Skip to main content

कथा कादंबऱ्यांचा यंत्रमानवी कारखाना

लेखक हेमंतकुमार यांनी सोमवार, 21/09/2026 08:50 या दिवशी प्रकाशित केले.

कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात  AI मुळे पोटार्थी लेखक  आणि   अन्य काही  कलावंत देखील देशोधडीला लागतील की काय अशी  वास्तव भीती आज  घोंघावते आहे. नोव्हेंबर 2022मध्ये चॅट जीपीटी सार्वजनिक झाल्यानंतरचा AIचा   झंझावात सर्वांच्या डोळ्यांसमोर आहेच.   सुरुवातीस हे प्रकरण  विज्ञान तंत्रज्ञानापुरते   सीमित राहील की काय असे वाटत असताना हळूहळू   या यंत्रप्रज्ञेने जीवनाच्या असंख्य क्षेत्रांत प्रवेश करून    व्यापक संचार केलेला दिसतो. त्यामध्ये  लेखन आणि कलाक्षेत्रही  आलेले आहे.  या पार्श्वभूमीवर सन 1954 मधील Roald Dahl या ब्रिटिश लेखकाच्या   ‘The Great Automatic Grammatizator’ या  (तारतम्याविना वापरलेल्या)  आधुनिक तंत्रज्ञानाचे प्रभावी  विडंबन करणाऱ्या समर्थ कथेची   प्रकर्षाने आठवण होत आहे.  AI सारखे मानवनिर्मित तंत्रज्ञानच एके दिवशी  आपल्या मानगुटीवर बसेल आणि त्यातून  मानवी विचारक्षमता आणि सर्जनशीलतेचा अंत होण्याचा धोका आहे हे  भयस्वप्न त्या कथेतून व्यक्त झालेले आहे.  गेल्या 72 वर्षानंतर ती कथा  आज  तर  अधिकच कालसुसंगत  ठरल्याने  सादर आहे तिचा  अल्पपरिचय : 

तंत्रकुशल नोकर असलेला त्या कथेचा नायक गणिते  सोडवणारा एक भला मोठा संगणक तयार करतो. त्यानंतर   शिणलेल्या अवस्थेत तो विश्रांती घेत असताना त्याच्या डोक्यात एक भन्नाट कल्पना येते की,  इंग्रजी भाषेचे व्याकरण देखील गणितीय   सूत्रांप्रमाणे   काटेकोर बांधलेले आहे.   अशाच एखाद्या अन्य संगणकात जर आपण अंकांच्या ऐवजी शब्द आणि  लेखनकल्पना (plots)  ठासून भरल्या तर त्यातून हव्या  त्या प्रकारची आणि अगदी प्रमाणभाषेतली  व्याकरणशुद्ध  कथा-कादंबरी सहज  तयार   होऊ शकेल !  आयुष्यात आपणही कधीतरी लेखक व्हावे ही  त्याची मनीषा होती   पण  प्रयत्नांती देखील  त्याला त्यात यश आलेले नव्हते.  

मग  तो  या कल्पनेला मूर्त स्वरूप देऊन असाच एक भला मोठा संगणक तयार करतो. त्यात कथा-कादंबरी लिहिण्यासाठी लागणारा सर्व मसाला अर्थात ‘कच्चा माल’   विविध प्रणालींद्वारे भरला जातो. प्रत्येक प्रणालीसाठी यंत्रावर एक स्वतंत्र  बटन ठेवलेले असते आणि त्यानुसार यंत्रात कथानकाचे प्रकार,  मध्यवर्ती संकल्पना,  लेखनशैली,  पात्रे, शब्दसंग्रह आणि व्याकरणाचे नियम हे सर्व काही यथास्थित  भरले जाते. तसेच प्रत्येक कथेमध्ये अथवा कादंबरीच्या प्रत्येक प्रकरणात एखादा तरी लांबलचक आणि  गूढ  शब्द  घालण्याची त्यात सोय केली जाते.  असा शब्द घालण्याने वाचकाच्या लेखी तो  लेखक एकदम प्रतिभावान ठरतो असे  नायकाचे म्हणणे !  याचबरोबर कथानकात मिसळण्यासाठी आनंद,  दुःख, विनोद,  कारुण्य,  रहस्य आणि वर असोशीची फोडणी  या सर्व गुणधर्मांचीही  सोय करण्यात आली.  एकंदरीत पाहता  त्या काळी बाजारात यशस्वी ठरलेल्या अनेक पुस्तकांचा अभ्यास करून वरील सर्व  मालमसाला यंत्राला पुरवण्यात आला.  सरतेशेवटी,  यंत्रातून लेखनाचे उत्पादन करताना त्याचा सुमार दर्जा हा निकष महत्त्वाचा ठरवण्यात आलेला होता.  

