Skip to main content

नचिकेत — मृत्यूच्या दारातून अमरत्वाच्या ज्ञानाकडे

लेखक ज्ञानोबाचे पैजार यांनी सोमवार, 14/09/2026 08:19 या दिवशी प्रकाशित केले.

विचार करून सांगा की... एखाद्या बापाने रागाच्या भरात आपल्या सात वर्षांच्या  मुलाला मृत्यूच्या स्वाधीन केले, तर काय होईल? तो मुलगा घाबरेल? रडेल? वडिलांकडे दयेची याचना करेल? 

एखाद्या सर्वसाधारण मुलाने हेच केले असते. पण ऋषी वाजश्रवा यांचा पुत्र नचिकेत जरा वेगळा होता, तो सात वर्षांचा बालक जिवंतपणीच यमलोकाच्या दाराशी पोहोचला आणि मृत्यूदेव यमराजांच्या दरवाज्यात  तीन दिवस आणि तीन रात्री निश्चयाने  उभा राहिला.  का? कशासाठी ? त्याने यमराजांकडे काय मागितले?

त्याला जाणून घ्यायचे होते, “मृत्यूचे रहस्य.”

जे सत्य जाणून घ्यायला कोणताही मनुष्य बिचकतो,  त्याच सत्याचा शोध या बालकाने घेतला.

मृत्यूनंतरसर्व काही संपते का? की हा हाडामांसाचा देह नष्ट झाल्यानंतरही काहीतरी असे उरते, जे कधीच नष्ट होत नाही?

ही केवळ एका पित्याच्याक्रोधाची किंवा एखाद्या चमत्काराची कथा नाही. ही कथा आहे—

अशा ज्ञानाची, जे मनुष्याला मृत्यूच्या भीतीतून मुक्त करते.

ही कथा आहे कठोपनिषदातील अमर बालकाची —नचिकेताची.

 

या कथेची सुरुवात होते प्राचीन काळातील एका भव्य आश्रमातून. महर्षीवाजश्रवा मोठा यज्ञ करीतहोते. या यज्ञाचे नाव होते विश्वजितयज्ञ. स्वर्गप्राप्ती आणि महान पुण्य मिळविण्यासाठी हा यज्ञ केला जात होता. त्यामुळे अर्थातच विश्वजित यज्ञ काही साधा सोपा यज्ञ नव्हता. त्याचे नियम अतिशय कठोर होते. पूर्णाहुतीच्या वेळी  यजमानाला आपली सर्व संपत्ती, धन आणि आपल्या प्रिय वस्तू दान कराव्या लागत. अर्थातच, हा काही केवळ संपत्ती वाटून टाकायचा विधी नव्हता. त्यामागे होता त्यागाचा संकल्प. जोपर्यंत मनुष्य आपल्या आसक्तीचा त्याग करत नाही, तो पर्यंत त्याच्या दानाला पूर्णता कशी येणार?

महर्षी वाजश्रवांनी यज्ञ सुरू केला. दानविधी सुरू झाला. पण... त्याच वेळी त्यांच्या अंतःकरणातील एक जुना शत्रू हळूहळू जागा झाला  “मोह”

महर्षींकडे असंख्य गायी होत्या. त्या काळात गोदान  हे अत्यंत पवित्र आणि श्रेष्ठ दान मानले जात असे. पण आपल्या चांगल्या, निरोगी आणि दुभत्या गायी देण्याऐवजी महर्षींनी भाकड गाई दानात देण्यास सुरुवात केली ज्यांच्याकडून आता दूध मिळण्याची काहीही शक्यता नव्हती.

यज्ञमंडपात बसलेला लहानगा नचिकेत हे सर्व पाहत होता. वय लहान होते, पण बुद्धी अत्यंत तीक्ष्ण होती आणि सर्वात महत्वाचे म्हणजे त्याचे अंतःकरण निर्मळ होते.

त्याला जाणवले, “दानाच्या नावाखाली जर निरुपयोगी वस्तू दिल्या, तर तर तो काही खरा  त्याग नाही.”

