चहाकॉर्नरचा व्हरांडा अगदी शांत होता. काचेआडून येणारा संध्याकाळच्या रहदारीचा मंद आवाज आणि छपरावरून टपकणाऱ्या पावसाच्या थेंबांची लय शांत संगीतमय साथ देत होती.
नीलने मुद्दामच कोपऱ्यातील टेबल निवडले होते. त्याला तेथपर्यंत सोडून जाण्याआधी सेवकाने त्याची ऑर्डर विचारली. गरम चहा ऑर्डर करुन तो खुर्चीत विसावला. त्याचे दोन्ही हात थंडगार मातीच्या कपातून मिळेल तशी गरमी शोधत होते. त्याने ऑडिओ-नोड पूर्णपणे बंद करुन खिशात ठेवला होता. गेल्या अनेक महिन्यांत पहिल्यांदाच त्याच्या डोळ्यांसमोर जीवलगाने दिलेल्या मायक्रो-टाइमलाइन्स, बायोमेट्रिक आकडे किंवा संभाषणाची सुरुवात कशी करावी या सूचना झळकत नव्हत्या. गोठवले जाण्याआधी जीवलग मॅंडेटरी असलेली कॉशननोट त्याच्या कानात पुटपुटला होता. तिकडे दुर्लक्ष करुन नीलने जीवलगाला निद्रिस्त केले. होऊ घातलेली भेट त्याला थोडी भितीदायकसुद्धा वाटत होती. अगदी तयारी न करता कस्टमर मिटिंग अटेंड केल्यासारखी.
मीरा तीन-चार मिनिटे उशिरा पोहोचली असावी, नीलने अंदाज केला. जीवलग असता तर नक्कीच साडेचार मिनिटे उशीर झाला अशी कमेंट कुजबुजला असता. तिने आपली पारदर्शक छत्री मिटवली, दाराजवळच्या पितळी स्टँडमध्ये ठेवली आणि आपल्या चष्म्याच्या कडेला हलकेच स्पर्श केला. फ्रेमवरचा पिवळसर बारीक दिवा एकदा लुकलुकला आणि शांत झाला.
थोड्या संकोचाने ती टेबलाजवळ आली. "नील?"
"हो. मीरा?" तो उठून उभा राहिला. त्याने जुजबी वाकून नमस्कार करण्याचा प्रयत्न केला, पण त्याच क्षणी तिने हस्तांदोलनासाठी हात पुढे केला होता. या विसंगतीवर दोघेही हसले, आणि नीलच्या चेहऱ्यावर नकळत लाजेची लाली उमटली.
"माफ करा," समोरची खुर्ची ओढत ती म्हणाली, "सहसा माझा जीवलगच भेटीच्या पद्धती सांगतो. व्यावसायिक कामासाठी हात मिळवणे, ओळखीसाठी फक्त मान डोलावणे. पण आज मी त्याला विचारलेच नव्हते."
"माझ्या जीवलगाने बंद होण्यापुर्वी मला इशारा दिला होता की माझ्या नाडीचे ठोके वाढले आहेत," खाली बसत नील म्हणाला, "तिकडे लक्ष न देता मी त्याचे तोंड दाबले."
मीराने त्याच्याकडे पाहिले. तिचे डोळे थेट त्याच्या अंतरंगांचा अंदाज घेत होते. पण त्यात कोणतेही हिरवे हायलाइट्स नाहीत, बाहुल्यांच्या हालचाली नाहीत. त्याच्याही गळ्यावर तरंगणारा भावनादर्शक स्कोअर नव्हता. पण आपले डोळे नक्कीच आपला विश्वासघात करत असणार. हिने जीवलगाशिवाय इतका कंट्रोल कसा मिळवला असेल? न राहवून त्याने विचारले "तुम्ही अगदी पूर्णपणे बंद केलाय?"
"अगदी पूर्णपणे. मला तुमची आवडती पुस्तके माहीत नाहीत, क्रेडिट स्कोअर माहीत नाही, आणि आपली सुसंगतता किती टक्के आहे हेही ठाऊक नाही. मला फक्त इतकेच माहीत आहे, की तुम्ही एका अनाकलनीय, अनप्लग्ड अनोळखी व्यक्तीसोबत चहा प्यायला तयार झालात."
नील जरासा सैलावला. “चहा घेणार की कॉफी?” त्याने विचारले. जवळ आलेल्या सेवकाला तिने कॉफीची ऑर्डर दिली. कॉफीचा वाफाळता कप हातात घेतांना ती किंचित हसली, हनुवटी हातावर टेकवत म्हणाली, "तुम्हाला माहीत आहे? आपली ही भेट निश्चित करण्यासाठी आपल्या जीवलगांना दोन आठवडे वाटाघाटी कराव्या लागल्या. माझा सांगत होता, की तुमचा गोपनीयतेबाबत फार आग्रही आहे. त्याची खात्री माझ्याकडून झाली त्यानंतर मात्र भेटीची वेळ ठरवताना तुमचा कमालीचा नम्र होता."
