मी वर दिलेल्या "कोर्टशिप" या शीर्षकाचा आणि कोर्टकचेरीचा काहीही संबंध नाही, हे तुमच्या सहज लक्षात येईल. त्यासाठी तुम्ही "चाणाक्ष वाचक" वगैरे असण्याची काहीच गरज नाही. कोर्टाची पायरी चढण्याची वेळ कुणावरही न येवो, पण कोर्टशिप करण्याची संधी मात्र प्रत्येकाला मिळावी.
कोर्टशिप म्हणजे प्रणयाराधन. या पृथ्वीतलावर जेवढे म्हणून प्राणीमात्र आहेत ते सगळे प्रणयाराधन करतच असतात. मग मादीला आकर्षित करण्यासाठी कीटक विशिष्ट गंध सोडतात. फुलपाखरं रंगीबेरंगी पंख पसरवतात. मोर पिसारा फुलवून नाच करतो. कोकिळ कुहू कुहू अशी साद घालतो. झाडांना मग फुलं येतात. त्या फुलांमध्ये मध भरतो. कुत्रा, मांजर यांचा "प्यार का मौसम" आपल्याला माहीत आहेच.
माणूस हा प्राणी या प्रणयाराधनाला अपवाद अर्थातच् नाही. टीन एजपासूनच हे प्रणयाराधन सुरु होतं.
आपलं सर्व साहित्य, कथा, कविता, नाटकं, टी व्ही सिरियल्स, मल्टिप्लेक्स, पीव्हीआर, ओटीटीवर झळकणारे सिनेमे , त्यांचं कथानक, गाणी, त्यावरचे नाच या सगळ्यांमध्ये माणसाच्या कोर्टशिपचाच काळ दाखवलेला असतो. कारण माणसाच्या आयुष्यात तोच काळ सर्वात जास्त आकर्षक, चमकदार, सुखावह, धुंद करणारा, नशीला, नटखट, स्वप्नील, हवाहवासा वाटणारा, कधी संपूच नये असं वाटणारा, सर्वोच्च आनंदाचा, मजेचा, रंगीला, सर्वस्व वाहून टाकायला लावणारा, बेभान करणारा, मदहोश करणारा, अविस्मरणीय अनुभव देणारा, स्वत्व, अहंकार समर्पित करायला लावणारा, असा "द बेस्ट" काळ असतो. तो काळ सोडला तर बाकी उरतंच काय आयुष्यात?
शिरीन फरहाद, सोनी महिवाल, हीर रांझा, लैला मजनू, या जोड्या "तहे दिलसे" कोर्टशिप करणाऱ्या म्हणून प्रसिद्ध आहेत. एखाद्याची प्रेयसी दिसायला तितकीशी बरी नसली तर "लैला को देखो मजनूकी आँखोंसे", असं म्हणून समजूत काढली जाते. प्रेयसीचं प्रेम मिळवण्यासाठी कुणी श्रीमंतीचं सोंग आणतो तर कुणी उच्चशिक्षित असल्याचं भासवतो. मग ते दोघे बागेत पळत गाणी म्हणतात, नाचतात,पावसात भिजतात.
यात वाचकांना, श्रोत्यांना, प्रेक्षकांना चेंज म्हणून दोघांचा विरह दाखवतात. आसवांचा पूर येतो. गाणी म्हटली जातात. या गाण्यांवर लोक जीव ओवाळून टाकतात. वर्षानुवर्षे अनेक गीतकार, संगीतकार, वादक, गायक आणि गायिका यांना लाखो रुपये कमावता येतात.
प्रियकर, प्रेयसीच्या प्रेमात विघ्न आणण्यासाठी एक खलनायक हजर असतोच. त्याचे विविध कारनामे नायक हाणून पाडतो. शेवटी नायिकेला मिळवतोच. प्रत्येक कलाविष्कारात हीच 'थीम' असते. अगदी राम सीता आणि रावणापासून! पण ही तीच तीच थीम माणसाला आवडते. कारण कोर्टशिप-प्रणयाराधन माणसाला आवडतं.