पित्याची ही लबाडी त्याला सहन झाली नाही. तो उठला. आणि पित्याजवळ गेला. आणि भर यज्ञ मंडपातत्याने  विचारले  "तात ... विश्वजित यज्ञाततर ल्या सर्व  प्रिय गोष्टी दान करायच्या आसतात ना?  मी पण आपल्याला अत्यंत प्रिय आहे मग आपण मला, मला कोणाला दान करणार?”

वाजश्रवांनी त्याच्याकडे दुर्लक्ष केले. नचिकेतापुन्हा म्हणाला “आपली संपत्ती, आपले सर्वस्व यामध्ये मी ही येतो ना? मग सांगा, आपण मला कोणाला दान करणार?”  वडील काही बोलत नाही हे पाहून पित्याला चुकीच्या मार्गावर जाण्यापासून थांबवावे, या भावनेने नचिकेत पुन्हा म्हणाला, “तात सांगा ना, मला कोणाला दान करणार?”

आता मात्र वाजश्रवा चिडले त्यांचा संयम सुटला आणि क्रोधाच्या भरात त्यांच्या तोंडून शब्द बाहेर पडले 

“मी तुला मृत्यूला दान देतो!  जा—तुला यमराजांच्या स्वाधीन करतो!” 

क्षणभर सगळीकडे शांतता पसरली. एका पित्याने क्रोधाच्या भरात आपल्या जिवंत मुलाला मृत्यूच्या हवाली केले होते.

नचिकेताने पितृआज्ञा शिरसावंद्य मानली.  त्याच्या मनात एकचु विचार होता “हा देह नश्वर आहे.” माणसाचे शरीर शेतातील पिकासारखे आहे. ते उगवते, वाढते, पिकते, कापले जाते, मातीत मिसळते, आणि पुन्हा नव्याने जन्माला येते. म्हणून नश्वर शरीरासाठी सत्याचा त्याग का करावा?  या विचाराने तो जिवंतपणीच यमलोकाच्या दिशेने निघाला.

मृत्यूच्या मार्गाची कल्पना केली तरी सामान्य मनुष्याचा थरकाप उडेल. पण नचिकेताच्या मनात किंचितही भीती नव्हती. कारण त्याचे अंतःकरण सत्याच्या शोधासाठी व्याकूुळ झाले होते, 

प्रदीर्घ आणि खडतर प्रवासानंतर तो यमराजांच्या द्वाराशी पोहोचला. पण यमराज तेथे नव्हते. मृत्यूदेव काही  कार्यासाठी बाहेर गेले होते. द्वारपालांनी त्या जिवंत बालकाला आत प्रवेश दिला नाही.  लहानगा नचिकेत काय करणार? पण तो परत फिरला नाही , त्या दाराशीच तो बसून राहिला.

एक दिवस गेला, दुसरा दिवस गेला, तिसरा दिवसही गेला.

तीन दिवस आणि तीन रात्री तो अन्न-पाण्याविना यमराजांची प्रतीक्षा करीत राहिला.

अखेर तीन दिवसांनी यमराज परतले, त्यांच्या सेवकांनी त्यांना सांगितले, “धर्मराज, आपल्या दाराशी एक बालक तीन  दिवसांपासून  अन्नपाण्याविना  आपली  प्रतीक्षा  करत  बसला आहे.”

परंपरेनुसार अतिथीला देवतुल्य मानले जाते.  तो उपाशी परतला तर तो गंभीर अधर्म मानले जाई. यमराज धर्मवान होते, त्यांना आपल्या चूकिचीी जाणिीव झाली आणि ते स्वतः नचिकेताजवळ गेले आणि म्हणाले

“हे बालका , माझ्या अनुपस्थितीत तू तीन रात्री माझ्या दाराशी अन्न-पाण्याविना राहिलास. माझ्याकडून अपराध झाला. त्याचे प्रायश्चित  म्हणूनतू कोणतेही तीन वर माग. तुझ्या वरांची पूर्तता करण्यास मी  वचनबद्धआहे”

नचिकेताने थोडा विचार केला आणि म्हणाला, “माझे वडील  माझ्यावर  रागावले  आहेत.  त्यांचा क्रोध  आणि  पश्चात्ताप  दूर  होऊ दे.  मी  परत  गेल्यावर  त्यांनी  मला  ओळखावे आणि प्रेमाने मला जवळ घ्यावे.”

