Skip to main content

शीर्षकहीन... (शीर्षक सुचवावे)

लेखक अनिशासूत यांनी बुधवार, 02/09/2026 14:08 या दिवशी प्रकाशित केले.

गेल्या वीकेंडला सहजच इंस्टाग्राम चाळत असताना एक रील पाहण्यात आली. एक रिक्षाचालक काका होते, हिंदी भाषिक असावे बहुतेक. त्यांनी आपल्या रिक्षामध्ये एक कागद चिकटवला होता, ज्यावर रोजच्या व्यवहारातील हिंदी वाक्यांना मराठीत कसं बोलायचं हे लिहून ठेवलं होतं. स्वतःच्या पोटापाण्यासाठी, महाराष्ट्रात राहून चार पैसे कमावण्यासाठी ते प्रामाणिकपणे इथली भाषा शिकण्याचा प्रयत्न करत होते. पण त्या रीलचं कॅप्शन होतं, "After all he has a family to raise as well..."

इथपर्यंत सगळं ठीक होतं; पण खरी कीव आली ती कमेंट सेक्शन वाचून. तिथे परप्रांतीयांनी आणि त्याहूनही भयानक म्हणजे त्यांचा पुळका असणाऱ्या तथाकथित 'कूल' मराठी भाषिकांनी अक्षरशः उच्छाद मांडला होता. महाराष्ट्र शासनाच्या भाषा धोरणावर तोंडसुख घेण्यापासून ते आपण किती 'सेक्युलर' आणि 'ब्रॉड-माइंडेड' आहोत याचं विकृत प्रदर्शन करण्यात सगळे मग्न होते. कोणी म्हणत होतं, "कशाला भाषेचा अट्टहास करता?", तर कोणी थेट छत्रपती शिवाजी महाराजांचा संदर्भ देऊन "महाराजांनी कधी भाषेची सक्ती केली नव्हती" असा अर्धवट ज्ञानाचा आव आणत होतं. स्वतःच्याच मातीत स्वतःच्या भाषेसाठी आक्रोश करावा लागतोय आणि स्वतःचेच लोक दुसऱ्यांच्या अरेरावीचं वकिलीपत्र घेऊन उभे आहेत, हे पाहून मनाला अतिशय तीव्र दुःख झालं.

सर्वात संतापजनक गोष्ट म्हणजे या उथळ पुरोगाम्यांचा ऐतिहासिक अज्ञानाचा माज. छत्रपती शिवाजी महाराजांना मध्ये ओढणाऱ्यांना हे ठाऊकही नाही की महाराजांनी परकीय, सुलतानशाही भाषेचा प्रशासनावरील विळखा मोडून काढण्यासाठी 'राज्यव्यवहार कोश' तयार करून घेतला होता. महाराजांची ती भाषिक आणि सांस्कृतिक दूरदृष्टी होती. केवळ किल्ले जिंकणं म्हणजे स्वराज्य नव्हतं, तर स्वतःची अस्मिता, स्वतःची भाषा आणि स्वाभिमान टिकवणं हे महाराजांचं ध्येय होतं. पण आजचे तथाकथित 'लिबरल' लोक महाराजांच्या नावाचा वापर स्वतःच्या लाचारीचं समर्थन करण्यासाठी करताना दिसतात.

