Skip to main content

रैक्व — ज्ञानाचा शोध

लेखक ज्ञानोबाचे पैजार यांनी मंगळवार, 22/09/2026 10:16 या दिवशी प्रकाशित केले.

प्राचीन काळी एका समृद्ध राज्यावर जनश्रुती  नावाचा राजा राज्य करीत होता. राजा जनश्रुती  प्रजाहितदक्ष म्हणून दूरदूर पर्यंत प्रसिद्ध होता. त्याच्या राज्यात रस्त्यांच्या कडेला प्रवाशांसाठी धर्मशाळा उभारल्या होत्या. उन्हाळ्यात पाणपोया चालत. दूरच्या गावांतून शहरात येणाऱ्या लोकांसाठी अन्नछत्रे होती. वृद्ध, अनाथ आणि गरजू लोकांना राजकोषातून मदत दिली जातअसे.

राजाच्या महालाचे दरवाजेही गरजूंसाठी कधिही  बंद नसत.

संध्याकाळी राजदरबारातील कामकाज संपले की राजा अनेकदा वेश बदलून नगरातून फिरत असे.  कुठे एखाद्या विहिरीची दुरवस्था झाली आहे का,  कुठे एखाद्या शेतकऱ्याला पाण्याची अडचण आहे का, कुठल्या धर्मशाळेत प्रवाशांना अन्न मिळत नाहीका याची तो स्वतः चौकशी करीत असे. हळूहळू त्याच्या मनात आपल्या कार्याबद्दल समाधान निर्माण झाले.

माझ्या राज्यात कोणी उपाशी झोपू नये,” तो आपल्या अधिकाऱ्यांना नेहमी सांगत असे. त्याच्या दानधर्माची कीर्ती दूरवर पसरली.

एकदा काही ऋषी राजदरबारात आले होते. त्यांच्याशी चर्चा करताना राजाने विचारले, “माझ्या राज्यात धर्म आणि दान यांची व्यवस्था योग्य प्रकारे चालली आहे ना?” एका वृद्ध ऋषींनी त्याच्याकडे पाहिले आणि शांतपणे उत्तरदिले, “राजन्, तुझ्या दानाची कीर्ती खरोखर दूरवर पोहोचली आहे.”

राजाला ते ऐकून समाधान वाटले. त्या रात्री त्याला नेहमीपेक्षा गाढ झोप लागली.

उन्हाळ्याचे दिवस होते.

राजमहलाच्या उंच गच्चीवर त्या रात्री थंड वारा वाहत होता. आकाश निरभ्र होते. असंख्य तारे चमकत होते. दिवसभराच्या उकाड्यानंतर महालातील सेवकांनी गच्चीवर राजासाठी शीतल पाण्याची व्यवस्था केली होती. राजा आपल्या शय्येवर विसावला होता. त्याचे काही सेवक जवळच होते. रात्र बरीच झाली होती.

अचानक आकाशातून पक्ष्यांच्या पंखांचा आवाज आला. काही राजहंस दक्षिणेकडून उत्तरेकडे उडत होते. रात्रीच्या अंधारात त्यांची शुभ्र शरीरे चंद्रप्रकाशात चमकत होती.

हंसांचा थवा राजमहलाच्या वरून जात असताना, पुढे उडणाऱ्या एका हंसाने मागे पाहिले आणि आपल्या सोबत्याला हाक मारली, “सावध! जास्त  खाली जाऊ नकोस. हा राजा  जनश्रुती चा महाल आहे. त्याच्या तेजाने तू दिपून जाशील!”

मागचा हंस हसला.

इतका मोठा कोण आहे हा जनश्रुती ?”

पहिला हंस म्हणाला, “तुला त्याची कीर्ती माहीत नाही? त्याच्या दानाची चर्चा चारही  दिशांना आहे.”

दुसरा हंस पुन्हा हसला. “दान देतो म्हणून कोणी महान होत नाही. त्या राजाची तुलना रैक्वाशी करू नकोस.”

रैक्व?”

हो. रैक्व. त्याच्या ज्ञानासमोर जनश्रुती चे वैभवही फिके पडेल.” दोन्ही हंस पुढे निघून गेले.

गच्चीवर पडलेल्या राजाला मात्र त्यांचे शब्द स्पष्ट ऐकूआले. तो अचानक उठून बसला

काय म्हणाले ते?”

जवळ झोपलेला सेवक दचकून उठला. “महाराज?”

तुम्ही काही ऐकले का?”

नाही, महाराज.”

राजा काही क्षण शांत राहिला.

रैक्व कोण आहे?”

