने काढण्यात आले, तेव्हा हनुमान समजली जाणारी मूर्ती प्रत्यक्षात काळ्या पाषाणातील अत्यंत भव्य आणि देखणी केवल नृसिंहाची द्विभुज मूर्ती असल्याचे उघड झाले. या मूर्तीच्या एका हातात 'प्रयोग चक्र' उभे धरलेले सुदर्शन चक्र स्पष्टपणे दिसले, जे वाकाटक काळातील वैष्णव शिल्पकलेचे मुख्य वैशिष्ट्य आहे.
या जतन प्रक्रियेदरम्यान केवळ मूर्तीच उघड झाली नाही, तर मंदिराच्या मंडपाच्या आतील भिंतीवर शेंदूर आणि मातीच्या थराखाली लपलेला १५ ओळींचा संस्कृत भाषेतील आणि उत्तर-ब्राह्मी किंवा गुप्त ब्राह्मी लिपीतील शिलालेख प्रकाशात आला.
शिलालेखाचे ऐतिहासिक महत्त्व आणि संदर्भाची पुष्टीहा शिलालेख इतिहासकारांसाठी एक सुवर्णखजिना ठरला, कारण त्याने अनेक ऐतिहासिक रहस्यांवरून पडदा उचलला.या शिलालेखात गुप्त सम्राट चंद्रगुप्त (द्वितीय) आणि वाकाटक राजघराण्याची अधिकृत वंशावळी आणि त्यांच्यातील वैवाहिक संबंधांची सविस्तर नोंद आढळली. प्रभावती गुप्त यांच्या एका अज्ञात कन्येने (अतिभवती) तिच्या आईच्या स्मरणार्थ हे मंदिर आणि 'कदलीवाटक' नावाच्या गावाजवळ पाण्याचा जलाशय बांधल्याचा उल्लेख यात आहे. यावरून मंदिराचा निर्मिती काळ इ. स. ४२० ते ४५० दरम्यानचा असल्याचे तंतोतंत सिद्ध झाले.राजकीय संघर्षाचा पुरावा: इतिहासकारांच्या मते, या शिलालेखात प्रभावती गुप्त यांच्या मुलीचा विवाह तिचा मामा घटोत्कचगुप्त जो माळव्याचा गुप्त राज्यपाल होता याच्याशी झाल्याचा आणि नंतर गुप्त साम्राज्यात झालेल्या सत्तासंघर्षाचा अत्यंत महत्त्वाचा संदर्भ मिळतो.
२.नाशिक जिल्ह्यातील वणी येथील सह्याद्रीच्या सात शिखरांच्या कुशीत वसलेले श्री सप्तशृंगी देवी शेंदूर निघाल्यामुळे मूर्तीचा बटबटीतपणा पूर्णपणे नाहीसा झाला असून, देवीच्या चेहऱ्यावर एक अलौकिक शांतता, मंद स्मित आणि अतीव सात्त्विकता दिसून येते. गडावर येणारा प्रत्येक भक्त मातेचे हे रूप पाहून स्वतःचे भान हरपून बसतो.महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठांपैकी आद्य शक्तीपीठ मानले जाते.सप्टेंबर २०२२ मध्ये पुरातत्व विभाग आणि मंदिर प्रशासनाने केलेल्या ऐतिहासिक संवर्धन प्रक्रियेत, या स्वयंभू मूर्तीवरील तब्बल २ हजार किलो वजनाचा शेंदूर लेप अत्यंत शास्त्रोक्त पद्धतीने काढण्यात आला, ज्यामुळे आदिमायेचे अतिप्राचीन व विलोभनीय रूप प्रकाशात आले .
