Skip to main content

भृगू — सत्याच्या शोधात

लेखक ज्ञानोबाचे पैजार यांनी गुरुवार, 17/09/2026 10:31 या दिवशी प्रकाशित केले.

संध्याकाळची वेळ होती, आश्रमाभोवतीची झाडे सावलीत हरवू लागली होती. पश्चिमेकडे मावळणाऱ्या सूर्याची शेवटची किरणे नदीच्या पाण्यावर चमकत होती. यज्ञ शाळेतला अग्नी हळूहळू शांत होत होता.

भृगू मात्र आश्रमाच्या एका टोकाला बसला होता.

त्याच्या समोर अनेक दिवसांपासून उभाअसलेला एकच प्रश्न पुन्हा जागा झाला होता, ब्रह्म म्हणजे नेमके काय?”

त्याने हा शब्द अनेकदा ऐकला होता, ऋषी ब्रह्माबद्दल बोलत, शिष्य  ब्रह्माबद्दल  चर्चा करत, मंत्रांमध्ये ब्रह्माचा उल्लेख येत असे, पण भृगूच्या मनात  समाधान नव्हते,  शब्द ऐकून त्याला वाटे, मी ब्रह्माबद्दल ऐकतो आहेपण मला ते खरोखर कळले आहे का?

त्या रात्री त्याने ठरवले, उद्या वडिलांना विचारायचे.

त्याचे वडील होते वरुणआश्रमात त्यांचा मोठा मान होता. पण भृगूसाठी ते केवळ ऋषी किंवा पिता नव्हते  नव्हते, तर ते त्याचे खास मार्गदर्शक होते, कोणत्याही प्रश्नाचे उत्तर ते प्रामाणिकपणेआणि समोरच्याला संपूर्ण समजेपर्यंत देत.

दुसऱ्या दिवशी पहाटे भृगू नदीकाठी गेला, नदीवर धुक्याची पातळ चादर पसरली होती. पाण्यावरून पक्ष्यांचे आवाज येत होते.

स्नान करून तो वडिलांकडे गेला, वरुण त्या वेळी अग्नी समोर बसलेहोते.

भृगू काही क्षण शांत उभा राहिला, वरुणांनी त्याच्याकडे पाहिले,  “काय झाले, भृगू?”

तात, मला एक प्रश्न विचारायचाआहे.”

विचार.”

ब्रह्म काय आहे?”

वरुण शांत झाले.

भृगूला वाटले, आता वडील एखादा मंत्र सांगतील, एखादी गूढ व्याख्या देतील, कदाचित एखादे असे उत्तर देतील की ज्यामुळे त्याचा प्रश्न कायमचा संपेल.

पण वरुणांनी तसे केले नाही, त्यांनी केवळ काही शब्द सांगितले

यतोवा इमानि भूतानि जायन्ते । येन जातानि जीवन्ति 
यत्प्रयन्त्यभिसंविशन्ति। तद्विजिज्ञासस्व। तद्ब्रह्मेति 

अर्थ ज्यापासूनसर्व प्राणी आणि वस्तू उत्पन्न होतातज्यामुळे ते जगतात आणि ज्याच्यात शेवटी विलीन होतातत्याचा शोध घेतेच ब्रह्म आहे.”

वरुण म्हणाले,  “भृगु, मी तुला उत्तर सांगणार नाही. तू स्वतः शोध घे.”

भृगूने आश्चर्याने पाहिले. “मग मी ते कसे जाणू?”

वरुण म्हणाले, तपसा ब्रह्म विजिज्ञासस्वतुझ्या तपश्चर्येतून सत्याचा अनुभव घे, तपश्चर्येने ब्रह्म जाणण्याचा प्रयत्न कर.”

भृगू शांत राहिला, वरुणांनी आणखी एक वाक्य सांगितले, अन्नंप्राणं चक्षुः श्रोत्रं मनो वाचमिति।

अन्न, प्राण, चक्षू, श्रोत्र, मन आणि वाणी यांच्याकडे लक्ष दे, त्यांचा शोध घे, विचार कर, अनुभव घे, आणि जेव्हा तुला वाटेल की उत्तर सापडलेआहे, तेव्हा पुन्हा तपास.”

भृगूने वडिलांना नमस्कार केला, तो निघाला, त्याच्या कडे उत्तर नव्हते, पण आता त्याच्याकडे मार्ग होता.