यमराज प्रसन्न झाले, ते म्हणाले “तथास्तु!  तुझा पिता तुला पाहताच त्याचा राग विसरेल, त्याचे मन शांत होईल आणि तो तुला प्रेमाने स्वीकारेल.”

बारकाईने विचार केला तर असे लक्षात येईल की नचिकेताने आपल्या पहिल्या इच्छेत स्वतःसाठी काही मागितले नव्हते. त्याने मागितले होते पित्याचे समाधान.

मग  नचिकेताने दुसरा वर मागितला  “हे यमदेवा, स्वर्गात  भूक नाही,  तहान नाही,  वृद्धत्व नाही  आणि  मृत्यूचे  भयही नाही,  असे  मी ऐकले आहे.  त्या स्वर्गप्राप्तीचा  मार्ग  दाखविणाऱ्या अग्निविद्येचे ज्ञान मला द्या.”

उत्तरादाखल यमराजांनी नचिकेताला केवळ एक यज्ञ करण्याची पद्धत सांगितली नाही.  तर त्यांनी स्वर्गप्राप्तीचा मार्ग दाखविणाऱ्या अग्नीचे तत्त्वज्ञान शिकवले,  वेदीची रचना, इष्टकांचा प्रकार, संख्या आणि मांडणी यांसह त्या यज्ञामागील आध्यात्मिक अर्थही स्पष्ट केला. नचिकेताने ते सर्व एकाग्रतेने आत्मसात करून यमराजांना जसेच्या तसे सांगितले. त्याच्या या विलक्षण ग्रहणशक्तीने प्रसन्न होऊन यमराजांनी त्या अग्नीला ‘नचिकेताग्नी’ हे नाव दिले.

दोनवर पूर्ण झाले होते, पित्याचा राग शांत होणार होता, स्वर्ग मार्गाचे ज्ञानही मिळाले होते, आता तिसरा वर बाकी होता ,आणि तोच सर्वांत मोठा होता.

यमराजम्हणाले, “नचिकेता, आता तुझा तिसरा आणि अंतिम वर माग.” नचिकेताने थेट मृत्यूदेवांच्या डोळ्यांतपाहिले आणि तो म्हणाला,  “हे मृत्युदेव,  मनुष्याच्या  मृत्यूनंतर काय होते, याबद्दल मोठा संशय आहे. काही म्हणतात की आत्मा मृत्यूनंतरही अस्तित्वात राहतो. काही म्हणतात की शरीर नष्ट झाले की सर्व काही संपते.  आपण  महाज्ञानी  आहात  आपण कृपया  हे स्पष्ट करून सांगावे  की मृत्यूनंतर काय उरते?  आत्म्याचे  खरे  स्वरूप  काय  आहे?  मला  या  रहस्याचे  ज्ञान द्या.  हाच माझा तिसरा वर आहे. ”

यमलोकात संपूर्ण शांतता पसरली, यमराजांना ठाऊक होते की हा काही साधा प्रश्न नव्हता, हे अत्यंत सूक्ष्म ज्ञान होते. ते म्हणाले, “बाळ नचिकेत, हा  विषय  अत्यंत  गूढ  आहे.  देवतांनाही याचा शोध घेणे कठीण गेले आहे. त्या ऐवजी तू दुसरा कोणताही वर माग.” पण नचिकेत अढळहोता.

“जे ज्ञान अत्यंत दुर्लभ आहे, ते आपण जाणता. मग आपल्यापेक्षा श्रेष्ठ गुरु मला कोण मिळणार? आपण कृपया मला याचेच ज्ञान द्यावे या व्यतिरिक्त मला दुसरे काहीही नको”

हे ऐकल्यावर आता यमराजांनी त्याची परीक्षा घेण्याचे ठरवले, त्यांनी नचिकेतासमोर जगातील सर्व प्रकारचे ऐश्वर्य ठेवले.  ते म्हणाले  दीर्घायुष्य, पुत्रपौत्र,  असंख्य  गायी,  घोडे,  हत्ती  आणि  संपत्ती माग, संपूर्ण पृथ्वीचे राज्य माग, तुला हवे तितके आयुष्य माग.” आणि पुढे  म्हणाले  “देवतांनाही दुर्लभ असणाऱ्या अप्सरा,  दिव्य रथ  आणि वाद्ये मी तुला देईन. जगातील सर्व दुर्मिळ  सुखे माग. पण बाळा मृत्यूनंतर काय होते, हे मात्र विचारू नकोस.”

