Skip to main content

दक्षिण भारतातील सायकल प्रवासाचे अनुभव ९: अमृतापूरी- तिरूअनंतपूरम १०० किमी

लेखक मार्गी यांनी रविवार, 24/05/2026 16:58 या दिवशी प्रकाशित केले.

✪ चिन्मय मिशन पद्मनाभ केंद्रात भेट 

✪ रस्ता, डायवर्जन आणि परत रस्ता 

✪ "आर्याज" हॉटेलातला अप्रतिम केरळी उपमा! 

✪ तिरूअनंतपूरम- दक्षिणेकडील महानगर 

✪ प्राचीन आणि रमणीय मंदिरं 

✪ स्वामी सुधीर चैतन्यजींसोबत संवाद 

✪ “Appointments and disappointments!” 

 

नमस्कार. २० जानेवारीची सकाळ. अमृतापुरीमध्ये ब्रह्मचारी रवीजींनी छान व्यवस्था केली होती. त्यांच्याशी छान बोलणं झालं. अगदी घरच्याप्रमाणे त्यांनी सोबत केली. सकाळचा चहा घेतला, आठवणीसाठी रवीजींसोबत फोटो घेतला आणि निघालो. “त्याच्या" सोबत पुढचा प्रवास सुरू झाला! कधी कधी विश्वास बसत नाहीय मी इथे सायकल चालवतोय आणि इतकं कुठे कुठे फिरतोय! गेल्या आठ दिवसांमध्ये कुठे कुठे जाऊन इथे आलोय, हे लवकर आठवतसुद्धा नाहीय! खरंच माझं नशीब! आणि हे करण्याची मला बुद्धी झाली! 

(माझा ब्लॉग इंग्रजीत इथे वाचता येईल. सायकल प्रवासातले फोटो बघता येतील‌ व सर्व लेख एकत्र वाचता येतील. त्याशिवाय विज्ञान प्रयोग, गणितातील गमती, ट्रेकिंग, ध्यान, आकाश दर्शन, फिटनेसबद्दलचे लेख तिथे वाचता येतील.) 

 .  .   

सायकल दौ-याच्या आयोजनामध्ये समन्वयन- कोऑर्डिनेशनसुद्धा खूप महत्त्वाचं असतं. थांबण्याचे टप्पे, तिथे भेट द्यायची त्या संस्था, राहण्याची सोय इ. प्रत्यक्ष पेडलिंग, योग्य आहार, योग्य विश्रांती, गरजेनुसार इलेक्ट्रॉल ह्यासोबत हे समन्वयनसुद्धा खूप महत्त्वाचं असतं. निरामय योग प्रसार व संशोधन केंद्र, परभणीची टीम सगळ्या टप्प्यांचं नियोजन करते आहे. ओळखीतल्या- परिचयातल्या व्यक्ती व संस्थांशी संपर्क सुरू आहे. त्यामुळेच तर बराचसा प्रवास खूप सुलभ होतो आहे. अनेक नवीन व्यक्ती व संस्थांशी ओळखीही होत आहेत. 

सकाळच्या शीतल हवेत पहिला टप्पा पूर्ण केला. समुद्र किना-याने काही अंतर जाऊन परत मुख्य महामार्ग आला. पण हा महामार्ग डायवर्शन्स म्हणजे विचलनांनी भरलेला आहे! रस्ता- डायवर्जन आणि रस्ता असा क्रम सुरू राहिला! त्यात कुठे कुठे मोठ्या वाहनांची दाटी. साधारण ३० किलोमीटर अंतरावर नाश्त्यासाठी थांबलो. आर्याज नावाच्या हॉटेल फ्रँचायजीमध्ये अतिशय उत्तम असा उपमा मिळाला! कधीही विसरणार नाही इतका स्वादिष्ट! 

सायकलिंग आता खूप सोपं झालंय. इतके दिवस सलग राईडस करतोय, त्यामुळे पायांमध्ये खूप शक्ती आली आहे. स्नायु सरावले आहेत. एक मूमेंटमसुद्धा मिळाला आहे. त्यामुळे आता विशेष दमायलासुद्धा होत नाही. फक्त इतर घटकांमुळे थोडा फरक पडतो. दुपारनंतर परत किना-यालगतचा दमटपणा सुरू झाला. शिवाय महामार्ग असल्यामुळे झाडं व सावल्या नाहीच. पाणी पीत राहिलो आणि ओआरएससुद्धा घेतलं. नंतरच्या टप्प्यावर जेव्हा काही खावसं वाटलं, तेव्हा नेमकं व्हेज हॉटेल नाही मिळालं. चहा- बिस्कीट आणि चिक्क्या असंच खाल्लं. रस्ता तसा समतलच आहे. चढ- उतार नाहीत. हळु हळु तिरूअनंतपूरम जवळ येतंय. मनातल्या मनात रँडम गाणी ऐकतोय आणि सायकलिंगचा आनंद घेतोय. 