सेवक गोंधळून एकमेकांकडे पाहू लागले, राजाने पुन्हा विचारले,

रैक्व नावाचा कोणीतरी मनुष्य आहे. आता हंसांनी माझी तुलना त्याच्याशी केली,  मला त्याच्याबद्दल माहिती हवी.”

पहाट होण्यापूर्वीच राजाच्या आज्ञेने दूत चारही दिशांना रवाना झाले.

दुसऱ्या दिवशी राजदरबारात या गोष्टीची चर्चा सुरू झाली. “रैक्व कोण आहे?”

कदाचित एखादा ऋषी असावा, कदाचित दुसऱ्या राज्यातील विद्वान,  कदाचित एखादा वनवासी तपस्वी, कोणालाही ठाम माहिती नव्हती.

राजाने आपल्या मुख्य अधिकाऱ्याला बोलावले.

रैक्व शोधून आणा.”

अधिकाऱ्याने नम्रपणे विचारले,

महाराज, त्याचे गाव, आश्रम, कुल किंवा प्रदेश यापैकी काही माहिती आहे का?”

राजा क्षणभर शांत राहिला, “काहीही नाही.”

मग आम्ही त्याला कसे शोधावे?”

राजाने उत्तर दिले, “जसा एखादा मनुष्य हरवलेला खजिना शोधतो, तसा शोधा.”

शोध सुरू झाला.

राजाचे दूत गावोगावी फिरू लागले. त्यांनी ऋषींना विचारले, साधूंना विचारले, व्यापाऱ्यांना विचारले, गुराख्यांना विचारले.

काही दिवस गेले. मग काही प्रवाशांनी सांगितले,

उत्तर दिशेला एका जुन्या गावा जवळ एक विचित्र मनुष्य राहतो. त्याचे नाव कदाचित रैक्वआहे.”

राजाचे दूत तिकडे निघाले.

गाव लहान होते.

गावाच्या शेवटी एक जुने, मोडकळीस आलेले गाडे (जुनी बैलगाडी) पडले होते. त्याच्या सावलीत एक मनुष्य बसलेला असे.

मळकट कपडे, केस विस्कटलेले, शरीरावर धुळीचा थर, त्याच्याकडेपाहून कोणीही सहज म्हणाले असते, “हा तर एखादा गरीब गाडीवान असावा.”

राजाच्या दूतांनी गावकऱ्यांना विचारले, “इथे रैक्व नावाचा कोणी आहे का?”

गावकऱ्यांनी त्या गाडीकडे बोट दाखवले

तो?”

दूतांनी त्या मनुष्याकडे पाहिले.

त्यांना क्षणभर विश्वासच बसला नाही.

हा रैक्व?”

हो.”

एक दूत पुढे गेला.

तुझे नाव रैक्व आहे?”

गाडी खाली बसलेल्या त्या मनुष्याने वर पाहिले.

हो.”

राजा जनश्रुती ने तुला बोलावले आहे.”

रैक्व पुन्हा खाली पाहू लागला.

मला?”

हो.”

कशासाठी?”

दूताला त्या प्रश्नाचे उत्तर माहीत नव्हते.

राजा स्वतः सांगेल.”

रैक्व काही बोलला नाही, तो तसाच बसून राहिला, दूत परतले.

राजाला रैक्व सापडल्याचे कळताच त्याने मोठ्या सन्मानाने त्याला आणण्यासाठी निघाला

या वेळी राजाने त्यांच्या सोबत अनेक गाड्या घेतल्या, सोने, रत्ने, उत्तम वस्त्रे, गाई, घोडे एख्याद्या राजासाठी योग्य अशी अनेक भेट वस्तू त्यात होत्या.

रैक्वला राजासमोर आणण्यात आले, त्याच्याकड़े पाहून  आश्चर्यच वाटले, राजा रथातून  खाली उतरला, त्याने रैक्वकडे पाहिले.

राजाने नम्रपणे म्हटले,

रैक्व, मी तुझ्याबद्दल ऐकले आहे. म्हणून तुला भेटण्यासाठी आलो आहे.”

रैक्व शांत होता.

राजाने आपल्या सेवकांना संकेत केला. सोन्याने भरलेली पेटी पुढे आणली गेली.

ही तुझ्यासाठी.”

रैक्वने पेटीकडे पाहिलेही नाही.

राजाने पुढे म्हटले,

या गाई, हे घोडे, ही रत्ने आणि हा सुवर्ण हार हे सर्व तुला देत आहे.”

रैक्वने पहिल्यांदा राजाकडे सरळ पाहिले.

त्याच्या चेहऱ्यावर ना आश्चर्य होते, ना आनंद.