त्याहून पुढे जाऊन जेव्हा हे लोक विचारतात, "महाराष्ट्राने काय वेगळं बलिदान दिलंय?", तेव्हा तळपायाची आग मस्तकात जाते. यांना विसर पडलाय की मुंबई ही महाराष्ट्राला ताटात वाढून मिळालेली नाही. तत्कालीन सत्ताधाऱ्यांनी जेव्हा मुंबईवर डोळा ठेवला होता, मोरारजी देसाईंसारखे लोक जेव्हा गर्वाने म्हणत होते की "सूर्य-चंद्र असेपर्यंत मुंबई महाराष्ट्राला मिळणार नाही", तेव्हा याच मुंबईच्या रस्त्यांवर १०६ हुतात्म्यांनी स्वतःचं रक्त सांडलं होतं. फ्लोरा फाऊंटनवर निशस्त्र मराठी माणसावर गोळ्या चालवल्या गेल्या होत्या. एवढंच नाही, तर मुंबई महाराष्ट्रात राहावी म्हणून गुजरातला नवीन राजधानी उभारण्यासाठी आणि महसूल तुटीसाठी महाराष्ट्राच्या तिजोरीतून ५० कोटींपेक्षा जास्त रक्कम मोजावी लागली होती. रक्त, घाम आणि हक्काचा पैसा देऊन ही मुंबई उभी राहिली आहे, कुणाच्या मेहेरबानीवर नाही.

इतर राज्यांत जाऊन बघा. तमिळनाडू, कर्नाटक, केरळ किंवा पश्चिम बंगालमध्ये कुणाची हिंमत आहे का तिथल्या भाषेला तुच्छ लेखण्याची? तिथे प्रत्येक परप्रांतीय अत्यंत आदराने स्थानिक भाषा शिकून घेतो. मग हा सगळा पुरोगामित्वाचा आणि सर्वसमावेशकतेचा ठेका एकट्या महाराष्ट्रानेच घेतला आहे का? इतकी वर्ष मायबाप मुंबईने सर्वांना पोटात घेतलं, आसरा दिला, भाकरी दिली; पण तरीही बाहेरून येऊन काही लोक जेव्हा "मुंबई काय मराठी माणसाच्या बापाची आहे का?" अशी उद्दाम भाषा वापरतात, तेव्हा या स्वतःला सुशिक्षित म्हणवणाऱ्या मराठी लोकांचं रक्त का खवळत नाही?

उदार असणं म्हणजे स्वतःची ओळख पुसून टाकणं नव्हे. त्या रिक्षाचालक काकांना किमान हे समजलं होतं की आपण ज्या मातीत कमावतो, तिथल्या भाषेचा आणि माणसांचा आदर केला पाहिजे. पण एसी रूममध्ये बसून इंस्टाग्रामवर ज्ञान पाजळणाऱ्या या उथळ पिढीला स्वतःच्याच मातीची लाज वाटते, ही खरी शोकांतिका आहे. स्वाभिमान बाळगणं म्हणजे संकुचितपणा नसतो; पण स्वतःच्या भाषेची विटंबना उघड्या डोळ्यांनी सहन करून दुसऱ्यांच्या अरेरावीला पाठीशी घालणं याला मात्र शुद्ध लाचार वृत्ती म्हणतात. ज्या दिवशी मराठी माणूस हा फरक समजून घेईल, त्याच दिवशी खऱ्या अर्थाने या मातीचा आणि हुतात्म्यांच्या बलिदानाचा आदर राखला जाईल.

**– अनिशासुत**

*(टीप: या लिखाणाला नेमकं कोणतं शीर्षक द्यावं हे सध्या तरी सुचलेलं नाही... प्रतिक्रिया देताना योग्य शीर्षक नक्की सुचवा.)*

 


वाचने 438
प्रतिक्रिया 20

प्रतिक्रिया

चांगलं लिहिलंय.  अस्तनीतले निखारे किंवा सहिष्णुतेचा दंभ मराठीस काळ किंवा मराठीस मरावेच लागेल  असे शीर्षक देता येईल.

 

मराठी माणसेच मराठी मारून हिंदी लादायचा अतोनात प्रयत्न करताहेत. मराठीस मरावेच लागेल, अन्यथा आपण सहिष्णु असल्याचे प्रशस्तीपत्र मिळणार नाही. 


In reply to by श्रीगुरुजी

दाद दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद, विशेषतः 'सहिष्णुतेचा दंभ' आणि 'मराठीस मरावेच लागेल' ही शीर्षकं थेट काळजाला भिडणारी आहेत!