 आता तो त्याच्या मालकाला ही अभूतपूर्व  योजना   पटवून देतो आणि त्यानुसार लेखन पाडून  ते  दोघेही रातोरात लेखक बनतात आणि त्यावर चांगली कमाई पण  करू लागतात. त्यातूनच पुढे  एक  मोठा साहित्यिक धंदा उभा राहतो.  नंतर  अनेक काल्पनिक लेखकांच्या नावांनी देखील ते साहित्य-उत्पादन वाढवू लागतात. तरी देखील खऱ्याखुऱ्या हयात   प्रतिभावंत  लेखकांशी  आपल्याला अजूनही स्पर्धा करावी लागतेय  याची त्या  नायकाला खंत  असते. मग तो त्याचे  अखेरचे  संहारक ब्रह्मास्त्र  सोडायचे ठरवतो.  तो अनेक प्रथितयश लेखकांना भेटतो आणि त्यांच्यापुढे एक करारनामा ठेवतो. त्यामध्ये असे म्हटलेले असते की संबंधित लेखकाने त्याचे आयुष्यभराचे  जे  काय मानधन असेल ते एकदाच या संगणक कंपनीकडून घ्यावे आणि इथून पुढे ती कंपनी जे  साहित्य निर्माण करेल त्यावर आपले नाव वापरण्याची लेखी परवानगी देऊन टाकावी. याखेरीज त्या लेखकांनी इथून पुढच्या आयुष्यात अन्यत्र काहीही सार्वजनिक लिहायचे नाही हीदेखील जाचक  अट.   

नायकाच्या या प्रयत्नांना  संमिश्र प्रतिसाद मिळतो. काही तरुण  लेखक तर त्याला जवळपास कानाखाली काढूनच बाहेर हाकलतात. पण  प्रणयकथांची राणी असलेल्या  एका श्रीमंत  लेखिकेला  ही कल्पना खूपच रंजक वाटते आणि ती  संगणक प्रत्यक्ष बघण्याची इच्छा व्यक्त करते.  नायक तिची इच्छा पूर्ण करतो आणि तिलाच तिथे योग्य ती बटणे दाबायला बसवतो.  त्यातून जी कादंबरी निर्माण होते ती वाचून ती लेखिका अवाक्  होते कारण  तिला जाणवते की तिच्या स्वतःच्या ‘सर्जनशील’ लेखनापेक्षाही त्या  यंत्रातून निघालेली  कादंबरी अधिक चांगली आहे !  मग ती आनंदाने करारनाम्यावर सही करते.  

अशा तऱ्हेने तेव्हाच्या  साहित्यिक विश्वातले जवळपास 70%  लेखक गुमान तो  करार मंजूर करून आपले स्वत्व त्या यंत्राला विकतात. ओसरणीला लागलेले ज्येष्ठ लेखक तर या  प्रस्तावाला  अगदी सहज बळी पडतात.  

