Skip to main content

उपकोसल — अग्नीच्या प्रकाशात

लेखक ज्ञानोबाचे पैजार यांनी शुक्रवार, 18/09/2026 10:03 या दिवशी प्रकाशित केले.

गुरुकुलात संध्याकाळ उतरली होती.

दिवसभराचा गोंगाट हळूहळू शांत होत होता. नदीकाठून परतलेल्या शिष्यांचे आवाज आता विरळ झाले होते. कुठेतरी एखादा पक्षी शेवटची हाक देत होता. गोशाळेत गुरे निवांत उभी होती. आकाशात एकेक तारा दिसू लागला होता.

पण गुरुकुलाच्या यज्ञ शाळेत मात्र अजून प्रकाश होता.

तीन अग्नी मंदपणे धगधगत  होते.

गार्हपत्यअग्नीअन्वाहार्यपचन अग्नी आणि आहवनीय अग्नी.

( गार्हपत्यअग्नी :- गृहस्थाशी किंवा घराशी संबंधित अग्नी.  गृहस्थाच्या घरातील यज्ञकर्माची सुरुवात याच अग्नीपासून होतअसे.  महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा अग्नी सतत जपून ठेवायचा अशी परंपरा होती. इतर यज्ञाग्नी प्रज्वलित करण्यासाठी गार्हपत्य अग्नीपासून अग्नी घेतला जाई.

आहवनीय हा देवतांना हवि अर्पण करण्यासाठी वापरला जाणारा अग्नी. तूप, धान्य, समिधा इत्यादी हवि याच अग्नीत अर्पण केले जात.   यज्ञातील इदं अग्नये स्वाहा”, “इदं  इन्द्राय  स्वाहाअशा आहुती प्रामुख्याने आहवनीय अग्नीत दिल्या जात.

अन्वाहार्यपचन या शब्दाचा संबंध पचन, म्हणजे शिजवणे, याच्याशी आहे. यज्ञकर्मात ऋत्विज, पुरोहित किंवा यज्ञाशी संबंधित व्यक्तींसाठी जे अन्न तयार केले जात असे, ते शिजविण्यासाठी या अग्नीचा उपयोग होत असे. म्हणून त्याला पचनाचा अग्नी असे साधे नाव देता येईल. याला दक्षिणाग्नी असेही संबोधले जाते, कारण तो यज्ञाच्या दक्षिण बाजूस स्थापित केला जात असे.)

उपकोसल त्या अग्नीं समोर बसला होता, त्याचे डोळे थकलेले होते, पण ते अग्नी पासून हटत नव्हते. किती तरी वर्षे झाली होती त्याला या गुरुकुलात  येऊन, तो लहानपणीच आचार्य सत्यकाम जाबाल यांच्या आश्रमात आला होता. इतर शिष्यांसारखा तो ही वेद शिकत होता; पण त्याची मुख्य जबाबदारी होती अग्नींची  सेवा.

पहाटे उठल्यावर तो सर्वप्रथम यज्ञ शाळेत येई, राख बाजूला करी, कालच्या निखाऱ्यांत अजून प्राण शिल्लक आहे का ते पाहत असे, समिधा नीट रचत असे, अग्नी मंदावला असेल तर पुन्हा चेतवीत असे, पावसाळ्यात ओलसर लाकूड सुकवत असे, वाऱ्याच्या रात्री अग्नी विझू नये म्हणून त्याच्याभोवती आडोसा करी, हिवाळ्याच्या पहाटे सगळे शिष्य गाढ झोपलेले असताना उपकोसल मात्र अग्नीपाशी बसलेला असे, कधी कधी त्याला वाटे, ‘मी इथे शिकायलाआलो आहे की आयुष्यभर अग्नीची राख राखण्यासाठी?’

पण त्याने कधी तक्रार केली नाही, वर्षे जात राहिली, एकेक करून त्याच्या सोबत आलेले शिष्य आपले शिक्षण  पूर्ण करून गुरुकुलातून  निघून  गेले, त्यांच्या निरोपाच्या वेळी आचार्य त्यांना जवळ बोलवत. त्यांच्या डोक्यावर हात ठेवत, काही मंत्र सांगत, आशीर्वाद देत.

उपकोसल दूर उभा राहून ते पाहत असे, एकदा त्याने धीर करून आचार्यांना विचारले, “गुरुदेव, माझे शिक्षण कधी पूर्ण होईल?” 

सत्यकामांनी त्याच्याकडे पाहिले, “ वेळ आली की तुला कळेल. ” एवढेच उत्तर मिळाले. उपकोसल पुन्हा आपल्या कामाला लागला.