"माझ्याच संस्कारांचे प्रतिबिंब आहे त्यात," नील शांतपणे म्हणाला, "किंवा काय माहीत! कदाचित त्याच्याच वागण्याचे प्रतिबिंब माझ्यात उतरले असेल. मला अनेकदा दोन्हींमधला फरक ओळखणे कठीण होऊन बसते."
"म्हणूनच तर मी इथे आल्याबरोबर जीवलगाला सुट्टी दिली." मीरा म्हणाली. हॉलमधील बांबूच्या झाडांमधून येणाऱ्या प्रकाशाने तिच्या गालावर हिरवट सावल्या पडल्या होत्या. "मंगळवारी मी एका स्नेहभोजनाला गेले होते. टेबलाभोवती आठ माणसे बसली होती. कदाचित अनेक वर्षांनी भेटणारे मित्र असावेत. प्रत्येकाबरोबर जीवलग असणारच. समोरच्या व्यक्तीने केलेला विनोद संपण्याआधीच जीवलग त्यांना कानात पंचलाइनवर सांगत असणार! लोक विनोद पूर्ण होण्याआधीच हसत होते. तिथे कोणीच कोणाला खरोखरीचे भेटत नव्हते. फक्त भेटीचे व्यवस्थित व्यवस्थापन केले जात होते."
"अनुकूलित एकाकीपण," नील हळूच म्हणाला.
"अगदी बरोबर! दोन वाक्यांमधली शांतताही सहन न होणाऱ्या जीवलगांच्या बाहुल्यांची ती गर्दी होती." तिने आपल्या पर्समधून चष्मा काढला, तो मिटवला आणि टेबलावर साखरेच्या बाजुला ठेवून दिला. "आज मला हेही पाहायचे होते, की संभाषणाला अल्गोरिदमची सुरक्षा नसली तरीही अजून मी माणसाशी बोलू शकते का."
नीलने तिच्या चष्म्याचा तो विझलेला दिवा पाहिला. जीवलगाशिवाय छानच मॅनेज करीत होती की ती! मात्र यावर काय बोलावे हे लगेच लक्षात न आल्याने त्याचा हात चष्म्याच्या फ्रेमकडे गेला. मीरा एकटक आपल्याकडे बघत आहे या जाणिवेने तो थांबला. दोघांमध्ये पाच सेकंद अस्वस्थ शांतता पसरली. कोणत्याही सूचनेविना तयार झालेली अनाहूत, न भरून येणारी, पण थोडी तणावपूर्ण पोकळी.
त्याने एरवी डिजिटल डॅशबोर्ड तपासला असता. आता कॉफीच्या कपाभोवती वळलेली तिची बोटे तो फक्त शांतपणे पाहत राहिला.
"भीती वाटते ना थोडी?" शेवटी त्याने विचारलेच.
"हो, मलाही वाटते." मीरा म्हणाली. तिच्या आवाजात एक संथ, नैसर्गिक मोकळेपणा होता. नीलला तिचे कौतुक वाटले. आपणसुद्धा थोडे घाबरलो आहोत हे कळलेले तिने किती सफाईने लपविले! "तुमच्या जीवलगाने परिचयाच्या पानांवर न लिहिलेली एखादी गोष्ट सांगा मला. त्याला अगदी निरुपयोगी वाटलेली अशी एखादी गोष्ट."
नीलने क्षणभर विचार केला. पावसाच्या शांत रिमझिमने दोघांमध्ये पूल बांधला होता.
"मी नऊ वर्षांचा असताना," तो सांगू लागला, "माझ्या आजोबांच्या घरामागे पावसाळी ओढ्यावर मी दगडांचा एक छोटा पूल बांधण्याचा प्रयत्न करत होतो. सूर्यास्तापूर्वी तो तीनदा कोसळला. शेवटी रस्त्यावरचे दिवे लागेपर्यंत मी चिखलात बसून रडत राहिलो."
अगदी मनापासून त्याचे बोलणे ऐकत मीराने उत्सुकतेने त्याच्याकडे पाहिले. "मग नंतर कधी पूर्ण केलात तो पूल?" तिने विचारले.
"कधीच नाही," नील हसत म्हणाला, "मी घरात गेलो आणि गरम दूध पिऊन झोपून गेलो."
