मिथिलेजवळच्या एका शांत आश्रमात ऋषी उद्दालकांचा आश्रम होता. वेदाध्ययन, यज्ञकर्म, स्वाध्याय आणि शास्त्र चर्चा यांमुळे तो आश्रम दूरदूरपर्यंत प्रसिद्ध होता. अनेक तरुण तेथे शिक्षण घेण्यासाठी येत. त्यांच्यात कहोड नावाचा एक तरुण विशेष बुद्धिमान, परिश्रमी आणि गुरुभक्त म्हणून ओळखला जात असे. उद्दालकांना कहोडा विषयी विशेष प्रेम होते इतके की त्यांनी आपली कन्या सुजाता हिचा विवाह कहोडाशी लावून दिला
कहोड आणि सुजाताचे जीवन साधे होते, परंतु त्यात समाधान होते. कहोड दिवसभर आश्रमातीलअध्ययन-अध्यापन आणि यज्ञकर्मात व्यस्त असत, तर सुजाता घरातील कामे सांभाळत असे. काही काळाने सुजाता गर्भवती झाली आणि तिच्या मनात एक स्वाभाविक इच्छा निर्माण झाली, आपल्या पोटी येणाऱ्या बालकाने लहानपणा पासून वेदांचे स्वर, ऋषींच्या चर्चा आणि ज्ञानाचे वातावरण अनुभवावे. म्हणून ती अनेकदा कहोड ज्या ठिकाणी विद्यार्थ्यांना वेद शिकवत असे तेथे शांतपणे बसत असे.
एका दिवशी कहोड वेदमंत्रांचा उच्चार करीत होते. आश्रमातील विद्यार्थी त्याचे म्हणणे लक्षपूर्वक ऐकत होते आणि सुजाताही नेहमीप्रमाणे काही अंतरावर बसली होती. अचानक तिच्या गर्भातून एक स्पष्ट आवाज ऐकू आला. तो आवाज अजून जन्माला न आलेल्या बालकाचा होता—“पिताश्री, आपण मंत्रांचा अर्थ जाणता; पण या मंत्रांचा उच्चार अशा प्रकारे का करता? या ठिकाणी स्वर चुकत आहे.” कहोड काही क्षण स्तब्ध झाले. विद्यार्थ्यांनी ही एकमेकांकडे पाहिले. गर्भातील बालकाने आपल्या पित्याच्या वेदपठणातील चूक दाखवावी, हे कहोडांना अपमानास्पद वाटले आणि रागाच्या भरात त्यांच्या तोंडून शाप निघाला “जन्मतःच तू आठ ठिकाणी वाकलेलाअसशील!”
शापाचा उच्चार होताच आश्रम पुन्हा शांत झाला. सुजाताच्या मनात मात्र भीती दाटून आली. कहोडांनााही आपल्या शब्दांचा पश्चात्ताप झाला, पण उच्चारलेला शाप मागे घेणे त्यांच्या हातात नव्हते. काही काळाने सुजातेला पुत्र झाला, त्याचे शरीर आठ ठिकाणी वाकलेलेहोते. म्हणून त्याचे नाव पडले—अष्टावक्र.
अष्टावक्र वाढत गेला तसे त्याची बुद्धिमत्ता विलक्षण असल्याचे स्पष्ट होऊ लागले. त्याच्या शरीरातील वाकडेपणाकडे पाहून अनेकांना तो वेगळा वाटत असे; पण त्याच्या बोलण्यात, प्रश्न विचारण्याच्या पद्धतीत आणि वेद-वेदांतावरील आकलनात विलक्षण प्रगल्भता होती. उद्दालकांच्या आश्रमातील विद्वानांशी चर्चा करताना तो वयाने लहानअसूनही अनेकदा असे प्रश्न विचारत असे की मोठमोठ्या पंडितांनाही क्षणभर थांबून विचार करावा लागे.
कहोड विद्वान ब्राह्मण होते. एकदा मिथिलेचा राजा जनक याच्या दरबारात विद्वानांच्या शास्त्रार्थाची सभा भरल्याचे समजताच ते ही त्या सभेत सहभागी होण्या साठी निघाले. तेथे वरुणपुत्र बंदीशी झालेल्या शास्त्रार्थात कहोडांचा पराभव झाला आणि मग आधीच ठरलेल्या नियमा प्रमाणे त्यांना बंदीच्या स्वाधीन व्हावे लागले ; त्या नंतर ते परतलेच नाहीत.
सुजाातेला मात्र कहोडांच्या या परतीची वाट पाहत राहावे लागले. काळ पुढे सरकत गेला, अष्टावक्र मोठा होत गेला; पण त्याची अनेक वर्ष आपल्या वडिलांशी प्रत्यक्ष भेट कधीच झाली नाही.
अष्टावक्र सुमारे बारा वर्षांचा असताना एक प्रसंग घडला आणि त्याच्या आयुष्याची दिशा बदलली. एके दिवशी तो ऋषी उद्दालकांच्या मांडीवर बसला होता. तेवढ्यात उद्दालकांचा पुत्र श्वेतकेतू तेथे आला. त्याने अष्टावक्राला पाहिले आणि त्याला खालीओढत म्हणाला, “ही माझ्या वडिलांची मांडी आहे; तू त्यांवर का बसला आहेस?” त्या शब्दांनी अष्टावक्राच्या मनाला खोल जखम झाली. त्याला प्रथमच प्रश्न पडला “माझे वडील कुठेआहेत? मी इतर मुलां सारखा माझ्या वडिलांच्या मांडीवर का बसू शकत नाही?”
तो धावत आईकडे गेला आणि त्याने हट्टाने विचारले, “आई, माझे वडील कुठे आहेत? तू मला त्यांच्या बद्दल कधीच का सांगितले नाहीस?” सुजाता बराच वेळ शांत राहिली. इतकी वर्षे तिने मनात दडवून ठेवलेले सत्य आता मुला पासून लपवणे अशक्य झाले होते. तिने कहोडांची संपूर्ण कथा सांगितली आणि अखेरीस म्हणाली, “तुझे वडील एका मोठ्या शास्त्रार्था साठी मिथिलेतील राजा जनकाच्या दरबारात गेले होते; तेथे बंदी नावाच्या विद्वानाने त्यांचा पराभव केला आणि त्यानंतर ते परत आले नाहीत.”
अष्टावक्राने आईचे बोलणे शांतपणे ऐकले; त्याच्या मनात एकच प्रश्न पेटला—बंदी कोण आहे? त्याने माझ्या वडिलांना कुठे नेले आहे ? त्याला कळले की मिथिलेचा राजा जनक विद्वानांचा आश्रयदाताआहे आणि त्याच्या यज्ञात देशभरातील श्रेष्ठ पंडित एकत्र येतात. त्या यज्ञात शास्त्रार्थ घडत आणि बंदी नावाचा एक विलक्षण विद्वान प्रत्येक प्रतिस्पर्ध्याला आव्हान देत असे.