हे सर्व कशासाठी?”

राजा थोडा अडखळला.

तुझ्या ज्ञानासाठी.”

रैक्व हसला.

ते हसू उपहासाचे होते की करुणेचे, हे राजाला समजले नाही.

राजन्,” रैक्व म्हणाला, “तू मला विकत घेण्यासाठी आला आहेस का?” राजाचा चेहरा उतरला.

नाही. माझा तसा हेतू नाही.”

मग या वस्तू कशासाठी?”

राजाने उत्तर दिले,

तुझ्या चरणी अर्पण म्हणून.”

रैक्व मंद स्वरात म्हणाला, “ज्याच्या मनात संपत्तीचे मोल आहे, त्याला हे वैभव अमूल्य वाटेल. पण माझ्या दृष्टीने यापैकी कशालाही अर्थ नाही. ज्याची मला गरज नाही, त्याचा संग्रह करून मी काय करणार?”

राजाने मान खाली घातली.

क्षणभर त्याला त्या रात्री ऐकलेले हंसांचे शब्द आठवले. त्याने विचारले, “मग मी परत जावे का?”

रैक्वम्हणाला, “जर तुला फक्त भेटवस्तू  द्यायच्या असतील, तर हो.” 

राजा निघून गेला, त्या रात्री राजाला झोप आली नाही.

त्याने आपल्या आयुष्यात पहिल्यांदाच एखाद्या मनुष्यापुढे स्वतःचे वैभव निरुपयोगी ठरल्याचे अनुभवले होते.

त्याच्या मनात एकच प्रश्न होता, “रैक्वकडे असे काय आहे, जे माझ्याकडे नाही?”

पहाटे त्याने पुन्हा रैक्वकडे जाण्याचा निर्णय घेतला.

यावेळी त्याने कोणतीही सोन्याची पेटी, रत्ने किंवा मोठा ताफा घेतला नाही.

तो साध्या रथात बसला, फक्त काही आवश्यक सेवक त्याच्यासोबत होते.

गावाजवळ पोहोचल्यावर त्याने रथ थांबवला, पुढचा रस्ता त्याने पायी चालत पार केला.

रैक्व त्याच जुन्या गाड्याखाली बसला होता, राजा त्याच्यासमोर जाऊन उभा राहिला, काही क्षण दोघेही शांत राहिले.

मग राजाने नम्रपणे म्हटले, “रैक्व,  मी तुला ओळखले नाही.”

रैक्वने त्याच्याकडे पाहिले.

आणि आज?”

आजही तुला पूर्णपणे ओळखत नाही. म्हणूनच आलो आहे.”

रैक्वच्या चेहऱ्यावर हलकेसे स्मित उमटले.

राजा पुढे म्हणाला,

मला ते ज्ञान हवे आहे ज्यामुळे तुला माझे धन, माझे राज्य आणि माझी कीर्ती काहीच महत्त्वाची वाटत नाही.”

रैक्व काही क्षण शांत राहिला.

राजन्, ज्ञान मागण्यासाठी राजा म्हणून आलाआहेस की शिष्य म्हणून?”

राजाने उत्तर दिले, “शिष्य म्हणून.”

रैक्वने मान हलवली. “मग बस.”

राजा जमिनीवर बसला.

त्या दिवसापासून जनश्रुती  काही काळ रैक्व जवळ राहू लागला, पहिल्या काही दिवसांत रैक्व त्याच्याशी फारसे बोलत नसे.

कधी तो गाडीच्या चाकाकडे पाहत बसे, कधी नदीकाठी जाई, कधी गावातील एखाद्या वृद्धाशी बोलत बसे, कधी दिवसभर काहीही बोलता शांत बसून राहे, राजाला सुरुवातीला ते विचित्र वाटले.

एका संध्याकाळी राजा म्हणाला,

रैक्व, तू  इतका वेळ शांत कसा बसतोस?” 

रैक्वने विचारले, “तुला शांतता सहन होत नाही?”

राजा हसला, “राजमहलात नेहमी काही ना काही आवाज असतो.”

म्हणूनच कदाचित तुला इथे राहणे अवघड जात आहे.”

राजा गप्प बसला, दुसऱ्या दिवशी रैक्व त्याला नदीकाठी घेऊन गेला, नदीशांतपणे वाहत होती.

रैक्वने विचारले, “राजन्, या नदीत किती पाणी आहे?”

राजा म्हणाला, “मला माहीत नाही.”

तुझ्या राज्यातील प्रत्येक विहिरीचे पाणी मोजण्यासाठी अधिकारीआहेत?”

हो.”