भृगू आश्रमापासून थोड्या अंतरावर असलेल्या एका शांत ठिकाणी गेला, तेथे एक जुने झाड होते, त्या खाली तो बसला, वरुणांनी  काय सांगितले ते त्याने पुन्हा आठवले, सहाजिकच त्याचे लक्ष अन्ना कडे गेले, सर्व जीव कशामुळे जगतात? तर ते अन्ना मुळे ”

पक्षी दाणे शोधतात, गाय गवत खाते, बालक आईचे दूध पिते,  माणूस अन्न घेतो आणि त्याला शक्ती मिळते, अन्न नसेल तर शरीर अशक्तहोते, अनेक दिवस अन्न न मिळाल्यास शरीराचा अंत होतो.

भृगू बराच वेळ विचार करतराहिला, त्याच्या मनात एक विचार स्पष्ट होऊ लागला

अन्नापासूनच शरीर निर्माण होतेअन्ना मुळे शरीर जगते, अन्न असेल तरच हे जीवनचक्र चालते, म्हणजे अन्नच ब्रह्म असावे.”

अन्नंब्रह्मेति व्यजानात् 

त्याला उत्तर सापडल्या सारखे वाटले, म्हणून तो वडिलांकडे परतला.

तात, मला वाटते मला उत्तर सापडले.”

वरुणांनी विचारले, “काय?”

अन्न ब्रह्म आहे.”

वरुण काही क्षण त्याच्याकडे पाहत राहिले.

तुला असे का वाटते?”

भृगूने आपले विचार सांगितले.

वरुणांनी त्याचे बोलणे पूर्ण ऐकले,  मग ते म्हणाले, “चांगला विचार आहे.”

भृगूला वाटले, आता वडील त्याचे उत्तर मान्य करतील, पण वरुण म्हणाले, “आता पुन्हा नव्याने विचार कर.”

पुन्हा?”

हो.”

कशाचा?”

अन्नाला जन्म देणारे काय आहे? अन्नाला उपयोगात आणणारे काय आहे? अन्न खाल्ले की शरीराला जीवन देणारे काय आहे?”

भृगू पुन्हा शांत झाला.

वरुण म्हणाले, तपसाब्रह्म विजिज्ञासस्व.”

भृगू पुन्हा निघाला.

विचार करताना त्याचे लक्ष श्वासाकडे गेले, तो शांत बसला आणि श्वासाचे निरीक्षण करू लागला ,  श्वासआत, श्वास बाहेर, पुन्हा आत, पुन्हा बाहेर, त्याने विचार केला,

अन्नशरीराला पोषण देतेपण शरीरात प्राण नसेल तर?”

त्याच्या समोर एक मृत पक्षी पडला होता, काल पर्यंत तो आकाशात उडत होता, आज त्याचे पंख होते, डोळे होते, चोच होती, शरीर होते, पण तो उडत नव्हता.

भृगू त्याच्याकडे बराच वेळ पाहत राहिला, काय झाले  होते?

शरीर तर होते, मग जीवन कुठे गेले?  त्याने स्वतःच्या छातीवर हात ठेवला, श्वास चालू होता, जीवन होते, त्याच्या मनात दुसरा विचार आला,  

प्राणा मुळेच जीवन आहे.”

प्राणोब्रह्मेति व्यजानात् 

तो पुन्हा वडिलांकडे गेला. “तात, अन्न नव्हे, प्राणच ब्रह्म असावा.”

वरुणांनी विचारले, “का?”

भृगूने सांगितले. “प्राणामुळे शरीर जगते. प्राण निघून गेला की शरीर उरते, पण जीवन राहत नाही.”

वरुणांनी मान हलवली, "छान तुझ्या विचारांची दिशा योग्य आहे ,आता अजून पुढे जा.”

म्हणजे? हे ही पूर्ण उत्तर नाही? ”

तुला काय वाटते? ”

भृगू काही क्षण विचारात पडला. “अजून काहीतरी बाकी आहे.”

वरुण म्हणाले, “मग ते शोध.”

भृगू पुन्हा आपल्या एकांतात गेला.

यावेळी त्याने प्राणापेक्षा अधिक खोलवर आत पाहण्याचा प्रयत्न केला, प्राण चालू होता, पण प्राणाला दिशा कोण देत होते?