हे प्रणयाराधन असफल झालं तरी त्यासाठी अश्रू ढाळायलाही मानव प्राण्याला आवडतं. प्रेमभंग झालेला नायक/नायिका यांच्यापासून प्रभावित होऊन काही मानवप्राणी 'सनम बेवफा' असं गाणं गात गात आत्महत्या करतात. काहीजण मनोरुग्ण होतात. काहीजण व्यसनाधीन होतात. उदास , खिन्न मनाने पुढचं आयुष्य कसंतरी ढकलतात.
काही प्रेमवीर आणि वीरांगना मात्र असे उदास, निराश वगैरे होत नाहीत. ते एकदा नाही तर अनेकदा प्रेमात पडतात. त्यांचं 'दिल' शक्तिमान, मजबूत असतं. त्यांचं हृदय सिंहासन विशाल असतं. त्या सिंहासनावर अनेक प्रियकर, प्रेयस्या आरुढ होऊ शकतील एवढी 'स्पेस' असते. हृदयसिंहासनाखेरीज, एक्स्ट्राॅ खुर्च्या, आणि आवश्यकता पडल्यास सतरंज्याही अंथरलेल्या असतात.
ते प्रणयाराधन लाईटली घेतात. उगीच लांबडा चेहरा करून हिंडत नाहीत किंवा सर्व सुखांचा त्याग करून संन्यासही घेत नाहीत. ते, "तू नहीं और सही" असं म्हणत "थाम ले दूसरा कोई दामन", असं म्हणत बिनधास्त दुसरा ऑप्शन निवडताना दिसतात.
"प्यार सब कुछ नहीं जिंदगी के लिये", हे व्यवहार्य तत्त्वज्ञान स्वीकारतात.
त्याचं काय आहे, मानवी जीवन या पृथ्वीतलावर सुरू झालं तेव्हापासून आलेल्या अनुभवावरून माणसाच्या काही मूलभूत प्रवृत्ती (basic instincts) तयार झाल्या आहेत. त्या आता त्याच्या प्रतिक्षिप्त क्रिया, Reflex actions झाल्या आहेत. भीती, पलायन, हर्ष , हिंस्त्रता, युयुत्सु वृत्ती याचप्रमाणे "कामेच्छा" ही देखील त्याची सहज प्रवृत्ती आहे. ती त्याची अंगभूत प्रवृत्ती आहे. तो ती टाळू शकत नाही. शिल्पकला, चित्र कला,धातुकला, नृत्य,गायन, ह्या विविध कला देखील "कामवासने"चेच विविध प्रकारचे आविष्कार आहेत, असे मानले जाते.
तुम्हीच बघा ना! कोणतीही साहित्यकृती वा दृकश्राव्य कलाकृती घ्या. त्यात प्रणयाराधन दाखवून झालं, की त्या दोघांचं मीलन म्हणजेच लग्न झालेलं दाखवतात. त्यानंतर "द एन्ड", "समाप्त", अशी अक्षरं झळकतात. म्हणजे मीलन हा प्रणयाराधनाचा हेतू, आणि तीच त्याची फलश्रुती.
किती प्रायमरी लेव्हलचं आहे हे सगळं ! काही प्रेक्षकांना नायक नायिका यांचं प्रत्यक्ष लग्न झालेलं दाखविल्याशिवाय समाधान होत नाही. किती गोड असा भाबडेपणा! एनिवे .. या प्रणयाराधनाचा अनुभव प्रत्येकाला मिळावा ही सदिच्छा व्यक्त करते.
खऱ्याखुऱ्या प्रेमाचा अनुभव हा आयुष्य सुफळ, संपूर्ण करणारा , जीवनाला पूर्णत्व देणारा, अलौकिक,या मर्त्य जगाच्या पलिकडचा,दिव्य अनुभव असतो.
मिसळपाव
प्रतिक्रिया