कथेच्या अखेरीस   उभरता  लेखक असलेला कथानिवेदक   या सर्व प्रकाराने भयंकर अस्वस्थ झालेला दाखवलाय.    या यांत्रिक साहित्यिक धंद्यामुळे त्याच्यावर अक्षरशः उपासमारीची  वेळ आलेली  आहे. परिणामी  त्या करारनाम्यावर आपण देखील सही करावी की काय अशा द्विधा मनस्थितीत तो  आहे. पण  अखेरीस वैतागून  तो देवाला  म्हणतो, 

 “ही   उपासमार  सहन करण्याची ताकद  मला दे रे, देवा !”  

या उदास व खिन्न सुरावर ती कथा संपते.

 कथा अप्रतिम व ओघवती आहे. तिची भाषा तर  सोपी आणि  मधाळ. संपूर्ण कथेत लेखकाने (विस्तृत स्पष्टीकरण या अर्थी)  वापरलेला  epexegetically  हा एक शब्द पूर्णतः अपरिचित असल्याने अवघड  व बोजड  वाटला.   कदाचित कथेच्या आशयाला पुष्टी मिळण्यासाठीच तो वापरला गेला असावा का ? किंवा कदाचित 1954मधील ब्रिटिश इंग्लिशचा तो खास नमुना असू शकेल.

कथेत सूचित केल्याप्रमाणे  कालौघात  तंत्रज्ञानाच्या तुफान  रेट्यात  मनुष्य-लिखित  साहित्याचे भवितव्य  असे दारुण असेल काय,  हा विचार वाचकांच्या मनात  सोडण्यात कथा  यशस्वी होते. हेच तिचे बलस्थान. तसेच कथनाच्या ओघात  ती लेखन व प्रकाशन क्षेत्रातील विविध वृत्तीप्रवृत्तींना छानसे चिमटे देखील घेते.  त्यातली 1954 मध्ये मांडलेली  भयसंकल्पना आज वास्तवात उतरलेली पाहून आपल्यालाही  अस्वस्थ वाटल्याशिवाय राहत नाही.

कथेचे दणदणीत शीर्षक तर मार्मिक आणि तिच्या आशयाला अतिशय साजेसे आहे.  Great या  शब्दातून तंत्रज्ञानाची घमेंड ध्वनित होते   तर Grammatizator  हा  लंबाचौडा व तिरपागडा  शब्द कॅल्क्युलेटर व जनरेटरच्या धर्तीवर खास तयार करण्यात आलेला दिसतो.  मानवी भावभावना व्यक्त करणारी आतड्याची भाषा अखेर एका यंत्राची गुलाम होऊन राहते हा त्यातून व्यक्त होणारा भाव आपल्याला  थरारून टाकतो.  एकूण काय,  तर ही कथा  मुळातून वाचण्यातच खरी मजा आहे.  

. . . 

आता येऊ थेट 2026 मध्ये . . .

काय दिसतंय अवतीभवतीच्या लेखनविश्वात ? साहित्य असो की पत्रकारिता, शैक्षणिक पातळीवरील निबंध असोत की  प्रबंध, नोकरीचे अर्ज असोत की संस्थांचे नियमित अहवाल, अनेक ठिकाणी   एआय वापरून  लिहीलेल्या विविध प्रकारच्या सपक लेखनाचा सुळसुळाट झालेला दिसतोय. त्यातला काही अधिकउणे भाग अगदी नजरेत भरण्यासारखा आहे. भाषा आणि व्याकरणशुद्धता,  तर्कसंगत मांडणी आणि एकंदरीत सभ्यता  व सांस्कृतिकतेचा मुलामा असलेले लेखन आता कुठल्याही  लेखकाला यंत्राद्वारे आयते हाती मिळत आहे. हरकत नाही, पण  सुमारे 25-30 वर्षांपूर्वी ‘खाऊजा’ धोरण अवतरल्यानंतर जगभर  जसे सांस्कृतिक सपाटीकरण दिसून आले तद्वत  आज हे लेखनातले सपाटीकरण अगदी सहज जाणवते आहे. लेखनासाठी यंत्रमानवी मदत घेण्यामुळे माहिती मिळवणे खूप सोपे झाले आहे, हा अर्थातच  फायद्याचा भाग. 

