दर्या
दादूस जाम दमला होता. छोटासा पोर तो, समुद्राच्या खवळलेल्या पाण्याशी झुंज तरी किती देणार ? … तेही एकट्याने पोहत.
एका लाकडाच्या ओंडक्याला धरून तो तरंगत होता. नशीब ! समुद्र खूप वेळाने का होईना,शांत झाला. त्याने जरा दम खाल्ला. त्याला बरं वाटलं. तोंडात गेलेलं खारं पाणी त्याने थुंकलं. त्याने डोळे मिटले आणि त्याला सकाळचा प्रसंग आठवू लागला...
त्याचं गाव कोकणातलं, बुरुंडी. समुद्रकिनारी वसलेलं. दापोली शहराच्या थोडसं पलीकडे.कोळ्यांची वस्ती सारी. त्यामध्ये एका घरात दादूस रहायचा.
त्या दिवशी सकाळी त्याचे वडील निघणार होते. समुद्रात मासेमारीला. त्यांची छोटीशी बोट होती, एकविरा. जेमतेम पाच-सहा माणसं बसतील एवढीच. बोटीत खलाशी, बरोबर स्वयंपाकाचं साहित्य, पाणी,डिझेल. पण लाइफ जॅकेट्स ? ती मात्र नव्हती. कारण ती त्यांना परवडणारी गोष्ट नव्हती. दादूस त्याच्या वडिलांना म्हणाला, मी आज बोटीवर येतो. ते त्याला नको म्हणाले. पण त्याने हट्टच केला. शेवटी नाईलाजाने त्यांनी त्याला घेतलं. आपण सहलीला जातो, बोटीत बसतो; पण ती बोट वेगळी आणि - मासेमारीची बोट ? ती म्हणजे मजेची गोष्ट नाही. म्हणून तर दादूसला बोटीवर जायला खूप मजा वाटायची. त्याला ते साहस वाटायचं. शेवटी कोळ्याचा पोर तो. समुद्र पाहत तर मोठा झालेला.
बोट निघाली. आज वारं जास्तच जोरात होतं. का कोणास ठाऊक ? ते अंगावर घेत दादूस उभा होता.आजीने शिकवलेलं एक कोळीगीत म्हणत –
चाललिया होरी समिंदरा हो समिंदरा
जाल्यात गावल म्हावरा म्हावरा
समुद्र शांत होता. ते समुद्रात आत गेले. किती ? तर फार लांब नाही. काही सागरी मैल आणि पाणी लागलं की डचमळ करायला. याचा अंदाजच नव्हता. शेवटी समुद्रच तो. लहरी ! लाटा मोठ्या झाल्या. खूप मोठ्या ! आणि एका महाकाय लाटेनं त्यांची बोट हवेत उचलून फेकली गेली. बोटीवरची डबडीडुबडी, इतर साहित्य आणि अर्थातच माणसंसुद्धा. लाटांनी बोटीची बराच वेळ फेकाफेक केली.
त्या खवळलेल्या दर्यानं माणसं आत ओढली. त्या सगळ्यांची ताटातूट झाली. कोण कुठे तर कोण कुठे ? वडील त्याला आणि तो त्यांना शोधत होता. त्याच्या वडलांना तो एकदा दिसला. पण तो क्षणभर दिसला आणि एका मोठ्या लाटेत दिसेनासाही झाला.
सगळेजण धडपड करायला लागले. हातपाय मारायला लागले. ते सगळेच जातिवंत कोळी. लागले पोहायला. दादूससुद्धा. पण तो इतरांपेक्षा लहान होता. आणि खवळलेल्या समुद्रात पोहणं काय सोपं असतं ? घरात बसून माशाचं कालवण ओरपण्याएवढं ?
नशीब ! पडताना त्याने एक लाकडाचा ओंडका घट्ट धरून ठेवला आणि तो तरंगत राहिला. आता तुटलेली बोट मागे पडली होती. बरोबरची सगळी माणसं गायब झाली होती. तो समुद्रात आत कुठेतरी होता. खूप खूप लांब. किती सागरी मैल? कोणास ठाऊक.
आता दादूसच्या डोळ्यात पाणी आलं. तो स्वतःवरच चिडला. का आपण आज बोटीवर आलो ? वडील नको म्हणत होते…
समुद्रही लवकरच शांत झाला होता. त्याला तो वडिलांसारखा वाटला. वडील जसे चिडतात आणि शांतही होतात. तसाच तो समुद्र. त्याला वाटलं, आता शोधायला वस्तीतली माणसं येतील. बोटी घेऊन. पण त्यांना आपलं ठिकाण- ते कसं कळणार ? तो विचारात पडला. तो दमला होता. त्याचे डोळे मिटू लागले होते. त्याच्या डोळ्यांसमोर गावातला गणपती आला. त्यांच्या गावात श्रीसावरदेवाचे देऊळ आहे. त्या देवळात एक गणपती ठेवलाय.तो निघताना बाप्पाच्या पाया पडला होता.
