हिंदी सक्तीबद्दल
लेखनप्रकार
सध्याच्या हिंदी सक्तीच्या वाजत गाजत असलेल्या विषयावर आपले दोन आणे टाकण्याचा मोह मला आवरला नाही.
माझे सर्व शिक्षण मी महाराष्ट्रात पूर्ण केले. पहिली ते सातवी मराठी माध्यम आणि आठवीनंतर सेमी-इंग्लिश. आम्हाला हिंदी आणि इंग्रजी या दोन्ही भाषा पाचवीपासुन होत्या. हिंदी भाषा हा विषय म्हणुन मी फक्त पाचवी ते सातवी शिकलो. आठवी ते दहावी त्याची जागा संस्कृतने घेतली.
अकरावी बारावीमध्ये विज्ञान शाखेत आम्हाला फक्त एकच भाषा होती ती म्हणजे इंग्रजी. इलेक्ट्रॉनिक्स विषय निवडल्यामुळे इतर कोणताही भाषेचा विषय नव्हता. अभियांत्रिकीनंतर अभ्यास केलेली भाषा फक्त संगणकांची, माणसांची नाही.
त्यामुळे आता पद्धतशीर रित्या शाळेत तीन वर्ष शिकलेल्या भाषांचा विचार केला तर हिंदी मला आजही उत्तम समजते, बोलता येते, त्या भाषेत लिहिता येते आणि व्यक्त होता येते. याउलट संस्कृतचे तेव्हा पाठ केलेले आणि आजवर लक्षात असलेले काही श्लोक सुभाषित सोडले तर एखादा नवा संस्कृत श्लोक समोर आला तर त्यातल्या अर्ध्याअधिक शब्दांचे अर्थ लावता येतील पण श्लोकांचा अर्थ लावायला तीनतीनदा वाचल्याशिवाय किंवा भाषांतर वाचल्याशिवाय सांगता येणार नाही. त्यात बोलणे, स्वतःहून काही लिहिणे तर लांबच राहिले.
अशी अवस्था का झाली? कारण बिरबलाच्या गोष्टीतल्या सारखे आहे. भाकरी का करपली, घोडा का अडला इ. "न फिरवल्यामुळे". संस्कृतचा वाचन, लिखाण, संभाषण, नाटक, सिनेमा इ. कुठल्याही माध्यमातुन अजिबात सराव नाही. हिंदीचा मात्र सतत सराव आहे. आपल्याकडे मराठीपेक्षा जास्त हिंदी सिनेमे, हिंदी चित्रपटगीते बघितली ऐकली जातात. अनेक उत्तर भारतीय आपल्या आजूबाजूला राहतात, कार्यालयात भेटतात, त्यामुळे संभाषणाचा सराव राहतो.
मराठी, हिंदी भाषेत बरेच साम्य आहे, ज्यांना या दोन्ही भाषा येतात त्यांना हे सहज जाणवु शकते. त्यामुळेच इतर दाक्षिणात्य राज्यातून येणाऱ्या लोकांना हिंदी जशी अवघड जाते तेवढी आपल्याला जात नाही. बोलताना आपला मराठी हेल राहत असेल तेवढाच, पण त्याबद्दल कमीपणा घ्यायची गरज नाही. गुजराती, बंगाली, पंजाबी, हरयाणवी, बिहारी असे सर्व लोक हिंदी बोलतात तेव्हा त्यांचा त्यांचा हेल आणि लहेजा असतोच. आपण काही वेगळे नाही.
सांगायचं तात्पर्य त्रैभाषिक सूत्र हे अशा पद्धतीने आपल्याकडे आधीपासून आहेच. हिंदीचा याहुन अधिक प्रचार प्रसार महाराष्ट्रात अजिबात आवश्यक नाही. मराठी चित्रपटांना थिएटरमध्ये पुरेसे शो मिळत नाहीत अशी नेहमीच रड असते. घराबाहेर अनेक लोक रिक्षावाले, कॅबवाले, वेटर यांच्याशी सवयीने हिंदीतच संभाषण सुरु करतात. हिंदीचं मराठीवर सांस्कृतिक अतिक्रमण आतासुद्धा आहेच, ते वाढवायची गरज नाही.