बंदीहा केवळ विद्वान नव्हता; तो आपल्या विद्वत्तेचा विलक्षण आत्मविश्वास बाळगणारा आणि वादविवादात प्रतिस्पर्ध्याला मानसिकदृष्ट्याही दबावाखाली आणणारा पंडित होता. त्याच्या तोंडून वेद, ब्राह्मणग्रंथ, यज्ञविधी, छंद, व्याकरण, तर्क आणि संख्या यांचा संदर्भ इतक्या वेगाने आणि अचूकपणे बाहेर पडत असे की समोरचा पंडित अनेकदा आपले उत्तर मांडण्या आधीच गोंधळून जाई. त्याची वाणी धारदार होती, स्मरणशक्ती असामान्य होती आणि शास्त्रार्थातील त्याची रणनीती इतकी नेमकी होती की राजसभेतील विद्वानही त्याच्याशी वाद घालण्या पूर्वी अनेकदा विचार करीत.
बंदीची आणखी एक गोष्ट सर्वांना माहीत होती. जो ब्राह्मण त्याच्याशी झालेल्या शास्त्रार्थात पराभूत होई, त्याला जलात बुडविले जाई. त्यामुळे जनकाच्या दरबारात बंदीचे नाव केवळ विद्वत्तेचे प्रतीक राहिले नव्हते; त्यात एक प्रकारची दहशतही मिसळली होती. अनेक विद्वान त्याच्याशी वाद घालण्यासाठी आले आणि पराभूत झाले होते कहोडांचा ही त्यात समावेश होता.
अष्टावक्राने ही कथा ऐकली आणि त्याच्या मनात निर्णय झाला. “मी मिथिलेला जाईन आणि बंदीला शास्त्रार्थाचे आव्हान देईन,” तो आईला म्हणाला. सुजाताने त्याला समजावण्याचा प्रयत्न केला, “तू अजून लहान आहेस; बंदी हा सामान्य पंडित नाही.” परंतु अष्टावक्र शांतपणे म्हणाला, “आई, वयाने लहान असणे आणि ज्ञानाने लहान असणे या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. माझ्या वडिलांचा शोध घ्यायचा असेल तर मला त्या दरबारात जावेच लागेल.”
अष्टावक्राने आपला मामा श्वेतकेतू याला सोबत घेतले आणि दोघे मिथिलेच्या दिशेने निघाले. प्रवासात अनेकांना अष्टावक्राचे शरीर पाहून कुतूहल वाटत असे, परंतु तो त्याकडे लक्ष देत नसे. त्याच्या मनात शरीराविषयी न्यूनगंड नव्हता; उलट त्याला असे वाटत होते की लोकांच्या नजरेत दिसणारे शरीर आणि माणसाच्याआत असलेली बुद्धी यांचा काहीही संबंध नाही.
राजा जनकाच्या यज्ञशाळे भोवती प्रचंड गर्दी होती. दूरदूरच्या प्रदेशांतून ऋषी, ब्राह्मण, पंडितआणि विद्वान आले होते. यज्ञकुंडातून धूर वर जात होता, वेदमंत्रांचे स्वर वातावरणात घुमत होते आणि राजसभेच्या एका भागात विद्वानांच्या शास्त्रार्थासाठी स्वतंत्र जागा तयार करण्यातआली होती.
अष्टावक्र आणि श्वेतकेतू यज्ञशाळेच्या प्रवेशद्वाराजवळ पोहोचले तेव्हा द्वारपालाने त्यांना थांबवले. “बालकांना , आत जाण्याची परवानगी नाही,” तो म्हणाला. अष्टावक्राने शांतपणे उत्तर दिले, “आम्ही यज्ञ पाहण्यासाठी आलेलो नाही; आम्ही शास्त्रार्थासाठी आलो आहोत.” द्वारपाल हसला आणि म्हणाला, “तुमच्या वयाच्या मुलांनी शास्त्रार्थ करायचा? आत तर देशातील श्रेष्ठ विद्वान जमले आहेत.”
अष्टावक्राने त्याच्याकडे पाहून उत्तर दिले, “विद्वत्तेला वयाची आवश्यकता असते असे जर तुम्हाला वाटत असेल, तर जनकाच्या दरबारात जाण्यापूर्वीच तुम्ही बंदीचा अर्धा विजय निश्चित केला आहे. मला आत जाऊ द्या; माझ्या शब्दांवरून माझी पात्रता ठरवा.” त्याच्या आत्मविश्वासाने द्वारपाल प्रभावित झाला, पण त्याने राजाची परवानगी घेणे आवश्यक असल्याचे सांगितले.
अखेर ही बातमी राजा जनकापर्यंत पोहोचली. जनकाने अष्टावक्राला बोलावून घेतले आणि त्याची परीक्षा घेण्याचे ठरवले. त्याने काही गुंतागुंतीचे प्रश्न विचारले संख्या, काळ, दिशा, यज्ञ आणि विश्व रचनेशी संबंधित कोडी. अष्टावक्राने प्रत्येक प्रश्नाचे उत्तर केवळ पाठांतराने नव्हे तर त्यामागील अर्थ समजून दिले. जनकाच्या चेहऱ्यावरचे आश्चर्य वाढत गेले. त्याला जाणवले की त्याच्यासमोर उभाअसलेला हा वाकड्या शरीराचा मुलगा साधा बालक नसून विलक्षण प्रतिभेचा धनी आहे.
जनकाने त्याला यज्ञशाळेत प्रवेश दिला.
अष्टावक्र यज्ञशाळेत प्रवेश करताच अनेक विद्वानांच्या नजरा त्याच्याकडे वळल्या. काहींच्या चेहऱ्यावर आश्चर्य होते, काहींच्या चेहऱ्यावर उपहास, तर काही विद्वान त्याच्या वयामुळे त्याला गांभीर्याने घेत नव्हते. बंदीनेही त्याच्याकडे पाहिले आणि हसत म्हणाला, “हे बेंगरूळ ध्यान शास्त्रार्थ करणार?”
अष्टावक्राने त्याच्याकडे सरळ पाहिले. त्याच्या आवाजात राग नव्हता, पण शब्दांमध्ये विलक्षण धार होती.