शरीर जगत होते, पण काय करायचे, काय टाळायचे, कुठे जायचे, हे कोण ठरवत होते?

त्याला स्वतःचे मन आठवले, कधी ते शांत असे, कधी अस्वस्थ, कधी आनंदी, कधी दुःखी.

कधी एका क्षणी एका गोष्टीची इच्छा करी आणि दुसऱ्याच क्षणी तिचा त्याग करी.

भृगूने डोळे मिटले, मनाकडे पाहायचा प्रयत्न केला, त्याला मनात दिसत होत्या कधी बालपणीच्या आठवणी, कधी आश्रमातील घटना, कधी वडिलांचे शब्द, तर कधी भविष्यातील कल्पना. जणू एक विचार दुसऱ्याला जन्म देत होता.

भृगू हसला, हेच तर मला शोधायचे आहे.”

त्याने विचार केला, मन नसते तर अनुभूती कशा झाल्या असत्याइच्छा कशा निर्माण झाल्या असत्याविचार कुठून आले असते?”

त्याला पुन्हा एक उत्तर सापडले, तो वडिलांकडे गेला.

तात, आता मला वाटते, मनच ब्रह्म असावे.”

वरुणांनी पुन्हा विचारले, “तुला असे का वाटते?”

भृगू म्हणाला,

प्राण जीवन देतो; पण त्या जीवनाला दिशा देणारे मन आहे. इच्छा, विचार, स्मृती, भावना हे सगळे मनातच घडते.”

वरुणशांत होते, त्यांनी विचारले, “स्वप्नात तू कुठे असतोस?”

भृगू थोडा चकित झाला, “झोपेत?”

 हो. शरीर झोपलेलेअसते. पण स्वप्नात तू धावतोस, बोलतोस, पाहतोस, घाबरतोस. हे सगळे कुठे घडते?”

मनातच.”

“ते सगळे सत्य असते का?”

 “नाही”

मग जागेपणी मनाला जे खरे वाटते, ते नेहमीच अंतिम सत्य असते का? मन विचार करतेपण योग्य-अयोग्य ठरवणारे कोणमन कधी एका गोष्टीची इच्छा करते, तर लगेच दुसऱ्या गोष्टीकडे वळते, म्हणजे  मन अस्थिर आहे, अंतिम सत्य अस्थिर,चंचल आणि नित्य बदलणारे  कसे असू शकते?”

भृगू 'गप्प झाला.

वरुणम्हणाले, “पुन्हा तप कर. शोध घे आणि काही सापडले की सांग

या वेळी भृगू अधिक खोलवर गेला, त्याने केवळ मनाकडे पाहिले नाही, त्याने जाणणाऱ्या शक्तीकडे पाहिले, मन विचार करते, पण विचार योग्यआहे की चुकीचा, हे कोण ठरवते

मनाला इच्छा होते, पण कोणती इच्छा स्वीकारायची, कोणती सोडायची, हे कोण ठरवते?

शब्द ऐकू येतात, पण त्यांचा अर्थ कोण समजतो?

डोळ्यांना दृश्य दिसते, पण हे काय आहे?” असा प्रश्न कोण विचारतो

भृगू बराच काळ याच विचारात राहिला, हळूहळू त्याला जाणवले, मन आणि जाणिवा एकच नाहीत, मनात विचार येतात, पण विचारांकडे पाहणारे काहीतरी वेगळे आहे.

मनापेक्षा बुद्धी अधिक सूक्ष्म आहे, त्याने हे अनुभवले आणि त्याने त्याला नाव दिले, विज्ञान.

विज्ञानंब्रह्मेति व्यजानात् 

ज्ञानाची ती अधिक सूक्ष्म शक्ती, विवेक, जाणीव, भेद ओळखण्याची क्षमता.

भृगू पुन्हा वरुणांकडे गेला.

तात…”

वरुणांनी त्याच्याकडे पाहिले.

आता काय सापडले? ”

विज्ञान.”

काय म्हणतोस ते जरा विस्ताराने सांग

मन विचार करते; पण त्या विचारांचे परीक्षण करणारी एक अधिक सूक्ष्म शक्ती आहे. ती जाणते, ओळखते, निर्णय घेते,  म्हणून मला वाटते, विज्ञान ब्रह्म असावे.”

वरुण काही क्षण शांत राहिले, भृगूला आता सवय झाली होती, तो वडिलांच्या चेहऱ्यावरून उत्तर समजू लागला होता.

