उच्च शिक्षण म्हणजे केवळ उदरनिर्वाहा साठी, धनप्राप्तीसाठी किंवा बाह्य जगाचे ज्ञान मिळविण्यासाठी केलेली साधना आहे का?
की त्यापलीकडेही त्याचा काही अर्थ आहे?
विद्याप्राप्त करण्याचा अधिकार समाजातील काही विशिष्ट वर्गांपुरताच मर्यादित आहे का?
की ज्ञानाच्या शोधात निघालेल्या प्रत्येक मनुष्याचा त्यावर समान अधिकार आहे?
लौकिक दृष्टिकोनातून पाहिले तर आज आपण जी शिक्षणव्यवस्था स्वीकारली आहे, तिचा मुख्यउद्देश लौकिक ज्ञान प्राप्त करून जीवनात यशस्वी होणे, व्यवसाय करणे आणि धनार्जन करणे हा आहे. हे ज्ञान निश्चितच आवश्यक आहे. परंतु ज्ञानाला सीमा नाही. मनुष्याचे जीवन केवळ उदरनिर्वाहासाठी नसते. सतत शिकत राहणे, प्रश्न विचारत राहणे आणि ज्ञानाच्या अधिक गहन स्तरांचा शोध घेत राहणे, हा ही मानवी जीवनाचा एक महत्त्वाचा भागआहे.
पण मग हे ज्ञान नेमके कोणते?
हा प्रश्नच एका बालकाच्या मनात सतत घोळत होता.
त्या बालकाचे नाव होते — सत्यकाम.
सत्यकाम एका दासीचा पुत्र होता. लहानपणापासूनच तो अत्यंत बुद्धिमान, जिज्ञासू आणि शांत स्वभावाचा होता. त्याच्या मनात सतत नवनवीन प्रश्न निर्माण होत असत. आजूबाजूचे जग त्याला केवळ दिसत नव्हते; ते त्याच्याशी जणू काही संवाद साधत होते.
नदीकडे पाहताना त्याला प्रश्न पडत असे —
“नदीला दोन तीर असतात. मग माझ्याही अस्तित्वाला असे दोन तीर आहेत का? एक मला दिसणारा आणि दुसरा मला अजून न दिसलेला?”
अग्नीची धग जाणवली की तो विचार करी —
“ताप माझ्यातही आहे आणि अग्नीतही. मग माझ्यातील हा ताप आणि अग्नीतील ताप एकच आहे का? मी ही अग्नीच आहे का?”
सूर्याकडे पाहताना त्याच्या मनात पुन्हा प्रश्न उभा राहत असे —
“ताप सूर्यालाही आहे. मग मी सूर्य आहे का? सूर्य माझ्यात आहे का?”
पावसाचा थेंब जमिनीवर पडताना पाहून त्याला विलक्षण विचार सुचत —
“बिंदू जलात मिसळतो, जल प्रवाहात मिसळते, प्रवाह नदीत, नदी गंगेत आणि गंगा सागरात. पण मग हा सागर कुठे मिसळतो? मेघात? आकाशात? आणि पुन्हा मेघातून पाऊस पडतो, पुन्हा थेंब तयार होतो, पुन्हा जल होते. मग मी कुठून आलो? आणि शेवटी कुठे जाणार?”
असे असंख्य प्रश्न त्याच्या मनात उठत. उत्तरांच्या शोधात तो एका आचार्याकडून दुसऱ्या आचार्याकडे भटकत असे.
एकदा त्याने एका ऋषींच्या आश्रमात जाऊन विनम्रपणे विचारले, “आचार्य, मला आपला शिष्य करूनघ्याल का?”
ऋषींनी त्याच्याकडे पाहिले.
“तू कोणाच्या पुत्र आहेस? तुझे कुल कोणते? गोत्र कोणते?”
सत्यकामा कडे या प्रश्नाचे उत्तर नव्हते.
दुसऱ्या आश्रमातही त्याने शिष्य होण्याची इच्छा व्यक्त केली. तेथेही त्याला त्याच प्रश्नांचा सामना करावा लागला.
हळूहळू त्याला समजू लागले की त्याची बुद्धी, त्याची जिज्ञासा किंवा त्याची ज्ञानाची तहान यापेक्षा त्याचा जन्म अधिक महत्त्वाचा मानला जात आहे.
पण त्याने प्रश्न विचारणे सोडले नाही.
