Skip to main content

पाऊसखुणा

लेखक चक्कर_बंडा यांनी मंगळवार, 21/07/2026 13:00 या दिवशी प्रकाशित केले.
पाऊस

 

                                                               "पाऊसखुणा मातीवर उमटतात आणि काळावर व्रण ठेवून जातात"

 

पावसाची माझ्यापुरती एक विलक्षण सवय आहे. तो एकटा येत नाही. त्याच्या प्रत्येक सरीबरोबर कुठली ना कुठली आठवण जमिनीवर उतरते. पहिला थेंब मातीला स्पर्श करतो, आणि कुठल्यातरी विस्मृतीत गेलेल्या दाराची कडी नकळत उघडते. मग ओल्या मातीचा गंध मनाच्या अशा कोपऱ्यात शिरतो, जिथे सहसा मुक्त प्रवेश निषिद्ध असतो.

पावसाळा हा माझ्यासाठी ऋतू कमी आणि स्मृतींचा प्रदेश अधिक, प्रत्येक ढग म्हणजे एखाद्या जुन्या दिवसाची घडी, प्रत्येक सर म्हणजे काळाने रेखलेलं एखादं पात्र आणि धुकं म्हणजे कागदावर न उतरलेल्या शब्दांचा श्वास.

पावसाळा आणि माझी जंगलभ्रमंती हे ही एक समीकरण आहे. पहिला पाऊस पडला की जंगल नव्याने जन्म घेतं व तो सोहळा अनुभवण्यासाठी पावलांना जंगलाची ओढ लागते. उन्हाळ्याने करपलेल्या खोडांवर हिरव्या पालवीची अक्षरं उमटतात. करवंदाच्या काटेरी जाळ्यांतून मोत्यांसारखे पाण्याचे थेंब चमकू लागतात. ऐन, धावडा, बेहडा, जांभूळ, हिरडा, किंजळ यांच्या फांद्यांवरून पाणी झिरपत राहतं. दूर डोंगरांच्या कुशीत धुक्याने पांढरी शाल पांघरलेली असते. प्रत्येक झाड आपल्याच सावलीत पुन्हा एकदा जन्म घेत असल्यासारखं दिसतं.

अशा वेळी जंगलात शांतता नसते.

मातीखालून बाहेर आलेल्या खेकड्यांची लगबग सुरू होते. पानांच्या आड लपलेले बेडूक पावसाच्या स्वागताचा सामूहिक गजर करत असतात. दूर कुठेतरी पावश्या साद घालत असतो. वाऱ्याने झाडांच्या शेंड्यांत उठलेली सळसळ आणि ओढ्याच्या पाण्याची खळखळ एकत्र मिसळून असा स्वर निर्माण करतात, की तो ऐकण्यासाठी कान आणि मन शांत असावं लागतं.

त्या संगीताच्या पार्श्वभूमीवर जंगलात फिरताना मला तिची आठवण न यावी असं सहसा होत नाही. धुकं डोंगरावरून खाली उतरायला लागतं, तेव्हा तिचा शुभ्र पेहराव आठवतो. ओढ्यावर पावसाचे गोलाकार तरंग उठतात, तेव्हा तिच्या गालावर पसरणाऱ्या हास्यलहरी दिसतात. बांबूच्या पानांवरून ओघळणारे थेंब पाहिले की तिच्या केसांतून ठिबकणारं पाणी आठवतं. ती प्रत्यक्ष कुठं दिसत नाही...पण सगळीकडे असते.

मी जुन्या ओळखीच्या वळणावर उभा राहतो. जंगलातुन जाणाऱ्या डांबरी रस्त्यावर पावसाने धुऊन काढलेली लाल माती चमकत असते. धुक्याचा पडदा चिरत लाल परी तिच्या चाकांखालून उडालेल्या पाण्याचे तुषार हवेत मोत्यांसारखे फेकत करकचून आवाज करीत थांबते. दार उघडते. जंगलातील दुर्गम वाड्यावस्त्यांवर वस्तीला असणारे चारदोन पांथस्थ उतरून त्यांच्या दरीत वसलेल्या घरट्यांकडे निघून जातात, घंटी वाजते. इंजिनाचा आवाज दूर विरत जातो व रस्ता पुन्हा एकटा उरतो. मी त्या वळणावर उभा राहून "प्रतीक्षा" करीत असताना या चक्राची कितीदा पुनरावृत्ती होते याचं भान मला राहत नाही. काही प्रतीक्षा अशा असतात की त्यांना शेवट नसतो. ऋतू बदलत राहतात. वाट पाहणं मात्र संपत नाही, अंधार पडतो, मग त्या वळणावरून पुढे निघावंचं लागतं.