परंतु (विशेषतः प्रादेशिक भाषांत) उण्याच्या बाजूला लेखनातील सपक यांत्रिकपणा,  काहीशी कोरडी भाषा, वाचकाच्या मनाला साद घालण्यातील असमर्थता आणि नव्या धाडसी  लेखनप्रयोगांचा अभाव या उणिवा अगदी प्रथमदर्शनीच जाणवतात. माहिती मिळवण्यासाठी  एआयचा सहाय्यक म्हणून वापर नक्कीच उपयुक्त आहे.  परंतु ती माहिती मिळवून केलेल्या लेखनाला अंतिम रूम देताना त्यावर मानवी संस्कार झाले तर ते अधिक चांगले.  असे संस्कारित लेखन वाचकांच्या मनाला भिडेल. परंतु सध्या अनेक क्षेत्रातील बरेच लेखक त्यांचे  लेखन एआयच्या  घाण्यातून काढून जसेच्या तसे प्रकाशित करताना दिसतात;  अगदी संशोधन क्षेत्रही त्याला अपवाद राहिलेले  नाही. एक उदाहरण म्हणून हा  कार्यालयीन  पत्रव्यवहार पहा  : (https://www.news18.com/viral/its-definitely-chatgpt-boss-sent-a-perfect-sick-leave-reply-but-forgot-to-remove-one-line-ws-l-10160626.html). 

 

चित्रातली शेवटची ओळ पहा. 

 भविष्यात जर असे मानवी संस्कार न झालेले  लेखन बहुसंख्येने होत राहिले तर त्यातून वाचकांची विचारक्षमता रुंदावणे  तर कठीणच. नवनवीन तंत्रज्ञानाची सर्वांनीच  मदत घेण्यात काहीच वावगे नाही. परंतु   तारतम्य न बाळगता लेखकवर्ग एआयच्या आहारी गेल्यास त्यातून  स्वतंत्र विचारशक्ती  गमावण्याचा धोका संभवतो. यंत्रमानवाची मदत घेणारा समाज कालौघात  यंत्राधीन  होईल की काय अशीही शक्यता मनात येते.   अशा  यंत्राहारी जाण्यातून मानसिक असंतुलन किती टोकाला जाऊ शकते हे अतिशय प्रभावीपणे दाखवणारा  ‘आय एम नॉट ए रोबो’ हा  ऑस्करप्राप्त  लघुपट जरूर पाहण्यासारखा आहे :  https://www.youtube.com/watch?v=4VrLQXR7mKU

मानवाने आपली अफाट आणि अचाट बुद्धी वापरून हे  लेखनतंत्र निर्माण करून ठेवले खरे, पण  आजच्या घडीला ते त्याच्याच उरावर बसू पाहतंय.  ही समस्या तर उद्भवली आहे  आणि तिच्यातून मार्ग काढणे हा देखील एक मानवी गुणधर्मच.   काही विचारी लेखकांनी त्यातून  मार्ग काढण्याचे  प्रयत्न जरूर  चालवलेले  आहेत. आपले लेखन खरोखर नैसर्गिक (मानवी)  वाटण्यासाठी लेखनात काही विशिष्ट बदल केले जात आहेत.   त्यामध्ये लेखनात बोलीभाषा आणि विशिष्ट समूहांच्या भाषेचा (slangs) पुरेसा वापर,  पारंपरिक लेखनशैलीची काही प्रमाणात मोडतोड,  वाचकाला साद घालणारी निवेदनपद्धती, काही प्रमाणात मुद्दामून बिघडवलेली शब्द अथवा  वाक्यरचना आणि काही  अनवट  लेखनप्रयोगांचा समावेश,  हे त्यातले काही उपाय. ही झाली लेखकांची बाजू. 