मराठी भाषा अभ्यास केंद्र याबाबत चांगले काम करत आहे पण सरकारला मराठीला उत्तेजन द्यायचेच नाही असे दिसते. मुख्यमंत्रीही आपली अनेक निवेदने हिंदीत का करत असतात हे कळत नाही. यातून एक संदेश नक्की जातो. दोन मराठी लोकही हिंदी बोलताना पाहणे ही केवळ एक शिक्षा आहे.


In reply to by स्वधर्म

काय बोलणार स्वधर्म साहेब, जिथे कुंपणच शेत खायला टपलंय, तिथे भाषेच्या रक्षणाची अपेक्षा तरी कोणाकडून करायची?


असे धागे वाचले की काही प्रश्न पडतात.

कित्येक लोक आयटी किंवा तत्सम क्षेत्रात काम करत असताना नोकऱ्या बदलतात आणि चेन्नई, हैद्राबाद, बंगलोर, कलकत्ता, दिल्ली अशा ठिकठिकाणी बदल्या स्वीकारतात. यांना सी, मग सी प्लस प्लस, मग सी शार्प वगैरे भाषा, त्या जोडीला येणारे तंत्रज्ञानातले नवीन प्रवाह हे सारे आत्मसात करणे भाग असते. त्यात भर म्हणून प्रादेशिक भाषा शिकणे सोपे आहे का? त्यातल्या त्यात लिपी वेगळी असेल, तर ती भाषा शिकणे अत्यंत जिकीरीचे ठरू शकते.

समजा एखाद्या मराठी युवकाने पाच वर्षाच्या कालावधीत तीन टिकाणी (चेन्नई, हैद्राबाद आणि बंगलोर) नोकरी केली, आणि अनुक्रमे तमिळ, तेलगू आणि कन्नड शिकण्यात तो कमी पडला, तर प्रत्येक ठिकाणी त्याने मार खायचा का? 

भाषिक अस्मितेतून मारहाण करणे योग्य असेल, तर अन्य प्रांतियांना तो नैतिक अधिकार आपोआप मिळतो आणि त्यांनी तो बजावला तर अन्य प्रांतातल्या मराठी समाजाला त्याची झळ पोचू शकते ही बाजू अवश्य लक्षात घ्यायला हवी. माझ्या माहितीत दक्षिण भारतात वर्षानुवर्षे काम केलेले आणि हिंदीतून संवाद साधणारे/ स्थानिक भाषा न शिकलेले कित्येक आयटी व्यावसायिक आहेत. सुदैवाने कुणाला मारहाण झाल्याचे कानावर आलेले नाही. असो. 


In reply to by मूकवाचक

नवीन तंत्रज्ञान, संगणकाची नवीन भाषा, नवीन भ्रमणध्वनी वापरणे इ. शिकायची तयारी आहे, पण स्थानिक भाषा शिकण्यास कडाडून विरोध असे का? महाराष्ट्रात येऊन उर्मटपणे खेकसायचं हिंदीमे बोलो. कामाच्या ठिकाणी जर नवीन तंत्रज्ञान वापरून काम करायचे असेल तर ते शिकतात ना. का तेथेही खेकसणार जावाचं काम करेन, नवीन तंत्रज्ञान येत नाही.

 

मुळात परप्रांतियांनी अगदी साजूक, निर्भेळ मराठी बोलावी अशी कोणाचीही अपेक्षा नाही. एखाद्या परराज्यात स्थानिक भाषेतील  आठ दहा शब्द, ३-४ वाक्ये बोलली तरी स्थानिकांना बरे वाटते व ते प्रोत्साहन देतात. पण उर्मटपणे हिंदीमे बोलो, मराठी नही असे खेकसल्यावर प्रतिक्रिया येणारच. 