त्या गणपतीचीसुद्धा एक कहाणी आहे. तो गणपती गावातल्या मच्छीमारांना समुद्रात आढळला होता. त्यांनी त्याला बोटीत घेतलं. त्याची पूजा केली आणि त्याला पुन्हा समुद्रात सोडून दिलं. पुन्हा थोड्या वेळाने तो गणपती बोटीजवळ आला. त्यामुळे त्यांना असं वाटलं की गणपतीबाप्पाला आपल्याच गावात रहायचं आहे. म्हणून त्यांनी गणपती गावात आणला आणि देवाच्या देवळात ठेवला. गणपतीची मूर्ती देखणी ! मीटरभर उंचीची,शिसवी लाकडाची. विशेष म्हणजे मूर्ती तीन तोंडाची आहे.
त्याने बाप्पाचं नाव घेतलं. तो म्हणाला, जसा तू समुद्रातून आमच्या गावात आलास, देवा, तसंच तू मला आता या समुद्रातून माझ्या गावात परत ने.
आणि त्याला डोळ्यांसमोर काहीतरी दिसलं. तो आला होता... बाप्पाने पाठवलेला एक दूतच म्हणा ना !...
तो एक गरुड होता. पांढऱ्या पोटाचा समुद्री गरुड. त्याचं नाव दर्या. तुम्ही म्हणाल, हा काय प्रकार ? गरुडाचं नाव दर्या कसं काय ?
एकदा एक खूप मोठं चक्रीवादळ आलं होतं. कोकणातल्या सागरकिनाऱ्यांना ते थेट धडकलं नसलं, तरी त्याने किनाऱ्यावरच्या गावांचं खूप नुकसान केलं होतं. झाडं मोडून पडली होती. पाणी किनाऱ्याच्या पुढे आलं होतं. घरांचे पत्रे उडाले होते. भिंती पडल्या होत्या. सगळं नुकसान !
असं ते महाभयंकर वादळ थांबलं, तेव्हा दादूसला सुरुच्या झाडाखाली एक पिल्लू सापडलं.समुद्री गरुडाचं. त्याचे आई-वडील वादळात कुठे गेले होते, कोणास ठाऊक ? उडून गेले होते की मरण पावले होते ?...
दादूसने त्याला घरी आणलं. त्याला प्रेमाने सांभाळलं. त्याच्यासाठी पिंजरा केला. आतमध्ये बसायला मस्त गवताची गादी केली. तो त्याला माशांचे तुकडे भरवत असे. दादूसने त्याचं नाव दर्या ठेवलं होतं. समुद्रकिनारी सापडला म्हणून. त्यालाही दर्या नावाने हाक मारली की लगेच कळायचं. दादूसचं दर्यावर खूप प्रेम होतं आणि दर्याचही दादूसवर तेवढंच प्रेम होतं. पुढे दर्याची तब्येत जरा सुधारली. त्याच्या पंखात बळ आलं. तेव्हा दादूसने त्याला पिंजऱ्यातून बाहेर काढलं. मोकळं ठेवलं. तो उडायला शिकला ; पण तो उडून निघून गेला नाही. तर तो त्याच्या घराभोवतीच असायचा. दादूस जिकडे जात असेल तिकडे तो त्याच्या मागेमागे जायचा. त्यांची जोडीच झाली होती म्हणा ना. एक वेगळीच मैत्री. दादूस त्याच्याशी बोलायचा. गप्पा मारायचा. दर्यालाही ते कळत असावं बहुतेक. तो घरातल्या सगळ्यांकडेच जायचा. दादूसच्या वडलांकडेही. तो पूर्ण माणसाळला होता.
पण पुढे दर्या मोठा होत गेला. एक देखणा समुद्री गरुड. मग एके दिवशी तो निघून गेला. त्याच्या नैसर्गिक अधिवासात. निसर्गात ! मग तो परत काही आला नाही.
तोच आज आला होता- दर्या ! तो खाली आला. त्या लाकडाच्या ओंडक्यावर बसला. किर्र्कन ओरडला. दादूस म्हणाला- दर्या ! अप्पा- अप्पा… दर्याला काय कळलं कोणास ठाऊक ? पण तो आकाशात उडाला. आज त्याची पाळी होती मैत्रीला जागण्याची.