 दुसऱ्या बाजूस वाचकांनीही जागरूक असणे महत्त्वाचे आहे.  या संदर्भात पाश्चात्य जगात नुकतेच घडलेले एक उदाहरण पथदर्शक ठरावे.  Mia Ballard  या लेखिकेची  Shy Girl  ही भय-कादंबरी निर्मितीक्षम  एआय  वापरून लिहीली  असल्याचे  तीव्र आक्षेप अनेक वाचकांकडून आल्यानंतर संबंधित प्रकाशकांनी ती कादंबरी मागे घेतल्याचे जाहीर केलेले आहे.  विविध माहिती मिळवण्यासाठी AIचा सहाय्यक म्हणून वापर आणि एखादी   निर्मितीच AIच्या ताब्यात देणे यातील तारतम्य बाळगणे महत्त्वाचे.  ललित लेखनात तरी हा मुद्दा महत्त्वाचा ठरावा.  इंग्रजीचे जागतिक स्थान आणि महत्त्व पाहता त्या भाषेत केलेले एआय-निर्मित लेखन सध्या  बहुधा  सर्वाधिक असू शकेल. त्या तुलनेत सध्या तरी प्रादेशिक भाषांमधले ललित  लेखन  मर्यादित असावे. त्या भाषांमध्ये बेमालूम शिरकाव करण्यासाठी या तंत्राला अजून बराच पल्ला गाठावा लागेल. अर्थात त्याचा झपाट्याने ‘शिकण्याचा’  सध्याचा वेग पाहता लवकरच ते अशा अनेक गोष्टी आत्मसात करेल  असा होरा आहे.  AI  वापरून लिहिलेले इंग्रजी भाषेतील काही साहित्य तर इतके बेमालूम  वठले आहे की,  जाणकार वाचकांना सुद्धा ते लेखन नैसर्गिक आहे की यंत्रनिर्मित आहे याचा निवाडा करणे जवळजवळ अशक्य होत आहे.

एकंदरीत पाहता  नजीकच्या काळात साहित्यजगतात  दोन प्रकारची लेखने वाचकांपुढे येणे अटळ आहे. . त्यापैकी एक असेल ते  लेखकाने स्वयंप्रज्ञेने  केलेले   नैसर्गिक  व  प्रामाणिक लेखन आणि दुसरे म्हणजे अर्थातच  एआयच्या कारखान्यातून घाऊक प्रमाणात बाहेर पडलेले व  मानवी संस्करण  न झालेले  कृत्रिम चकचकीत  लेखन. (पहिल्या प्रकारचे लेखक समग्र माहिती मिळवण्यासाठी एआयचा तारतम्याने  वापर करूही  शकतील).  बाजारातील या दोन्हींच्या स्पर्धेत  आपल्या पुढ्यातील लेखनाचा  नीरक्षीरविवेक करणे हे सर्वस्वी सुजाण वाचकाच्या हातात असेल. 

********************************************************************************************

टीप : हा लेख लिहिण्यासाठी आंतरजालावरील मुक्त माहितीचा वापर केलेला असला तरीही  प्रत्यक्ष हे लेखन स्वतः विचार करून आणि मानवी हातांनीच  टंकलेले  आहे याची खात्री बाळगावी ! 🙂

 

 

 

 

 

लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 180
प्रतिक्रिया 6

प्रतिक्रिया

चांगला आढावा घेतला आहे. 

 

>>भविष्यात जर असे मानवी संस्कार न झालेले लेखन बहुसंख्येने होत राहिले तर त्यातून वाचकांची विचारक्षमता रुंदावणे  तर कठीणच

वाचकांची विचारकक्षा रुंदावण्याचा एआय निर्मित लेखनाशी संबंध लक्षात नाही आला.  एआय निर्मित लेखन जर विषय व्यापकरित्या समजावून देत असेल तर विचारकक्षा रुंदावण्याची रिस्क नसावी. बर्याच प्रतिथयश लेखकांचे लेखनही साचेबद्ध असते आणि विचारकक्षा रुंदावण्यासारखे नसते. 