 

अनेक गुजराती, मारवाडी, शीख दुकानदार स्वतःहून स्थानिक भाषा शिकतात. मराठीचे हिंदीशी खूप साधर्म्य आहे. हिंदीभाषिकांना मराठी शिकणे अत्यंत कमी श्रमात, कमी वेळात शक्य आहे. परंतु अहंगंड, माजोरडेपणा, दुराग्रह, आडमुठेपणा दाखवित राहिले की दहा जणातला एखादा तरी फटके देणारच. 

 

बरं हे धोरण सर्व राज्यात, सर्व देशात वापरत असाल तर वेगळी गोष्ट आहे. परदेशात हिंदीचा आग्रह धरणार नाही, तामिळनाडू सारख्या राज्यात हिंदीचा आग्रह धरणार नाही, पण महाराष्ट्रात मात्र आपण यांच्यापेक्षा भारी असल्याचा आविर्भाव आणून उर्मटपणे हिंदीला चिकटून राहणार व माठी भाषेचा आणि मराठी लोकांचा अपमान करणार. मग आज ना उद्या तीव्र प्रतिक्रिया येणारच. 


In reply to by मूकवाचक

भाषा न आल्याबद्दल मारहाण करणे चूक आहे पण आम्ही स्थानिक भाषा शिकणारच नाही तुम्हाला काय हवं ते करा हा उद्दामपणा सुद्धा तितकाच चूक आहे.

आपण जेथे नोकरी साठी जातो तेथली भाषा शिकण्यासाठी प्रयत्न करणे यात चूक काय आहे त्यात आपला अहंगंड आणण्याची आवश्यकता नाही.

मी नौदलात असताना माझे पोस्टिंग मुंबईहून कोची ला होणार असे वाटत होते म्हणून मी रॅपिडेक्स चे पुस्तक आणून मल्याळी भाषा शिकायला सुरुवात केली त्याची लिपी शिकून मी ती वाचायलाही लागलो होतो.  

पण दुर्दैवाने माझे पोस्टिंग कोची ऐवजी विशाखापटणम येथे झाले ते सुद्धा तटरक्षक दलाच्या जहाजावर तेथे सुद्धा मी रॅपिडेक्स चे पुस्तक आणून तेलुगू भाषा शिकायला सुरुवात केली. त्या भाषेत ५६ अक्षरे असून चाळीस तरी अक्षरे  w ला इकडे तिकडे रफार लावून तयार होतात असे लक्षात आले. तेलगू लिपी हि मल्याळीपेक्षा जास्त किचकट आहे.  

पण भाषा थोडी फार शिकेपर्यँत एक वर्षातच माझे पोस्टिंग गोव्याला झाले. तेथे अर्थातच मला कोकणी समजत होतेच थोडे फार बोलायला सुद्धा सुरुवात केली होती. पण मग पोस्टिंग पुण्याला झाले          

हे सर्व माझी सरकारी नोकरी होती आणि मला सार्वजनिक संपर्क करण्याची अत्यावश्यकता नव्हती परंतु तेथे स्थायिक असणारे निवृत्त सैनिक किंवा त्यांच्या कुटुंबियांशी संपर्क साधणे सोपे जावे म्हणून माझा असा प्रयत्न होता. मी (लखनौ) जोधपूर ओखा अशा ठिकाणाबद्दल बोलत नाही  त्या भाषा( राजस्थानी आणि गुजराती) मला बयापैकी  समजत होत्याच आणि थोडे फार संवाद साधता येत असे.  

एवंच- मी स्थानिक भाषा बोलणारच नाही हा अहंगंड अन उद्दामपणा पण तितकाच चूक आहे.    


In reply to by मूकवाचक

महाराष्ट्रात हा प्रश्न फक्त हिंदी भाषिकांबाबत का निर्माण होतो असे का विचारत नाही? इतर प्रदेशात जे मराठी भाषीक जातात त्यंच्या बाबतीत हा प्रश्न कधीच का निर्माण होत नाही? याचा विचार केलाय का कधी?