सात वर्षांचा नचिकेत शांतपणे यमराजांचे ऐकत होता. त्याला या संपत्तीचे जराही आकर्षण वाटले नाही.  तो म्हणाला, “हे धर्मराज, हे  सर्व  सुख  क्षणभंगुर  आहे.  आज  आहे,  उद्या  नाही.  इंद्रियांचे सामर्थ्यही काळानुसार क्षीण होते. आणि जेव्हा मृत्यू तुमच्यासमोर उभा आहे, तेव्हा दीर्घायुष्याचा अर्थ तरी काय? आपले रथ,  अप्सरा आणि संपत्ती आपणास  लखलाभ, मला नश्वर संपत्ती नको, मला त्या सत्याचे ज्ञान हवे आहे, ज्याचा शोध मोठ मोठे ज्ञानी घेत आले आहेत.”

यमराजांच्या चेहऱ्यावर समाधानाचे स्मित उमटले. त्यांच्या लक्षात आले, हा बालक खऱ्या ज्ञानाचा अधिकारी आहे. यमराज प्रसन्न चित्ताने म्हणाले 

श्रेयश्च प्रेयश्च मनुष्यमेतः
तौ सम्परीत्य विविनक्ति धीरः ।
श्रेयो हि धीरः अभि प्रेयसो वृणीते
प्रेयो मन्दो योगक्षेमात् वृणीते ॥

 ( अर्थ मनुष्यापुढे दोन पर्याय असतात प्रेय आणि श्रेय, प्रेय म्हणजे जे त्वरित सुखद वाटते जसे की धन, भोग, सत्ता, इंद्रिय सुख इत्यादी आणि श्रेय म्हणजे जे खरे कल्याण करणारे असे ज्ञान म्हणजेच सत्य, आत्मशोध. बहुसंख्य लोक प्रेयाची निवड करतात, कारण ती  निवड करणे अत्यंत सोपे आहे. पण खरा विवेकी, ज्ञानी मनुष्य मात्र श्रेयाची निवड करतो.

नचिकेताने ही प्रेय नाकारून श्रेय स्वीकारले होते.

आता यमराजांनी नचिकेताला आत्मविद्या सांगण्यास सुरुवात केली. ते म्हणाले—

न जायते म्रियते वा विपश्चित्
नायं कुतश्चिन्न बभूव कश्चित्।
अजो नित्यः शाश्वतोऽयं पुराणो
न हन्यते हन्यमाने शरीरे॥

विपश्चित अर्थात आत्मा कधी जन्म घेत नाही आणि कधी मरतहीनाही. तो कुठल्याही कारणा पासून उत्पन्न झालेला नाही आणि त्याच्या पासून दुसरे काही निर्माण झालेले नाही

यमराज नचिकेताला सांगतात की मनुष्य ज्याला "मी"  समजतो ते शरीर नसून तो आत्मा आहे. शरीर बदलते, वृद्ध होते आणि नष्ट होते; परंतु आत्मा नित्य आहे, शाश्वत आहे ,  ते असे सत्य आहे जे कधीही बदलत नाही. शरीर नश्वर आहे, पण आत्मा अमर आहे.  म्हणून मृत्यू हा आत्म्याचा अंत नसून केवळ शरीराचा अंत आहे. जसे मनुष्य जुने कपडे सोडून नवे कपडे परिधान करतो, तसे आत्मा जुने शरीर सोडून नवीन शरीर धारण करतो. आत्मा कधी जन्मत नाही आणि कधी मरत नाही; तो सदैव आहे.

आत्मतत्त्व अधिक स्पष्ट करण्यासाठी यमराजांनी नचिकेताला एक अद्भुत उदाहरण दिले.