आता पहिलीपासुन शिकवण्याचा विचार केला तर एक साधी गोष्ट बघा. आपल्याकडे आता बहुतांश चांगल्या शाळा इंग्रजी माध्यमाच्या आहेत. आसपासची बहुतांश मुलेही त्यामुळेच इंग्रजी माध्यमात शिकतात. अ आ इ आधी ए बी सी डी, एक दोन तीन आधी वन टू थ्री, आंब्या आधी मँगो, लाल पिवळ्या आधी रेड येलो शिकतात. त्यांना मराठी शब्दांचे अर्थ इंग्रजी पर्यायी शब्द वापरून सांगितले जातात.
ज्यांचं शालेय पुस्तकांच्या पलीकडे मराठी वाचन नाही त्यांना जास्त मराठी शब्द वापरून बोललं तर समजत नाही. हे फक्त मुलांच्याच बाबतीत नाही तर आजूबाजूला आपल्याच पिढीच्या मोठ्या लोकांशी बोलतानाही होतं. "हाय फाय मराठी" किंवा "प्रो लेव्हल मराठी" समजत नाही म्हणतात.
हि अशी अवस्था असतांना आणखी एक भाषा पहिलीपासून त्यांच्या माथी मारून काय होणार. मराठी आणि हिंदीत इतकं साम्य आहे कि एक ना धड भाराभर चिंध्या होण्याची शक्यता जास्त वाटते. अनेक शैक्षणिक क्षेत्रातील लोकही याचा विरोध करत आहेत.
आपल्या पिढीच्या उदाहरणावरून दिसून येते कि पाचवी पासून हिंदी शिकूनही आपलं त्या बाबतीत काही अडलेले नाही. हिंदीचा आणखी प्रसार करण्याऐवजी आपल्या मुलांची मराठी आणखी कशी उत्तम होईल, त्यांना शालेय अभ्यासक्रमात मराठी पुस्तकांची यादी देणे, मराठी कविता म्हणायला लावणे, मराठी नाटक बसवणे असे उपक्रम करून याचा प्रयत्न होण्याची गरज आहे.
याचे राजकारण कुठवर जाईल, शासकीय निर्णय काय होतील ते माहित नाही. पण ते काहीही झाले तरी सर्व मराठी पालकांनी आपल्या मुलांची मराठी चांगली होण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आजसुद्धा आहे. वर्षातुन दोन तीनदा मराठीचे स्टेटस आणि स्टोरी ठेवणे पुरणार नाही. त्यामुळे सजग व्हा, माय मराठीसाठी सक्रिय व्हा.
वाचने
4254
वाचनखूण
प्रतिक्रिया
24
पाचवीपासून हिंदी आहे तसंच
In reply to पाचवीपासून हिंदी आहे तसंच by कंजूस
मराठी भाषा पहिलं प्रेम.
खरे आहे
हिंदी सक्ती की तिसरी भाषा सक्ती?
In reply to हिंदी सक्ती की तिसरी भाषा सक्ती? by मारवा
माझा विरोध हा हिंदी भाषेला
In reply to माझा विरोध हा हिंदी भाषेला by रात्रीचे चांदणे
खरे आहे
देवेंद्र फडणवीस पुरेशी तयारी
In reply to देवेंद्र फडणवीस पुरेशी तयारी by युयुत्सु
देवेंद्र फडणवीस पुरेशी तयारी
तुम्हाला शैक्षणिक प्रयोग
In reply to तुम्हाला शैक्षणिक प्रयोग by युयुत्सु
खरे
In reply to खरे by माईसाहेब कुरसूंदीकर
पण मुळात पहिलीच्या मुलांना
मराठी कुठे शिकवली जाते का?
सर्वांचे प्रतिसादासाठी आभार.
हिंदीला किंवा कुठल्याही भाषा शिकण्याला विरोध असण्याचे कारण नाही.
In reply to हिंदीला किंवा कुठल्याही भाषा शिकण्याला विरोध असण्याचे कारण नाही. by धर्मराजमुटके
शेटजीला इंग्रजी शिकवा.
In reply to शेटजीला इंग्रजी शिकवा. by आग्या१९९०
हा हा
In reply to शेटजीला इंग्रजी शिकवा. by आग्या१९९०
शेटजीला इंग्रजी शिकवा.
In reply to शेटजीला इंग्रजी शिकवा. by धर्मराजमुटके
:)
In reply to शेटजीला इंग्रजी शिकवा. by आग्या१९९०
आरारा...
पदवी पदव्युत्तर शिक्षण राजकीय
In reply to पदवी पदव्युत्तर शिक्षण राजकीय by सुबोध खरे
अनपढ
In reply to अनपढ by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
:)
हा हा हा
केडीया