एके दिवशी त्या प्रदेशात गौतमऋषी आले. सत्यकामाने त्यांना पाहिले. ऋषी दुसऱ्या दिवशी पहाटे जेव्हा नदीतून स्नान करून बाहेर आले , तेव्हा सत्यकाम धावत त्यांच्या जवळ गेला. त्याने त्यांच्या चरणांवर मस्तक ठेवले.
“आचार्य,” तो म्हणाला, “मी तुमचा शिष्य होऊ शकतो का?”
गौतमऋषींनी त्याच्याकडे पाहिले. त्यांच्या चेहऱ्यावर मंद स्मित उमटले.
“प्रश्न विचारणे ही चांगली गोष्ट आहे, बालका. पण शिष्य होण्याची विनंती तुझ्या वडिलांनी माझ्याकडे करायला हवी होती.”
सत्यकाम काही क्षण शांत राहिला.
“माझे वडील नाहीत, आचार्य.”
ऋषी पुन्हा म्हणाले,
“मग तू घरी जा. आपल्या आईला विचार. आपल्या वडिलांचे नाव काय, तुझे कुल कोणते आणि गोत्र कोणते. ही माहिती घेऊन परत ये. कारण माझा शिष्य होण्यासाठी कुल आणि गोत्राची माहिती आवश्यक आहे.”
सत्यकामाच्या चेहऱ्यावर मात्र निराशा नव्हती. तो नमस्कार करून घरी परतला.
घरी पोहोचताच त्याने आईला विचारले,
“आई, माझ्या वडिलांचे नाव काय? आपले कुल कोणते? माझे गोत्र कोणते?”
आईने आश्चर्याने त्याच्याकडे पाहिले.
“अचानक तुला हे का जाणून घ्यायचे आहे?”
सत्यकामाने गौतम ऋषींशी झालेला सारा संवाद तिला सांगितला.
“आई, गौतम ऋषी मला शिष्य करून घेऊ शकतील. पण त्यासाठी मला माझ्या वडिलांचे नाव, कुल आणि गोत्र सांगावे लागेल.”
त्याची आई काही काळ शांत राहिली. तिच्या डोळ्यांसमोर तिच्या आयुष्याचा सारा प्रवास उभाराहिला.
ती म्हणाली, “सत्यकाम, मला तुझ्या वडिलांचे नाव माहीत नाही. मी तरुणपणी अनेक लोकांची सेवाकेली. त्या काळात तुझा पिता कोण होता, हे मला निश्चितपणे सांगता येणार नाही.” ती क्षणभर थांबली आणि म्हणाली,
“पण तू तुझ्या आचार्यांना खरे तेच सांग. त्यांना सांग — ‘मी जाबाला यांचा पुत्र आहे आणि माझे नाव सत्यकाम जाबाल आहे.’”
सत्यकामाने आईचे शब्द मनात कोरूनघेतले. दुसऱ्याच दिवशी तो गौतम ऋषींच्या आश्रमात पोहोचला.
ऋषींनीविचारले, “मग? तुझ्या वडिलांचे नाव आणि गोत्र कळले?”
सत्यकामाने शांतपणे उत्तर दिले, “आचार्य, माझ्या आईने सांगितले की, तिच्या तरुणपणी तिने अनेक लोकांची सेवा केली. त्यामुळे माझे वडील कोण, माझे कुल कोणते किंवा गोत्र कोणते हे तिला माहीत नाही. तिने मला एवढेच सांगितले की, मी जाबाला यांचा पुत्र आहे आणि माझे नाव सत्यकाम जाबाल आहे.”
गौतमऋषी काही क्षण त्याबालकाकडे पाहत राहिले. त्यांच्याडोळ्यांत समाधान होते.
नैतदब्राह्मणोविवक्तुमर्हति । नानृतमवादीः । समिधं सोम्य आहर । उप त्वानेष्ये । न सत्यादगाः ॥
“अशा प्रकारे सत्य बोलण्याचे धैर्य ज्या बालकात आहे, तो ब्राह्मण स्वभावाचाआहे,” ऋषी म्हणाले. “तू असत्य बोलला नाहीस. समिधा घेऊन ये. मी तुला माझा शिष्य म्हणून स्वीकारतो. कारण तू सत्यापासून दूर गेला नाहीस.”
त्या दिवसापासून सत्यकाम आश्रमात राहू लागला.