“बंदी, माझ्या शरीराकडे पाहून तू हसतोस. शरीराची रचना वाकडी आहे म्हणून त्यातील बुद्धीही वाकडी असेल, असे तुला वाटते का? एखाद्या माणसाचे ज्ञान त्याच्या देहाच्या आकारावरून ठरवता येत नाही. शास्त्रार्थात शरीराचे सौंदर्य किंवा कुरूपता कसोटी नसते; कसोटी असते ती विचारांची स्पष्टता, तर्काची ताकद आणि सत्य ओळखण्याची क्षमता. जर तू बाह्यरूप पाहूनच विद्वत्तेचा निर्णय घेत असशील, तर या सभेत तुझ्या ज्ञानापेक्षा तुझ्या दृष्टीचीच परीक्षा अधिक आवश्यक आहे.”
सभेत कुजबुज पसरली. जनकाने हात उंचावून सर्वांना शांत केले. बंदीच्या चेहऱ्यावरचे हास्य नाहीसे झाले होते. त्याला आता समोरचा मुलगा केवळ भावनेने आलेला नसून शास्त्रार्थाची खरी तयारी करूनआलेला आहे, हे जाणवले.
बंदीने अष्टावक्राला औपचारिक आव्हान दिले. परंतु हा नेहमीचा प्रश्नोत्तरांचा वाद नव्हता. त्यात संख्या, वैदिक प्रतिमा, विश्वरचना, यज्ञ आणि प्रतीकात्मक विधानांची एक वेगवान मालिका होती. बंदी एक संख्या सांगत असे आणि तिच्याशी संबंधित वैदिक उदाहरणे मांडत असे; अष्टावक्र त्याच्या विधानाला पुढच्या संख्येने उत्तर देत असे. एका वरून दोन, दोन वरून तीन, तीन वरून चारअसा हा शास्त्रार्थ वाढत गेला आणि सभेतील विद्वानांची उत्सुकता प्रत्येक क्षणाला अधिक तीव्र होत गेली.
बंदीम्हणाला, “एकच अग्नी अनेक प्रकारे प्रज्वलित होतो; एकच सूर्य संपूर्ण जगाला प्रकाशित करतो; देवांचा वीरेंद्र एकच आहे आणि पितरांचा अधिपती यमही एकच आहे.”
अष्टावक्राने क्षणाचाही विलंब न करता उत्तर दिले, “दोन आहेत इंद्र आणि अग्नी हे दोन सहचर; नारद आणि पर्वत हे दोन देवर्षी; अश्विनीकुमार हे दोन जुळे; रथाला दोन चाके आणि विवाहात पती-पत्नी असे दोन.”
बंदीने पुढे तीन सांगितले कर्मानुसारप्राण्यांचे तीन प्रकारचे जन्म, यज्ञकर्माशी संबंधित तीन वेद, ऋग्वेद, यजुर्वेद आणि सामवेद, तीन सवन, म्हणजे प्रातः सवन, माध्यंदिन सवन आणि तृतीय सवन; तसेच तीन लोक आणि तीन प्रकारच्या ज्योती.
अष्टावक्राने चारांनी उत्तर दिले चार आश्रम, चार वर्ण, चार दिशा आणि गायीचे चार पाय. त्या नंतर पाच, सहा, सात अशी संख्या पुढे जात राहिली. पाच अग्नी, पाच यज्ञ, सहा ऋतू, सहा इंद्रिये, सात छंद, सात ऋषी, आठ वसु आठ दिशांचे किंवा यज्ञाशी संबंधित संकेत—प्रत्येक विधानाला अष्टावक्र तितक्याच नेमकेपणाने पुढच्या संख्येने प्रत्युत्तर देत होता.
सभेतील वातावरण आता बदलले होते. काही वेळापूर्वी अष्टावक्राच्या शरीराकडे पाहून हसणारे विद्वान आता त्याच्या प्रत्येक शब्दाकडे लक्ष देत होते. जनक स्वतः सिंहासनावर पुढे झुकून हा संवाद ऐकत होता. बंदीचा आत्मविश्वास मात्र हळूहळू कमी होत चालला होता; कारण समोरचा तरुण त्याच्या प्रत्येक विधानाला केवळ उत्तर देत नव्हता, तर त्याच्यापेक्षा पुढचे पाऊल टाकत होता.
बंदीने अकराचा क्रम पूर्ण केल्यानंतरअष्टावक्राने तत्क्षणी बाराचा धागा पकडला—“बारा महिने, जगती छंदाच्या प्रत्येक पादातील बारा अक्षरे, बारा दिवसांचा प्राकृत यज्ञ आणि बारा आदित्य.” त्याच्या उत्तरात केवळ संख्येची पुनरावृत्ती नव्हती; प्रत्येक संख्येमागे दडलेला वैदिक संदर्भ त्याला तितक्याच सहजतेने जोडता येत होता.
आता सभेतील सर्वांचे लक्ष बंदीकडे लागले. बंदीने तेराचा उच्चार केला—“तेरावी तिथी, तेरा द्वीपांची पृथ्वी...” एवढे बोलून तो क्षणभर थांबला. पुढचा धागा त्याच्या ओठांवर आला नाही. सभागृहात एक विलक्षण शांतता पसरली. अष्टावक्राने क्षणाचाही विलंब न करता त्याचा अर्धवट विचार पूर्ण केला—“केशीने तेरा दिवस भ्रमण केले आणि तेरा अक्षरां पासूनपुढे सुरू होणारे छंद अतिच्छंद म्हणून ओळखले जातात.”
क्षणभर कोणालाच काही कळले नाही आणि अचानक सभेत एकच गजर उठला, अजेय बंदी पराभूत झाला होता.
जनकाने उठून घोषणा केली, “बंदी, तू पराभूत झाला आहेस. या सभेच्या नियमानुसारआता तुझ्यावर अष्टावक्राचा अधिकार आहे. त्याला जे योग्य वाटेल ते तो ठरवू शकतो.”
अष्टावक्राने बंदीकडे पाहिले. त्याच्या मनात वडिलांची आठवण होती. त्याने कठोर आवाजात विचारले, “ज्या ब्राह्मणांना तू पराभूत केलेस, त्यांचे काय झाले? माझे वडील कहोड कुठे आहेत?”
बंदीने प्रथम काही क्षण मौन पाळले आणि नंतर शांतपणे उत्तर दिले, “अष्टावक्र, मी वरुणाचा पुत्र आहे. माझ्या पित्याने एका महान यज्ञाचे आयोजन केले होते आणि त्या यज्ञासाठी श्रेष्ठ ब्राह्मणांची आवश्यकता होती. म्हणून शास्त्रार्थात पराभूत झालेल्या ब्राह्मणांना जलमार्गे वरुणाच्या निवासस्थानी पाठवले गेले. तेथे ते यज्ञात सहभागी झाले आहेत; त्यांना मारण्यात आलेले नाही.”
अष्टावक्राच्या चेहऱ्यावरचा ताण किंचित कमी झाला. त्याने विचारले, “माझे वडीलही तेथेच आहेत?”
बंदीने मान डोलावली. “होय. कहोड तेथे आहेत.”
