Skip to main content

दिवाळी अंक २०२६ : आता लिहायला घ्या!

लेखक साहित्य संपादक यांनी गुरुवार, 27/08/2026 08:15 या दिवशी प्रकाशित केले.

दिवाळी अजून जरा दूर आहे.

म्हणजे कॅलेंडरमध्ये दूर आहे. संपादक मंडळाच्या डोक्यात मात्र ती आतापासूनच सुरू झाली आहे. बाकी लोकांना दिवाळी म्हटलं की फराळ, फटाके, रांगोळी, नवीन कपडे असं काहीबाही दिसतं. संपादकांना रिकामी अनुक्रमणिका, शेवटच्या तारखेला एकदम येऊन आदळणारे व्यनि, ई मेल्स आणि “लेख जवळजवळ पूर्ण झाला आहे, आणखी दोन दिवस मिळतील का?” असे प्रश्न दिसायला लागतात.

म्हणून या वेळी जरा लवकरच हाका मारत आहोत.

तर, प्रथेनुसार यंदाही मिसळपाव दिवाळी अंक २०२६ साठी मिपाकर सदस्य आणि वाचक यांच्याकडून साहित्य मागवत आहोत.

यंदा कोणतीही खास थीम नाही. नकोच..!! खूप झाल्या थीम्स.

प्रेम, प्रवास, विज्ञान, समाज, आठवणी, रहस्य, विनोद, भय, स्वयंपाक, इतिहास, तंत्रज्ञान, सोशल मीडिया ,  रील्स कशी बनवावीत यापैकी काहीतरी किंवा त्याखेरीज या मोठ्या यादीपैकी कोणत्याही सदरात न बसणारं पण वाचावंसं वाटणारं काहीही चालेल. कथा, कविता, ललितलेखन, वैचारिक लेख, अनुभव, व्यक्तिचित्र, प्रवासवर्णन, विज्ञान आणि तंत्रज्ञानविषयक लेख, पाककृती, भाषांतर, व्यंगचित्र अशा सर्व साहित्यप्रकारांचं स्वागत आहे.

थोडक्यात, विषयाचं बंधन नाही. फक्त लिहिणाऱ्याने स्वतः लिहिलेलं आणि वाचणाऱ्याला काहीतरी देणारं असावं. ते "काहीतरी" म्हणजे ज्ञान, विचार, आनंद, हसू, हुरहूर किंवा रात्री झोपताना उगीच आठवत राहणारं एखादं वाक्यदेखील असू शकतं. पण अगदीच शब्दशः घेऊ नका. एकोळी धागे मिपावर अप्र होतात हे माहीत असेलच..!!

दर वर्षीचे काही नेहमीचे नियम आहेत. जुन्या मिपाकरांना ते आता तोंडपाठ झाले असतील. तरीही नवीन लेखकांसाठी आणि पाठ झालेले नियम सोयीस्करपणे विसरणाऱ्या जुन्या लेखकांसाठी पुन्हा एकदा चऱ्हाट वळणे आले:

* दिवाळी अंकासाठी पाठवलेले साहित्य पूर्वप्रकाशित नसावे.

* लेखन युनिकोड टेक्स्ट स्वरूपात पाठवावे. पीडीएफ, छायाचित्र किंवा स्कॅन केलेले हस्तलिखित पाठवू नये.

* साहित्य कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात AI वापरून लिहिलेले किंवा तयार केलेले नसावे. दिवाळी अंकासाठी मिपाला लेखकाचे स्वतःचे विचार, स्वतःचे शब्द आणि स्वतःची निर्मिती अपेक्षित आहे. एडिट करायला किंवा आऊटलाईन ऊर्फ रूपरेखा बनवायला एआय वापरला तर चालेलच.  पण पूर्ण लेखनच एआय लिखित नसावं. एआय स्लॉप इज नॉट वेलकम.

* साहित्य मिसळपाववरील ईमेलने sahityasampadak.mipa@gmail.com या ई पत्त्यावर पाठवावे.

* ईमेलमध्ये आपला मिपा आयडी जरूर लिहावा. आपण मिपाचे सदस्य नसाल, तर आपले नाव आणि आवश्यक संपर्कविषयक माहिती लिहावी.

