Skip to main content

जमिनीवर पडलेली कोणतीही गोष्ट ती सापडणाऱ्याचीच असते

लेखक विजुभाऊ यांनी शुक्रवार, 10/07/2026 22:46 या दिवशी प्रकाशित केले.

एखाद्याचे नशीब कसे असते ना. शॉपिंग तेही सुपरमार्केटमधे जाऊन करणे ही एखाद्यासाठी एन्टरटेन्मेन्ट कशी ठरू शकते. पण माझ्यासाठी ती असते. निदान  माझ्या सारख्या बैचलर साठी तरी. कसे आहे ना . त्या निमीत्ताने एखादे वेळेस काही छान आयटम पहायला मिळतात.  पण हे  कधीतरीच.   भर पावसाळ्यात अचानक आकाश उघडून लख्ख सूर्यप्रकाश यावा तसे नशीब उघडले असावे तेंव्हाच.  नाहीतर एरवी दिसतात त्या, सुधृड बालकांची स्पर्धा करावी इतक्या गुटगुटीत म्हाताऱ्या काकवा नाहीतर करवादलेले चेहरे घेऊन येणारे चष्मेवाले काका, नाही तर मावशी छाप  सदावशिवपेठी ताया. पण नाईलाज असतो.  दर आठवड्याला हे करावेच लागते. निदान घरात समान भरण्यासाठी तरी  मला सुपरमार्केट मधे यावेच लागते. मला खरेच माझ्या बाकीच्या कलीग्जचा हेवा वाटतो. शनिवारी रविवारी ते कसे गर्लफ्रेंड सोबत नाहीतर बायकोसोबत मस्त आउटिंगला जातात. थिएटरमधे जाउन मस्त  रोमैंटिक पिक्चर बघतात. आणि आम्ही . आठवडाभराच्या खरेदी साठी पिशव्या उचलत फिरतो. कोणाकडे जायचे तर तेही लेकाचे आपल्यासारखेच बैचलरच शोधावे लागतात. गर्लफ्रेंड नसलेले. अगदीच नाईलाज म्हणून. 

आपल्याला गर्लफ्रेंड असती तर आयुष्य किती छान झाले असते ना.

कॉलेजात होतो तेंव्हापासून माझे स्वप्न आहे. मस्त घाऱ्या  हिरव्या डोळ्यांची, सरळ नाकाची  गोरीपान छान गर्ल फ्रेंड असावी. कॉलेजात होतो तेंव्हा ती सृष्टी गद्रे  होती कॉमर्सला. ती नुसती रस्त्यावरून जाताना दिसली तरी हजार एक ऱ्हदये तुडवत जात असेल. आम्ही तर तीला स्टेफी ग्राफच म्हणायचो. अगदी तश्शी दिसायची. तीच्याशी बोलणे सोडा पण ती दिसावी म्हणून किती तरी क्लास सोडून कॉरीडॉरमधे उभे असायचे. चांदी जैसा रंग है तेरा सोने जैसे बाल एक तुही धनवान गोरी. बाकी सब कंगाल. हे गाणे नक्की  तीला पाहूनच लिहीले असावे. शक्य असते ना तर तीच्या वर्गात बसता यावे म्हणून इंजिनीयरिंग सोडून कॉमर्सला ऐडमीशन  घेतली असती. सालं काय नशीब असते ना एकेकाचे. आमच्या पॉलिमर इंजिनियरिंग च्या क्लासमधे वाळवंटात खजुरीचे झाड असावे तशी एकटी सौंदर्या रंगराजन.   सौंदर्य फक्त नावातच बाकी काही बोलायची सोय नाही. जाऊ दे.ंअशीब आपलं म्हणायचे आणि सोडून द्यायचे.

गेल्या आठवड्यात एक विचित्र अनुभ आला. नेहमी प्रमाणे सुपरमार्केटमधे गेलो होतो.   