तो गुरुसेवा करी, आश्रमातील कामे करी, इतर शिष्यांसोबत अध्ययन करी आणि आपल्या मनात उठणारे प्रश्न गुरुंना विचारी.
एक दिवस गौतम ऋषींनी त्याला एक वेगळेच काम दिले. आश्रमाच्या गोशाळेत चारशे कृश गायी उभ्या होत्या. गौतम ऋषींनी सत्यकामाला सांगितले, “या चारशे गायी घेऊन वनात जा.”
सत्यकामाने आनंदाने गायींची दोरी हातात घेतली. “आचार्य, मी त्यांची सेवा करीन.”
ऋषीम्हणाले, “पण एक अटआहे. जोपर्यंत या चारशे गायींची संख्या एक हजार होत नाही, तोपर्यंत तू आश्रमात परत येऊ नकोस.”
सत्यकामाने क्षणभरही विचार केला नाही. “आज्ञा, आचार्य.”
तो चारशे गायी घेऊन वनाच्या दिशेने निघाला.
दाट जंगलात त्याने गायींसाठी सुरक्षित जागा शोधली. सकाळी त्यांना चरण्यासाठी घेऊन जाई, दुपारी सावलीत बसवी, आजारी गायांची काळजी घेई आणि रात्री त्यांना कळपात सुरक्षित बसवत असे .
ऋतू बदलत गेले. पावसाळे आले आणि गेले. उन्हाळ्याच्या कडक उन्हात वनातील झाडांची पाने सुकली. हिवाळ्याच्या रात्री थंडीने अंग गोठत असे. परंतु सत्यकाम आपल्या गायींसोबत राहिला. हळूहळू त्या गायी त्याचे कुटुंबच बनल्या.
त्याला प्रत्येक गायीचा आवाज ओळखता येऊ लागला. कोणती गाय आजारी आहे, कोणती हरवली आहे, कोणत्या वासरालाआई सापडत नाही — हे त्याला सांगण्याची गरज पडत नसे.
वर्षे सरली. गायींची संख्या वाढत गेली. चारशे... पाचशे... सहाशे... सातशे... आठशे... नऊशे...
एक दिवस त्या कळपातील एक बलवान वृषभाने सत्यकामाकडे पाहिले. संध्याकाळचे सूर्यकिरण जंगलावर पसरले होते. गायी शांतपणे चरण्यात मग्न होत्या. सत्यकाम जवळच्या दगडावर बसला होता. अचानक तो वृषभ त्याच्याजवळ आला. तो काहीक्षण सत्यकामाकडे एकटक पाहत राहिला आणि जणू काही मानवी आवाजात म्हणाला,
“सत्यकाम!”
सत्यकाम दचकला.
त्यानेआजूबाजूला पाहिले, कोणीही नव्हते, वृषभ पुन्हा म्हणाला, “सत्यकाम, आता आमची संख्या एक हजार झाली आहे. आता तू आम्हाला गुरुकुलाकडे घेऊन जाऊ शकतोस.”
सत्यकामाच्या डोळ्यांत आश्चर्य दाटले. “तू बोलतोस?”
वृषभशांतपणे उभा राहिला. “मी तुला ब्रह्माचे एक पद सांगतो.
प्राचीदिक् कला, प्रतीची दिक् कला, दक्षिणा दिक् कला, उदीची दिक् कला ।
एष वै सोम्य चतुष्कलः पादो ब्रह्मणः प्रकाशवान् नाम ॥
पूर्व, पश्चिम, दक्षिण आणि उत्तर याचार दिशा ब्रह्माच्या एकाचतुष्कल पादासारख्या आहेत. त्याला प्रकाशवान् असे म्हणतात. पूर्व, पश्चिम, उत्तर आणि दक्षिण — याचार दिशा त्याचे चारअंश आहेत. जे सर्व दिशांना व्यापून राहते, त्या विराट अस्तित्वाचा विचार कर.”
सत्यकाम शांतपणे ऐकत राहिला. वृषभाचा आवाज पुन्हा आला,
“आता आम्हाला घेऊन आपल्या गुरूकडे जा.”
दुसऱ्या दिवशी पहाटे सत्यकामाने एक हजार गायींचा कळप गोळा केला आणिआश्रमाच्या दिशेने प्रवास सुरू केला. परंतु त्याचा प्रवास अजून संपलेला नव्हता.
