Skip to main content

उत्तंक — गुरुदक्षिणेच्या शोधात

लेखक ज्ञानोबाचे पैजार यांनी रविवार, 20/09/2026 18:13 या दिवशी प्रकाशित केले.

हस्तिनापूरच्या राज सभांपासून दूर, वनराईच्या शांत सावलीत एक साधेसे आश्रम जीवन वाहत होते. त्या आश्रमात वेदाध्ययन, यज्ञकर्म, स्वाध्याय आणि गुरुसेवा यांना समान महत्त्व होते. तो आश्रम ऋषी वेद यांचा होता 

ऋषी वेद हे विद्वान, संयमी आणि कठोर शिस्तीचे आचार्य म्हणून  प्रसिद्ध होते; परंतु त्यांच्या कठोरतेत कोरडेपणा  नव्हता, कारण शिष्याने स्वतःच्या सामर्थ्याने उभे राहावे आणि ज्ञानाचे ऋण  जाणून जगावे, हीच त्यांची अपेक्षा होती. त्यांच्या अनेक शिष्यांपैकी उत्तंक हा अत्यंत निष्ठावान, परिश्रमी आणि गुरूच्या प्रत्येकआज्ञेचे अक्षरशः पालन करणारा होता.

वर्षानुवर्षे उत्तंक आश्रमात राहिला. पहाटेच्या  वेळी नदीवरून पाणी आणणे, यज्ञासाठी समिधा गोळा करणे, गुरूंच्या आवश्यक वस्तूंची व्यवस्था  करणे, आश्रमातील कामे पाहणे आणि त्यानंतर वेदांचे अध्ययन करणे, हा त्याचा रोजचा क्रम होता. गुरूंची सेवा करताना त्याने कधी कोणते  काम लहान-मोठे मानले नाही;  कारण त्याच्या साठी गुरूंच्या आश्रमातील  प्रत्येक कार्य हे अध्ययनाचाच  एक भाग होते. काळ पुढे सरकत गेला आणि एक दिवस त्याच्या गुरूंनी त्याला घरी परतण्याची परवानगी दिली.

उत्तंकाने गुरूंच्या चरणांवर मस्तक ठेवले, पण उठताना त्याच्या मनात एक विचार घट्ट झाला होता. “गुरुदेव, आपण मला इतके ज्ञान दिले,  इतकी वर्षे आश्रय दिलात;  मी आपले ऋण फेडल्याशिवाय कसा जाऊ? ” ऋषी वेदांनी त्याच्याकडे शांतपणे पाहिले आणि  म्हणाले, “उत्तंका,  ज्ञानाचे  मोल वस्तूंनी चुकविता येत नाही;  तू केलेली सेवाआणि तुझी निष्ठा हीच पुरेशी आहे.”  परंतु उत्तंकाने वारंवार आग्रह धरला,  “गुरुदेव, आपण काही मागत नसाल तर माझे मन अधिकच अस्वस्थ  होईल;  मला काहीतरी गुरु दक्षिणा देण्याची संधी द्या.” अखेरीस ऋषींनी हसून त्याला सांगितले, “ माझ्या कडे मागण्या सारखे काही नाही; परंतु तुझ्या गुरुमातेला  विचार. तिला जे हवे असेल ते आणून दे.”

उत्तंक गुरुमाते समोर गेला आणि विनयाने म्हणाला, “ माते, गुरुदेवांनी मला घरी जाण्याची परवानगी दिली आहे; पण गुरुदक्षिणा दिल्याशिवाय मी जाण्यास तयार नाही.  गुरुदेव काहीही मागत नाहीत, म्हणून आपणच मला अशी वस्तू सांगा जी मी आपल्या चरणी अर्पण करू शकेन.” गुरु मातेनेही  प्रथम काही मागण्यास नकार दिला, पण उत्तंकाचा आग्रह पाहून ती काही वेळ विचारात पडली