 रविवाारी ग्रैंड पार्टी करायची होती नव्या असाईनमेम्टच्या सक्सेस ची.   इतर  कलीग्स पण  नेहमी ओरडत असतात कधीतरी तू तुमच्या सी के पी पद्धतीची कोळंबीची खिचडी खाऊ घाल म्हणून.   त्यांचे आत्मे शांत करायचे होते. म्हणून चांगली किलोभर कोळम्बी घेतली. इतर सामानही होतेच, मसाले , मेयॉनीज वगैरे.   बाकी   असावेत म्हणून चांगले अर्धा किलो काजूही घेतले. खा लेको करा चैन.  नेमकी सामानासाठी ट्रॉली नव्हती.  सगळ्या फुल्ल. त्यामुळे त्या दोन भरलेल्या पिशव्या हातात घेऊन पार्किंग मधे आलो. गाडीची किल्ली नेमकी मागच्या खिशात. किल्ली काढायला म्हणून पिशव्या खाली ठेवल्या आनी किल्ली लावून दार उघडणार इतक्या एकजण   असताना धावत आला आणि त्या दोन्ही पिशव्या उचलून पळून गेला. जाताना तो  ओरडून गेला" जमिनीवर पडलेली कोणतीही गोष्ट ती सापडणाऱ्याचीच असते". तो असे  म्हणाला आणि आसापासच्या लोकानी टाळ्याही वाजवल्या. मला कळालेच नाही काय घडतेय ते. अस्सा राग आला होता ना. त्या ला गाठायचे म्हणून मी गाडी बाहेर काढताना एक दोन सिक्युरिटी कोन ही उडवले. पण तो पळून गेला. सापडला नाही.  चोर तो चोर . आणि लोकही त्याला प्रोत्साहन देत होते.  विचित्रच ना.

मी राग आवरता घेतला. नुसते स्वत:वर रागावण्यापेक्षा  उद्याच्या पार्टीची तयारी  महत्त्वाचे. म्हणजे पुन्हा तेच सामान खरेदी करायचे.  म्मार्केटमधे जाऊन तेच सामान घेतले.  त्याच काउंटरवरून. एक आणखी विचित्र गोष्ट दिसली. माझ्या सारखेच कपडे घातलेला एक तरूण तिथे  कोणाचे काही पडले तर तो ते उचलून घेत होता. पण ज्यांचे सामन पडले त्याला परत करत नव्हता. कोणी विचारले तर तो तेच शब्द उच्चारत होता "जमिनीवर पडलेली कोणतीही गोष्ट ती सापडणाऱ्याचीच असते" म्हणजे असा प्रकार आहे होय. 

 या आठवड्यात पुन्हा सुपरमार्केटची वारी. ... मी गाडी पार्क करून पार्किंगचे तिकीट घेतले. आणि आत आलो. काय काय घ्यायचे हे ठरवले होतेच. चहा, कांदे बटाटे, एम टी आर ची रेडी टू कूक पाकिटे, बिसीबेळे भात, सांबार, उपमा. दाळ तांदूळ थोडे शिल्लक आहेत पण हे इंद्रायणी तांदूळ दोन किलो घेऊन पाहुया. साखर नको.  लिक्विड डिटरजंट. मधेतरी कधी भूक लागली तर लक्ष्मीनारायण चिवडा, मल्टी ग्रेन ब्रेड.  भरपूर झाले . आणखी काही घेता येईल का म्हणुन मी इकडे तिकडे पाहिले. ब्राउजिंग . अरे हे काय तो  तोच गेल्या आठवड्यात माझ्या पिशव्या घेऊन पळून गेलेला  तो माणूस. माझी नजर चोरतोय.चांगला झापतोच आता त्याला. मी एका खांबाआड त्याला दिसणार नाही असा लपलो. आणि तो कुठे जातोय हे पाहू लागलो. तो एक एक वस्तू घेतोय. मी जिथे लपलो आहे त्या बाजूलाच आला. माझ्या समोर आला की पकडायचाच त्याला. काय होईल दंगा होईल ना होऊ देत. घाबरायचे कशाला.  त्याने फोन घेतला. आणि कोनाशी तरी तो बोलू लागला. इकडे इकडे.... इकडे डावीकडे बघ इथे...स्टेशनरी सेक्क्षनच्या बाजूच्या रांगेत इकडे ... अगं समोर बघ दिसतोय का मी. असे म्हणत त्याने हात वर केला. तो ज्या दिशेला पहातो तिकडे मी ही पाहिले.