क्षणभर अष्टावक्राने डोळे मिटले. इतके दिवस मनात साठलेल्या प्रष्णाचे उत्तर त्याला मिळाले होते. वडिलांची सुटका आता त्याच्या हातात होती.
बंदीने जनकाकडे पाहून सांगितले, “राजन्, अष्टावक्राने मला पराभूत केलेआहे. आता त्याची आज्ञा मला मान्य आहे.”
अष्टावक्राने त्याला स्पष्ट आज्ञा केली, “जर तू खरोखर वरुणाचा पुत्र असशील, तर वरुणलोकात गेलेल्या सर्व ब्राह्मणांना परत घेऊन ये. माझ्या वडिलांसह.”
बंदीने जलदेवतेचे स्मरण केले. यज्ञशाळेत काही क्षण मंत्रोच्चार घुमले आणि त्यानंतर जलातून एकामागून एक ब्राह्मण वरआले. शेवटी अष्टावक्राच्या नजरेसमोर एक परिचित चेहराआला—कहोड.
वर्षानुवर्षे दूर असलेले पिता-पुत्र एकमेकां समोर उभे राहिले. कहोडांनी आपल्या मुलाकडे पाहिले; त्याच्या डोळ्यांत आश्चर्य, अभिमान आणि प्रेम एकाच वेळी दाटून आले. “अष्टावक्र,” एवढेच त्याच्या तोंडून बाहेर पडले आणि पुढच्या क्षणी त्यांनी मुलाला आपल्या मिठीत घेतले.
कहोड आश्रमात परतले, सुजातेला आपला पती जिवंत पाहून जे समाधान झाले, त्याची तुलना कोणत्याही शब्दांशी करता येत नव्हती. परंतु कहोडांच्या मनात आणखी एक विचार होता. त्यांनी आपल्या मुलाकडे पाहिले आणि म्हणाले, “तुझ्या जन्माच्या वेळी माझ्या शापामुळे तुझे शरीर आठ ठिकाणी वाकले. त्या शापाचे ओझे तू इतकी वर्षे वाहिले आहेस; आता त्यातून मुक्त होण्याची वेळ आली आहे.”
कहोडांनी अष्टावक्राला समंगा नदीत स्नान करण्यास सांगितले. अष्टावक्र नदीच्या पाण्यात उतरला. त्याने क्षणभर डोळे मिटले आणि स्वतःला प्रवाहाच्या स्वाधीन केले. पाण्याच्या लहरी त्याच्या शरीरा भोवती फिरत राहिल्या आणि काही क्षणांनी तो नदीतून बाहेर आला.
सुजाता, कहोड आणि श्वेतकेतू त्याच्याकडे पाहतच राहिले.
त्याचे शरीर आता सरळ झाले होते.
ज्या देहाला लोकांनी बालपणा पासून “आठ ठिकाणी वाकलेला” म्हणून ओळखले होते, तो देह आता ताठ उभा होता. कहोडांच्या डोळ्यांत पाणी आले. त्यांनी मुलाच्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाले, “तुझ्या शरीराने आज आपले वाकडे पण सोडले; पण मला वाटते, तुझ्या ज्ञानाने ते खूप आधीच सोडले होते.”
अष्टावक्र काही बोलला नाही. त्याने नदीकडे पाहिले. प्रवाह पुढे जात होता आणि त्याच्या मनातही काहीतरी शांतपणे पुढे सरकत होते.
अष्टावक्राच्या जीवनातील जनकाचा प्रसंग येथे संपत नाही. जनकाने त्याच्या बुद्धिमत्तेचा अनुभव घेतला होता, पण त्याला केवळ शास्त्रार्थ जिंकणारा पंडित म्हणून अष्टावक्राकडे पाहायचे नव्हते. जनक स्वतः अत्यंत जिज्ञासू राजा होता; राज्य, संपत्ती, सत्ता आणि यज्ञ यांच्या मध्यभागी राहूनही त्याच्या मनात आत्मज्ञानाचा प्रश्न सतत जागा होता.
अष्टावक्रआणि जनक यांच्यात नंतर झालेला संवाद भारतीय तत्त्वज्ञानाच्या इतिहासात स्वतंत्र महत्त्व प्राप्त करतो. हा संवाद महाभारतातील बंदीच्या शास्त्रार्था पेक्षा पूर्णपणे वेगळ्या स्वरूपाचा आहे. येथे विजय-पराजय नाही, संख्या नाहीत, यज्ञातील स्पर्धा नाही आणि विद्वत्तेचे प्रदर्शनही नाही; येथे प्रश्न आहे “मी कोण?”
जनक विचारतो—
“कथंज्ञानमवाप्नोति? कथं मुक्तिर्भविष्यति?
वैराग्यं च कथं प्राप्तम्? एतद् ब्रूहि मम प्रभो।”
“ज्ञान कसे प्राप्त होते? मुक्ती कशी मिळते? वैराग्य कसे प्राप्त होते? हे मला सांगा.”
आणि अष्टावक्राचा उत्तराचा सूर वेगळाच आहे. तो जनकाला बाहेरच्या जगाचे ज्ञान वाढवण्यास सांगत नाही; तो त्याला स्वतःकडे पाहायला सांगतो. “तू शरीर नाहीस, इंद्रिये नाहीस, मन नाहीस; तू या सर्वांचा साक्षी असलेले चैतन्य आहेस,” अशी त्याची दिशाआहे. अष्टावक्रगीतेतील पहिल्या अध्यायात जनकाच्या या प्रश्नाला उत्तर देताना आत्म्याला साक्षी-चैतन्य म्हणून जाणण्याचा आग्रह दिसतो.
याच संवादातून पुढे “अष्टावक्रगीता” म्हणून प्रसिद्ध झालेला अद्वैतवेदांताचा एक अत्यंत प्रभावी ग्रंथ भारतीय परंपरेत रूढ झाला. त्यात जनक आणि अष्टावक्र यांच्यातील संवादाच्या माध्यमातून आत्मा, देह, मन, बंधन, मुक्ती, वैराग्य आणि साक्षीभाव यांचा विचार केला जातो.
अष्टावक्राच्या जीवनाची सुरुवात मात्र एका वेगळ्याच प्रश्नाने झाली होती—“माझे वडील कुठे आहेत?” त्या प्रश्नाने त्याला मिथिलेपर्यंत नेले, बंदी समोर उभे केले, शास्त्रार्थ जिंकायला लावला आणि अखेरीस वडिलांना परत आणले. पण त्या प्रवासात त्याच्यासमोर आणखी एक मोठा प्रश्न उभा राहिला—“मी कोण?”