दादूसचा काका वस्तीमधल्या मित्रांना घेऊन निघाला होता. दोन- चार बोटी निघाल्या होत्या. त्यांना तुटलेली बोट सापडली. हळूहळू एकेक तरंगणारी आणि पोहणारी माणसंही सापडली. आणि दादूसचे वडील ? ते दादूसला शोधत,पोहत लांब गेले होते. बऱ्याच वेळाने तेही सापडले. पण दादूस ? … तो समुद्रात कुठे होता, कोणास ठाऊक ? तुमच्या भाषेत लोकेशन ?
दादूसचे वडील एका बोटीत चढले होते आणि ते सगळीकडे पहात होते. त्यांची नजर फिरत होती.पण त्यांना पोरगा दिसत नव्हता. त्यांच्या समुद्राच्या अनुभवाचा आज कदाचित काही उपयोग नव्हता.
पण दर्या किनाऱ्याच्या दिशेने निघाला होता. घराकडे. अप्पांच्या शोधात. वाटेत त्याला बोटी दिसल्या आणि अप्पादेखील. पक्ष्यांची नजर तीक्ष्ण असते.
अप्पांनाही आकाशात उडणारा दर्या दिसला. त्यांनी मोठ्याने आवाज दिला- ए दर्या ! आणि तो त्यांच्या बोटीजवळ आलादेखील. त्याने त्याचे भलेमोठे पंख फडफडवले. तो ओरडला आणि त्याने पुन्हा आकाशात भरारी घेतली. लोकांना त्याचा संकेत कळला नाही ; पण वडलांना कळलं. त्यांनी त्याला पिल्लू असल्यापासून पाहिलं होतं. त्यांनी त्याला स्वतःच्या हाताने भरवलं होतं.ते म्हणाले, त्याच्या मागे चला. दर्या उडत राहिला. गिरक्या घालत राहिला. बोटी त्याच्या मागे जात राहिल्या. आणि एके ठिकाणी तो खाली पाण्याजवळ गेला.
आणि खलाशांना तो दिसला. त्यांचा दादूस तिथे होता.
बोट तिकडे वळवण्यात आली. दादूसला वर घेण्यात आलं. दादूस रडू लागला. काकांनी आणि वडिलांनी त्याला जवळ घेतलं.
दादूसने रडवेल्या डोळ्यांनी दर्याकडे बोट दाखवलं आणि म्हणाला, दर्या- माझा मित्र ! त्यावर सगळेजण हो म्हणाले. त्यावर दर्याने त्याचे मोठे पंख फडफडवले व तो बोटीवरच येऊन बसला.
आज दर्याला दादूसवरचं संकट कसं कळलं होतं, कोणास ठाऊक ? योगायोग की त्याला बाप्पाने पाठवलं होतं ? ते एक बाप्पाच जाणे.
बोटी परत फिरल्या. दर्या वर डौलात उडत होता. तो दादूसला सोडायला येत होता. कदाचित तो परत त्याच्या घरी राहिलाही असता. खूप दिवस किंवा - अगदी थोडे दिवस. बाप्पालाच माहिती.
बोटी बुरुंडीला निघाल्या होत्या. दोन मित्रांची भेट घडवून,समुद्रही काही झालंच नाही अशा थाटात शांत होता.
खाली दर्या लहरत होता. वर दर्या विहरत होता.
काका जोरात म्हणाला,’ गणपती बाप्पा ’ सगळे एका सुरात ओरडले – ‘ मोरया ! ‘
मिसळपाव
प्रतिक्रिया
अप्रतिम.. किती दिवसांनी…
अप्रतिम.. किती दिवसांनी तुमचे लेखन वाचले..
पुढे काय होईल हे प्रत्येक ओळ वाचताना होत होत..
अतिशय खूपच रोचक.. आणि सुंदर कथा...
लहान मुलांना सांगायला सुद्धा हि गोष्ट खुप्पच उपयोगी येईल.
लिहीत रहा.. वाचत आहे..
अगदी लहान होवून वाचली.
अगदी लहान होवून वाचली.
नेहमी प्रमाणेच मस्त .
तुमच्या बालकथेने अशाच एका बालकाची आठवण आली. गटारी आमोशेला भाऊच्या धक्क्यावरून रेवस ला जाणारी बोट वादळात सापडली. बरेच लोक बुडाले. बोटीचा कॅप्टन पण बुडाला. एक बारा वर्षाचा मुलगा तब्बल बारा तास समुद्रात पोहून किनार्यावर पोहोचला होता. विश्वनाथ उर्फ बारकूशेठ,
छान बालकथा आहे.आवडली
छान बालकथा आहे.
आवडली