टू माय सरप्राईज..,...  ओहोहो. तिथे साक्षात  सृष्टी गद्रे उभी आहे. ती स्टेफीग्राफ या चोराची गर्लफ्रेंड? नशीब  कसे असते ना..... कुत्र्याच्या गळ्यात माणीक म्हणायचे हे.

सृष्टी ला तो अजून दिसलेला नाही.  फोनवर बोलत ती इकडे तिकडे बघतच पुढे येतेय.  कोणाच्यातरी मधे ठेवलेल्या ट्रॉलीला सृष्टी अडखळून पडली. पडली कसली अक्षरश: आडवी झाली.

माझ्या डोक्यात पटकन दिवा पेटला. मी एकदम पुढे झालो. तो चोर , तीचा बॉयफ्रेंड तिथे पोहोचायच्या   मी तिथे पोहोचलो. खाली पडलेल्या सृष्टीला हात देऊन उठवले. तेवढ्यात तो चोर तिथे पोहोचलाच त्याने सृष्टीचा हात हातात घ्यायच्या आत मीच त्याला हटकले. आणि म्हणालो.   "जमिनीवर पडलेली कोणतीही गोष्ट ती सापडणाऱ्याचीच असते". 

....चकोर शाह.

लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 688
प्रतिक्रिया 14

प्रतिक्रिया

गंमत म्हणून गोष्ट आवडली 😃

बाकी स्टेफी ग्राफच्या 😍 नॉस्टॅल्जीयाबद्दल आभार, फार कमी स्त्रिया अशा असतात ज्यांच्या दिसण्याच्या इतर स्त्रियाही फॅन असतात.


@विजुभाऊ, तुमच्या गोष्टीशी समांतर हा फॉरवर्ड सध्या फिरतोय

 

हुशारी
काल संध्याकाळी मी सुपरमार्केटमध्ये गेलो होतो.
खरेदीच्या यादीतील सर्व वस्तू घेतल्यावर, मी पैसे भरण्यासाठी रांगेत उभा होतो. खिशात फोन परत ठेवताना, माझ्या हातातील ५०० रुपयांची नोट निसटली आणि जमिनीवर पडली. माझ्या अगदी पुढे खरेदीचे पैसे भरत असलेल्या, निळा शर्ट घातलेल्या एका टक्कल असलेल्या माणसाने हळूच खाली वाकून ती नोट उचलली.
त्याचे आभार मानून आणि माझे पैसे परत घेण्यासाठी मी माझा हात पुढे केला. पण त्याच्या प्रतिसादाने मला पूर्णपणे धक्काच बसला! तो म्हणाला, "जमिनीवर पडलेली कोणतीही गोष्ट ती उचलणाऱ्याचीच असते!"
असे बोलून, काहीच घडले नाही अशा अविर्भावात तो निघून गेला.
माझ्या मागे आणि आजूबाजूला असलेले लोक अविश्वासाने एकमेकांकडे पाहताना आणि आपापसात कुजबुजताना मला दिसले. काही क्षण मी तिथेच थक्क होऊन उभा राहिलो. मला राग आला आणि वाईटही वाटले. मी ठरवले की काहीतरी केलेच पाहिजे.
माझ्याकडे GPay नव्हते आणि रोख रक्कमही गेली होती, त्यामुळे मी माझ्या खरेदी केलेल्या वस्तू तिथेच सोडल्या आणि पार्किंग लॉटमध्ये त्याच्या मागे धावलो.
पुढे काय होणार हे पाहण्याच्या उत्सुकतेपोटी, रांगेतील काही लोक माझ्या मागे आले.
मी त्याला माझे पैसे परत मागितले, पण त्याने माझ्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले आणि चेहऱ्यावर एक गर्विष्ठ भाव घेऊन चालत राहिला.
तो त्याच्या कारजवळ पोहोचला. कारच्या चाव्या काढण्यासाठी, त्याने आपल्या हातातील खरेदीच्या दोन पिशव्या जमिनीवर ठेवल्या.
मी मनात विचार केला: हीच तर संधी आहे! मी त्या दोन्ही पिशव्या उचलल्या आणि त्याने मला जे शब्द म्हटले होते तेच शब्द पुन्हा उच्चारले: "जमिनीवर पडलेली कोणतीही गोष्ट ती सापडणाऱ्याचीच असते!"
मग, भीती, उत्साह आणि हसू अशा मिश्र भावनांसह मी तिथून पळून गेलो.
जवळ उभे असलेल्या लोकांनी टाळ्या वाजवून आणि ओरडून मला दाद दिली.
तो 'हुशार' माणूस इतका संतापला की, पार्किंग लॉटमधील काही सुरक्षा कोन (security cones) जवळजवळ उडवतच त्याने आपली कार वेगाने चालवत नेली.
तो उत्कटतेचा किंवा उत्साहाचा क्षण ओसरल्यावर, मी घरी आलो आणि त्या संपूर्ण घटनेचा विचार करून हसलो. मी त्या पिशव्या उघडल्या तेव्हा त्यात खालील गोष्टी होत्या:

* १ किलो कोळंबी (prawns)
* दह्याची २ पाकिटे
* २ किलो बासमती तांदूळ
* होल ग्रेन ब्रेड (whole grain bread)
* ५०० ग्रॅम काजू
* स्ट्रॉबेरी जॅमच्या २ बरण्या
* १ किलो बेदाणे
* मेयोनीजची १ बरणी
* ५०० ग्रॅम दूध पावडर
* घड्याळाची ४ बॅटरी
* ५०० ग्रॅम 'मिल्मा' (Milma) तूप
* चिकन मसाल्याचे १ पाकीट

केवळ ५०० रुपयांत इतका किराणा मी माझ्या आयुष्यात कधीच खरेदी केला नाही!
हे लिहीत असताना मी ते काजू खात आहे आणि विचार करत आहे... मी जे केले ते योग्य होते, की मी केवळ सूडबुद्धीने वागत होते?
तुम्ही इथपर्यंत वाचलेत का?

खरं तर, हे सर्व खरोखर घडलेच नाही!

वाचनाला प्रोत्साहन देण्यासाठी ही केवळ एक छोटीशी मोहीम आहे.

वाचनामुळे आपल्या मनाला आणि कल्पनाशक्तीला चालना मिळते, आपण नवीन ठिकाणी पोहोचतो आणि आपली संवाद कौशल्ये सुधारतात.

चला, लेखन आणि वाचनाला प्रोत्साहन देऊया! त्या निमित्ताने वाचन होईल तुमचं !


In reply to by श्वेता व्यास

त्याचंच विडंबन आहे हे (बहुतेक) .....

 

.... काय विजूभाऊ ? 


In reply to by चौथा कोनाडा

विडंबन नाही . मला एका नी  तो मेसेज पाठवला  त्या मेसेज ला उत्तर म्हणून मी हे लिहिले होते.

लेखकाच्या नावानिशी हे फॉरवर्ड करायला हरकत नाही.


भारी होती गोष्ट, अशा हरवलेल्या अनेक गोष्टी उचलायच्या राहून गेलेल्या. 

अर्ज है की, कोणाची शायरी आहे माहिती नाही. पण तो पुढे म्हणतो 
 

अगर तुम मिल भी जाते तो न होता ख़त्म अफ़्साना
फिर उस के बा'द दिल में क्या ख़बर क्या आरज़ू होती

 

-दिलीप बिरूटे
(स्वप्नाळु )

 


जमिनीवर पडलेली कोणतीही गोष्ट ती सापडणाऱ्याचीच असते.

हे तुम्हाला फार उशीरा समजलं. भारतीय जनतेला ते अगोदरच ठाऊक आहे म्हणूनच ते कचरा इथे तिथे फेकतात. कारण त्यांना माहित असतं की तो कचरा झाडूवाल्याला सापडणार आहे आणि जमिनीवर पडलेली कोणतीही गोष्ट ती सापडणाऱ्याचीच (पर्यायाने सफाई कामगाराचीच) असते.