भारताने पहिलं रॉकेट जिथून सोडलं ते थुंबा नकाशात जवळच दिसलं! तिरूवनंतपूरम! केरलमची राजधानी आणि दक्षिणेतलं एक मोठं शहर! मोठ्या इमारती, विस्तीर्ण शहरी वस्ती आणि आंतरराष्ट्रीय कंपन्यांची कार्यालयं. दुपारची वेळ असल्यामुळे विशेष रहदारी नाही आहे. अगदी वेळेत म्हणजे १ वाजता चिन्मय मिशनच्या पद्मनाभ नावाच्या मुख्य केंद्रात पोहचलो. बरोबर १०० किमी झाले. ईशा आदि योगीपासूनचे सलग चार दिवसांमध्ये चार शतक झाले. स्वामी सुंदर चैतन्यजींनी इथे बोलून ठेवलं आहेच. स्वामी सुधीर चैतन्यजी बाहेर गेले आहेत. 

चिन्मय मिशनचं हे कॉरपोरेट कार्यालय आहे. प्रशासन, समन्वयन, बैठका, कार्यशाळा, प्रशिक्षण इ. इथे होतात. व्हॉलंटीअर्स राहण्याच्या डॉर्मिटरीमध्ये मला राहायची जागा मिळाली. इथे व्हॉलंटीअर असलेला एक जण पूर्वी ईशा केंद्रात होता, असं म्हणाला. त्यांच्याशी अनौपचारिक संवाद झाला. दुपारचं जेवण खूप दिवसांनी घरासारख्या ठिकाणी केलं! किचनमधल्या ताईसुद्धा एक एक शब्दाने पण आपुलकीने विचारपूस करत आहेत!  .  .  .  .   

आज टप्पा थोडा छोटा असल्यामुळे दुपारी लॅपटॉपवर थोडं काम करता आलं. ह्या सगळ्या प्रवासात असं काम करण्यासाठीच लॅपटॉप जवळ ठेवला आहे. काही काही दिवस तरी काम करता येतंय. संध्याकाळी स्वामी सुधीर चैतन्यजी भेटले. त्यांच्याशी छान गप्पा झाल्या. चिन्मय मिशनने आधी एकदा तिरूअनंतपूरम ते कासारगोडा (दक्षिण ते उत्तर केरलम) अशी सायकल यात्रा केली होती. त्याबद्दल त्यांनी सांगितलं. ते स्वत:ही त्यात होते. त्यावेळी ते लोक त्या त्या ठिकाणी थांबून योग सत्रही घेत होते. संध्याकाळी ते मला पद्मनाभस्वामी मंदिर आणि अत्तुकाल भगवती मंदिर दाखवायला घेऊन गेले. दक्षिणेतली मंदिरं खूपच वेगळी आहेत! अतिशय सुंदर असं सूक्ष्म कला असलेलं बांधकाम! ती गोपुरं! खूप वेगळी भव्यता! हे बघताना प्रश्न पडतो की, आज अशी भव्य, सुंदर आणि तितकीच सूक्ष्म निर्मिती करणारे लोक कुठे असतील! 

एकूणच दक्षिण भारतात वेगळी शिस्त आणि मेहनतीची वृत्ती जाणवते. भाषेचा किंवा पार्श्वभूमीचा फरक असूनही लोक सहज बोलतात. हावभावातून संवाद होतो. अगदी एक- दोन शब्दांमधूनही छान बोलणं होतं! 

स्वामी सुधीर चैतन्यजी नंतर त्यांच्या साधनेमध्ये आणि पूजेमध्ये व्यस्त आहेत. चिन्मय मिशनच्या ह्या कार्यालयामध्ये स्वामी चिन्मयानंदांचा छान पुतळा आहे. जागोजागी त्यांचे सुविचार लावलेले आहेत. काही काही सुविचार तर अगदी सटीक आहेत. उदा., “Disappointment can come only to those who make an appointment with the future!” “In life, to handle yourself, use your head and to handle others, use your heart!” 

असा मस्त दिवस गेला. उद्या १० वा दिवस आणि हा दौरा अर्धा पूर्ण होईल! कन्याकुमारी! आणि हो, आता डोंगर जवळपास संपले. पुढे कुठेच घाट किंवा चढ लागणार नाहीत! आणि अगदी सहज पुढचे टप्पे होतील... पण हा भ्रम होता! 

पुढील भाग: दक्षिण भारतातील सायकल प्रवासाचे अनुभव १०: तिरूअनंतपूरम- कन्याकुमारी ९४ किमी 

वाचल्याबद्दल धन्यवाद. माझ्या ब्लॉगवर ट्रेकिंग, आकाश दर्शन, विज्ञान प्रयोग, ध्यान, फिटनेस, सायकलिंग इ. बद्दलचे लेख उपलब्ध. -निरंजन वेलणकर 09422108376. लिहीण्याचा दिनांक- 24 मे 2026.

लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 23
प्रतिक्रिया 0

प्रतिक्रिया