थेट जिवंत पाषाणात कोरलेली ही भव्य मूर्ती सुमारे १० फूट उंचीची असून ती अठरा हातांची -अष्टादशभुजा आहे, ज्यामध्ये चक्र, त्रिशूळ, शंख आणि धनुष्य-बाण यांसारखी विविध आयुधे अत्यंत बारीक कोरीवकामासह स्पष्ट दिसू लागली आहेत. शेंदूर निघाल्यानंतर मातेचे विशाल आणि तीक्ष्ण नेत्र थेट भक्तांच्या रोखाने सरळ समोर पाहत असल्याचे उघड झाले, ज्यामध्ये एकाच वेळी दुष्टांचा संहार करण्याचे सामर्थ्य आणि भक्तांसाठीची वात्सल्यपूर्ण करुणा जाणवते. देवीच्या मुखमंडलावरील अलौकिक शांतता, मंद स्मित, कानांतील कुंडले आणि गळ्यातील हार पाषाणावर इतके सुंदर कोरलेले दिसतात की, सभोवतालच्या धुक्या आणि दरीच्या अथांग निसर्गसौंदर्यात गाभाऱ्यात उभी असलेली ही जगदंबा पाहणे भक्तांसाठी डोळ्यांचे पारणे फेडणारा अनुभव ठरतो.इ.स. १७६८ मध्ये पेशवे काळात देवीचा खोळ नैसर्गिकरीत्या पडल्याची ऐतिहासिक नोंद आहे
३. पुण्याचे ग्रामदैवत असलेल्या कसबा गणपतीच्या मूर्तीवरील दुरुस्ती व जतन प्रक्रियेदरम्यान सुमारे ९०० किलो वजनाचा शेंदूर लेप काळजीपूर्वक काढण्यात आला. जानेवारी २०२६ मध्ये पूर्ण झालेल्या या प्रक्रियेनंतर छत्रपती शिवाजी महाराज आणि जिजाबाई यांच्या काळापासून पूजली जाणारी, अंदाजे १५ व्या शतकातील अत्यंत मनोहारी चतुर्भुज मूर्ती तिच्या मूळ दगडी सिंहासनासह प्रकट झाली.श्री जयति गजानन मूळ मूर्ती साधारण २ फूट उंच असून चतुर्भुज आहे. चतुर्भुज पैकी एक डावा हात अभय मुद्रेत, एक उजवा हात आशीर्वाद मुद्रेत आहे. दुसर्या डाव्या हातात मोदक आणि मोदकावर सोंड ठेवलेली असून, उजव्या बाजूला खालच्या बाजूस मूषक वाहन आहे. ही मूर्ती डाव्या सोंडेची असून मूर्तीची अर्ध पद्मासनाची बैठक आहे. लंबकर्ण आणि लंबोदर ही मूर्तीची इतर वैशिष्ट्ये आहेत.
नंतर
आधी
४.उंटाडे मारुती मंदिर हे रास्ता पेठेतील सुमारे 350 वर्षांहून अधिक पुरातन देवस्थान आहे. सरदार रास्ते हे पेशव्यांचे सेनाप्रमुख होते. त्यांच्याकडे येणाऱ्या व्यापाऱ्यांचे उंट येथे बांधले जात. त्यामुळे याला “उंटाडे मारुती’ असे नाव देण्यात आले. सन 1908 साली सरदार श्रीनिवास मुदलीयार यांनी त्यांची जागा केईएम हॉस्पिटलला दिली. त्याचबरोबर या देवस्थानाचा आणि मंदिराचा जीर्णोद्धार केल्याचा इतिहास आहे.शेंदूर काढल्यानंतर यातून सुमारे 7 पोती शेंदूर लेपन जमा झाले आहे. यामुळे काळ्या पाषाणातील देखणी, सुबक मूर्ती दिसत आहे. या मूर्तीचा मानवी चेहरा आहे. तर मारुतीच्या डोक्यावरील मुकूट कमलपुष्पाप्रमाणे आहे. उजवा हात आशीर्वादपर असून, डाव्या हातात गदा आहे. दोन्ही पायांमध्ये झोपलेला कली असल्याचे धोंडफळे यांनी सांगितले.
https://www.dainikprabhat.com/untade-maruti-appeared-in-its-original-fo…
५.महाराष्ट्रातील प्रसिद्ध अष्टविनायक मंदिरांमधील मूर्तींवरही दर अनेक वर्षांनी शेंदूर कवच नैसर्गिकरीत्या गळण्याची किंवा ते शास्त्रोक्त पद्धतीने काढण्याची परंपरा आहे. या प्रक्रियेला धार्मिक परिभाषेत 'खोळ उतरणे' असे म्हणतात. शेंदूर काढल्याने मूर्तीचा मूळ पाषाण दीर्घकाळ सुरक्षित राहतो आणि मूर्तीचा आकार मूळ रचनेनुसार पूर्ववत स्पष्ट होतो.