काही  दिवसांनी एक विशिष्ट शुभ दिवस येणार होता आणि त्या दिवशी आश्रमात ब्राह्मणांना भोजनासाठी बोलावून त्यांचे  सत्कार करण्याची  तिची  इच्छा होती. तिने उत्तंकाकडे पाहिले आणि म्हणाली, “जर तू माझी गुरुदक्षिणा म्हणून काही आणणारच असशील, तर राजा पौष्याच्या राणीच्या कानातील दिव्य कुंडल घेऊन ये. त्या कुंडलांनी त्या शुभ दिनी मी ब्राह्मणांच्या समोर अलंकृत होऊन बसू इच्छिते.  मात्र लक्षात ठेव, ही साधी कुंडले नाहीत;  नागराज तक्षकाची त्यांच्यावर नजर आहे. त्या मुळे त्यांना सुरक्षितपणे घेऊन येणे तितके सोपे नसेल.”

उत्तंकाने नम्रपणे गुरुमातेच्या चरणांना स्पर्श केला आणि म्हणाला, “माते, आपण मला जे कार्य दिले आहे ते पूर्ण करूनच  मी परत येईन.” 

दुसऱ्या दिवशी त्याने प्रवासाला सुरुवात केली. वनातील पायवाटेने तो पुढे जात असताना अचानक त्याला एक विलक्षण दृश्य दिसले, एक प्रचंड आकाराचा गजराज पुढे चालला होता आणि त्याच्या पाठीवर एक असामान्य तेजस्वी पुरुष आरूढ झाला होता. त्या पुरुषाने उत्तंकाला थांबवले आणि गंभीर स्वरात सांगितले,  “उत्तंका, या गजराजाने त्यागलेल्या पदार्थाचा थोडासा भाग ग्रहण कर.”  उत्तंकाला त्या आज्ञेचा अर्थ समजला नाही;  त्याला ती गोष्ट अत्यंत विचित्र आणि अप्रिय वाटली. त्याने नम्रपणे नकार दिला, परंतु त्या पुरुषाने पुन्हा आग्रह केला आणि म्हणाला, “याचा तिरस्कार करू नकोस;  तुझ्या गुरूंनीही हे ग्रहण केले आहे.”  गुरूंचे नाव ऐकताच उत्तंकाच्या मनातील संकोच कमी झाला;  गुरूने जे केले आहे, ते आपल्या  दृष्टीने अपवित्र कसे असू शकेल, असा विचार करून त्याने त्या दिव्य गजराजाच्या विष्ठेचा अंश ग्रहण  केलाआणि त्यानंतर त्याने त्याचे मूत्रही ग्रहण केले.

उत्तंक पुढे निघाला आणि राजा पौष्याच्या राजधानीत पोहोचला. राज सभेत प्रवेश करून त्याने राजाला नमस्कार केला आणि आपली विनंती सांगितली.  राजा पौष्याने त्याचे स्वागत केले आणि म्हटले, “ऋषिवर, आपण कोणत्या कार्यासाठी आलात  ते  निःसंकोचपणे सांगा.” उत्तंक म्हणाला, “मला माझ्या गुरु मातेने गुरुदक्षिणेसाठी आपल्या राणीच्या कानातील  कुंडले आणण्यास सांगितले आहे.”  राजाने त्याला अंतःपुरात जाऊन राणीची भेट घेण्याची  परवानगी दिली.

उत्तंक अंतःपुरात गेला; परंतु त्याला राणी कुठेच दिसली नाही.  तो परत राजाकडे आला आणि म्हणाला, “महाराज, आपण मला राणीच्या भेटीस जाण्यास सांगितले;  परंतु अंतःपुरात गेल्यावर मला त्या दिसल्या नाहीत. आपण माझ्याशी विनोद करीत आहात काय?”  पौष्य काही क्षण शांत राहिला आणि म्हणाला, “तुम्ही  भोजनानंतर शुद्धीच्या विधीचे योग्य पालन केले आहे का? माझी राणी अत्यंत शुचिर्भूत आहे; अशुद्ध अवस्थेत असलेल्या व्यक्तीला ती दिसत नाही. ” उत्तंकाला आठवले की प्रवासाच्या घाईत त्याने उभ्या उभ्याच शुद्धी केली होती. त्याने पुन्हा विधिपूर्वक आचमन करून, हात-पाय-चेहरा स्वच्छ धुऊन, मन स्थिर केले आणि अंतःपुरात प्रवेश केला. यावेळी त्याला राणी दिसली.

