Skip to main content

सुफिया- कन्याकुमारी ते काराकोरम धावणारी पहिली व्यक्ती

लेखक मार्गी यांनी शुक्रवार, 14/08/2026 14:00 या दिवशी प्रकाशित केले.

“It was about thousands of small decisions not to give up!” 

काराकोरम पास कुठे आहे तुम्हांला माहिती आहे का? तो उत्तर लदाख़मध्ये डीबीओच्या जवळ आहे. सुफिया सुफी- ५ वेळा आधी गिनीज जागतिक विक्रम केलेली सुफिया कन्याकुमारी ते काराकोरम हे ५००० किमीचे अंतर ८६ दिवसांमध्ये धावली (रोजची सरासरी ≈ 58 किमी)! होय. तुम्ही बरोबर वाचलंत. तिची माहिती अनेकांना नाही. फक्त कल्पना करा, तुम्ही १ तास बाहेर कडक ऊन्हात, दमट वातावरणात आणि सतत पडणार्‍या पावसात उभे आहात. आता परत विचार करा. ८६ दिवस आणि दररोजचं सरासरी अंतर ५८ किमी- संपूर्ण भारत आणि पाऊस, ऊन, वारा, वादळ, पूर आणि उंच पर्वत!! तिने ही धाव ६ ऑगस्टला पूर्ण केली. 

सुफिया सुफी ही अजमेरची अल्ट्रा डिस्टन्स रनर आहे. एक दशकभर हवाई उड्डाण क्षेत्रात काम केल्यानंतर २०१७ मध्ये तिला रनिंग ही तिची पॅशन सापडली! फिटनेसची आवड म्हणून सुरू झालेलं तिचं रनिंग भारताची सर्वांत मोठी एंड्युरन्स कहाणी बनलं! 

तिचे आधीचे 5 गिनीज जागतिक विक्रम: 

* कश्मीर ते कन्याकुमारी पळणारी सर्वांत वेगवान महिला (४००० किमी, ८७ दिवस, दररोजचं सरासरी अंतर ≈ 46 किमी) - हा तिने ह्यावेळी‌ स्वत:च मोडला व ६८ दिवसांतच हे अंतर पार केलं! 

* भारतीय सुवर्ण चतुष्कोण (Golden Quadrilateral) पळणारी सर्वांत वेगवान महिला (६००० किमी, ११० दिवस, दररोजचं सरासरी अंतर ≈ 55 किमी) 

* सियाचेन बेस कँपवरून करगिलला पळणारी पहिली महिला 

* मनाली ते लेह अंतर पळणारी सर्वांत जलद धावपटू (४३० किमी, ९८ तास- म्हणजे फक्त ४ दिवस. तेही इतके उंच पर्वत!) * कतार देश पूर्ण पळणारी पहिली महिला 

(तिच्याबद्दल माझा ब्लॉग. तिथे माझे धावण्याचे अनुभव, विज्ञान प्रयोग, गणितातील गमती, ट्रेकिंग, ध्यान, सायकलिंग, 

फिटनेस इ. बद्दल वाचता येईल.)

  .   

तिच्याबद्दल एक छोटा व्हिडिओ. 

तिच्या ह्या लेटेस्ट मोहीमेत म्हणजे कन्याकुमारी ते काराकोरम- Run for dreams, तिला प्रचंड खडतर आव्हानं होती. प्रत्येक दिवशी कस लागायचा, वेदना, थकवा, उष्णता, दमटपणा, पाऊस, रस्त्यावरचे आठ- दहा तास आणि अनेक बिकट क्षण! जेव्हा थांबणं अगदी सोपा पर्याय होता. ती म्हणते की, काही दिवशी तिचं शरीर सक्षम होतं. काही दिवशी ते नव्हतं. काही दिवस ती आत्मविश्वासाने पळाली आणि काही दिवस ती स्वत:ला फक्त पुढे नेत राहिली. पण प्रत्येक पाऊल- प्रत्येक दिवस तिला तिच्या उद्दिष्टाकडे नेत गेला. कन्याकुमारीच्या किनार्‍यापासून उत्तुंग काराकोरम खिंडीपर्यंत तिने कित्येक राज्यं ओलांडली, शहरं बघितली, उत्तुंग पर्वत ओलांडले आणि स्वत:च्या मर्यादाही ओलांडल्या. हे पूर्ण झाल्यानंतर तिला वाटतं की, ही धाव एकाच मोठ्या क्षणाबद्दल नव्हती. ती माघार न घेण्याच्या हजारो क्षणांविषयी होती. 

It was about thousands of small decisions to not give up. 

-निरंजन वेलणकर 09422108376. लिहीण्याचा दिनांक- 14 ऑगस्ट 2026.

लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 157
प्रतिक्रिया 5

प्रतिक्रिया

मार्गी,

 

हे जे काही केलंय त्यांस अमानवी हे एकमेव विशेषण लागू पडतं. दररोज सरासरी ५८ किमी आणि ते ही मध्ये विश्रांतीचा दिवस न घेता हा अचाट प्रकार आहे. मी साधं दहा किमी धावलो तरी दुसऱ्या दिवशी धावू शकंत नाही. इतकी विश्रांतीची गरज भासते. हिच्या अवयवांची झीज कशी भरून येत असेल याचं कुतूहल आहे. बहुधा हिचं झीजपुरवठा चक्र ( = recuperation cycle ) झोपेशी कमी निगडीत असून सतत चालू असावं. हिचा चयापचय अतिशय तीव्राध्यस्त ( = quickly adjust ) होणारा असावा.

 

आ.न.,

-गा.पै.


म्हणजे रोज १ मॅरेथॉनपेक्षा जास्त अंतर धावायचे? तेही एलिव्हेशन वर (कारण खालुन वर जायचे आहे.) भयंकर आहे ही बाई!!

मी कितीतरी वर्षे १० मिन्टात २ कि.मी. धावायचे स्वप्न बघतोय. (बघतोच आहे फक्त. कधी होईल काय माहेत)


हो, हे अमानुषच आहे! मी गेली अनेक वर्षं रनिंग नेटवर्कमध्ये तिची वाटचाल बघतोय. तिला एके काळी बोललोही होतो की, तू आधीच स्वत:ला सिद्ध केलंय, मग हा वेडेपणा का करते! पण तिने करून दाखवलं! तेही मेजर त्रास न होता.

 

@ गामा पैलवान जी, हो ना. फक्त जे सतत फार मोठं रनिंग करतात, त्यांच्या शरीराला थोडी सवय होते. शिवाय जसे ती मोठे रेकॉर्डस करत गेली, तसे स्पॉन्सर्स, क्र्यू, सपोर्ट व्हेईकल, डाएटीशियन वगैरे आले. त्यामुळे तिने मॅनेज केलं असेल ते. पण तरीही काही टप्प्यांवर तिला खूप जास्त त्रासही झालाच. अशक्य आहे ती एकूण!