मूर्तीला शेंदूर लावण्यामागे धार्मिक आणि व्यावहारिक अशी दोन्ही कारणे आहेत.धार्मिक मान्यतेनुसार, लाल किंवा नारिंगी शेंदूर हा ऊर्जा, पराक्रम आणि रजोगुणाचे प्रतीक मानला जातो, तसेच रामायणातील कथेनुसार प्रभू रामाच्या दीर्घायुष्यासाठी हनुमानजींनी आपल्या संपूर्ण अंगाला शेंदूर लावला होता, म्हणूनच मारुती, गणपती आणि भैरवनाथ यांसारख्या देवतांना शेंदूर अर्पण करण्याची परंपरा आहे. व्यावहारिक दृष्टिकोनातून, जुन्या काळात मूर्तीचा पाषाण ऊन, वारा आणि पाण्यापासून खराब होऊ नये म्हणून त्यावर तेल-शेंदूराचे लेपन केले जायचे, जे एका नैसर्गिक वॉटरप्रूफ कोटसारखे काम करायचे. हा शेंदूर प्रामुख्याने दोन पद्धतींनी तयार केला जातो, ज्यातील पहिल्या नैसर्गिक पद्धतीमध्ये 'शेंदरी' नावाच्या झाडाच्या फळांच्या बियांपासून किंवा हळद, चुना आणि विशिष्ट प्रमाणात पारा एकत्र करून पारंपरिक शेंदूर बनवला जातो. तर दुसऱ्या व्यावसायिक किंवा रासायनिक पद्धतीमध्ये शिशाचे ऑक्साईड -Lead Oxide वापरून आधुनिक नारिंगी शेंदूर तयार केला जातो.
-भक्ती
संदर्भ -
https://www.loksatta.com/aurangabad/dharashiv-mankeshwar-temple-satwai-…
https://sanatanprabhat.org/marathi/992852.html
https://www.prahaar.in/2026/01/01/repair-of-the-vermilion-shell-on-the-…
https://pilgrimdata.in/temple/keval-nrsinh-rudra-nrsinh-temple-mahakavi…
https://www.dainikprabhat.com/untade-maruti-appeared-in-its-original-fo…
मिसळपाव







प्रतिक्रिया
बहुतेक सर्वच मूर्त्यांची मुळ…
बहुतेक सर्वच मूर्त्यांची मुळ रुपे विलोभनिय अन हरखून जाण्यासारखी असावीत. तुम्ही दिलेल्या उदाहरणांमध्ये हे ताडता येते. जे खरे स्वरूप आहे ते जपले पाहीजे.
दुसरे असे की अशा ऐतिहासीकदृष्ट्या महत्वाच्या अशा मूर्त्यांना नैसर्गीकपणेच जपले पाहीजे. दूध, दही, अगदी पाणी तत्सम पदार्थांनी त्यांना अभिषेक करणे वगैरे बंद केले पाहीजे. मुर्तीवर काही रासायनीक पदार्थांचा थर आजकाल देतात तो योग्य की अयोग्य याचाही उहापोह झाला पाहीजे, कारण त्यात मूर्तीचे मुळ रूप कितीही केले तरी झालोळले जातेच.
अभासपूर्ण लेख. लिहीतांना घेतलेले कष्ट जाणवतात.
अतिशय सुंदर माहितीपुर्ण लेख.
धन्यवाद.
शेंदूर लाल चढ़ायो अच्छा गजमुखको।
दोंदिल लाल बिराजे सुत गौरिहरको॥
हाथ लिए गुडलद्दु सांई सुरवरको।
महिमा कहे न जाय लागत हूं पदको॥
लेप काढल्यामुळे मुर्ती स्वस्वरूपात अतिशय विलोभनीय दिसत आहेत.
सप्तशृंग गडावर मी २०२४ मधे गेलो होतो. मातेचे गर्भगृह तीन बाजूने उघडे असल्याने मनसोक्त दर्शन झाले. हेच एक मंदिर असे आहे की कितीही वेळ रांगेत उभे राहीले तरी कमीच वाटते. कारण देवीचे दर्शन सतत होत रहाते.
सरस्वती आणी सटवाई एकच देवी कारण विद्येची देवता जी तुमचे आमचे सर्वांचे नशीब लिहीते.
रोचक माहिती
शेंदूर कसा बनवतात ते सांगितल्याबद्दल आभार.
@स्वधर्म
In reply to रोचक माहिती by स्वधर्म
शेदुराचे झाड असते.शाशास्त्रीय नाव बिक्सा ओरेलाना' (Bixa orellana) आणी बोली भाषे 'कुमकुम किंवा कुंकवाचे झाड. लावल्यानंतर "लिची फळा", प्रमाणे झुपक्यातून फळे लागतात. लाल फळे सुकल्यावर त्यातून मोहरीच्या देण्या एवढे बीज निघते त्याची दळून बारीक पावडर करतात.