दुसऱ्या दिवशी धुक्याने भरलेल्या सकाळी मग एखादं रानफुल उमलून येतं... कोणाच्याही नकळत, कसलाही गाजावाजा नाही. कसलाही आवाज नाही. फक्त पावसाच्या मंद सरीत ओल्या मातीवर त्याची पहिली खूण उमटते... पावसाने धुतलेल्या त्या गंधविहीन फुलांचं सौंदर्य ओल्या मातीच्या गंधात मिसळून एक वेगळाच दरवळ निर्माण करत असतं.

तसं या रानफुलांचं आयुष्य तरी कितीसं ??? दोन... चार... कदाचित आठ दिवस ???

नाही... जोपर्यंत कुणीतरी त्याला पाहून आनंदी होतं राहतं... तोपर्यंत. खरं तर आयुष्य दिवसांनी, वर्षांनी मोजुचं नये,
ते स्पर्शांनी, स्मितांनी आणि आठवणींनी मोजावं.

जंगलात मी नेहमी एखाद्या ओढ्याच्या पाण्यासारखा चालतो —कुठे थांबायचं, —कुठे वळायचं, याचा काही नेम नसतो. एखाद्या पक्ष्याची साद कानावर पडली की पाऊल त्या दिशेने वळते. फुलांचा गंध आला की वाट आपसुक बदलते नुकत्याच ओसरलेल्या ओढ्याच्या विस्तीर्ण पात्राशेजारून चालताना वाळूतून रात्रीच्या पावसाने मातीचा रंग गडद झालेला दिसतो. त्या मऊ पृष्ठभागावर असंख्य खुणा उमटलेल्या दिसतात. मोरांची बारीक, रेखीव पावलं. सांबराच्या खुरांचे ठसे. रानडुकराने नाकाने उकरलेली रेती. एखाद्या सशाने मारलेल्या उड्या. आणि एका काठाशी, पाण्याच्या अगदी जवळ, बिबट्याच्या पंजाची अर्धवट उमटलेली खूण. मातीतून रात्रभर जंगलात घडलेल्या घटना वाचता येतात.

ओढ्याच्या शांत डोहात पाणी गडद हिरवं दिसतं. काठावर वाकलेल्या जांभळाच्या फांद्या आपल्या प्रतिबिंबाकडे पाहत उभ्या असतात. पाण्यावर अधूनमधून थेंब पडतात तेव्हा त्या हिरव्या आरशावर क्षणभर वर्तुळ उमटतं.

"आरसा आणि पाणी यात फरक माहीत आहे?"

"आरसा फक्त चेहरा दाखवतो. पाणी चेहऱ्यामागील मनाचा वेध घेऊ पाहतं."

मी त्या डोहात पाहतो. माझा चेहरा दिसतो. पावसाने धुऊन काढलेल्या प्रत्येक गोष्टीचा खरा चेहरा दिसतोचं.... तेवढ्यात एक थेंब पाण्यावर पडतो. प्रतिबिंब तुटतं, नाहीसं मात्र होत नाही..

आठवणींचं आयुष्यही पाण्यातल्या प्रतिबिंबासारखंच असतं. त्या तुटतात...पण नाहीशा होत नाहीत. त्यांचे तरंग मात्र खूप दूरवर जात राहतात. पाऊस पुन्हा सुरू होतो. सुरुवातीला काहीच थेंब. मग रिमझिम, आणि पाहता पाहता संपूर्ण रानावर पाण्याचा पडदा उतरतो. या पावसाचा सर्वांत मोठा गुणधर्म झाडांना हिरवं करणं नाही. तो सृष्टीला, तिच्यातील हरेक प्राणीमात्राला आठवणी देतो... कायम सोबत राहण्यासाठी....

"पाऊसखुणा मातीवरून कदाचित पुसल्या जातील; पण मनावर उमटलेल्या खुणांना ऋतू नसतात."
 

लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 188
प्रतिक्रिया 4

प्रतिक्रिया

खूप खास !

"आरसा आणि पाणी यात फरक माहीत आहे?"
"आरसा फक्त चेहरा दाखवतो. पाणी चेहऱ्यामागील मनाचा वेध घेऊ पाहतं."
हे फारच आवडलं.