 

एके दिवशी सकाळी गुरुकुलात  हालचाल सुरू झाली, आचार्य सत्यकाम काही दिवसांसाठी प्रवासाला जाणार होते, शिष्यांना त्यांनी निरोप दिला, 

उपकोसल त्यांच्या जवळ गेला, गुरुदेव, मी ही आपल्या बरोबर येऊ?”

नाही, उपकोसल. तू  इथेच राहा, “अग्नींची सेवा कोण करेल?”

सत्यकाम हसले.

मला ठाऊक आहे, तू करशील.”

उपकोसलने नमस्कार केला.

आचार्य निघून गेले.

दोन दिवस गेले, चार दिवस गेले, आठ दिवस गेले, पण आचार्य परतले नाहीत, दरम्यान उपकोसलच्या मनात एक प्रश्न सतत वाढत होता.

माझे शिक्षण कधी पूर्ण होणार? ’

तो प्रश्न आता केवळ ज्ञानाचा नव्हता, त्याच्या मनात एक वेगळीच हुरहूर निर्माण झाली होती.

इतकी वर्षे मी सेवा केली. तरी गुरुदेवांनी मला अजून ब्रह्म विद्या का सांगितली नाही?’

त्याला इतर शिष्यांचे निरोप आठवले, त्यांचे आनंदी चेहरे आठवले, आणि पहिल्यांदाच त्याच्या मनात दुःख दाटून आले.

त्याने अन्न सोडले,  गुरुकुलातील लोकांनी त्याला समजावले, “उपकोसल, असे उपाशी राहू नकोस.”

तो शांतपणे  म्हणाला, “माझ्या मनात इतक्या इच्छा, इतके दुःख भरले आहेकी अन्न घशाखाली उतरत नाही.”

आचार्यांची पत्नी त्याच्याजवळ आली, तिने प्रेमाने विचारले, “काय झाले रे?”

उपकोसलने मान खाली घातली. “मला काहीच झाले नाही.”

ती म्हणाली, “काहीच झाले नाही असं तुझा चेहरा सांगत नाही.”

उपकोसल काही बोलला नाही, त्या रात्री तो पुन्हा यज्ञशाळेत गेला, तीन अग्नी त्याच्या समोर धगधगत होते.

रात्र गडद होत गेली, गुरुकुलातील सगळे झोपले, फक्त उपकोसल जागा होता, तो अग्नींकडे पाहत बसला. अचानक त्याला जाणवले, अग्नी जणू नेहमीपेक्षा वेगळ्या पद्धतीने धगधगत आहेत.

पहिल्या अग्नीची ज्योत उंच झाली, उपकोसलने डोळे चोळले, त्याला भास झाला का?

ज्योत पुन्हा हलली, आणि  एक आवाज उमटला, “उपकोसल!”

तो दचकला सभोवताली कोणी नव्हते, तो उठला.

कोण?”

ज्योती जणू हलक्या हसल्या सारख्या लहरल्या.

आम्ही तुला काही सांगू इच्छितो.”

 गार्हपत्य अग्नी जणू सजीव झाला, 

अग्नी म्हणाला, तू आमची इतकी वर्षे श्रद्धेने सेवा केलीस. आता आम्ही तुला ब्रह्मविद्येचा एक भाग सांगतो.”

उपकोसल स्तब्ध झाला, त्याने हात जोडले, गार्हपत्य अग्नी म्हणाला

प्राणोब्रह्मकम् ब्रह्मखं ब्रह्म 

प्राण हे ब्रह्म आहे. ‘कम्म्हणजे आनंद, सुख, ते ब्रह्म आहे.  ‘खम्म्हणजे आकाशतेही ब्रह्मआहे.”

उपकोसलाला प्रश्न पडला, “प्राण, आनंद आणि आकाशहे वेगवेगळे आहेत की एकच?”

अग्नी जणू त्याच्या मनातील प्रश्न ओळखून म्हणाला, “ब्रह्म सर्वत्र आहे. जीवनात प्राण म्हणून.अस्तित्वात आकाशा सारखे व्यापक. आणि अंतर्मनात आनंद स्वरूप.”

उपकोसलाला पहिला प्रकाश दिसला.

यानंतर अन्वाहार्यपचन अग्नी बोलला.

तो म्हणाला, “उपकोसल, आता माझे ऐक.”

पृथिवीअग्निःअन्नमादित्यःआपः दिशः नक्षत्राणि  

याचा आशय असा, पृथ्वी, अग्नी, अन्न, सूर्य, जल, दिशा आणि नक्षत्रे ही सर्व विश्वातील परस्पर जोडलेली तत्त्वे आहेत.

उपकोसलाला जाणवले, ब्रह्म केवळ मंदिरात किंवा यज्ञाच्या वेदी पुरते  मर्यादित नाही, पृथ्वी मध्ये ते आहे, अन्नामध्ये ते आहे, सूर्यामध्ये  ते आहे, जलामध्ये  ते आहे, दिशांमध्ये ते आहे, आकाशातील नक्षत्रांमध्ये ते आहे, संपूर्ण विश्व एका अदृश्य तत्त्वाने जोडलेले आहे.

