✪ कडलोर जिल्ह्याचा ग्रामीण परिसर
✪ त्सुनामीच्या वेळच्या आठवणी
✪ जेवढं फिरू, तेवढं कळतं की, आपण काहीच फिरू शकत नाही!
✪ पुद्दुचेरीचा श्री अरविंद आश्रम!
✪ व्हाईट टाऊनमधला बीच
✪ श्री. मातृप्रसादजींसोबत संवाद
✪ आप्त जनांच्या भेटीमुळे घरी आल्याची भावना
नमस्कार. ३० जानेवारीची सकाळ! सायकल प्रवासाचा शेवटून दुसरा दिवस! पण काही बाबतीत सायकलिंग हे क्रिकेटसारखं आहे. जोपर्यंत शेवटचा रन होत नाही, तोपर्यंत मॅच पूर्ण होत नाही. शेवटचा किलोमीटर पूर्ण होईल, तेव्हाच हा प्रवास पूर्ण होईल. पण किती वेगळा अनुभव मला मिळतोय. आता तर आधीचे टप्पे आठवतसुद्धा नाही आहेत! काय ती गावं होती- उटीअलीकडचं गुडलूर, कर्नाटकातलं मलावली आणि रामेश्वरमजवळचं मंडपम! पहिल्या आठ दिवसांमध्येच कोपरापासूनचे हात काळवंडले. आणि आता तर चेहरासुद्धा दक्षिण भारतीय चेहर्यांसारखा झाला आहे. पण हा मिरवायचा दागिना असतो! त्याचा आनंद घ्यायचा असतो.
(माझा ब्लॉग इंग्रजीत इथे वाचता येईल. सायकल प्रवासातले फोटो बघता येतील व सर्व लेख एकत्र वाचता येतील. त्याशिवाय विज्ञान प्रयोग, गणितातील गमती, ट्रेकिंग, ध्यान, आकाश दर्शन, फिटनेसबद्दलचे लेख तिथे वाचता येतील.)
.
.
.
रोजच्या प्रमाणे हेलसकर मॅडमनी दिलेला अंजीर खाऊ खाऊन दिवसाची सुरूवात केली. सकाळी आनंदनजींसोबत गप्पा झाल्या. खूप काही त्यांचे प्रयत्न आहेत. गावासाठी त्यांना खूप काही करायचं आहे. खूप छान वाटलं त्यांना भेटून. त्यांचा निरोप घेऊन निघालो. लाईव्ह लोकेशन ग्रूपवर शेअर केलं. आजचा रूट अगदी निर्जन परिसरातून जातोय. अतिशय शांत गावं! शेतांमागे झालेला सूर्योदय! एका मुख्य रस्त्यापर्यंत मोबाईलमधल्या नकाशाचा वापर केला. पुढे रस्ता समजून घेतला आणि मोबाईल पाऊचमध्ये ठेवून निघालो. वाटेत एक वेगळंच दृश्य दिसलं! चक्क ट्रॅफिक जाम झाला आहे. त्याचं कारण शेकडो जंगली कोंबड्यांचा झुंड! भयानक वेगाने शेकडो कोंबड्यांनी रस्ता ओलांडला! आणि मग वाहनं निघाली. साधारण २५ किलोमीटरवर कुंभकोणमवरून आलेला महामार्ग मिळाला. इथे नाश्ता करून घेतला. आजसुद्धा हेडविंड आहे. पण आता त्याचीही सवय झालीय. त्यामुळे वेग चांगला मिळतोय.
काही अंतर महामार्गावरून गेलो. आज पुद्दुचेरीला जायचं आहे. कडलोरसाठी पुढे एका शहरातून उजवीकडे वळालो. हळु हळु किनारपट्टी जवळ येते आहे. जानेवारी २००५ मध्ये इकडे आलो होतो तेव्हाच्या आठवणी. त्सुनामीमुळे उद्ध्वस्त झालेली गावं. विशेषत: अगदी किनार्यालगत राहणारे गरीब लोक. लोकांना मदत मिळत होती, पण त्यात खूप असमानता होती. आणि तमिळ नाडू किनारपट्टीच्याही पलीकडे अंदमानपासून बांग्लादेश- इंडोनेशियामध्येसुद्धा त्सुनामीने प्रलय घडवून आणला होता. किती वेगळी नैसर्गिक आपत्ती होती ती! तेव्हा आम्ही चाणक्य मंडलकडून १०० मुलं- मुली आलो होतो. आठ दिवस मदत कार्यात भाग घेतला. कॉलेजच्या दिवसांमध्ये खूप काही शिकवून जाणारे ते दिवस होते. त्सुनामी नंतरही तरंगमबाडीसारख्या गावांमध्ये पहाटे होणारी काकड आरती अजूनही आठवते. हळु हळु दु:ख बाजूला ठेवून उभे राहिलेले लोक! मिलिटरीच्या जवानांसोबत काम केल्याचा अनुभव!