राणीने त्याचे स्वागत केले.  उत्तंकाने आपली विनंती सांगितली आणि गुरु मातेला गुरुदक्षिणा म्हणून कुंडले हवी असल्याचे स्पष्ट केले. राणीने क्षणाचाही  विलंब  करता आपल्या कानातील तेजस्वी कुंडले काढून त्याच्या हातात ठेवली; मात्र देताना तिने गंभीर स्वरात त्याला सावध केले, “ही कुंडले अत्यंत मौल्यवान आहेत आणि नागराज तक्षकाला त्यांचा मोह आहे. त्यामुळे प्रवासात क्षणभरही त्यांच्या वरील लक्ष ढळू देऊ नकोस.” उत्तंकाने आत्मविश्वासाने उत्तर दिले, “देवी, आपण निश्चिंत राहा; तक्षकाला माझ्याकडून ही कुंडले घेणे शक्य होणार नाही.”  त्याने राजाचा निरोप घेतला आणि आश्रमाकडे परतीचा प्रवास सुरू केला.

मार्गात एका ठिकाणी उत्तंकाने विश्रांतीसाठी थांबून स्नान केले आणि कुंडले सुरक्षित ठिकाणी ठेवली. त्याला क्षणभर वाटले की आता सर्व संकटे मागे पडली आहेत; त्याची सावधगिरी एका क्षणासाठी ढिली पडली, तक्षक गुप्त रूपाने त्याच्या मागावरच  होता, त्या संधीचा तक्षकाने फायदा घेतला, क्षणातच कुंडले हिसकावून घेतली आणि सर्प रूप धारण करून पृथ्वीच्या गर्भात नाहीसा झाला. उत्तंक काही क्षण स्तब्धउभा राहिला; त्या नंतर त्याच्या डोळ्यांत संतापाची ज्वाला पेटली. “ही गुरुदक्षिणा आहे; ती कोणत्याही परिस्थितीत परत मिळवायचीच,” असे मनाशी ठरवून त्याने तक्षकाचा माग काढण्यास सुरुवात केली.

तक्षक ज्या दिशेने नाहीसा झाला होता त्या दिशेने उत्तंक धावत गेला आणि अखेरीस त्याला पृथ्वीखाली जाणारा मार्ग दिसला. त्याने आपल्या सामर्थ्याने तो मार्ग उघडला आणि नाग लोकात प्रवेश केला. समोरचे दृश्य त्याला अवाक् करणारे होते, रत्नजडित प्रासाद, सुवर्ण भित्ती, स्वच्छ जलाशय, अद्भुत  वृक्ष आणि सर्वत्र नागवंशीयांची वस्ती दिसत होती. परंतु त्या वैभवाकडे पाहण्याची त्याला फुरसत नव्हती; त्याच्या मनात एकच विचार होता, तक्षकाने चोरलेली कुंडले परत मिळवायची.

नागलोकात फिरताना त्याला दोन स्त्रिया एका मागावर बसून काळे आणि पांढरे धागे विणताना दिसल्या. थोडे पुढे त्याला सहा कुमारांनी फिरविलेले बारा आऱ्यांचे एक विशाल चक्र दिसले. त्याच्या आसपासचे दृश्य जितके भव्य होते तितकेच गूढही होते; तरीही उत्तंक आपल्या उद्दिष्टा पासून विचलित झाला नाही