त्याला समजले होते, वरुण त्याला उत्तर देणार नाहीतते त्याला पुन्हा शोधायला पाठवणार.

आणि तसेच झाले.

भृगू,” वरुण म्हणाले,

हे आधी पेक्षा अधिक सूक्ष्म आहे.”

भृगूच्या चेहऱ्यावर उत्सुकता उमटली, “ मग हेच ब्रह्म? ”

वरुणांनी हलकेच मान हलवली, “तुला अजून प्रश्न पडतो आहे ना?  ज्ञान असले तरी मनुष्य दुःखी का होतो? बुद्धिमान माणूसही अस्वस्थ का असतो योग्य काय आहे हे माहीत असूनही मी नेहमी तेच का करत नाही?”

भृगूने काही क्षण विचार केला, मग तो म्हणाला,

हो.”

मग जा, अधिक शोध घे आणि काही सापडले की सांग

या वेळी भृगू अनेक दिवस परतला नाही

तो एका नदीकाठी बसला, दिवस गेले, ऋतू बदलल्यासारखे वाटले, त्याने स्वतःच्या अनुभवांकडे पुन्हा पाहिले, अन्न….प्राण….मन….विज्ञान.

प्रत्येक पायरी आधीच्या पायरीपेक्षा सूक्ष्म होती, पण प्रत्येकाच्या पलीकडे आणखी काहीतरी उरले होते, भृगूने स्वतःला एक प्रश्न विचारला

माणूस जगतो कशासाठी?”

फक्त अन्नासाठी?... नाही.

फक्त श्वासासाठी?....नाही.

फक्त विचार करण्यासाठी?...नाही.

फक्त ज्ञान मिळवण्यासाठी?....कदाचित नाही.

ज्ञान मिळाले की काय होते?...मनाला एक प्रकारची शांतता मिळते….एखादे रहस्य उलगडले की आनंद होतो….प्रिय व्यक्ती भेटली की आनंद होतो…..निसर्गात एकट्याने बसलो तरी कधीकधी मनात एक अव्यक्तआनंद भरतो….

आई आपल्या मुलाला जवळ घेते तेव्हा तिला काय मिळते?...काही वस्तू?...काही  धन?...काही ज्ञान

नाही….तरी तिच्या चेहऱ्यावर समाधान असते….भृगूला जाणवले

आनंद हा बाहेरून मिळणारा पदार्थ नाही.

तो मनाच्या पलीकडे काहीतरी आहे….ज्या क्षणी इच्छा शांत होते, त्या क्षणी आनंद उगवतो….ज्या क्षणी भीती नाहीशी होते, त्या क्षणी शांतता येते.

ज्या क्षणी मला अजून काही हवे’  हा विचार थांबतो, त्या क्षणी अंतःकरण भरून जाते.

जिथे कोणत्याही बाह्य वस्तूशिवाय पूर्णत्व आहेतो आनंद वेगळा आहे.”

भृगूने डोळे मिटले, श्वास शांत झाला, विचार शांत झाले, मन शांत झाले, काही क्षणांसाठी त्याला स्वतःभोवतीचे जग विसरल्यासारखे वाटले.

नदीचाआवाज होता, झाडांची पाने हालत होती, दूर कुठेतरी पक्षी ओरडत होता, पण त्या सगळ्याच्या पलीकडे एक खोल शांतता होती.

भृगूच्यामनात एक शब्द उमटला, आनंद.

आनन्दोब्रह्मेति व्यजानात् 

आनंद हेच ब्रह्म आहे.”

तो पुन्हा वडिलांकडे गेला,  वरुणआश्रमाच्या बाहेर बसले होते.

भृगू त्यांच्यासमोर बसला, काही क्षण दोघे ही शांत राहिले, शेवटी वरुणांनी विचारले,

आता?”

भृगूने हळू आवाजात म्हटले,

तात, मला वाटते...”

तो थांबला.

पूर्वी तो प्रत्येक वेळी आत्मविश्वासाने म्हणतअसे, मला उत्तर सापडले.”

पण आता त्याचा आवाज वेगळा होता.

मला वाटते, ब्रह्म म्हणजे आनंद.”

