माझे ‘मिपा’लपण
लिहिण्याची आवड आधीपासूनच होती. पण २००८मध्ये कसा ते आठवत नाही पण मिपाचा शोध लागला. त्याआधी त्याकळचे इतर एकदोन साहित्यिक मंच वापरुन पहिले होते. पण तिथले स्ट्रेट जॅकेटेड वातावरण आवडले नाही. मिपावर काही दिवसच वाचनापुरते राहिलो आणि तिथल्या खुल्या वातावरणात रमलो. तिथे पडीक असणारी रोजची नावे ओळखीची झाली. ते लिखाण आवडलेच, त्याहीपेक्षा जास्त उत्स्फूर्त प्रतिक्रिया आणि त्यातून होणारे सवाल जवाब आवडले. खुले वातावरण असूनही तिथे एक शिस्त होती. शिस्त लावणारे रिन्गमास्टर विसोबा खेचरदेखील माहीत झाले. त्यांना तात्या म्हणतात आणि संस्थापक या नात्याने त्यांचा इथे दबदबा आहे हे लक्षात आले. आधी मी कवितांनी सुरवात केली. त्याला चांगला प्रतिसाद मिळाल्यानंतर २००८ ते २०१६-१७ पर्यन्त माझ्यावर मिपाचे जणू गारूडच चढले होते. तिथले कंपूज्ञान होण्याआधी चर्चेत वाहवून मी नकळत कोणाच्या शेपट्यांवर पायदेखील दिले असतील. त्यातून मिळालेल्या शालजोडी आणि नारळातून हेही कळले की इथे सगळेच आलबेल नव्हते. काही दंडेल ग्रुप्स होते. काही तात्यांचे ‘चमचे’ होते. मी इथे साहित्यप्रेमाने आलो होतो. मग लोकलकंपूगिरीत कंडे दुर्लक्ष करुन केवळ माझ्या लिखाणाकडे लक्ष देऊ लागलो. परंतु मी नकळत केलेल्या अपराधांची शिक्षा वाचन संख्या आणि प्रतिक्रियासंख्यावर होतेय असा फील आला. नंतर गृप व्हायब्रंट ठेवणारे तात्यादेखील मिपा सोडून गेले. नवीन वातावरणात रमायचा खूप प्रयत्न केला. पण पूर्वीची मजा येत नव्हती. मग पुन्हा मायबोली आणि इतर मंच धुंडाळले. कुठेच जुन्या मिपाची मजा नव्हती. साधारण २०१७मध्ये सगळ्यांनाच रामराम ठोकला. स्वत:चे चल अकेला मार्ग घेतले. लिहीत राहिलो. चार कथासंग्रह आणि दोन कादंबऱ्या प्रकाशित केल्या. आता मिपा बदलले आहे, मीही पूर्वीसारखा ‘अरे’ ला ‘कारे’ म्हणणारा नाही राहिलो. मिपाची आठवण आली की अधुनमधुन चक्कर मारतो. कोकणातले मूळ रहिवासी जसे वरसलसाठी आत्मियतेने जातात तसेच. मिपाची मूळ ओळख कोकणातल्या शिव्या देणाऱ्या प्रेमळ आणि खुल्या माणसांसारखीच आहे. त्यावेळी खुद्द तात्यांनी मला नारळ आणि शालजोडीतले दिले होते. टारझनबरोबरदेखील पंगे घेतले होते. टारझनदेखील सिंगापुरात काही वर्षे त्याच्या जेनसह होता असे कळले. माझे आणि खरंतर त्याचे नशीब की आमची कधी आमनेसामने भेट झाली नाही. झाली असती तर सिंगपुरात असले चालत नाही याचा त्याला विसर पडला असता.
असो, हे सगळे आठवायचे कारण बिरुटे सरांनी लिहिलेली मिपा-वेताळ कथा! त्यावेळचे काही अजूनही इथे आहेत हे बघून मन आठवणीत खेचले गेले. झाले गेले माफ करा!
---------
| लेखनविषय: |
|---|
मिसळपाव
प्रतिक्रिया