ते म्हणाले “हे नचिकेता, या शरीराला एक रथ समज.” या रथाला जोडलेले घोडे म्हणजे पाच इंद्रिये, डोळे,  कान,  नाक,  जिव्हा,  त्वचा,  जे  सतत  बाह्य  विषयांकडे  धावत असतात. या घोड्यांचा लगाम म्हणजे मन, आणि त्या लगामाला योग्य दिशा देणारा सारथी म्हणजे बुद्धी, या सर्वांच्या  आत शांतपणे बसलेला रथाचा खरा स्वामी म्हणजे आत्मा.

जर मनावर बुद्धीचे नियंत्रण नसेल तर घोडे स्वैर धावतील, रथ चुकीच्या दिशेने जाईल, माणूस विषयांच्या मागे धावत राहील, पण बुद्धी जागृत असेल आणि मन नियंत्रणात असेल तर?  तर घोडे योग्य मार्गाने धावतील रथ योग्य दिशेने जाईल आणि मनुष्य आपल्या अंतिम ध्येयापर्यंत सहज पोहोचेल.

आपण अनेकदा स्वातंत्र्य म्हणजे “मला जे वाटेल ते मी करेन”  असे समजतो. पण यमराजांची शिकवण वेगळी आहे.  स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नव्हे,  जर प्रत्येक इच्छा  आपल्याला  जिथे घेऊन जाईल तिथे आपण जात राहिलो, तर आपण स्वतंत्र आहोत की इच्छांचे गुलाम?   खरे स्वातंत्र्य म्हणजे मन आणि  इंद्रियांवर  बुद्धीचे प्रभुत्व  आणि बुद्धीच्या  पलीकडे असलेल्या आत्म्याची ओळख.  जो मनाला जिंकतो,  तो स्वतःला जिंकतो, आणि जो स्वतःला  जिंकतो,  तो जन्म-मृत्यूच्या चक्रातून मुक्त  होतो.

यमराजांकडून मृत्यू आणि आत्म्याचे हे परमज्ञान प्राप्त करून नचिकेत पृथ्वीवर परतला. यमराजांनी दिलेल्या पहिल्या वरानुसार त्याचे वडील त्याची  वाट पाहत होते. नचिकेत आश्रमात परतला,  वाजश्रवांनी त्याला पाहिले,  त्यांचा क्रोध नाहीसा झालेला होता त्याची जागा आता पश्चातापाने घेतली होती, त्यांनी आपल्या मुलाला हृदयाशी कवटाळले,  ज्या मुलाला त्यांनी क्रोधाच्या भरात मृत्यूच्या हवाली केले होते, तोच मुलगा आता आत्मविद्येचा ज्ञाता बनून परतला होता.

नचिकेताला काय मिळाले? नचिकेताला सोनं चांदी धनदौलत मिळाली नाही, की कोणत्याही राज्याचे सम्राट पद मिळाले नाही, दीर्घायुष्य त्याचे ध्येय कधीच नव्हते.

त्याला मिळाले मृत्यूच्या पलीकडचे ज्ञान. त्याला समजले शरीर नश्वर आहे, आत्मा अमर आहे, इंद्रिये घोड्यांसारखी आहेत, मन लगाम आहे, बुद्धी सारथी आहे आणि आत्मा या संपूर्ण रथाचा स्वामी आहे.

नचिकेताच्याकथेला एक अमर संदेशलाभला आहे—

“उत्तिष्ठतजाग्रत प्राप्य वरान्निबोधत।”

अर्थ - “उठा! जागे व्हा! आणि श्रेष्ठ ज्ञान प्राप्त करून सत्याला जाणून घ्या.”

हा मंत्र माणसाला निष्क्रियतेतून कृतीकडे, अज्ञानातून ज्ञानाकडे आणि सामान्यतेतून श्रेष्ठत्वाकडे  नेणारा प्रेरणा मंत्र मानला जातो.

नचिकेत फक्त सात वर्षांचा होता, पण त्याने एक गोष्ट ओळखली होती जी अनेक सुजाण माणसांच्याही लक्षात येत नाही, नश्वर गोष्टींनी शाश्वत समाधान मिळत नाही.

त्याने यमराजांकडून संपत्ती मागितली नाही. भोग मागितले नाहीत, दीर्घायुष्य मागितलेनाही, त्याने मागितले “सत्य ” आणि म्हणूनच तो भारतीय ज्ञानपरंपरेत अमर झाला.