वरुणांनी त्याच्याकडे पाहिले, भृगूपुढे म्हणाला,

अन्नातून शरीर, प्राणातून जीवन, मनातून अनुभव, विज्ञानातून जाणिव, पण या सगळ्यांना अर्थ मिळतो तो आनंदामुळे.”

वरुणांच्या डोळ्यांत समाधान दिसले, पण त्यांनी तरीही विचारले, “आनंद म्हणजे काय? आनंद कुठेआहे?”

भृगू म्हणाला,  “बाहेर नाही.”

मग?”

आत.”

कुठे?”

भृगूने डोळे मिटले, त्याला उत्तर देण्याची घाई झाली नाही, काही वेळाने तो म्हणाला,

आनंद म्हणजे काय? चांगले अन्न मिळाले की जे वाटते ते? पैसा मिळाला की जे वाटते ते? प्रशंसा मिळाली की जे वाटते ते?

नाही त्या भावनेलाही आपण आनंद म्हणत असलो तरी तो आनंद बाह्य वस्तूंवरअवलंबून आहे.

वस्तू आली आनंद झाला, वस्तू गेलीआनंद गेला, तो आनंद क्षणभंगुर असतो, पण ब्रह्मानंद कोणत्याही बाह्य वस्तूवर अवलंबून नसतो.

तो पूर्णत्वाचा अनुभव आहे.

जेव्हा मनाची धावपळ थांबते, जेव्हा इच्छा शांत होतात, जेव्हा  “मला अजून काहीतरी हवे”  हा आग्रह विरतो, तेव्हा अंतःकरणात जी शांत, पूर्ण आणि निरपेक्ष अवस्था निर्माण होते..... तो आनंद."

आनन्दाद्ध्येवखल्विमानि भूतानि जायन्ते 
आनन्देन जातानि जीवन्ति 
आनन्दं प्रयन्त्यभिसंविशन्ति 

आनंदातूनच सर्व जीव उत्पन्न होतात, आनंदामुळे जगतात आणि शेवटी आनंदातच विलीन होतात.”

भृगुच्या अंतःकरणात आता एक विलक्षण शांतता उतरली.

"आनंदकुठे आहे?  जिथेमी’  आणि  ‘माझेयांचा आवाज शांत होतो... तिथे.”

वरुण शांत राहिले, भृगूने डोळे उघडले.

पहिल्यांदा त्याला जाणवले की वडिलांनी त्याला ब्रह्म सांगितले नव्हते, त्यांनी त्याला केवळ दिशा दिली होती, बाकीचा प्रवास त्याने स्वतः केला होता.

काही दिवसांनी भृगू पुन्हा नदीकाठी गेला, संध्याकाळ उतरली होती,  आकाशात सूर्याचा लाल गोळा हळूहळू क्षितिजा मागे जात होता. नदीवर सोनेरी प्रकाश पसरला होता,  पाण्याचा मंद खळखळाट कानावर येत होता.

भृगू एका खडकावर बसला, त्यानेडोळे मिटले,  त्याच्या मनात एका मागून एक सारे टप्पे उभे राहिले

अन्न. अन्नातून शरीर., 

प्राणप्राणातून जीवन

मनमनातून इच्छा, भावना, विचार

विज्ञानविज्ञानातून जाणिव, विवेक, ओळख

पण तरीही शोध संपला नव्हता. या सगळ्यांच्या पलीकडे काय? त्याने पुन्हा स्वतःलाच विचारले

मी कोण?”

उत्तर म्हणून एखादा शब्द मनात यावा, अशी त्याची अपेक्षा होती, पण यावेळी काहीच आले नाही.

मन शांत झाले, श्वास मंद झाला, विचार एका मागून एक विरत गेले, मी शरीर आहे...हा विचार ही गेलामी प्राण आहे...तो ही गेला….मी मन आहे...तो ही विरला….मी जाणणारा आहे...हा विचार ही शांत झाला….आणि मग….काही क्षणांसाठी भृगूला स्वतःला काहीही सिद्ध करायचे उरले नाहीकाही जाणून घ्यायचे उरले नाही….काही मिळवायचे उरले नाही….तो फक्त शांत बसला…..नदी वाहत होती…..वारा वाहत होता….झाडांची पाने सळसळत होती….दूर एखादा पक्षी आपल्या घरट्याकडे परतत होता….सगळे पूर्वीसारखेच होते.