साहित्य पाठवण्याची अंतिम तारीख : १५ ऑक्टोबर २०२६

अंतिम तारीख म्हणजे साहित्य पाठवायला सुरुवात करण्याची तारीख नव्हे.  हाच एक छोटासा गैरसमज दर वर्षी अनेकांचा होतो. तो यंदा होऊ नये अशी क्षीण आशा आहे. तुमचं लेखन तयार असेल तर लगेच पाठवा. तयार नसेल तर आजच लिहायला घ्या.  अगदी रातोरात उठून लिहायला बसणं शक्य नसेल तर उद्या सकाळी सुरुवात केलीत तरी हरकत नाही. पण १५ ऑक्टोबरच्या मध्यरात्री घड्याळ आणि इंटरनेटची गती यांच्याशी एकत्र शर्यत लावू नका.

लेख मिळाल्यानंतर निवड, आवश्यक संपादकीय संस्कार, मुद्रितशोधन, सजावट आणि अंकाची तांत्रिक निर्मिती असं बरंच काही पडद्यामागे चालतं. ते आमचं बऱ्याचदा रडून झालंच आहे. पण मुख्य म्हणजे त्यासाठी आम्हालाही थोडा वेळ द्या... इतकंच.

मिपाचा दिवाळी अंक हा केवळ संपादक मंडळाने तयार केलेला अंक नसतो. सदस्य आणि वाचकांनी आपापल्या पोतडीतून आणून ठेवलेल्या कथा, कविता, अनुभव आणि विचारांमधून तो तयार होतो. काही जुने हात दर वर्षी न चुकता लिहितात. काही बराच काळ शांत राहून अचानक एखादं सुंदर लिखाण घेऊन येतात. काहींचं हे पहिलंच लेखन असतं. त्या सगळ्यांसाठी जागा असावी म्हणून हे आवाहन. जरा उशीरच झाला असला तरी, देर आये दुरुस्त आये म्हणा..

तर.  लेखण्या, कीबोर्ड, मोबाईल आणि मनात बरेच दिवस मुक्कामाला असलेले विषय बाहेर काढा. पांढऱ्यावर काळं आणि नाईट मोड आवडत असेल तर काळ्यावर पांढरं करून लगेच सेंडवा.  पण फक्त युनिकोड.  पीडीएफ किंवा अन्य फॉरमॅट नको.

वाट बघत आहोत.
 

लेखनविषय:

वाचने 787
प्रतिक्रिया 27

प्रतिक्रिया

सहर्ष स्वागत! यावेळी थोडी लवकर नोटीस आली हे चांगले झाले; लेखकूंना लिहायला प्रेरणा मिळेल.  

 

शंका व सुचवणी:

प्रेम, प्रवास, विज्ञान, समाज, आठवणी, रहस्य, विनोद, भय, स्वयंपाक, इतिहास, तंत्रज्ञान, सोशल मीडिया ,  रील्स कशी बनवावीत यातील काही किंवा या मोठ्या यादीपैकी कोणत्याही सदरात न बसणारं पण वाचावंसं वाटणारं काहीही चालेल

म्हणजे या यादीतील विषयांवर लिहायचे आहे की लिहायचे नाही? की माझा काही गैरसमज होतोय?

 

साहित्य कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात AI वापरून लिहिलेले किंवा तयार केलेले नसावे. दिवाळी अंकासाठी मिपाला लेखकाचे स्वतःचे विचार, स्वतःचे शब्द आणि स्वतःची निर्मिती अपेक्षित आहे. एडिट करायला किंवा आऊटलाईन ऊर्फ रूपरेखा बनवायला एआय वापरला तर चालेलच. पण पूर्ण लेखनच एआय लिखित नसावं. एआय स्लॉप इज नॉट वेलकम.

पूर्णतः सहमत. त्याशिवाय ठळक भागाबद्धल म्हणजे, मानवलिखीत AI संस्कारित सुद्धा असायला नको असे वाटते. कारण तसे केल्यास मग त्या लिखाणात (cyborg!) मानवी अंश किती आहे व कृबु अंश किती आहे हे पडताळून पाहणे जिकिरीचे आहे असे मला वाटते. तरीही शेवटी साहित्य संपादकांच्या निर्णयाशी सहमत आहे.

 

बाकी, दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मिपा दिवाळी अंकात चांगलेचुंगले वाचायला मिळेल ही खात्री आहे. मिपा दिवाळी अंक २०२६ लेखनकर्मात आम्हीही खारीचा वाटा उचलू शकू ही श्री चरणी प्रार्थना!

 

- (ठोक वाचकू व किरकोळ लेखकू) कांदा लिंबू 


In reply to by कांदा लिंबू

त्या यादीतील विषयांवर लिहायचेच आणि शिवाय इतरही जे सुचेल ते. गोंधळ टाळण्यासाठी मूळ लेखात बदल केला आहे.