पहिल्या प्रश्नाचे उत्तर त्याला नदीच्या पलीकडे, वरुणाच्या यज्ञात आणि वडिलांच्या रूपाने मिळाले; दुसऱ्या प्रश्नाचा शोध मात्र त्याने स्वतःच्या अंतर्यामात घेतला. आणि म्हणूनच अष्टावक्राची कथा केवळ एका विलक्षण बालकाने जिंकलेल्या शास्त्रार्थाची कथा राहत नाही; ती बाह्य रूपाच्या मर्यादांपासून सुरू होऊन आत्मस्वरूपाच्या शोधापर्यंत पोहोचणाऱ्या एका असामान्य जीवन प्रवासाची कथा बनते.
प्रेरणा :- वसु भारद्वाज यांचे "शुन:शेप, उत्तंक आणि अष्टवक्र"
पैजारबुवा,
मिसळपाव
प्रतिक्रिया
या सगळ्या कथा कुठुन येताहेत?
कथा वाचायला अतिशय तरल आहेत. त्यात ज्ञानही ठासुन भरले आहे. जणू माणसाने कसे जगावे/वागावे याचे परीपाठ ह्या कथा घालुन देत आहेत. पण ह्यांचा उगम कुठे आहे हे मज अज्ञानास निरोपावे.
अष्टावक्र-बंदी वादविवाद…
In reply to या सगळ्या कथा कुठुन येताहेत? by राजेंद्र मेहेंदळे
अष्टावक्र-बंदी वादविवाद महाभारतात वनपर्वात विस्ताराने येतो. मात्र तेथील वाद थोडा निराळ्या पद्धतीने येतो. बंदी बौद्धमत, मीमांसा, तर्कमत, सांख्यमत, द्वैत इत्यादी विविध तत्त्वज्ञानांच्या आधारे मत मांडतो आणि अष्टावक्र त्याचा प्रतिवाद करुन अद्वैत मत स्थापित करतो. साहजिकच महाभारतातील हा अध्याय प्रक्षिप्त आहे.
धन्यवाद!! हे कुठे वाचायला मिळेल?
In reply to अष्टावक्र-बंदी वादविवाद… by प्रचेतस
धन्यवाद!! हे कुठे वाचायला मिळेल?
संस्कृत डॉक्युमेंट्स वर बोरी…
In reply to धन्यवाद!! हे कुठे वाचायला मिळेल? by राजेंद्र मेहेंदळे
संस्कृत डॉक्युमेंट्स वर बोरी आणि कुंभकोणम प्रति उपलब्ध आहेत, बोरीत प्रक्षिप्त भाग बऱ्यापैकी गाळला असून वर माउलींनी लेखात उद्धृत केलेला भाग आहे तर कुंभकोणम मध्ये सर्व मत वाद प्रतिवाद विस्ताराने आहे.
अद्वैत... आता तर वाचयालाच पाहिजे.
In reply to अष्टावक्र-बंदी वादविवाद… by प्रचेतस
बंदी बौद्धमत, मीमांसा, तर्कमत, सांख्यमत, द्वैत इत्यादी विविध तत्त्वज्ञानांच्या आधारे मत मांडतो आणि अष्टावक्र त्याचा प्रतिवाद करुन अद्वैत मत स्थापित करतो....
प्रचेतस हे लिहाच 🙏
>> गर्भातील बालकाने आपल्या…
>> गर्भातील बालकाने आपल्या पित्याच्या वेदपठणातील चूक दाखवावी, हे कहोडांना अपमानास्पद वाटले आणि रागाच्या भरात त्यांच्या तोंडून शाप निघाला “जन्मतःच तू आठ ठिकाणी वाकलेलाअसशील!” ह्यातून सामान्य वाचकाने काय बोध घ्यायचा? - (सामान्य वाचक) सोकाजी
flawless बोधकथा
In reply to >> गर्भातील बालकाने आपल्या… by सोत्रि
मिपावर flawless बोधकथा लेखन स्पर्धा आयोजित करता येईल. एखादा सामान्य मिपाकरच हे शिवधनुष्य उचलू शकेल. असो.
=)) =)) =))
In reply to flawless बोधकथा by मूकवाचक
बोधकथा विथ फ्लॉ! मस्त मस्त!!
सद्य सामाजिक परिस्थिती अशी का आहे ह्या उत्तर मला आज मिळालं - बोधकथा विथ फ्लॉ.
- (मेस्मराईज्ड) सोकाजी
समग्र दर्शन विथ फ्लॉ असा एक संदर्भ ज्ञानेश्वरीत आहे
In reply to =)) =)) =)) by सोत्रि
ज्ञानेश्वर माउलींच्या मते काही दर्शनात देखील फ्लॉ होते.
एके हाती दंतु । जो स्वभावता खंडितु । तो बौद्धमतसंकेतु । वार्ताकाचा ॥ १-१२ ॥
ज्ञानेश्वर माऊलींच्या मते, गणपतीच्या एका हातामध्ये असणारा मोडका (तुटलेला) दात हा स्वभावतःच खंडित झालेल्या बौद्ध मताचे (बौद्ध तत्त्वज्ञानाचे) प्रतीक आहे.
दुर्दैव ज्ञानेश्वर माउलींचे!
In reply to समग्र दर्शन विथ फ्लॉ असा एक संदर्भ ज्ञानेश्वरीत आहे by मूकवाचक
>> ज्ञानेश्वर माउलींच्या मते काही दर्शनात देखील फ्लॉ होते.
दुर्दैव ज्ञानेश्वर माउलींचे असे की, फ्लॉ असलेल्या बोधकथा वाचून वाचून सगळीकडे फ्लॉ दिसू लागून, त्या माऊलींच्या मतांच्या नावावर भाषांतरकारांच्या मताचा अनर्थ लादून, माऊलीने नेमकं सांगितलंय काय ह्याचीच गल्लत केली जाते.
श्लोक १-१२ नुसता न वाचता १-१०, १-११ आणि १-१२ हे श्लोक एकत्र वाचल्यास माऊलींना नेमकं काय म्हणायचंय ते फ्लॉलेसली कळेल.
हे तिन्ही श्लोक आस्तिक आणि नास्तिक ह्या दोन्ही तत्त्वज्ञानाच्या शाखांचा आढावा आहे. इथे ज्ञानदेव ह्या वेगवेगळ्या तत्त्वज्ञानांना गणेशाच्या हातातील वस्तूंशी जोडत आहेत.
देखा षड्दर्शने म्हणिपती | तेचि भुजांची आकृती ||
म्हणऊनि विसंवादे धरिती | आयुधे हाती || १०||
तरी तर्क तोचि परशु | नीतिभेदु अंकुशु |
वेदांतु तो महारसु | मोदकाचा || ११ ||
एके हाति दंतु | जो स्वभावता खंडितु |
तो बौद्धमत संकेतु | वार्तिकांचा || १२ ||
१-१० मध्ये तत्त्वज्ञानाच्या सहा आस्तिक शाखांबद्दल माऊली सांगते आहे. एकाच गणेशाच्या सहा हातांमध्ये वेगवेगळी आयुधे आहेत, पण हात एकाच गणेशाचे आहेत. त्याचप्रमाणे सहा आस्तिक शाखा असल्यातरीही त्या एकाच सत्याकडे निर्देश करतात.
