✪ पुण्यातल्या मावळ, खेड आणि भोर तालुक्यातली गावं
✪ निर्मल ग्राम पडताळणी समिती सदस्य म्हणून फिल्ड वर्क
✪ गावातले पॉवर डायनॅमिक्स आणि महिला सहभाग
✪ लातूरमध्ये रिसर्चसाठी माहिती संकलन
✪ नांदेडमधल्या कावळगांवला भेट
✪ स्थावर- जंगम मालमत्ता आणि कुत्रा!
✪ परीक्षेच्या आधीची संध्याकाळ- अभ्यासाऐवजी "कोड बूक"
"कर्वे समाज सेवा संस्थेतले" दिवस! दुसर्या वर्षीचं फिल्ड वर्क खूप वेगळं होतं. ग्राम विकासावर काम करणार्या बजाज ग्रूपमधल्या एका संस्थेत मला पाठवलं गेलं. पुणे जिल्ह्यातल्या गावांमध्ये त्यांचं काम होतं. कर्वेनगरवरून बस बदलून आधी आकुर्डीला जायचो. तिथे संस्थेचं कार्यालय होतं. तिथे चर्चा झाल्यानंतर तळेगांव दाभाडेजवळच्या कान्हेवाडी तर्फे चाकण गावात जायचो. कधी कधी इंदुरी गावातून ७ किमी पायी जावं लागायचं. २००७ मध्ये ती गावं बरीच शांत होती. औद्योगिकीकरण इतकं आत गेलेलं नव्हतं. त्यामुळे पायपीट असली व जाताना वाहन मिळत नसलं तरी फिरताना छान वाटायचं. गावांचं गावपण तोपर्यंत शिल्लक होतं. सुरूवातीला मावळ आणि भोर व पुढे खेडमधली गावं बघायला मिळाली.
(इथे सगळे लेख एकत्र वाचता येतील. विज्ञान प्रयोग, गणितातील गमती, ट्रेकिंग, ध्यान, सायकलिंग, फिटनेसबद्दलचे लेख वाचता येतील.)
ह्या लेखाचा व्हिडिओ सारांश इथे बघता येईल.
फिल्ड वर्कमध्ये पहिल्या टप्प्यात निर्मल ग्राम योजनेसाठी संस्थेची पडताळणी समिती सदस्य म्हणून त्या समितीत मला काम दिलं गेलं. अनेक गावांमध्ये संस्था पडताळणीसाठी भेटी द्यायची. निर्मल ग्राम योजनेमध्ये काही निकष असायचे- संपूर्ण गावात स्वच्छता कशी आहे, वस्त्या- वाड्यांवर शौचालय आहे का, नाल्या बंदिस्त आहेत का इ. लोकांसोबत चर्चा असायची. त्यामध्ये शिकायला तर खूप मिळालंच पण मजासुद्धा खूप आली. संस्थेमधले मार्गदर्शक सर व इतर सहकारी ह्यांच्याशी मैत्री झाली. त्यांच्या कामाचे पैलू हळु हळु लक्षात आले. संस्थेची प्रोफाईल बनवता आली आणि संरचना समजून घेता आली. मार्गदर्शनाला नागमणी मॅडम होत्याच. त्यामुळे चर्चा छान व्हायच्या. त्यांचा भर होता की, कामाबरोबर गावांमधलं निरीक्षण, वेगवेगळे पॉवर डायनॅमिक्स, वेगवेगळे अप्रोचेस हेसुद्धा बघायला पाहिजेत. एखादं काम कसं उभं राहतं, महिला त्यात किती सहभागी असतात, असतात तरी का, अशा अनेक बाजूंनी ते समजून घेतलं पाहिजे. नागमणी मॅडम फिल्ड वर्क मार्गदर्शक असल्यामुळे ह्या गोष्टी छान शिकायला मिळाल्या. रिपोर्ट लिहीण्यातही फिल्ड वर्क इतकीच मजा येत होती. पावसाळ्याच्या दिवसात भोरजवळच्या आशिंपी, देवघर, निगूडसर अशा गावांमधल्या भेटी आणि भोरमधले मुक्काम विशेष लक्षात राहिले!
सोमवार- मंगळवार दोन दिवस फिल्ड वर्क असायचं. बाकी दिवस कॉलेज असायचं. रिसर्चचं लातूरमधलं माहिती संकलन (डेटा कलेक्शन) पूर्ण झालं. लातूरच्या सगळ्या प्रकारच्या प्रातिनिधिक वस्त्या घेऊन प्रश्नावल्या भरून घेतल्या. कचरा वेचकांच्या मुलाखती घेतल्या. इथून पुढे त्याचं टेब्युलेशन एका कोष्टकामध्ये सगळे प्रतिसाद आकड्यांमध्ये नोंदवणे आणि मग कोडबूक बनवणे अशा गोष्टी सुरू झाल्या. त्याच सुमारास माझा कर्वेचा मित्र कैलास यसगेचं त्याच्या मूळ गावातलं काम बघायला नांदेडच्या कावळगांवला जाऊन आलो. कर्वेतले असे अनेक विद्यार्थी होते ज्यांचं आधीपासूनच काम सुरू झालेलं होतं. कैलास व त्याचे मित्र शेतकर्यांचं संघटन व सक्षमीकरण करत होते. मित्रांनी मिळून चांगलं काम उभं केलेलं दिसलं.