"छान," पुढे झुकत ती हळूच म्हणाली, "म्हणजे कोणतीही एरर-रिपोर्ट न मागता तुम्ही अपयशाचा स्वीकार कसा करायचा हे शिकलात. मग आपले नक्कीच जमेल."
संध्याकाळ आणखी गडद झाली आणि हवेतला गारवा वाढू लागला. कपातली पेये पार थंड झाली होती, पण कोणीही दुसरे ड्रिंक मागवण्यासाठी हालचाल केली नाही. सेवकाची बेगडी आत्मीयता त्यांना नको होती. दोघांमध्ये मीराचा घडी घातलेला चष्मा आणि खिशात नीलचा शांत पडलेला जीवलग एखाद्या जुन्या, विसर्जित पूजासाहित्यासारखे पडून होते.
मीराने चष्म्याकडे पाहिले. तिच्या ओठांच्या कोपऱ्यावर एक मंद, अर्थपूर्ण हसू उमटले.
"उशीर झालाय. अनोळखी माणसाच्या भेटीविषयी नियमावली काय सांगते, ठाऊक आहे ना?" हलकासा इशारा करत तिने विचारले.
"मला ते ठरलेले नियम तोंडपाठ आहेत," खुर्चीत रेलत नील म्हणाला. "संभाषणाचा सकारात्मक निर्देशांक बहात्तर टक्क्यांच्या पुढे गेला तर जीवलग 'अ'कडून जीवलग 'ब'कडे परस्परसंमती आणि पसंतीचा करार पाठवला जातो. कूटकुलूपबंद! त्यामध्ये शरीराची मूलभूत लक्षणे, मर्यादा, आरोग्याच्या नोंदी, गर्भनिरोधक खात्री आणि टप्प्याटप्प्याने जवळ येण्याची संपूर्ण आचारसंहिता नोंदवलेली असते."
"अगदी निर्जंतुक," मीरा हळूच म्हणाली. "फार सुसंस्कृत! माझी बहीण तिच्या जोडीदाराला भेटत होती तेव्हा त्यांच्या जीवलगांनी स्पर्शाच्या मर्यादा ठरवण्यासाठी तीन दिवस खर्डेघाशी केली होती. उंबरठ्यात पहिले चुंबन घेण्याआधी त्यांच्याकडे डिजिटल स्वाक्षरी केलेला करार तयार होता. कोणावर लाजिरवाणी वेळ येणार नाही. कोणी सीमा ओलांडणार नाही. आणि कोणालाही नकाराचा कडवटपणा सहन करावा लागत नाही."
"आणि श्वास घशात अडकेपर्यंत कोणाच्या हृदयाचे ठोके धावत नाहीत याविषयी काय?" नीलने हळूच विचारले.
ती अचानक सावध झाली. तिने मान वर करून त्याच्याकडे पाहिले. तिचे डोळे अधिक तीक्ष्ण झाले होते. तिने सावधपणे विचारले, “नील तू खरेच जीवलगाला ऑफ केलेय ना?”
तिच्या अनपेक्षित प्रश्नाने गोंधळून तो म्हणाला “असे का विचारते आहेस?”
हसत ती म्हणाली “रीलॅक्स! मला वाटले की माझ्या ह्रदयाची धडधड तुला तुझ्या जीवलगाने सांगितली की काय!”
थोडावेळ कोणीच काही बोलले नाही. पावसाची रिमझिमदेखील ती शांतता भंग करायला असमर्थ होती. शांतता सहन न झाल्याने शेवटी मीरानेच विचारले. “जोक्स अपार्ट नील पण आपण हे कसे करणार, नील? या कृत्रिम शांततेत बसलेली आपल्यासारखी दोन सामान्य माणसे. आपल्याकडे धोके तपासण्यासाठी कोणताही अल्गोरिदम नाही, किंवा माझा खांदा तुमच्याकडे झुकला आहे म्हणजे ते आमंत्रण आहे की फक्त बसण्याची चुकीची पद्धत, हे कानात सांगायला जीवलग नाही."
हॉल आता पूर्ण रिकामा होता. बाहेर पडणाऱ्या पावसाच्या पाण्याचे संथ थेंब आता ती शांतता मोडू लागले. दोन जीवांच्या जवळिकींची शक्यता आता त्यांच्यामध्ये अचानक जड आणि अनिर्णित उभी ठाकली.