१-११ मध्ये माऊली म्हणते, परशू जसा अडथळे तोडतो, तसा तर्क चुकीची कल्पना, भ्रम आणि कुतर्क तोडतो आणि जसं अंकुश वापरून हत्तीला योग्य दिशेला नेता येतं त्याचप्रमाणे नीती-अनीतीचा विवेक मनुष्याच्या आचरणाला दिशा देतो. हा आत्मज्ञानाचा अनुभव म्हणजे अंतिम गोडवा जे वेदांताचे ज्ञान आहे ते गणेशाच्या हातातील मोदकाच्या गोडव्या प्रमाणे आहे.
१-१२ मध्ये माऊली नास्तिक तत्त्वज्ञानाबद्दल बोलत आहे. बौद्ध तत्त्वज्ञानात अनित्यता, क्षणभंगुरता आणि स्वभावशून्यता ह्या संकल्पना वेदांतील पुरुष ह्या अखंड वस्तुस्वरूपाला नाकारतात. त्या अखंडतेला विरोध करणारं तत्त्वज्ञान तुटलेल्या दाताच्या प्रतीकातून माऊलींनी दाखवले आहे. ह्या ओवीतला "वार्तिक" हा शब्द फार महत्त्वाचा आहे. कोणाच्या बौद्धमतांचा संकेत तर वार्तिकांचच्या म्हणजे वेदांवर टिप्पणी करणाऱ्यांचा म्हणजे वेद नाकारणाऱ्यांचा (नास्तिकांचा).
अशा प्रकारे माऊली पहिल्यास अध्यायात समग्र आस्तिक आणि नास्तिक तत्त्वज्ञानाच्या शाखांचा आढावा घेऊन विस्तीर्ण असा तत्त्वज्ञानाच्या कॅन्व्हास उभा करून गीतेच्या भावार्थदीपिकेचा पाया रचते.
- (माऊली पुढे नतमस्तक असलेला) सोकाजी
हम्म
In reply to दुर्दैव ज्ञानेश्वर माउलींचे! by सोत्रि
अभंग ज्ञानेश्वरी:
सहा शास्त्रे तीच, भुजांची आकृती, वेगळाले देती, अभिप्राय
म्हणोनिया हाती, आयुधे हि भिन्न, दाखवाया खूण, आपुलाली
तर्क तो परश, न्याय तो अंकुश, मोदक सुरस, वेदांताचा
बौद्ध-वार्तिकांचे, जे का बौद्धमत, तो चि छिन्न दंत, योगाहाती
मग सांख्यमत, तो चि पद्महस्त, स्वभावे जो देत, वर-दान ...
मी फक्त छिन्न दंताचा उल्लेख फ्लॉ असा केला आहे, एवढेच.
- (माऊलींपुढे नतमस्तक असलेला) मूकवाचक
दुर्दैव ++
In reply to हम्म by मूकवाचक
>> ज्ञानेश्वर माऊलींच्या मते, गणपतीच्या एका हातामध्ये असणारा मोडका (तुटलेला) दात हा स्वभावतःच खंडित झालेल्या बौद्ध मताचे (बौद्ध तत्त्वज्ञानाचे) प्रतीक आहे.
आणि
>> बौद्ध-वार्तिकांचे, जे का बौद्धमत, तो चि छिन्न दंत, योगाहाती
ह्यात जमीन-आस्मानाचा फरक आहे; जी भावांतराची आणि पर्यायाने भाषांतराची गल्लत आहे. आणि ह्यात नेमका फ्लॉ काय आहे हे कुठेच स्पष्ट होत नाहीयेय.
>> मी फक्त छिन्न दंताचा उल्लेख फ्लॉ असा केला आहे, एवढेच.
दुर्दैव ++
- (कन्फ्युज्ड) सोकाजी
प्रश्न अगदी रास्त
In reply to >> गर्भातील बालकाने आपल्या… by सोत्रि
तुमचा प्रश्न अगदी रास्त आहे, कदाचित पैजार बुवा उत्तर देतील. एकूणात वैदिक (ढोबळ हिंदू) ज्ञान परंपरेत कथांना अतिशय महत्त्व आहे. आजही 'कथा ज्ञान यज्ञ' अशा प्रकारचे मोठमोठे धार्मिक कार्यक्रम आयोजित केले जातात. अनेक स्टार बाबा बुवा स्वत:ला 'कथावाचक' म्हणवून घेतात. घरी पण ज्या काही पूजा सांगितल्या जातात (म्हणजे ज्यांना फक्त पुराणोक्तचाच अधिकार आहे त्यांच्याकडे) त्यात मुख्य भाग कथा हाच असतो. वेदोक्त अधिकार ज्यांना आहे त्याबद्दल माहिती नाही.
युवाल नोवा हरारी कथा 'स्टोरी' या गोष्टीमुळे मानवजात कशी उत्क्रांत झाली याचे उत्तम विवेचन करतो. कथेत वहावत न जाता तथ्य बघू शकणारे खूप कमी लोक असतात त्यामुळे त्याचे म्हणणे की ही जाण अत्यंत महत्त्वाची आहे. आजही कार्पोरेट मिटींगमध्येही What is your story? असा प्रश्न महत्त्वाचा ठरतो. आपले म्हणणे गळी उतरवण्यासाठी कथा हे अत्यंत प्रभावी साधन आजही आहे. एकदा एका कंपनीत बड्या अधिकाऱ्याचे असेच जबरदस्त प्रेझेंटेशन झाले. अगदी फ्लॉलेस स्टोरी होती. त्यानंतर दुसरे एक व्हीपी उठले. त्यांनी फक्त काही आकडे दाखवले. ते म्हणाले I don’t have a story, I have only solid numbers. बजेट कुणाला मिळाले हे स्पष्ट आहे.
पण हे मिपा आहे ना..... इथे…
In reply to प्रश्न अगदी रास्त by स्वधर्म
पण हे मिपा आहे ना..... इथे कथा, पाकृ, भटकंती, चर्चा काव्य इ. सर्व विषय लिहिले जाऊ शकतात.
ह... काथ्याकुट विभाग नसल्यामुळ लिहिणर्याने उत्तर द्यावेच याचा काही नियम नाहीये.