संपादक शशक स्पर्धा  आयोजित करणार होते पण एक जात सर्व  शशकांनी (खरगोश,ससा) यांनी स्पर्धेत भाग घेण्यास  नकार दिला.  


शब्द झाले मोती - 3 लिहायला घेतले होते, त्याचे पहिले 1-2 लेख JUST लिहिले आहेत, वयक्तिक डायरी असल्याने पुन्हा विचार करतोय अंका साठी देऊ की नको..

 

WILL TRY, WITH CHANGING NAMES OR WILL RETHINK 


सर्वांना एक विनंती आहे. आपण जे साहित्य पाठविणार आहात त्याचा तपशील किंवा माहिती आधीच इथे देऊ नये. अनेकदा त्यामुळे दिवाळी अंकात नेमके काय येणार आहे याची उत्सुकता कमी होऊ शकते. सर्वांनाच लिखाणासाठी शुभेच्छा.


In reply to by चौथा कोनाडा

शिवाय एखादी अत्यंत बारीकशी शक्यता की ज्यात अगदी क्वचित काही कारणाने साहित्य फायनल अंकात येऊ शकले नाही तरी काहीशी ऑकवर्ड स्थिती होऊ शकते.


दिवाळी अंकासाठी लिहित्या हाताना प्रोत्साहन देणा-या मिपाच्या दिवाली अंक टीमला शुभेच्छा. 
सामाजिक विषयावर लिहीन असे आश्वासन देतो, प्रयत्न करतो...........

-दिलीप बिरुटे


In reply to by Bhakti

@भक्ति, 

 

एके वर्षी मी पाठवलेला (बहुधा मिपा दिवाळी २०२०) लेख घेतला नव्हता. 

मग मी नंतर संपादन करून थोडा छोटा करून ४ भागात लेखमाला लिहिली 

(https://www.misalpav.com/story/48494)

 

तुम्ही ही असे करू शकता. 


In reply to by Bhakti

अग, दिवाळी अंकात नाही घेतला तरी मिपावर ते लेखन आपण प्रकाशित करू शकतो की.
माझ्या दिवाळी अंकात प्रकाशित झालेल्या लेखातील काही प्र चि लेखात समाविष्ट झाली नव्हती, त्यांमुळे मग लेखाची परिणामकारता मला कमी झाल्यासारखी वाटली. सा सना संपर्क करूनही काहीच उपयोग झाला नाही. त्यांमुळे यापुढे स्वतंत्र लेखच लिहायचा पर्याय निवडला आहे.:) 


In reply to by Bhakti

यावेळी लिहाच. एखादी अनवट पाककृती लिहिलीत तर नक्कीच वाचायला आवडेल.


काही वर्षांपुर्वी दिवाळी अंकात लेख छापून आला होता, पण इतके कमी प्रतिसाद आले होते की आपण काही लिहू शकतो हा विश्वासच ऊडाला. पण ह्या वर्षी पुन:प्रयत्न करणार.

 


In reply to by सौन्दर्य

तुम्ही लिहा हो ... प्रतिसाद काय येतील, न येतील. 
बहुधा बरेच लेख आवडतात, पण पोच देणे राहून जाते. यापुढे आवडलेल्या लेखांना प्रतिसाद आवर्जून देणार. 
प्रतिसाद आलेले आवडणे साहजिक आहे, पण आपला वेळ खर्चून, मेहनत घेऊन लिहिलेल्या लेखांस इतरांच्या approvalची गरज नसावी, नाही का ? 


In reply to by पर्णिका

लेख वाचल्यावर पाठीवर कौतुकाची थाप तरी पडावी अथवा रागाचा धपाटा तरी पडावा, पण काहीतरी पडावे असे नेहेमीच वाटत आले आहे.

तुमच्याच प्रतीसादाने अंगावर मूठ्भर मांस चढले आहे, नक्की लिहीणार.


या वेळेस लिहतो.

मराठी लिहायला मला खूप वेळ लागतो आणि कामातही खूप बदल होत आहे.  पण लिहायला आवडेल - संपादकांनाही आवडेल अशी आशा आहे. 😝




 


गवि, या तुझ्या आमंत्रणाला दाद देण्यासाठी हा निरोप! मस्त लिहिलयंस.

 

टिपः माझा आयडी 'मिसळपाव' असला, मिपाच्या बाल्यावस्थेत तत्कालीन चालकांच्या संमतीने घेतलेला, तरी मी एक सामान्य सभासद आहे. या आयडीचा आणि या संस्थळाच्या चालकांचा / संपादकांचा काहीही संबंध नाही.