कुंडले परत मिळविण्याची कोणतीही साधी वाट दिसत नसल्यामुळे उत्तंकाने देवतांना मनोभावे स्मरले. तेव्हा त्याला तोच तेजस्वी पुरुष पुन्हा दिसला, ज्याची भेट त्याला पृथ्वीवर प्रवासात झाली होती,  या वेळीतो अश्वावर बसलेला होता.  त्या पुरुषाने त्याला सांगितले की तो त्या दिव्य अश्वाच्या शरीरातील अपानमार्गात प्राणवायू फुंकावा. उत्तंकाने कोणताही संकोच करता तसे केले आणि पुढच्याच क्षणी त्या अश्वाच्या शरीरातील प्रत्येक छिद्रातून धगधगत्या ज्वाळा आणि धूर बाहेर पडू लागला. त्या अग्नीने नागलोक तापू लागला आणि तक्षकाच्या निवासा भोवती भीतीचे वातावरण निर्माण झाले. अखेरीस प्रचंड उष्णतेने भयभीत झालेला तक्षक कुंडले घेऊन बाहेर आला आणि म्हणाला, “उत्तंका, ही कुंडले घे आणि मला या अग्नीपासून मुक्त कर.” उत्तंकाने त्वरित कुंडले आपल्या हाती घेतली.

कुंडले हातात येताच उत्तंकाला अचानक दुसरीच चिंता जाणवली.  गुरुमातेने सांगितलेला शुभ दिवस जवळ आला होता आणि आश्रम अजून खूप दूर होता. तो मनात  म्हणाला, “मी  गुरुदक्षिणा पूर्ण केली आहे;  पण ती वेळेत गुरुमाते च्या हातात पोहोचली नाही, तर माझ्या संपूर्ण प्रयत्नाचा काय उपयोग? ”  तेवढ्यात त्या तेजस्वी पुरुषाने त्याला सांगितले, “या अश्वावर आरूढ हो;  तो तुला क्षणात तुझ्या गुरूंच्या आश्रमात पोहोचवील.”  उत्तंकाने विलंब करता अश्वावर स्वार होऊन प्रवास केला आणि आश्चर्यकारकरीत्या अल्पावधीत तो आश्रमाच्या दाराशी पोहोचला.

त्या सकाळी गुरु माता स्नान करून केस विंचरत बसली होती. उत्तंकाला कुंडले आणायची कामगिरी देऊन आपण त्याला संकटात तर ढकलले नाही ना याची तिला काळजी वाटत होती.पण त्याच क्षणी उत्तंक तिच्यासमोर उभा राहिला. त्याने नतमस्तक होऊन कुंडले तिच्या हातात ठेवली आणि म्हणाला, “माते, आपली गुरुदक्षिणा.”  गुरु माते च्या चेहऱ्यावर समाधान उमटले आणि ती म्हणाली, “उत्तंका, तू अगदी योग्य वेळी परतलास; तुझ्या निष्ठेने हे कार्य पूर्ण झाले.” मातेच्या हातात कुंडले देताना  उत्तंकाच्या मनावरचा मोठा भार उतरला.

यानंतर उत्तंक गुरूंच्या चरणी गेला. ऋषी वेदांनी त्याच्याकडे पाहून विचारले, “उत्तंका, इतका विलंब का झाला?” उत्तंकाने संपूर्ण घटना सांगितली, राजा पौष्याची भेट, राणीची कुंडले, तक्षकाची चोरी, नाग लोकातील प्रवास, काळे-पांढरे धागे विणणाऱ्या स्त्रिया, बारा आऱ्यांचे चक्र, अद्भुत पुरुष, तेजस्वी अश्व आणि मार्गात भेटलेल्या त्या गूढ पुरुषाने दिलेली आज्ञा. शेवटी तो थांबून म्हणाला, “गुरुदेव, त्या मार्गातील सर्व गोष्टींचा अर्थ मला समजला नाही; विशेषतः त्या दिव्य प्राण्याच्या विष्ठेचा अंश ग्रहण करण्यास मला का सांगितले गेले, हे मला कळले नाही. आपण कृपया या सर्व रहस्यांचाअर्थ सांगावा.”