पण भृगूच्या आत काहीतरी बदलले होते….. कारण त्याला आता ठाऊक होते आनंद हा एखादी वस्तू मिळाल्यावर निर्माण होणारा अनुभव नाहीतर इच्छा शांत झाली की जो उरतो, भीती दूर झाली की जो उरतो, अहंकार मागे सरकला की जो उरतो, स्वतःपासून स्वतःकडे पाहताना जो उरतो….तोच आनंद.

भृगूने डोळे उघडले, समोरची नदी तशीच होती, पण आता तिला पाहताना त्याच्या मनात प्रश्न नव्हता, त्याला काही सांगावेसे ही वाटत नव्हते, तो उठला, हळूहळू आश्रमाकडे चालू लागला.

रस्त्यात त्याला एक शेतकरी दिसला,  दिवसभराचे काम संपवून तो थकलेल्या बैलांना घेऊन घरी निघाला होता. थोडे पुढे एकआई आपल्या मुलाला कुशीत घेऊन बसली होती,  पक्ष्यांचा थवा घरट्यांकडे परतत होता,

भृगू थांबला, त्याने त्या सगळ्यांकडे पाहिले.

पूर्वी त्याला ब्रह्म एखाद्या गूढ, दूरच्या सत्या सारखे वाटत होते, आज मात्र जीवन जिथे होतेतिथेच ते होते. श्वासात, अन्नात, विचारात, जाणिवेत, आणि त्या सगळ्यांच्या पलीकडे पसरलेल्या शांत आनंदात.

आश्रमजवळ आला, वरुण बाहेरच बसले होते, भृगू त्यांच्या समोर जाऊन उभा राहिला, वरुणांनी त्याच्याकडे पाहिले, काही क्षण त्यांनी काही विचारले नाही, भृगूनेही काही सांगितले नाही.

बापाला  मुलाचा डोळ्यांत  शोध दिसत होता, मुलाच्या डोळ्यांत मात्र आता शोधाची घाई उरली नव्हती.

वरुणांनी हळूच विचारले,

भृगू?”

भृगूने नमस्कार केला. “तात.”

सापडले?”

भृगू काही क्षण शांत राहिला, मग तो म्हणाला

शब्दांत सांगता येईल असे काही सापडले नाही.”

वरुणांच्या चेहऱ्यावर मंद स्मित उमटले.

भृगू पुढे म्हणाला,

पण शोधताना जे उरले... त्या पासून दूर जाता येत नाही.”

वरुणांनी त्याच्याकडे पाहिले, या वेळी त्यांनी कोणताही पुढचा प्रश्न विचारला नाही.

भृगूने त्यांच्या चरणांवर मस्तक ठेवले, वरुणांनी त्याच्या डोक्यावर हात ठेवला

आश्रमातला अग्नी मंदपणे तेवत होता.

रात्र हळूहळू उतरू लागली, भृगू उठला, त्याच्या हातात ग्रंथ नव्हता, त्याच्याकडे नवी व्याख्याही नव्हती, पण आत एक अशी शांतता होती, जिला नावाची गरज नव्हती.

तो आकाशाकडे पाहत उभा राहिला, असंख्य तारे चमकतहोते, आणि त्या क्षणी त्याला जाणवले

ज्याचा शोध घेण्यासाठी तो दूर गेला होताते कधीच त्याच्या पासून दूर नव्हते.

भृगूने डोळे मिटले, त्याच्या अंतःकरणात एकच जाणिव शांतपणेउमटली,

आनन्दोब्रह्मेति व्यजानात्।

आणि त्या जाणिवेनंतर, पहिल्यांदाच, त्याला काहीही बोलावेसे वाटले नाही.

पैजारबुवा,

लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 19
प्रतिक्रिया 2

प्रतिक्रिया

पंचमय कोश

एक एक आवरण उलगडून अन्न,प्राण,मन,विज्ञान,आनंद हाच प्रवास सर्व सत्य शोधकांचा असतो,तत्वज्ञान कोणतेही मानणारे असले तरी.

याविषयक लिहिले होते.पण "वैदिक" संबंध जोडला असल्यामुळे कोणी वाचले की नाही ही शंका आहे.😅

https://www.misalpav.com/story/52985


लेख वाचताना मनात शांतता उतरत गेली आणि कुठेतरी हरवुन गेलो!! असेच लिहीत रहा आणि वाचकांना आनंद देत रहा!!