हिंदी भाषीक लोक इथे येऊन त्यांचीच भाषा बोलायचा आग्रह धरतात. ते तमिळनाडूमधे असे करत नाहीत. कारण तिथले लोक हिंदी चालवून घेत नाहीत.

 एक दोन वर्षे नाही पण वीस वीस वर्षे पुण्यात किंवा मुंबई मधे राहूनही मराठी बोलायला नकार देणाऱ्या हिंदी भाषिकांचे काय करायचे? 

प्रश्न ज्यांच्यामुळे निर्माण होतो त्याना न विचारता इतरानाच विचारला जातो कारण ते लवचिक असतात. ज्याना फक्त हिंदीच बोलायची आहे त्यानी इतरत्र जायचेच कशाला. आपल्या स्वत:च्या घरी रहा ना मग. इतरांच्या घरी रहायला जायचे आणि तेथे माझ्यासारखेच वागावे बोलावे म्हणून आग्रह का धरायचा?


In reply to by विजुभाऊ

ते तमिळनाडूमधे असे करत नाहीत. कारण तिथले लोक हिंदी चालवून घेत नाहीत.

 

 

मग आपण हिंदी भाषिकांना बडवून काढायला हवे की ती चालवून घेणाऱ्या लोकांना ? असा प्रश्न पडतोय ! असो ! .


In reply to by मूकवाचक

मूकवाचक साहेब, तुमचे प्रश्न स्वाभाविक वाटले तरी ते मूळ मुद्द्याला बगल देणारे आहेत.

१. सक्ती नाही, आदराचा भाग: लेखात कुठेही "भाषा येत नाही म्हणून झोडपून काढा" असे म्हटलेले नाही. मूळ मुद्दा त्या साध्या रिक्षाचालकाचा होता. त्याला कोडिंग शिकायचे नव्हते, पण ज्या मातीत आपण भाकरी मिळवतो, तिथल्या भाषेबद्दल किमान आदर म्हणून तो चार वाक्ये शिकत होता. प्रश्न भाषा 'अस्खलित बोलण्याचा' नाहीच, प्रश्न 'दृष्टिकोनाचा' आहे.

२. आयटी आणि भाषेचा बागुलबुवा: सी++, पायथन शिकताना माणसाचा मेंदू इतका विकसित होतो की रोजच्या व्यवहारातील १०-२० स्थानिक शब्द किंवा साधी वाक्ये समजून घेणे ही काही रॉकेट सायन्स नसते. कोणीही स्थलांतरितांकडून स्थानिक भाषेतील साहित्यात पीएचडी मागत नाहीये; पण "मला तुमची भाषा शिकायचीच नाही, तुम्हीच माझ्या भाषेत बोला" हा जो उद्दामपणा येतो, त्याला विरोध आहे.

३. दाक्षिणात्य राज्यांचा वास्तव अनुभव: बंगळुरू किंवा चेन्नईत मराठी किंवा इतर भाषक वर्षानुवर्षे राहतात, पण तिथे कोणी रस्त्यावर उभे राहून "बंगळुरू क्या तुम्हारे बाप का है?" किंवा "ये क्या फालतू भाषा है" असे म्हणण्याची हिंमत करत नाही. तिथे राहणारा माणूस कमीत कमी 'अण्णा', 'इल्ले', 'गोथिल्ला', 'वणक्कम' एवढ्यापुरता का होईना, स्थानिक संस्कृतीशी जुळवून घेतो. महाराष्ट्रात अडचण भाषा न येण्याची नाही, तर भाषा न शिकण्याच्या 'माज' आणि 'उर्मटपणाचे' समर्थन स्वतः मराठी माणसांनीच करण्याची आहे.