कॉलेजमधले तास, मित्रांची सोबत आणि इतर असाईनमेंटसही सुरू राहिल्या. सगळेच मित्र- मैत्रिणी हळु हळु व्यस्त होत चालले होते. स्पेशलायजेशनच्या तुलनेत सगळ्या वर्गाचा एकत्रित वेळ कमी झाला होता. त्यामुळे इतर वेळेत त्या मित्र- मैत्रिणींची उणीव जाणवायची. वेगवेगळ्या ग्रूप असाईनमेंटससुद्धा सुरू होत्या. इतर मित्र- मैत्रिणींनी अभ्यासानंतर केलेल्या सादरीकरणातूनही शिकायला मिळायचं. मानसी व संग्रामने केलेलं असं एक सेरेब्रल पाल्सीवरचं प्रेझेंटेशन अजून आठवतं. वर्ष पुढे गेलं तसा सबमिशनचा ताण हळु हळु वाढत होता. परीक्षासुद्धा जवळ आली. पण ह्या सेमीस्टरला विषय कठिण असे वाटले नाहीत. सामाजिक विधी- सोशल लेजिस्लेशन पेपरमध्ये नागमणी मॅडम शिकवताना छान उदाहरणं द्यायच्या. कायद्याच्या दृष्टीने बांधलेला कुत्रा स्थावर मालमत्ता (immovable property) आहे तर तोच कुत्रा सोडला तर जंगम मालमत्ता (movable property) होतो!
फिल्ड वर्कमध्ये गावांमध्ये झालेलं जल संवर्धन, पाणलोट व्यवस्थापन, संलग्न समतल चर (CCTs), कोल्हापूर बंधारे अशी कामं बघायला मिळाली. फिल्ड वर्कच्या पूर्वार्धामध्ये अभ्यास, आकलन, पूर्व तयारी अशा गोष्टी होत्या व उत्तरार्धात एका विषयावर मायक्रो स्टडी व बचत गट स्थापन करण्यासारखी कामं होती. आमच्या स्पेशलायजेशनचा एक दिवसीय दौरा पोपटराव पवारांचं आदर्श गांव असलेल्या हिवरे बाजारलाही जाऊन आला होता. हिरवे बाजारच्या जवळचे डोंगर व दूरचे डोंगर ह्यातला फरक लगेचच जाणवत होता. ह्यावेळी विद्यार्थ्यांचे लाडके व कमी बोलणारे विशाल करूणा सर सोबत होते. महाराष्ट्र- कर्नाटक सीमेवरच्या कसगी गावातून ते कसे पुढे आले, अन्याय सहन करत आणि कष्ट घेत ते कसे शिकले हे त्यांनी एकदा सांगितलं होतं.
तिसर्या सेमिस्टरची परीक्षा! अवघड विषय कोणता वाटत नव्हता. एका पेपरच्या आदल्या दिवशी अभ्यासाची काही काळजी वाटत नसल्यामुळे मी मस्त कोडबूक पूर्ण करत होतो. प्रश्नावलीतल्या प्रत्येक प्रतिसाद प्रकारांना संकेत अंक दिले होते व त्यांचं कोष्टक बनवणं सुरू झालं होतं. प्रबंध सादर करण्याची डेडलाईन १५ फेब्रुवारी होती. त्याआधी बरेच टप्पे बाकी होते. कोष्टकं बनवून विश्लेषण करायचं होतं. त्यातली निरीक्षणं मांडायची होती. प्रकरणं लिहायची होती. वेळेची शर्यत सुरू झाली होती!
काही मित्र- मैत्रिणी चेन्नैला एका कॉन्फरन्ससाठी जाऊन आले. तो अनुभवसुद्धा अगदी वेगळा होता. दिवाळीच्या सुट्ट्यांनंतर राजस्थान स्टडी टूअर होता. त्याची सगळी तयारी विद्यार्थ्यांनी आणि फॅकल्टीने मिळून केली. पुणे- अहमदाबाद ट्रेनने आणि तिथून पुढे बसने असा प्रवास होता. खूप वेगवेगळ्या संस्थांना भेट द्यायला मिळणार होती.
पुढचा भाग: कर्वेतले दिवस ८: राजस्थानमधला अविस्मरणीय स्टडी टूअर
-निरंजन वेलणकर 09422108376. लिहीण्याचा दिनांक- 3 सप्टेंबर 2026.
मिसळपाव
प्रतिक्रिया