आपण देश जेवढा फिरतो तेवढं कळतं की, आपण काहीच फिरू शकत नाही! काही सुंदर प्रदेश व मंदिर बघता आले तरी इतर अनेक गोष्टी राहूनच जातात. एका एका गावातच इतक्या विशेष गोष्टी असतात! इथून काहीसं जवळ असलेलं तिरूवनामलाई आणि अरुणाचलम! रमण महर्षींचं ठिकाण! “योग" येईल तेव्हा बघणं होईल.
२१ वर्षांपूर्वीचं कडलोर आणि आताचं कडलोर! वस्ती व दाटीवाटी खूप वाढल्यासारखी दिसते. दुपारी ऊन वाढतंय. मोठे रस्ते झाले असल्यामुळे सावली अगदी दुर्मिळ झालीय! लहान गावांमधून जाताना सावलीचा फायदा मिळतो. एका ठिकाणी खूप वेळाने सावली असलेलं झाड आलं. तिथे थांबून पाणी प्यायलो आणि आनंदनजींनी दिलेलं मोठं केळं खाल्लं. तेव्हा मोटरसायकलवरचे एक जण थांबले. दोन मिनिट बोलले. माझी विचारपूस केली! फोटोही काढला आणि स्टेटसला ठेवतो म्हणाले. आणि हो, ह्या पूर्ण प्रवासामध्ये माझे बाबाही माझे अपडेटस रोज शेअर करत आहेत!
रस्ता किनार्यालगत असला तरी "तो" दिसत नाहीय. त्याला मिळणार्या अनेक नद्या व खाड्या लागत आहेत. वस्ती खूप वाढली आहे. पुद्दुचेरी जवळ येत गेलं. पण ऊन्हाचा कडाका तितकाच वाढतोय. शिवाय झाड कमी असलेल्या आणि मोकळ्या प्रदेशातून मी समुद्रालगत आणि शहरी भागात आल्यामुळेही गरम होतंय. एका ठिकाणी ओआरएस घेतलं.
श्री अरविंदांचा आश्रम असलेलं पुद्दुचेरी! अजूनही एक वेगळी ओळख आणि वेगळी शैली टिकवून ठेवलेलं पुद्दुचेरी! आधी थेट आश्रमात जाणार होतो. पण इथे राहणार्या श्रीपाद वैद्य काकांनी सांगितलं की, दुपारी तो बंद असतो. त्यामुळे मग थेट त्यांच्या क्वार्टरवर जायचं ठरवलं. मुख्य शहरामध्ये थोडी गर्दी आहे. अनेक दिवसांनी ट्रॅफिक सिग्नल्स बघितले! इतक्या दिवसांनी गर्दीत सायकल चालवतोय. लक्ष देत राहिलो- सजगता- प्रत्येक पेडल सजगतेसह होईल असा प्रयत्न आहेच. जिपमर हॉस्पिटलमध्ये वैद्य काकांचा मुलगा- वेदांत डॉक्टर आहे. सुंदर कँपस! काका माझ्यासाठी समोर येऊन थांबले होते! त्यांच्या घरी आलो, आप्त भेटले आणि अगदी घरी आल्यासारखं वाटलं! आजचे ९६ किलोमीटर झाले. हेड विंड असूनही पेडलिंगच्या पाच तासांच्या आत पोहचलो.
नंतर आराम, गप्पा आणि जुन्या परभणीच्या आठवणी निघाल्या. काका- काकूंसोबत छान भेट झाली. संध्याकाळी काका, त्यांचे नातेवाईक आणि मी तिघं रिक्षाने श्री अरविंद आश्रमात गेलो. श्री अरविंद! त्यांच्याबद्दल खूप वाचलं आहे. एके काळचे क्रांतीकारक आणि नंतर उच्च कोटीचे संन्यासी! श्री अरविंद आणि श्रीमाताजी. मानव उच्च प्रज्ञेपर्यंत पोहचावा, ह्यासाठी त्यांनी खूप वेगळ्या प्रकारे स्वत:ला वाहून घेतलं. एका प्रवचनात ओशोंनी म्हंटलंय की, स्वातंत्र्यासाठी गांधीजी किंवा क्रांतीकारकांनी केलेले प्रयत्न दिसतात. पण श्री अरविंदांचे प्रयत्न भविष्यात लोकांना कळतील. त्यांनीसुद्धा पडद्याआड राहून चेतनेच्या पातळीवर खूप मोठं काम केलं आहे. त्यांची सगळी साधना- ऊर्जा तिकडे त्यांनी वळवली होती.