४. अपेक्षा फक्त आदराची: ५ वर्षांत ३ शहरे बदलणाऱ्याने भाषा नाही शिकली तरी चालेल, पण तिथल्या भाषेला तुच्छ लेखू नये आणि स्थानिक भाषेचा आग्रह धरणाऱ्यांना 'संकुचित' ठरवून स्वतःला 'ग्लोबल' म्हणवून घेण्याचा दांभिकपणा करू नये, एवढीच साधी अपेक्षा आहे.


In reply to by अनिशासूत

"...पण तिथल्या भाषेला तुच्छ लेखू नये आणि स्थानिक भाषेचा आग्रह धरणाऱ्यांना 'संकुचित' ठरवून स्वतःला 'ग्लोबल' म्हणवून घेण्याचा दांभिकपणा करू नये" - दोन्ही गोष्टी पटल्या. सहमत आहे.


एके काळी "ज्ञानेश्वरे रचिला पाया तुका झालासे कळस" म्हणून मराठी लोक मराठी भाषेचे भव्य वैभव व्यक्त करत असत. समर्थांचे दासबोध, मोरोपंतांच्या आर्या, अत्रेंची भाषणें, सावकारांची काव्यें इत्यादी मराठी भाषेची भूषणे होती.

आज काल रिक्षावाल्याने मराठी बोलावे, चहा च्या दुकानावरील मराठी बोर्ड चा फॉन्ट काय असावा ह्यावर मराठी भाषिकांचे भाषा प्रेम आणि गर्व व्यक्त होतो हे पाहून वाईट वाटते. मराठी माणसाचे प्रतिनिधी म्हणूनं मराठी चॅनेल वर ज्या व्यक्ती विविध राजकीय पक्षांकडून येतात त्यांनाच मराठी भाषा येत नाही. मराठी वृत्तनिवेदक सुद्धा बोलताना तत पप करतात, अशुद्ध मराठी बोलतात. बापटांच्या निमित्ताने मराठी चॅनल पाहणे झाले तिथे एक हिंदुत्ववादी पक्षाचा प्रतिनिधी पुण्याची थोर परंपरा वगैरे वर काढताना "आम्ही DJ चा इस्तेमाल करणार नाही" म्हणाला. दुसऱ्या तथाकथित हिंदुत्ववादी आणि हल्ली सेकुलर झाल्येल्या पक्षाचा प्रतिनिधी तर काय ती अत्यंत ग्राम्य मराठी भाषा बोलत होता ते सुद्धा समजत नव्हते. त्याच्या एकूण संभाषणात कुठेही फुल्स्टोप काय, कॉमा काय काहीच नव्हते. मराठी भाषेला अनेक बोली असल्याने माझा ग्राम्य भाषेला विरोध नाही पण माध्यमात चर्चा करताना किमान इतरांना समजेल अशी तरी स्पष्ट मराठी भाषा बोलता आली पाहिजे. आणि ह्या व्यक्ती काही मुंबईत आलेल्या यादव किंवा मिश्रा नव्हत्या तर पाटील, कांबळे, जोशी इत्यादी होत्या.

जोशी नावाचा वार्ताहर News १८ साठी  बोलताना "पुण्यामंध DJ बंद करावा अशी मागणी होत आहे ... "  म्हणाला. शुद्ध शब्द आहे "पुण्यात" हे बोलायला सुद्धा सोपे आणि उच्चारायला सुद्धा सोपे. ABP माझा चा वार्ताहर अनेकदा "काळाच्या अणुरूप" म्हणत होता. परवानगीला "परवाणगि" म्हणत होता.

धीरज घाटे हे (कदाचित गणपती मंडळांचे कोणीतरी) - पथकला पतक म्हणत होते.

सुनील माळी नावाचे संपादक त्या वादांत आले. ह्यांची बोलताना इतकी भंबेरी उडाली कि जणू काही हा मराठी माणूसच नाही असे वाटेल. ते ३० सेकंड एकही फुल्स्टोप न घेता बोलले पण मूळ प्रश्नाला उत्तर नाही दिले. आपल्या समोरील वार्ताहराला "अरे तुरे" करून बोलले. वैयक्तिक चा उच्चार वयक्तिक म्हणून करत होते.

