मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

भेटीलागी जिवा

बिपीन सुरेश सांगळे · · जनातलं, मनातलं
भेटीलागी जिवा दरवर्षीप्रमाणे पालख्यांचं पुण्यात आगमन होतं. त्याच्या काळजात कळ आणणारा दिवस . दरवर्षी आषाढवारीसाठी पालख्या पंढरपूरला जातात . तुकाराम महाराजांची पालखी देहूमधून तर ज्ञानेश्वर महाराजांची आळंदीमधून प्रस्थान ठेवते . मात्र पुण्यात त्या एकत्र येतात . एक दिवस थांबतात आणि पुढे मार्गस्थ होतात . वेगळ्या मार्गाने ! ... शहरात सगळीकडे उत्सवी वातावरण असतं . मांडव , पाण्याची - जेवण्याची व्यवस्था . एक ना दोन अनेक गोष्टी . धांगडधिंग्याची गाणी वजा असतात . मंडळाच्या कार्यकर्त्यांना कधी नाही ते भजनांची ओढ लागलेली असते . भेटीलागी जिवा लागलीसे आस ... वारकरी , त्यांच्या दिंड्या , त्यांचे ट्रक, तुळशी - वृंदावनं , विणेकरी , भजनं ,टाळ -मृदंग , भजनी ठेका . त्याच्या काळजाचा ठेका मात्र चुकलेला असतो . त्याच्याही डोक्यात तिच्या आठवणींची वारी सुरु असते . आणि मनाला आस ... --------------- त्यांचा जुना वाडा होता . पुढे तीन मजली माडी . मागे आतमध्ये अंगण . अंगणाच्या एका बाजूला घरांची रांग . सगळी रिकामी . एकदा त्याच्या वडलांनी भाडेकरू ठेवायचा निर्णय घेतला आणि अनुचं कुटुंब रहायला आलं . एकदम कूल पोरगी ! त्याला वडलांचा निर्णय खूप आवडला . दोघांची नजरानजर होऊ लागली . मग बोलणं होऊ लागलं . त्यादिवशी पालख्यांचं आगमन होतं . दोघांच्या घरातली सगळी मंडळी दर्शनाला गेलेली . वाड्यात दोघेच . त्याला आज संधी मिळाली . त्याने त्याचं मन व्यक्त केलं . ती काहीच बोलली नाही . त्याला काहीच कळेना . तो सरळ पुढे झाला व त्याने तिला मिठीत घेतलं . तिने विरोध केला नाही . ----- दोघे एकमेकांच्या सहवासात आनंदी असायचे . पण पुढे तिने वाडा सोडला आणि संपर्कही . तिच्यानंतर वाड्यात आणखी भाडेकरू आले होते . त्यांच्या मुला-मुलींच्या संपर्कात ती असायची . पण याच्या नाही . कारण ? - माहिती नाही . ----- त्यादिवशी पालख्या येणार होत्या . तो सकाळपासून बाहेरच होता . संध्याकाळी तो वाकडेवाडीला पोचला . वारी येत होती . त्याला वाटलं - आपणही वारीमध्ये सामील व्हावं म्हणजे तरी आपल्या मनाला बरं वाटेल . तोही चालू लागला . त्याच्या शेजारी एक आजोबा होते . वयस्कर , गावाकडचे , हे मोठा टिळा लावलेले . पण थकलेले , तरी ते चालत होते . तो त्यांच्याकडे पाहून हसला. तेही हसले . म्हणाले ,' दरवर्षी येतो . आता एकच इच्छा - वारीमध्येच भगवंताने बोलवून घ्यावं ' तो म्हणाला , ' असं म्हणू नका आजोबा, त्यापेक्षा ग्यानबा -तुकाराम म्हणा .' ते डेक्कनला पोचले आणि आजोबा पडले की खाली . त्याने आरडाओरडा केला . त्यांना बाजूला घेतलं गेलं तिथे आरोग्य पथक होतं . नशीब ! त्यांना फार काही झालं नव्हतं , थकवा आला होता एवढंच . नर्सेस त्यांना पहात होत्या . मागून एक डॉक्टर चालत आला . बरोबर एक तरुणी . ती त्याची बायको असावी , हे कळत होतं . ती अनू होती ... वारकऱ्यांचा प्रवाह थोडाच थांबला होता . ते चालतच होते, एकामागे एक . तो मनाने -ते आजोबा झाला होता . पालख्या खूप पुढे निघून गेल्या होत्या . --------------------

वाचने 1041 वाचनखूण प्रतिक्रिया 2