आश्रम तसा छोटेखानी आहे. मोबाईल बाहेर ठेवून आत गेलो. समाधीपाशी काही वेळ बसलो. सगळे जण मौनात आहेत. थोड्या वेळाने आश्रमातलं ग्रंथालय बघितलं. वेगवेगळ्या भाषांमध्ये त्यांची आणि त्यांच्याबद्दलची पुस्तकं. त्यांच्या एका शिष्याचं पुस्तक विकत घेतलं.
काकांसोबत बीचवर आलो. व्हाईट टाऊन परिसर. इथल्या इमारती फ्रेंच पद्धतीच्या आहेत. अगदी घरांची नावं व रस्त्यांची नावंसुद्धा! बीचवर आल्यावर तो दिसला! त्याची गर्जना! लाटा! आणि समुद्राच्या थोडा वर आकाशात चंद्र! हे दृश्य महाराष्ट्राच्या तुलनेत अगदी वेगळं! समुद्रावर चंद्राची कोर बघितलेली आहे. पण शुक्ल पक्षातला द्वादशी- त्रयोदशीचा चंद्र समुद्राच्या पार्श्वभूमीवर! वा! बीचवर गर्दी आहे. पण तरीही काही ठिकाणी समुद्र शांतपणे अनुभवता आला. बीचवर फिरत फिरत काका गांधीजींच्या पुतळ्याकडे घेऊन गेले. आज ३० जानेवारी असल्यामुळे गर्दी आहे. बराच वेळ फिरल्यावर आश्रमासमोरचं मंदिर बघायला गेलो. सुंदर बांधकाम आणि शिल्प! इथे आतमध्ये खूप गर्दी आहे. त्यामुळे बाहेरूनच दर्शन घेतलं.
आश्रमातले एक वरिष्ठ सदस्य श्री. मातृप्रसादजींसोबत थोड्या वेळ भेट झाली. ते व्यस्त होते पण त्यांनी वेळ दिला. ते मुळचे उत्तर भारतातले आहेत. ते माझ्या बाबांच्या ओळखीचे आहेत. त्यांना सायकल प्रवासाचा उद्देश, निरामय संस्थेचं काम आणि स्वरूप सांगितलं. ते बोलता बोलता सहज म्हणाले की, मी इथे ५३ वर्षांपासून आहे! म्हणजे त्यांचं वय किमान ७५ तर असेल. पण वाटत होते अगदी पन्नास- पंचावन्न वयाचे. वैद्य काका व दुसरे काकाही चकित झाले. .
.
.
.
संध्याकाळी वैद्य काकांचा मुलगा- वेदांतसोबत गप्पा झाल्या. जिपमर हॉस्पिटलमध्ये तो डॉक्टर आहे आणि प्रचंड व्यस्त असतो. आता ओढ आहे ती थिऑसॉफिकल सोसायटी आणि शेवटच्या दिवसाची! आज हेड विंड असूनही चांगला वेग मिळाला. उद्या बघू कसं होतं! हेड विंडने वेळ तर जास्त लागतोच, पण मग जास्त ऊन, जास्त दमणं आणि वेळेचं गणितही कोलमडतं! वेळ लागेल, पण थेट एकाच दिवसात उद्याचा टप्पा पूर्ण करेन. थिऑसॉफिकल सोसायटी बघून निरामयच्या चेन्नै शाखेमध्ये म्हणजे माझ्या बहिणीच्या घरी सायकल प्रवासाचा शेवट करेन!
पुढील भाग: दक्षिण भारतातील सायकल प्रवासाचे अनुभव २०: पुद्दुचेरी- चेन्नै १५० किमी
वाचल्याबद्दल धन्यवाद. माझ्या ब्लॉगवर ट्रेकिंग, आकाश दर्शन, विज्ञान प्रयोग, ध्यान, फिटनेस, सायकलिंग इ. बद्दलचे लेख उपलब्ध. -निरंजन वेलणकर 09422108376. लिहीण्याचा दिनांक- 3 जून 2026.
मिसळपाव
प्रतिक्रिया