मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

शोध

शाहिर · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
गंगाेत्त्रीच्या त्या बर्फाच्छादित प्रदेशात सूर्य अस्ताला जात होता. हिमालयाच्या शांत, पण भीषण वातावरणात मी विचारमग्न होऊन चालत होतो..घर सोडून 9 महिने होऊन गेले होते. आयुष्याच्या गुंत्यात गुरफटलेलो, अपराधी भावनेने पछाडलेलो. काहीतरी हरवले होते माझे पण शोधायचे कुठे ते कळत नव्हते त्याचा शोध घेत मी इथवर आलो होतो. "कोणता शोध आहे तुझा?" एक शांत, पण गूढ आवाज ऐकू आला. मी वर पाहिलं. समोर शुभ्र वस्त्रांमध्ये एक योगी उभा होते.. पांढर्‍या दाढीचे लाटा वाऱ्यासोबत हेलकावत होते. त्यांच्या डोळ्यांत खोल तलावासारखी शांती होती. "माहिती नाही" विषण्णतेने उद्घागरलो.. काही हवाय का ?..... तेही माहिती नाही .. पैसा, कुटुंब ,माणसे सार काहीं आहे.. भौतिक दृष्ट्या सगळे आहे...पण माझ्या चुकांचा प्रायश्चित्त... आत्मशुद्धीचा शोध घेतोय मी,. कधीकाळी चेतवलेल्या सूडभावनेतून तयार झालेले हे वैभव मला जाळते आहे.निसटलेला काळं मला वाकुल्या दाखवत आहे . रोज स्वतःला पडलेला प्रश्न ? तुला खरंच हेच हवं होता का ? योगी हसले. "चालत राहा. हा मार्ग सोपा नाही. काहीतरी मिळवायचे असेल तर काही द्यावे लागेल.. सर्वकाही हवे असेल तर सर्वस्व पणाला लावावे लागेल." हुंकार भरून मी विचार न करता त्यांच्या मागे चालू लागलो. रस्त्याला शेवट नव्हता. हिमाच्छादित पर्वतामधील पायवाटा, घनदाट झाडं, निळ्याशार आकाशाखाली अव्यक्त गूढता. किती वेळ गेला, मला उमजलंच नाही. अचानक, समोर एक नितळ तलाव दिसला. इतका शांत की त्याच्या पाण्यात ढगही स्थिर भासले. सूर्याच्या शेवटच्या किरणांनी ते सोनेरी चमकत होते. त्या शांत पाण्याकडे पाहताच, माझ्या मनातली अशांतता उसळून वर आली. "हा निर्वाणाचा तलाव आहे," योगी शांतपणे म्हणाले. "इथेच तू स्वतःला समर्पित करायचं ." मी गोंधळलो. "म्हणजे?" ते पुढे सरसावले. "सर्व काही त्याग कर. तुझं नाव, तुझं पाप, तुझं पुण्य, तुझी कहाणी... हे सर्व ज्या हातांनी घट्ट पकडलंय, ते मोकळे कर. फक्त रिकामे हातच पुन्हा भरले जाऊ शकतात." मला काळजात काहीतरी हलवल्यासारखं वाटलं. स्वतःच्या नावाशिवाय मी कोण? माझ्या कहाणीशिवाय, कर्मांशिवाय, मी उरेल तरी काय? आणि त्याला अर्थ तो काय ? पण मी विचार करायचा थांबवला. तलावाच्या काठावर गेलो. डोळे मिटले. एकेक करून अर्घ्य द्यावे तसे सर्व सोडून दिलं. माझे नाव, पूर्वज, त्याच्या आठवणी, माझे प्रेम अहंकार..माझे पाप पुण्य .. प्रत्येक भावना पाण्यात विलीन झाली. क्षणभर मला काहीच जाणवलं नाही. जणू काही स्वतःला पुसून टाकलं. पण नंतर... नंतर मला नव्याने काहीतरी उमगलं. एक विलक्षण हलकेपणा, मोकळेपणा. जणू माझा पुनर्जन्म झालं होतं. मी आता मी नव्हतो. मी कोण होतो, ते ठाऊक नव्हतं. पण आता, पहिल्यांदाच मी स्वतःला पूर्ण जाणवत होतो. ते माझ्याकडे बघून हसले, मूर्ख आहेस तू, तुला जे आता वाटत आहे ते केवळ तुझ्या मनाचा खेळ आहे..पुन्हा भौतिकात गेलास की तू पुन्हा ओझे घेऊन येणार.. अजून तुझी वेळ आली नाहीये..परत जा.. पण हा नियम लक्षात ठेव, भरून घेण्यासाठी हात रिकामे लागतात..हा सृष्टीचा नियम आहे, विनाशानंतर निर्माण, मृत्यू नंतर जीवन.. हे सगळे याच नियमात बांधले गेले आहेत..

वाचन 2431 प्रतिक्रिया 0