त्या संध्याकाळी सत्यकामाने एका मोकळ्या जागी मुक्काम केला. गायी एका बाजूला शांतपणे विसावल्या. सत्यकामाने लाकडे जमा केली आणि अग्नी प्रज्वलित केला. रात्र गडद होत गेली. आकाशात असंख्य तारे चमकत होते. अग्नीच्या ज्वाळा वर उसळत होत्या. सत्यकाम अग्नी समोर शांतपणे बसला होता.
अचानक अग्नीच्या ज्वाळांमधून एक आवाज ऐकूआला. “सत्यकाम!”
तो सावध झाला. “कोण?”
ज्वाळाअधिक तेजस्वी झाल्या. “मी अग्नी. वृषभाने तुला ब्रह्माचा एक अंश सांगितला. आता मी तुला दुसराअंश सांगतो.”
सत्यकामाने हात जोडले. अग्नी म्हणाला,
पृथिवीकला, अन्तरिक्षं कला, द्यौः कला, समुद्रः कला ।
एष वै सोम्य चतुष्कलः पादो ब्रह्मणोऽनन्तवान् नाम ॥
पृथ्वी, अंतरिक्ष, द्युलोक आणि समुद्र या चार व्यापक तत्त्वांतून ब्रह्माच्या अनंत स्वरूपाची कल्पना करता येते.
त्याला अनन्तवान् म्हणतात.
“पृथ्वी, अंतरिक्ष, द्युलोक आणि समुद्र या सर्वांमध्ये जे एक तत्त्व व्यापून आहे, त्याचा विचार कर. पृथ्वीवर तू स्थिरता पाहतोस, अंतरिक्षात विस्तार, आकाशात उंची आणि समुद्रात अथांगता. या सर्वांच्या पलीकडेआणि या सर्वांमध्ये जे एक आहे, त्याचा शोध घे.”
सत्यकाम अग्नीच्या ज्वाळांकडे पाहत राहिला. ज्वाळा हळूहळू शांत झाल्या. रात्र पुढे सरकत गेली.
दुसऱ्या दिवशी पहाटे सत्यकामाने गायींना पुढे नेले, काही अंतर गेल्यावर एका विस्तीर्ण जलाशयाजवळ तो थांबला. जलाशयावर सकाळचे सूर्य किरण पडले होते. पाण्यावर एक शुभ्र हंस अलगद तरंगतहोता. सत्यकाम त्या दृश्याकडे पाहत राहिला. अचानक तो हंस पाण्यावरून उडाला आणि त्याच्या जवळ येऊन बसला.
“सत्यकाम!”
सत्यकामानेआश्चर्याने त्याच्याकडे पाहिले. “तू ही मला बोलावतोस?”
हंस म्हणाला, “तुला ब्रह्मविद्येचा तिसरा अंश सांगण्यासाठी आलो आहे.”
सत्यकाम शांत झाला. हंसम्हणाला,
अग्निःकला, सूर्यः कला, चन्द्रमा कला, विद्युत् कला ।
एष वै सोम्य चतुष्कलः पादो ब्रह्मणः ज्योतिष्मान् नाम ॥
अग्नी, सूर्य, चंद्र आणि विद्युत्—या सर्वां मध्ये प्रकाश आहे. त्या प्रकाशातून ब्रह्माच्या ज्योतिष्मान्, म्हणजे प्रकाशमय स्वरूपाची अनुभूती घ्यावी.
“सूर्य, चंद्र, विद्युल्लता आणि अग्नी या सर्वांमध्ये जे तेजस्वी तत्त्वआहे, त्याचा विचार कर. सूर्याचा प्रकाश, चंद्राची शीतलता, विजेची चमक आणि अग्नीचे तेज त्यांच्या मध्ये वेगवेगळे पणा दिसतो; पण त्यांना प्रकाशित करणारे तत्त्व एकच आहे.”
सत्यकामाने आकाशाकडे पाहिले. पूर्व क्षितिजावर सूर्य उगवत होता. हंसआकाशात झेपावला आणि काही क्षणांतच दूर अदृश्य झाला.
त्या दिवशी संध्याकाळी सत्यकाम पुन्हा एका जलाशया जवळ थांबला.
रात्र झाली. गायी झोपी गेल्या. सत्यकाम मात्र जागाच होता. वृषभ अग्नी आणि हंस यांच्याशी झालेल्या संवादाचे तो चिंतन करत होता.