. आजही 'कथा ज्ञान यज्ञ' अशा…
In reply to पण हे मिपा आहे ना..... इथे… by Bhakti
. आजही 'कथा ज्ञान यज्ञ' अशा प्रकारचे मोठमोठे धार्मिक कार्यक्रम आयोजित केले जातात. अनेक स्टार बाबा बुवा स्वत:ला 'कथावाचक' म्हणवून घेतात
याची तुलना इथे का???
रोख कथेवर
In reply to . आजही 'कथा ज्ञान यज्ञ' अशा… by Bhakti
वरची ओळ 'कथा' ही गोष्ट किती सामर्थ्यवान आहे हे सांगण्यासाठी लिहिली होती. त्याचा या कथेच्या किंवा कोणत्याच कथेच्या लेखकाकडे रोख नव्हता.
हो हो
In reply to पण हे मिपा आहे ना..... इथे… by Bhakti
मी स्वागतच केले आहे. माझा तरी सोकाजीरावांना उत्तर मिळावेच असा काही आग्रह नाही 🙂
सोत्री आणि स्धर्म यांनी…
In reply to हो हो by स्वधर्म
सोत्री आणि स्धर्म यांनी कथेशिवाय लिहिलेल्या लेखावर प्रश्न विचारण्याची वाट पाहणारी भक्ती🙏
;)
In reply to सोत्री आणि स्धर्म यांनी… by Bhakti
भक्तीतै,
म्हणजे मी कथा लिहू नये आणि चुकून-माकून जर लिहीलीच तर त्यावर तुम्ही प्रश्न विचरण्याच्या लायकीची ती नसेल असा गर्भितार्थ यात नसावा अशी आशा बाळगतो. 😉
- (आपला कृपाभिलाषी) सोकाजी
मस्त
मस्त लेख. अष्टावक्र गीता म्हणजे भारतीय तत्त्वज्ञानातील सर्वोच्च मानबिंदू आहे असे म्हणतात ना?
तंतोतंत!
In reply to मस्त by चंद्रसूर्यकुमार
जहां सबका तत्त्वज्ञान खत्म होता है वहा से अष्टावक्र गीता शुरू होती है।
अष्टावक्र गीता तुर्यावस्थेचे, अष्टावक्राच्या त्या तुर्यावस्थेच्या अनुभूतीचे, विस्तृत विवेचन करणारा सर्वोत्तम ग्रंथ आहे. पण ती फार पुढची/वरची पायरी आहे. तिथपर्यंंत पोहोचायचे असे हा त्या ग्रंथाचा विषय नाही.
- (अष्टावक्र गीतेचा पंखा) सोकाजी
तिथपर्यंंत पोहोचायचे कसे असं वाचा
In reply to तंतोतंत! by सोत्रि
तिथपर्यंंत पोहोचायचे
असेकसे हा त्या ग्रंथाचा विषय नाही.- (माणूस) सोकाजी
अत्यंत अल्पश्रुत असल्याने...
अशा कथा माझ्यासाठी मेजवानी समान आहेत. देववाणी येत नाही,समजत नाही. या जन्मी शिकणे शक्य दिसत नाही.
तुम्ही लिहा,आवडीने वाचत आहे.
कथा ठाऊक होती 👍शेवटचा…
कथा ठाऊक होती 👍शेवटचा मतितार्थ 👍
वैदिक काळातील ज्ञान संकल्पनांच्या मर्यादा
पैजार बुवा, नेहमीप्रमाणे कथा अत्यंत रसाळ आहे. त्याकाळचे वर्णन स्मरणरमणीय आहे. वाचतच जावेसे वाटते. तरी दोन मुद्दे उपस्थित करावेसे वाटतात:
ज्ञान म्हणजे काय?
कथेत अष्टवक्र व बंदी यांच्यात आकड्यांचा वाद आहे. जसे की जगात 'एक' काय आहे, त्याचे उत्तर 'दोन' काय आहे, त्यावर 'तीन' काय याप्रमाणे अखेर तेरा या आकड्याशी बंदीचा पराभव होतो. या गोष्टी एक कोडे म्हणून रोचक आहेत पण यात पांडित्य काय असावे? बरेचसे प्रश्न तीन वेद, चार आश्रम, चार वर्ण, पाच यज्ञ इ. वैदिक परंपरा व कर्मकांडाशी संबंधित आहेत. हे अगदीच प्राथमिक 'ज्ञान' वाटते शिवाय त्याचा वास्तव उपयोगही स्पष्ट होत नाही. शिवाय कथेतून असे दिसते की हे सगळे 'ज्ञान' ऋषींच्या गुरूकुलात राहून, ऐकून ऐकून मिळवले जात असे. स्वत: पडताळणी करून जुने खोडून काढून नवे प्रस्थापित होत असे अशी काही उदाहरणे असतील तर त्याला ज्ञान नक्कीच म्हणता येईल, अन्यथा या परंपरा होत. ज्ञान व परंपरा या भिन्न गोष्टी आहेत. जे पुढे जाते, सुधारते ते ज्ञान आणि ज्या तशाच चालत राहतात त्या परंपरा असे मला वाटते.
शिवाय त्या काळी मी कोण आहे? मोक्ष कसा प्राप्त करावा? इ. प्रकारचे 'ज्ञान' होते. पण त्याचा प्रांत आधिभौतिक असल्या कारणाने मृत्यूशिवाय पडताळणी करताच येत नाही त्यामुळे ऐकेले तेच ज्ञान व त्यावर विश्वास ठेवण्याशिवाय पर्यायच नव्हता.
ज्ञानाचा उपयोग काय?
त्या काळच्या अनेक कथांतून दिसते की राजा किंवा उच्च पदावरील व्यक्ती अगदी परम सुखात ऐहिक जीवन जगत व प्रजेवर राज्य करीत. जे काही युध्दकला वगैरेचे ज्ञान होते त्याचा उपयोग राजाचे राज्य सुरक्षित राखण्यासाठी, परंतु प्रजेला कसे सुखात ठेवावे, न्याय कसा करावा किंवा व्यापार, शेती कशी करावी अशा प्रकारचे काही ज्ञान किंवा पांडित्य होते काय? अशा प्रकारच्या परंपरा नक्कीच होत्या, परंतु पिढी दर पिढी सुधारणा होत जाऊन तिथे ज्ञान निर्माण झाले का, याचे कुतूहल आहे. जीवनातील दु:खातून मार्ग कसा काढावा? याचे उत्तर मात्र देण्यात आलेले आहे ते म्हणजे विविध यज्ञ किंवा अनुष्ठने करून असे वाटते. उदा. पुत्रकामेष्टी किंवा अश्वमेध इ.