नचिकेत आपल्याला शिकवतो—

सत्यासाठीप्रश्न विचारा , सत्यासाठी मोहाचा त्याग करा, सत्यासाठी भीतीवर मात करा, आणि सर्वांत महत्त्वाचे, आपण शरीरापुरते मर्यादित नाही; आपल्या अस्तित्वात एक असे तत्त्व आहे जे जन्मत नाही आणि मरत नाही.

कठोपनिषदाची ही कथा हजारो वर्षांपासून मानवाला अज्ञानाच्या अंधारातून ज्ञानाच्या प्रकाशाकडे नेत आहे.

मृत्यूची भीती दूर करण्याचा मार्ग मृत्यू टाळण्यात नाही, तर मृत्यूचे खरे स्वरूप जाणून घेण्यात आहे आणि म्हणूनच नचिकेताची कथा आजही आपल्याला सांगतेआहे, 

उठा,  जागे व्हा,  प्रश्न विचारा,  सत्याचा शोध घ्या, आणि जोपर्यंत सत्य सापडत नाही तोपर्यंत थांबू नका.

ॐशान्तिः शान्तिः शान्तिः ॥

 

पैजारबुवा, 

लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 153
प्रतिक्रिया 6

प्रतिक्रिया

कृपा पैजारबुवा पुनश्च  लिहिते झाले.

बाप्पा आपल्याला असेच अनथक  लिहिण्याची बुद्धी देवो.

 

गणेशोत्सवा च्या हार्दिक शुभेच्छा.

 

लेख सवडीनुसार वाचून  प्रतिसाद देतो.


लेख आवडला. 

पण काही प्रश्न पडले---

सत्यासाठीप्रश्न विचारा , सत्यासाठी मोहाचा त्याग करा, सत्यासाठी भीतीवर मात करा, 

कोणते सत्य? कसला मोह? मोहाचा त्याग करायचा म्हणजे नक्की काय करायचे? कशापासून भीती? त्या भीतीवर कशी मात करायची?

 

तर घोडे योग्य मार्गाने धावतील रथ योग्य दिशेने जाईल आणि मनुष्य आपल्या अंतिम ध्येयापर्यंत सहज पोहोचेल.

योग्य मार्ग कोणता? कोणते अंतिम ध्येय?
 


 


अत्यंत रसाळ ओघवत्या शैलीत नचिकेताची गोष्ट! बुध्दानेही जगात दु:ख का आहे याचा शोध घेतला होता, फक्त या पृथ्वीवर. 


पैजारबुवा,

मस्त! दिवाळी अंकात शोभेलसा लेख आहे!

 

>> स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नव्हे,  जर प्रत्येक इच्छा  आपल्याला  जिथे घेऊन जाईल तिथे आपण जात राहिलो, तर आपण स्वतंत्र आहोत की इच्छांचे गुलाम?   खरे स्वातंत्र्य म्हणजे मन आणि  इंद्रियांवर  बुद्धीचे प्रभुत्व  आणि बुद्धीच्या  पलीकडे असलेल्या आत्म्याची ओळख.

 

त्रिवार वंदन!!

_/\_ _/\_ _/\_

 

फ्री वील वर लिहाण्याचा विचार करत होतो. त्यांचा हा बेसच झाला.

 

- (जागं होण्याचा प्रयत्नान असलेला) सोकाजी


उत्तम विवेचन

तत्वज्ञान  संबंधी 

प्रमुख अडचण अशी की how चा अभाव या थिअरी मध्ये नेहमी असतो.

दुसर म्हणजे कितीही सूुंदर  आदर्श आकर्षक भासले तरी निव्वळ कल्पना concrete नाही फार आढळत.

त्यामुळे  कर्मठ आदर्शवाद (dogmatic idealism), गूढवाद (mysticism) पेक्षा  materialistic जास्त जवळचे  वाटतात 

उदा what is deadand what is living in Indian philosophy या देवीप्रसाद यांच्या पुस्तकात ते लोकायत ,सांख्य आदी ना living असे म्हणतात ते यासाठी