 

लेखाचा रोख फक्त लेखकांपुरता ठेवून त्यातून वाचकांना वगळल्यास पोटार्थी लेखकांवर एआयचा परिणाम होऊ शकतो हा गाभा ठेवता येइल. 

 

- (एआय समर्थक) सोकाजी 


In reply to by सोत्रि

दुकानात २+२ करण्यासाठीही दुकानदार आजकाल कॅलक्युलेटर वापरतात. कालांतराने आकडेमोड करणारा मेंदुतील हा घटकच कमकुवत होईल का काय अशी भीती वाटते.युपीआय मुळे किती पैसे दिले व किती परत घ्यायचे ही झंझटच राहीली नाही. काही दिवसांपूर्वी एका दुकानात ६० चे बिल झाले होते. मी १०० ची नोट दिली.दुकानदार वयस्कर होता व त्याने १० सुटे मागितले व परत ५० रुपये दिले. जेन अल्फा कन्येला हा हिशोब काही समजला नाही.तिला समजावुन सांगितले कि त्याच्याकडे दहाच्या चार नोटा नव्हत्या म्हणुन त्याने आपल्याकडुन दहा अजुन घेऊन ५० ची नोट दिली. तिला ते फार फॅसिनेटींग वाटले पण मी चिंतीत झालो. आता तिलाच बाजारहाट करायला सांगतो व सगळे व्यवहार नगद करवतो व हिशोब ही तिचा तिच करते. एखादी गोष्ट जाणुन समजावुन घेण्यामागच्या सव्यापसव्यतेमुळे आजुबाजुच्या अनेक गोष्टींचे आकलन होत राहते पण कृत्रिम बुध्दीमत्तेमुळे तिच धडपड करायची गरजच राहत नाही आणि माझ्यामते हेच जास्त अलार्मिंग आहे. 


In reply to by कानडाऊ योगेशु

आता तिलाच बाजारहाट करायला सांगतो व सगळे व्यवहार नगद करवतो व हिशोब ही तिचा तिच करते

+१११

हो याची गरज आहे.


In reply to by कानडाऊ योगेशु

>> धडपड करायची गरजच राहत नाही

ह्यालाच प्रगती म्हणतात, त्यासाठीच मनुष्यप्राणी उरस्फोड करतोय. पूर्वी मनुष्य सगळी कामं अंगमेहनतीने करायचा, आता यंत्र ती कामं करतात. झपाट्याने वाढणारी ओबेसिटी ही त्याचाच परिपाक आहे आणि अलार्मिंगही आहे.

तंत्रज्ञानातील प्रत्येक शोधामागे काहीना काही अलार्मिंगही होतं/आहे. त्यामुळे एआयचा बाऊ करण्याची गरज नाही असं मला वाटतं. सध्याच्या तंत्रज्ञानाच्या प्रगतीचा वेग अफाट आहे त्याने ओव्हव्हेल्म व्हायला होतंय पण ते सहाजिक आहे.

- (एआय समर्थक) सोकाजी 


ते  दोघेही रातोरात लेखक बनतात आणि त्यावर चांगली कमाई पण  करू लागतात.

हे वाक्य वाचून खूप करमणूक झाली


कालच Trueman Show सिनेमा पाहिला.तो जसा खोट्या जगात अड्कलेला असुनही त्याला ठाउक नसते.पण जेव्हा सत्य समोर येते.तेव्हा त्याला तिथुन सुट्ण्याची तीव्र उर्मी मिळते.ती ताकद ,उर्मी एआय जाळ्यातुन सुट्ण्याची ज्याला त्याला मिळो.तो पर्यंत अशी ही बनवाबनवी वाढ्तच राहणार.