नीलच्या मनात जुनी सवय जागी झाली. कानाला हात लावायचा, समोरच्या व्यक्तीच्या सूक्ष्म हालचालींचा अंदाज घेण्यासाठी प्रॉम्प्ट मागवायचा, आणि यंत्राला या क्षणाची तीव्रता मोजू द्यायची. त्या आधाराविना, टेबलावरचा त्याचा हात आणि साखरेच्या भांड्यापाशी असलेला तिचा हात यांमधील अंतर अथांग आणि मोठ्या जोखमीचे वाटत होते. मीराचीदेखील तशीच स्थिती असावी. तिचा चेहरा विकलांग माणसासारखा दिसत होता.
"मला वाटते," प्रत्येक शब्द शांततेत तोलून-मापून उच्चारत नील हळूच हात तिच्याकडे सरकवत म्हणाला, "आपण या क्षणी बावळट ठरणे स्वीकारले पाहीजे."
"बावळट ठरणे धोक्याचे असते," मीरा पुटपुटली, पण तिने हात मागे घेतला नाही. "बावळट असाल तर तुम्ही माझ्या मनाचा चुकीचा अर्थ लावू शकता. किंवा मी नकार देऊन तुमचा हिरमोड करू शकते. आणि यात 'अनडू'चे बटण नसते."
"खरे वागण्याची हीच किंमत असेल तर मी द्यायला तयार आहे, तुम्ही?" नील म्हणाला. त्याने मुद्दाम आपला हात तीन इंच पुढे केला. तिच्या बोटांच्या अगदी जवळ नेऊन थांबवला. तिच्या त्वचेला त्याच्या हाताची ऊब जाणवेल इतका जवळ, आणि तिला हात मागे घेता येईल इतका लांब. "नकाराची शक्यता नष्ट करण्यासाठी जीवलग वाटाघाटी करतात. पण त्यामुळे उत्स्फूर्त 'हो'चा सन्मानही हिरावल्या जातो."
मीराने दोघांच्या हातांमधील अंतराकडे पाहिले. हिरवे कन्फर्मेशन रिंग पाहण्यासाठी तिने कोणतीही स्क्रीन शोधली नाही. तिने फक्त त्याची बोटे पाहिली. पेरांवर राकट, स्थिर, आणि कोणतीही जबरदस्ती न करता वाट पाहणारी आश्वासकता.
"माझ्या जीवलगाने मला सांगितले होते, की कोणी घाई केली की बचावात्मक पवित्रा घ्यायचा," तिचा आवाज अगदी हलका, कुजबुजल्यासारखा झाला. "त्याच्या वेळापत्रकानुसार शारीरिक स्पर्शापर्यंत पोहोचायला तब्बल सहा आठवडे."
"आणि मीरा काय म्हणते?"
ती थांबली. तो नाजूक आणि संहिताविरहित क्षण आणखी ताणल्यासारखा वाटला.
हळूच, कोणतेही पूर्वानुमान न घेता तिने राहीलेले एक इंचाचे अंतरही मिटवले. तर्जनी नीलच्या बोटांच्या सांध्यावर अलगद टेकवली. पावसाने तिची त्वचा गार पडली होती, त्याची मात्र ऊबदार होती. त्या मध्यस्थविरहित आश्वासक स्पर्शाने तिच्या अंगातून अंगात वीज गेल्यासारखी शिरशिरी आली.
"मीरा म्हणते," अगदी ठाम, स्पष्ट नजरेने त्याच्या डोळ्यांत पाहत ती म्हणाली, "तुमची इच्छा असेल तर आपण चष्म्याविना एकत्र चालू या. पावसात भिजू या. मग तुम्ही मला छत्रीत घ्या. कोणताही प्रोटोकॉल न पाळता तुम्ही मला पुन्हा विचारा “मीरा काय म्हणते?”
नीलच्या अंगावर सर्रकन काटा आला. तो काटा नव्हता. कोणताही प्रोसेसर कधीच नष्ट करू न शकणारी माणसाची ती आदिम, मिलनाची हाक होती.
"आणि जर तुम्ही ‘नाही’ म्हणालात तर?" त्याने हळूच विचारले.
मीराच्या चेहऱ्यावर आश्वस्त स्मित उमटले. "नाही म्हणालेच तर मग तुम्ही तो नकार ऐकाल, तेही अपयश पचवाल, अगदी लहानपणी न बांधलेल्या दगडी पुलासारखे!” ती थबकली. नीलचा पडलेला चेहरा बघून तिला त्याची दया आली. जरा जास्तच त्रास दिला का आपण! त्याच्याजवळ सरकत ही त्याच्या कानात हळूच कुजबुजली “नाही कशी म्हणू तुला!” झोपवलेले यंत्रजीवलग टेबलवरच सोडून दोघेही बाहेरच्या पावसात शिरले.
मघाचा रिमझिम पाऊस आता धारांनी कोसळत होता.
-----------------------------
मिसळपाव
प्रतिक्रिया