त्या काळच्या अनेक कथांतून…
In reply to वैदिक काळातील ज्ञान संकल्पनांच्या मर्यादा by स्वधर्म
हे फक्त कथांत ! त्याकाळांत राजाचे आयुष्य सुद्धा सामान्य माणसाप्रमाणे कष्टाचे होते. AC नव्हता, गाडी नव्हती आणि आधुनिक औषधोपचार सुद्धा नव्हते. कॅलेंडर वरील देवी देवतांच्या वैभवावरून जाऊ नका.
तत्वज्ञान हे पिरॅमिड चे टोक आहे. पाया म्हणजे सामान्य जनतेची सामान्य कामे (शेती, कायदा व्यवस्था इत्यादी). पाया विस्तृत असल्याशिवाय हे टोक जात उंच जाऊ शकत नाही. म्हणूनच आधुनिक भारतातून काहीही विशेष तत्वज्ञाने निर्माण होऊ शकत नाहीत. किंवा दळिद्री आफ्रिकेतून (इजिप्त वजा) काहीही विशेष ज्ञान आणि तत्वज्ञान निर्माण झाले नाही.
ज्ञान आणि कला ह्यांचे संवर्धन करण्यात भारतीय राजे आणि मंडी व्यवस्था अग्रगण्य राहिली आहे. राजा भोज ह्यांनी भोजपुर हे शहर वसवले आणि समरांगण सूत्रधार ह्या ग्रंथाचे संपादन केले. हा ग्रंथ भारतीय वास्तूरचनेची encyclopedia आहे. त्याकाळांत विविध राजांनी ह्या प्रकारची ग्रंथरचना निर्माण केली.
दुसरी गोष्ट म्हणजे अष्टवक्र वगैरे ह्या कथा आहेत. कथा टिकवण्यासाठी त्यांत वैविध्य आणि आणि आश्चर्य पाहिजे. दोन भिकारी धर्मशाळेंत भेटले आणि एक रोटी वाटण खाताना त्यांनी "मी कोण" ह्याविषवर प्रचंड सखोल चर्चा केली अशी कुणी कथा लिहिली तर कुणालाही ती ऐकावीशी वाटणार नाही. त्यामुळे शाप, वरदान, राजे महाराजे इत्यादी मसाला कथेंत घालावा लागतो. सामान्य बुद्धिमतेचे लोक कथा म्हणून आठवणीत ठेवतात पण त्या निमित्ताने त्यातील सखोल ज्ञान पुढच्या पिढीला दिले जाते.
आपणासि जाणावे आपण, या नाव ज्ञान.
In reply to वैदिक काळातील ज्ञान संकल्पनांच्या मर्यादा by स्वधर्म
"आपणासि जाणावे आपण, या नाव ज्ञान"
( -- येर ती पोट भरायाची विद्या). - दासबोध.
ज्ञान आणि 'माहिती' यातील फरक समर्थांनी अचूकपणे सांगितलेला आहे. 'स्वत:ला जाणणे' याविषयी:
सदा स्वरूपानुसंधान I
हे मुख्य साधुचे लक्षण I
जनी असोन आपण I
जनावेगळा II
अष्टावक्राच्या जन्माची आणि…
अष्टावक्राच्या जन्माची आणि ज्ञानसाधनेची कथा आवडलीच.
कथा आणि अतिशयोक्ती, कल्पनाविलास वगैरे
विषय निघालाच आहे तर थोडी भर.
दूरदर्शन येण्याआधीच्या काळात मनोरंजनाची साधने सीमीत होती. चाळ संस्कृतीत एखाद्या उत्सवाच्या निमित्ताने होणारे 'विविध गुणदर्शन' एवढेच मनोरंजन, बाकी मनोरंजनाची साधने एक तर नाहीत किंवा परवडणारी नाहीत हे अनुभवलेले लोक मी स्वत: पाहिलेले आहेत. ज्या काळात कीर्तन, प्रवचन, भजन, भारूड एवढेच मनोरंजन समाजाकडे उपलब्ध होते, तेव्हा त्यातच कल्पनाविलास, अतिशयोक्ती ठासून भरून कथेकरी मंडळी नवरसांना उत आणत असतील आणि सगळेच "मूकं करोति वाचालं, पंगू लंगयते गिरीम"च्या वळणावर जात असेल, तर त्यात आश्चर्य वाटण्यासारखे काहीच नाही. आता ओटीटीवर हवे त्या प्रकारचे आणि हव्या त्या भाषेतले मनोरंजन मुबलक प्रमाणात उपलब्ध असल्याने धार्मिक किंवा अध्यात्मिक साहित्यातून फापटपसारा न मांडता नेमके मार्गदर्शन मिळावे अशी अपेक्षा केली जातेे आहे. ते ही साहजिकच आहे.
आज डेटा सेंटरच्या एखाद्या कोपऱ्यात एखाद्या धर्माचे समस्त धर्मग्रंथ सहज सामावतील अशी स्थिती आहे. पण छपाईचा शोध लागण्यापूर्वीच्या काळात देखील ज्यांनी खूप मोठी ज्ञानसंपदा (बॉडी ऑफ नॉलेज) जतन करण्यसाठी आपल्या बौद्धिक क्षमतेचा वापर केला, त्यांचा पोपटपंची आणि घोकंपट्टी असा उपहास करणे सयुक्तिक नाही.
जुन्या काळातल्या कथांमधे मुबलक प्रमाणात वापरला गेलेला अतिशयोक्ती अलंकार, आज निरर्थक वाटेल असा कल्पनाविलास आणि त्या काळातल्या आणि आज गैरलागू झालेल्या प्रथा परंपरांचे उल्लेख येणारच. छिद्रान्वेषीपणा केला नाही, तरी बऱ्याच गोष्टी आजही आपले रंजनमूल्य टिकवून आहेत, आणि अधोरेखीत करायचा असलेला बोध स्पष्टपणे ठसवू शकतात, हेच त्यांचे यश आहे, त्यातच लेखकाचे मोठेपण आहे.
पोपटपंची आणि घोकंपट्टी…
In reply to कथा आणि अतिशयोक्ती, कल्पनाविलास वगैरे by मूकवाचक
पोपटपंची आणि घोकंपट्टी अत्यंत महत्वाची आहे. बालसंगोपनात ह्याचा भरपूर वापर केलाच पाहिजे. घोकंपट्टीला कमी लेखण्याची जी एक आधुनिक सवय निर्माण झाली आहे ती पूर्णतः चुकीची आहे. न्यूरोसायन्स ने तर हल्ली सिद्ध सुद्धा केले आहे कि घोकंपट्टी हा ज्ञानाचा आणि प्रगल्भ मेंदूचा पाया ठरू शकतो.
From a neuroscience perspective, learning things by heart—often called rote memorization or rehearsal—plays a vital, foundation-building role in the brain. While modern education heavily prioritizes critical thinking and problem-solving, neuroscience reveals that memorization is a powerful form of "mental gymnastics" that physically reshapes and optimizes the brain.