मग या नदीचे?”

राजा शांत राहिला.

रैक्व म्हणाला, “ज्या गोष्टीवर आपले राज्य चालते, त्यातील प्रत्येक गोष्ट मोजण्याची तुला सवय झालीआहे. पण काही गोष्टी मोजता येत नाहीत.”

राजा त्याच्याकडे पाहत राहिला.

काही आठवड्यांनी राजा पुन्हा महालात परतला, मात्र त्याच्या स्वभावात बदल झाला होता.

दरबारातील लोकांनी पाहिले की पूर्वी एखादा मंत्री राजाची स्तुती करीत असे तेव्हा राजा आनंदाने हसे. आता तो शांतपणे ऐकत असे.

पूर्वी मोठमोठ्या दानांची घोषणा केल्यानंतर तो त्यांची नोंदकरून घेत असे. आता तो म्हणे, “ज्याला मदत मिळाली, त्याच्यासाठी ते पुरेसे आहे. माझ्या नावाची गरज नाही.”

काही महिन्यांनी तो पुन्हा रैक्व कडे गेला.

यावेळी त्याने आपली कन्या आणि काही संपत्ती रैक्वच्या आश्रमासाठी अर्पण करण्याची इच्छा व्यक्त केली.

रैक्वने विचारले, “ही संपत्ती का?”

राजा म्हणाला, “तुझ्या आश्रमासाठी.”

आणि कन्या?”

राजा काही क्षण शांत राहिला.

तिला तुझ्या सेवे साठी ठेवू इच्छितो.”

रैक्वने मान हलवली.

जर ती स्वतःच्या इच्छेने येत असेल तर राहू दे. कोणालाही दान म्हणून देण्याचा  तुला अधिकार  आहे का? 

राजाने आपल्या कन्येकडे पाहिले. ती शांतपणे पुढे आली, “गुरुदेव, मला इथे राहायचे आहे.”

रैक्वने तिच्याकडे पाहिले आणि म्हणाला, “मग राहा.”

त्या दिवसापासून रैक्वच्या आश्रमात राजकन्याही इतर शिष्यांप्रमाणेच साधे जीवन जगू लागली.

एके संध्याकाळी आकाशात काळे ढग जमले होते, अचानक जोराचा वारा सुटला, आश्रमातील झोपड्यांची छपरे हलू लागली, राजा त्या दिवशी रैक्व कडेच होता.

त्याने आपल्या सेवकांना आज्ञा केली, “छप्पर धरून ठेवा!”

रैक्व मात्र शांतपणे उभा राहिला.

राजन्, इतके दिवस तू इतरांच्या छपरांची काळजी घेत होतास. आज स्वतःच्या मनाचे छप्पर टिकवून पहा.” राजा त्याच्याकडे पाहतच राहिला.

त्या रात्री वादळ बराच वेळ सुरू होते, पहाटेपर्यंत आश्रमातील काही झोपड्या कोसळल्या होत्या, राजाने स्वतः हातात फावडे घेतले आणि सेवकांसोबत माती बाजूला करण्यास सुरुवात केली.

रैक्व दूर उभा राहून पाहत होता, पहिल्यांदा त्याच्या चेहऱ्यावर समाधान दिसले.

काळ पुढे सरकत गेला, जनश्रुती  पुन्हा पुन्हा रैक्वकडे येत राहिला, प्रत्येक वेळी त्याच्या प्रश्नांची संख्या कमी होत गेली आणि शांततेत बसण्याची वेळ वाढत गेली.

एका पहाटे नदीच्या काठावर दोघे बसले होते, पूर्वेकडून सूर्य उगवत होता, पाण्यावर सोनेरी प्रकाश पसरत होता, राजाने हळू आवाजात विचारले,

रैक्व, त्या रात्री आकाशात उडणाऱ्या हंसांनी तुझे नाव घेतले नसते, तर माझे आयुष्य तसेच गेले असते का?”

रैक्व काही क्षण नदीकडे पाहत राहिला, “कदाचित.”

मग त्या हंसांचा मी ऋणी आहे.”

रैक्व हसला, “कधी कधी एखाद्या प्रवासाची सुरुवात करण्यासाठी एक शब्दही पुरेसा असतो.”

राजाने नदीकडे पाहिले, बराच वेळ दोघेही काही बोलले नाहीत, दूर आकाशात काही हंस उडत होते, राजाची नजर त्यांच्यावर खिळली.

आणि रैक्व शांतपणे नदीच्या प्रवाहाकडे पाहत राहिला.

पैजारबुवा, 

 

लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 1
प्रतिक्रिया 0

प्रतिक्रिया