बहुतेक मराठी लोकांना हल्ली ती आणि ति ह्यांतील फरक कळत नाही असे सुद्धा वाटते. मातृ ला मात्र म्हणतात. पुण्याला पुन म्हणतात. 


In reply to by साहना

जाऊ द्या हो!

कितीही झालं तरी माणव हा अपूर्न हाये!

सार्वजणिक जिवणात माणाने जगन्यासाठी भाशा सुद्ध आसने आवष्यक आहे!        


In reply to by साहना

साहनाजी,

आपल्या प्रतिसादातून मराठीच्या दर्जाबद्दलची तुमची काळजी दिसते, पण मूळ मुद्द्याचा रोख मात्र भरकटलेला वाटतो.

टीव्हीवरच्या पत्रकारांचे किंवा राजकीय प्रवक्त्यांचे उच्चार चुकतात, व्याकरण घसरले आहे ही तुमची खंत रास्त आहे. मराठी माणसाने स्वतःची भाषा शुद्ध आणि समृद्ध ठेवलीच पाहिजे, यात दुमत नाही.

पण घरातल्या मुलाचे उच्चार किंवा हस्ताक्षर थोडे चुकते आहे म्हणून बाहेरच्याने घरातल्या पाटीवरच थेट पाय ठेवावा, हे कसे चालेल? स्वतःची भाषा सुधारणे ही अंतर्गत गोष्ट आहे; पण ज्या मातीत राहतो तिथल्या भाषेकडे बघण्याचा बाहेरच्यांचा दृष्टिकोन आदरयुक्त असावा, हा थेट स्वाभिमानाचा विषय आहे.

ज्ञानोबा-तुकोबांचे साहित्यिक वैभव कपाटात जपायचे आणि रोजच्या व्यवहारात रस्त्यावरच्या पाटीचा व भाकरीचा स्वाभिमान जपायचा, या दोन्ही गोष्टी एकत्र सांभाळता येतात; त्यात परस्परविरोध असण्याचे कारण नाही.


आज की उद्या पासून हिंदी पंधरवडा नावाचा मूर्ख कार्यक्रम सुरू होणार आहे, ह्यात हिंदी ही राष्ट्रभाषा आहे असा खोटा प्रचार सरकारी खर्चाने सरकारी कार्यालयातून केला जाणार आहे, जागरूक लोकांनी असा प्रचार करणाऱ्या बँक्स, सरकारी खाती, ह्यांना जाब विचारणे गरजेचे आहे.


In reply to by अमरेंद्र बाहुबली

अगदी अचूक निरीक्षण! हिंदी ही 'राष्ट्रभाषा' नसून केवळ 'कार्यालयीन भाषा' आहे हा घटनात्मक फरक लोकांना कळेपर्यंत ही मानसिक शरणागती संपणार नाही. सरकारी खर्चाने होणाऱ्या या भाषिक अतिक्रमणाला रोखणं आणि हक्क बजावणं ही काळाची गरज आहे. महत्त्वाच्या मुद्द्याकडे लक्ष वेधल्याबद्दल धन्यवाद!


ग्रामीण महाराष्ट्र मराठी जपून आहे, पुण्य मुंबईतील मराठी जणच हिंदाळलेली आहे. ह्यानाच हिंदीचा पुळका जास्त असतो. 


हे असले लोक असताना मराठी भाषेला इतर बाहेरच्या शत्रूंची गरजच नाही. आणि यातल्या बऱ्याच लोकांची उदारता, पुरोगामित्त्व आणि सहिष्णुता फक्त उत्तर भारतीय आणि हिंदी पुरतीच मर्यादित असते... का ते सांगायला नकोच