ऋषी वेद शांतपणे म्हणाले, “उत्तंका, तुला मार्गात भेटलेला तो पुरुष दुसरा कोणी नसून इंद्र होता आणि तू ज्याला गजराजाच्या रूपात पाहिलेस तो ऐरावत होता. त्या दिव्य गजराजाने त्यागलेला पदार्थ साधा मल नव्हता; तो अमृतस्वरूप होता. तुझ्या गुरूनेही पूर्वी ते ग्रहण केले होते आणि त्याच कृपेमुळे नागलोकातील संकटातून तुझे प्राण वाचले. काळे आणि पांढरे धागे म्हणजे रात्र आणि दिवस;  सहा कुमारांनी फिरविलेले बारा आऱ्यांचे चक्र म्हणजे सहा ऋतूंनी बनलेले वर्ष; तो अद्भुत पुरुष पर्जन्य आणि तो तेजस्वी अश्व अग्नीचे प्रतीक होते.” हे ऐकून उत्तंक काही क्षण शांत राहिला; त्याला जाणवले की ज्या घटनांचा त्याला मार्गात केवळ गूढ आणि विस्कळीत अनुभव आला होता, त्या प्रत्यक्षात एका अदृश्य क्रमाने जोडलेल्या होत्या.

गुरूंची परवानगी घेऊन उत्तंक आश्रमातून निघाला; पण तक्षका विषयीचा संताप त्याच्या मनातून गेला नव्हता. त्याला वाटत होते की तक्षकाने केवळ कुंडले चोरली नव्हती, तर त्याच्या गुरुदक्षिणेच्या पवित्र कार्यात अडथळा आणला होता. त्या संतापाने त्याला हस्तिनापूरकडे नेले आणि तेथे त्याने राजा जनमेजयाची भेट घेतली. जनमेजयाच्या मनातही तक्षका विषयी खोलवर दाह होता, कारण तक्षकाने त्याचे वडील परीक्षित यांचा जीव घेतला होता; उत्तंकाने त्या संतापाला आपल्या अनुभवाची जोड दिली आणि तक्षका विरुद्ध कठोर कारवाई करण्याची प्रेरणा राजाला दिली.

काळपुढे  गेला आणि जनमेजयाने नागवंशाचा संहार करण्यासाठी महान सर्पसत्र आरंभले. यज्ञकुंडातील अग्नी प्रज्वलित झाला आणि मंत्रांच्या सामर्थ्याने एका मागून एक सर्प त्या अग्नीत ओढले जाऊ लागले. तक्षक भयभीत होऊन इंद्राच्या आश्रयाला गेला, तेव्हा जनमजेयाने आहुती सोडली "इंद्राय स्वाहा: तक्षकाय स्वाहा:"  यज्ञाची शक्ती इतकी प्रबळ होती की इंद्र आणि तक्षक दोघेही अग्नीकडे ओढले जाऊ लागले.  त्याच वेळी आस्तिक नावाचा तरुण ऋषिकुमार यज्ञ मंडपात आला आणि आपल्या विलक्षण वाणीने जनमेजयाला प्रसन्न केले; राजाने त्याला वर मागण्यास सांगितले तेव्हा आस्तिकाने सोन्या-चांदीची, गायींची किंवा संपत्तीची मागणी करता एकच वर मागितलासर्पसत्र थांबवावे आणि नागांचा संहार या पुढे होऊ नये.

जनमेजयाच्या यज्ञाची ज्वाला अखेरीस शांत झाली. तक्षकाचा जीव वाचला आणि नागवंशाचा पूर्ण संहार टळला. उत्तंकाच्या जीवनात गुरुदक्षिणेच्या एका साध्या आग्रहाने सुरू झालेला प्रवास राज दरबार, नागलोक, देव साहाय्य आणि अखेरीस एका प्रचंड राजकीय-धार्मिक घटनेपर्यंत पोहोचला होता; परंतु त्याच्या मनात मात्र त्या संपूर्ण प्रवासातील सर्वात खोल ठसा एका वेगळ्याच गोष्टीचा राहिलागुरूने काहीही मागितले नसतानाही गुरूचे ऋण फेडण्याची त्याचीअस्वस्थ इच्छा, आणि त्या इच्छेने त्याला ज्या अज्ञात मार्गावर नेले, त्या मार्गावर प्रत्येक संकटा मागे उलगडत गेलेले एक नवे रहस्य.

प्रेरणा:- शुन:शेप, उत्तंक आणि अष्टवक्र - वसु भारद्वाज

पैजारबुवा,

लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 29
प्रतिक्रिया 0

प्रतिक्रिया