पाण्याच्या पृष्ठभागावर अधूनमधून लहरी उठत होत्या. पहाटेच्या वेळी पाण्यात डुबकी मारणारा एक पक्षी त्याच्या नजरेस पडला. तो पक्षी पुन्हा पुन्हा पाण्यात बुडी मारी आणि क्षणभराने वर येई. अचानक तो सत्यकामा जवळ येऊन बसला.
“सत्यकाम!” पक्षी म्हणाला, “मी तुला ब्रह्मविद्येचा चौथा अंश सांगण्यासाठी आलो आहे.”
सत्यकाम एकाग्र झाला. पक्षी म्हणाला,
प्राणःकला, चक्षुः कला, श्रोत्रं कला, मनः कला ।
एष वै सोम्य चतुष्कलः पादो ब्रह्मणः आयतनवान् नाम ॥
प्राण, दृष्टी, श्रवण आणि मन ही सर्व आपल्या अनुभवाची साधने आहेत. त्यांच्या मागे असलेल्या चेतनेला आयतनवान्, म्हणजे सर्व अनुभवांचे आश्रयस्थान, असे म्हणतात.
“प्राण, नेत्र, श्रोत्र आणि मन — या सर्वांचा आधार असलेल्या त्या तत्त्वाचा शोध घे. ज्या मुळे प्राण चालतो, डोळे पाहतात, कान ऐकतात आणि मन विचार करते, त्या अंतःस्थित तत्त्वाकडे वळ.”
सत्यकाम बराच वेळ निःशब्द बसूनराहिला, त्याच्या मनात बालपणा पासून घोंघावणारे प्रश्न पुन्हा जागे झाले.
मीकोण?.....ज्याने पाहिले तो कोण?.....ज्याने ऐकले तो कोण?....ज्याने विचार केला तो कोण?...ज्यामुळे हे सारे घडते, ते काय आहे?....
पूर्व क्षितिजावर पुन्हा प्रकाश उमटू लागला, चारशे गायी आता एक हजार झाल्या होत्या.
वृषभाने त्याला ब्रह्माचा एक अंश सांगितला होता, अग्नीने दुसरा, हंसाने तिसरा, आणि त्या जलपक्ष्याने चौथा.
सत्यकामाच्या अंतःकरणात जणू एक नवा प्रकाश जन्माला आला होता. तो हजार गायींचा कळप घेऊन आपल्या गुरूंच्या आश्रमाच्या दिशेने निघाला.
सत्यकाम आश्रमाच्या जवळ पोहोचला, गौतमऋषी आश्रमाबाहेर उभे होते, दूरवरूनच त्यांना एक हजार गायींचा प्रचंड कळप दिसला, पण त्या कळपापेक्षा त्यांचे लक्ष एका दुसऱ्याच गोष्टीकडे गेले.
सत्यकामाच्या चेहऱ्यावर विलक्षण शांतता होती. त्याच्या डोळ्यांत एक वेगळे तेज होते.
वनात अनेक वर्षे राहून, निसर्गाच्या सहवासात राहून, गायींची सेवा करून आणि वृषभ, अग्नी, हंस व जलपक्ष्याकडून ब्रह्मविद्येचे अंश ऐकून त्याच्या अंतःकरणात काहीतरी बदलले होते.
सत्यकाम गुरूंच्या चरणांजवळ जाऊन नतमस्तक झाला. गौतम ऋषींनी त्याच्या मस्तकावर हात ठेवला.
“सत्यकाम,” ते म्हणाले, “तू परत आलास.”
सत्यकामाने नम्रपणे उत्तर दिले, “होय, आचार्य.”
गौतमऋषींनी त्याच्याकडे पाहिले आणि मंद स्मित केले.
“तुझ्या मुखावर मला ब्रह्मविद्येचे तेज दिसत आहे. तरीही, ज्या ज्ञानासाठी तू माझ्याकडे आलास, ते ज्ञान मी तुला आता स्वतः सांगतो.”
आणि त्या दिवशी गौतम ऋषींनी सत्यकामालाआपल्या समीप बसवून ब्रह्मविद्येचा अंतिम बोध दिला.
चारशे गायी घेऊन वनात गेलेला तो बालक, जेव्हा एक हजार गायींसहआश्रमात परतला, तेव्हा तो केवळ गुरूचीआज्ञा पूर्ण करून परतलेला शिष्य नव्हता.
तो सत्यकाम जाबाल म्हणून ब्रह्मविद्येचा अधिकारी झालेला साधक होता.
पैजारबुवा,
मिसळपाव
प्रतिक्रिया