आता आहवनीय अग्नी बोलला.

तो म्हणाला

आदित्येपुरुषो दृश्यते एष आत्मा एष अमृतःअभयः 

सूर्या मध्ये जो पुरुष दिसतो, तोच आत्मा आहे. तो अमर आहे. तो अभयस्वरूप आहे.”

उपकोसल मंत्रमुग्ध होऊन ऐकत होता. अग्नी पुढे म्हणाला,

जो प्रकाश तुला सूर्याच्या रूपाने बाहेर दिसतो, त्याच प्रकाशाचा सूक्ष्म अंश तुझ्या अंतःकरणातआहे.

बाहेरचा सूर्य प्रकाश देतो, पण अंतःकरणातील आत्मचैतन्य तुला सूर्याला ही जाणण्याची क्षमता देते.” उपकोसलाच्या मनात एक महान विचार उमटला, मी ज्या विश्वाकडे पाहतोते जाणण्याची शक्ती माझ्यातच आहे.”

अग्नींनी उपकोसलाला पुढे सांगितले

एषआत्मा अपहतपाप्मा विजरो विमृत्युर् विशोको विजिघत्सोऽपिपासः सत्यकामः सत्यसंकल्पः 

(हाआत्मा पापरहितवृद्धत्वरहितमृत्युरहितदुःखरहितभूक-तहान यांच्या पलीकडचा आहेत्याची इच्छा आणि संकल्प सत्य स्वरूप आहेत.)

उपकोसलाच्या मनात शांतता उतरली, ज्या मनुष्याला स्वतःला फक्त शरीर समजते, त्याला वृद्धत्वाची भीती वाटते, मृत्यूची भीती वाटते, दुःखाची भीती  वाटते, भूक-तहान, यश-अपयश, मान-अपमान यांचा परिणाम होतो, पण आत्मा या सर्व बदलांचा साक्षी आहे, शरीर  बदलतेआत्मतत्त्व बदलत नाही.

उपकोसल ऐकत राहिला, त्याच्या डोळ्यांत पाणी आले.

इतकी वर्षे तो अग्नीला फक्त सांभाळत होता, आज प्रथमच त्याला वाटले, कदाचित अग्नी त्याच्याकडेही पाहत होता.

 

काही दिवसांनी सत्यकाम ऋषी आश्रमात परतले, त्यांनी उपकोसलाकडे पाहिले, त्यांना काहीतरी वेगळे जाणवले, उपकोसलाच्या चेहऱ्यावर एक विलक्षण तेज होते, त्याचे मन शांत झाले होते, त्याच्या डोळ्यांत पूर्वीची अस्वस्थता नव्हती, गुरूंनी विचारले

उपकोसल, तुझ्या चेहऱ्यावर मला ज्ञानाचे वेगळेच  तेज दिसत आहे. तुला कोणी उपदेश केला?

उपकोसलाने नम्रपणे उत्तर दिले, “भगवन्, मला अग्नींनी उपदेश केला" आणि त्याने त्या रात्री  काय घडले ते इत्यंभूत सांगितले 

सत्यकामऋषी हसले.

होय. अग्नींनी तुला मार्ग दाखवला आहे, पण त्यांनी तुला ब्रह्माचे पूर्ण ज्ञान दिलेले नाही, आता मी तुला अंतिम सत्य सांगतो.”  उपकोसल गुरूंच्या चरणां जवळ बसला. सत्यकाम म्हणाले, “उपकोसल, तू डोळ्यांत स्वतःचे प्रतिबिंब पाहतोस ना?”

हो.”

त्या प्रतिबिंबाला केवळ शरीर समजू नकोस. डोळे म्हणजे पाहण्याचे साधन. पण पाहणारा कोणकान ऐकतात. पण ऐकणारा कोणमन विचार करते. पण विचार जाणणारा कोणशरीर अनुभवते. पण अनुभवाचा साक्षी कोण?

उपकोसल शांत झाला.

गुरूंनी सांगितले

एषआत्माएतदमृतम्अभयम्एतद् ब्रह्म 

हा आत्माच अमर आहे. तो अभय आहे. तोच  ब्रह्मआहे, म्हणजे, ज्याला तू बाहेर शोधत होतासत्याचे अंतिम सत्य तुझ्या स्वतःच्या चैतन्यात आहे."