बाजारात मिळणारा शेंदूर रासायनिक प्रक्रिया करून बनवतात. त्यामधे लाल शिसे (Lead Oxide) वापरतात.
घरगुती शेंदूर हळद आणी चुना एकत्र करून बनवतात.
शेंदूर खाल्याने आवाज जातो असे म्हणतात. शरीरावर घातक परिणाम होतात.
मी जंगलात फिरायला जातो तीथे शेंदूरा ची झाडे आहेत. फार कमी लोकांना माहिती असते. एक दिवस एक महिला फळांचा गुच्छ गुलदस्त्यात सजवण्यासाठी घेऊन चालली होती. तीला संभाव्य धोके सांगीतल्यावर तीने तो गुच्छ तीथेच फेकून दिला.
शेंदूर खाल्याने आवाज जातो…
In reply to @स्वधर्म by कर्नलतपस्वी
शेंदूर खाल्याने आवाज जातो असे म्हणतात. शरीरावर घातक परिणाम होतात.
खरी गोष्ट आहे.
मराठवाड्यात आमचे तीन पिढ्यांचे कौटुंबिक मैत्री असलेले, पंचक्रोशीत दरारा असलेले, आमच्या शेजारच्या गावातील सरपंच, त्यांना कुणीतरी खाण्यातून शेंदूर दिला आणि त्यांचा आवाज बसला. बाकी सगळे शारीरिक व्यवहार सुरळीत होते पण बोलायचं असेल तर मात्र एक एक शब्द उच्चारायलाही प्रचंड कष्ट पडायचे. दहा-बारा वर्षांपासून ते त्याच अस्पष्ट-आवाज अवस्थेत होते. आवाज बंद झाला तरीही त्यांचा दरारा कायम होता. वर्षभरापूर्वी ते वृद्धापकाळाने गेले.
कट्यार काळजात घुसली..
In reply to शेंदूर खाल्याने आवाज जातो… by कांदा लिंबू
या नाटकात खाॅ साहेबांना वाटते की त्यांना राजगायक बनवण्यासाठी त्यांच्या बेगमने पंडितजींना जेवणात शेंदूर खायला घातला. म्हणून ते बेगमला आपल्या बरोबर राजभवनात घेऊन येत नाही. आणी या गोष्टीचा मलाल त्यांना नेहमी राहिला. चांद उस्मान सुद्धा बेगमेला सामील असावेत अशी शंका त्यांनी व्यक्त केली.
पुरूषोत्तम दारव्हेकरांचे अप्रतिम नाटक.
खूप छान आणि वेगळ्या…
खूप छान आणि वेगळ्या विषयावरचा लेख
खूप छान माहिती मिळाली…
खूप छान माहिती मिळाली. अभ्यासपूर्ण लेख आहे. इतके दिवस शेंदुराला फक्त डोळे चिकटवलेल्या मूर्ती बघून, शेंदूर निघाला तर मूर्तीचे रूप इतके विलोभनीय असू शकेल असं वाटलं पण नव्हतं. किंबहुना काही ठिकाणी ओबडधोबड दगडाला देव मानण्यासाठी शेंदूर लावत असावेत असंही वाटायचं. तुमच्या लेखामुळे अनेक शेंदुरयुक्त मूर्तींमागे प्राचीन सुबक मूर्ती असेल हे लक्षात आलं.
खूपच छान माहिती आणि सुंदर…
खूपच छान माहिती आणि सुंदर मूर्ती!
लहानपणी कसबा गणपती मंदिरासमोर वास्तव्य असताना नियमित मंदिरात जात होतो. अगदी लहानपणी २-३ वेळा सोवळे नेसून गणपतीच्या गाभाऱ्यात जाऊन जास्वंदीचै फूल वाहण्याचे पुण्य मिळाले होते. शेंदूर काढून मूळ मूर्ती प्रकट झाल्यानंतर मंदिरात जाऊन डोळे भरून दर्शन घेतले.
कसबा पेठेतीलच गुंडाचा गणपती मंदिरातील गणेश मूर्तीवरील शेंदराचे कवच जवळपास ५० वर्षांपूर्वी काढले होते. ते नंतर राजा दिनकर केळकर वस्तुसंग्रहालयात ठेवले आहे.