सत्यकामांनी उपकोसलाला एक उदाहरण दिले. “समजा तू पाण्यात स्वतःचे प्रतिबिंब पाहतोस. पाणी स्थिर असेल तर प्रतिबिंब स्पष्ट दिसते, पाणी अस्थिर असेल तर प्रतिबिंबही तुटलेले दिसते, पाणी चिखलाने भरले असेल तर प्रतिबिंब अस्पष्ट दिसते, तसाच आत्मा आहे, तो बदलत नाही, पण मनाच्या अस्थिरते मुळे आपल्याला त्याचेे खरे स्वरूप स्पष्ट दिसत नाही.”

उपकोसलाला समजले

समस्या आत्म्यात नाहीसमस्या मनाच्या अस्थिरतेत आहेमन  शांत झाले की सत्य स्पष्ट दिसू लागते.

गुरूंनी पुढे सांगितले

उपकोसल, सूर्य स्वतःच्या प्रकाशाने चमकतो, त्याला दुसऱ्या दीपाची गरज नसते, तसाच आत्मा स्वतः प्रकाश आहे, आपण जगातील वस्तू पाहतो, पण त्या वस्तूंची जाणीव होण्या साठी चेतना आवश्यक आहे, ही चेतना दुसऱ्या कोणत्याही वस्तूने प्रकाशित होत नाही, ती स्वतःच प्रकाश आहे.”

आत्मा हा अनुभवाचा विषय नसून अनुभव शक्य करणारे चैतन्य आहेतू आत्म्याला एखाद्या वस्तूप्रमाणे हातात धरू शकत नाहीस. कारण प्रत्येक वस्तूला जाणणारा तू  आहेस.

उपकोसलाच्या अंतःकरणात एक अद्भुत शांतता निर्माण झाली, त्याला जाणवले, मी फक्त हे शरीर नाही, मी माझे विचार नाही, मी माझ्या इच्छा नाही, मी माझ्या भावना नाही, मी माझे यश नाही, मी माझे अपयश नाही, या सर्वांचा अनुभव घेणारे जे चैतन्य आहे, तेच माझे खरे स्वरूप आहे.

त्याने गुरूंच्या चरणी मस्तक ठेवले.

भगवन्, आता मला समजले.”

सत्यकामांनी विचारले, “काय समजले?”

उपकोसल म्हणाला, “अग्नीने मला बाहेरचे विश्व दाखवले, आपण मला त्या विश्वाला जाणणारे अंतःचैतन्य दाखवले, मला कळले की ब्रह्म दूर नाही, ते जीवनाच्या प्रत्येक स्तरात आहे, आणि त्याचा प्रकाश माझ्यातही आहे.”

गुरू संतोषाने म्हणाले, उपकोसल, आता खऱ्या अर्थाने तुझे शिक्षण पूर्ण झाले.”

त्या रात्री उपकोसल पुन्हा यज्ञशाळेत बसला, समोर तीन अग्नी होते, पण आज त्याला ते पूर्वीसारखे दिसत नव्हते, काल पर्यंत तो अग्नीची सेवा करीत होता, आज त्याला जाणवत होते, तो अग्नी बाहेर जळत असला तरी त्याचा प्रकाश कुठेतरी आत ही पोहोचला आहे.

त्याने हात पुढे केला, ज्योतीची उष्णता हातावर जाणवली, त्याने हात मागे घेतला, मग स्वतःच्या छातीवर ठेवला, श्वास आत गेला, बाहेर आला, तो स्वतःशीच कुजबुजला, “हा श्वास माझाआहे... की मीच या श्वासात आहे?”

उत्तर आले नाही, पण त्या प्रश्नाची गरजही उरली नाही, बाहेर आकाशात चंद्र होता, दूर नदी वाहत होती, झाडांच्या पानांतून वारा वहात होता, यज्ञशाळेत अग्नी शांतपणे जळत होता.

उपकोसल बराच वेळ तसाच बसून राहिला.

आचार्य काही अंतरावर उभे राहून त्याच्याकडे पाहत होते. त्यांना काही बोलावेसे वाटलेनाही.

कारण अनेक वर्षांपूर्वी ज्या मुलाने गुरुकुलात येऊन अग्नी पेटवला होता, तो मुलगा आता बदलला होता.

त्याने अग्नीची राख जपता जपता प्रकाश शोधला होता आणि तो प्रकाश शेवटी त्याला कुठे सापडला?

अग्नीमध्ये?  सूर्यामध्ये? आकाशामध्ये? की स्वतःच्या अंतःकरणात? कदाचित या सगळ्यां मध्येच.

त्या रात्री यज्ञशाळेतील तीन अग्नी जळत राहिले. पण उपकोसलच्या आतला चौथा प्रकाश जो बाहेरच्या कोणत्याही अग्नीने पेटवलेला नव्हता तो पहिल्यांदा त्याला स्पष्ट जाणवला.

पैजारबुवा,

लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 1
प्रतिक्रिया 0

प्रतिक्रिया