मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

किंमत

सर्वसाक्षी · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
मध्यंतरी मित्राशी बोलता बोलता जुन्या आठवणी निघाल्या. कशावरुनतरी बेलासिस रोडचा उल्लेख आला. एकदम इस्माईलभाइच्या दुकानातला प्रसंग आठवला. साधारण ३७-३८ वर्ष झाली असतील, मुंबईत बहुसंख्य टॅक्सी फियाट म्हणजे ११००डी/ पुढे प्रिमिअर प्रेसिडेंट/ पद्मिनी पण कुळ तेच. अनेक गाड्या जुनाट पण तरीही उत्पनाचं साधन होत्या. दरवर्षी टॅक्सी आर्‍टीओ पासिंगला न्यावी लागायची. पासिंगला न्यायची म्हणजे गाडी जरा चमकावायला लागायची. अर्धे मेकॅनिक स्वतःच झालेले ड्रायवर किरकोळ दुरुस्त्या स्वतःच करायचे, गॅरेजचा खर्चं परवडणारा नव्हता. रंगकाम करायला पेंटर बोलवायचा. जिथे मोठ्या प्रमाणावर टेक्सीवाले असायचे तिथे आपला कंप्रेसर घेऊन पेंटर टॅक्सीवाल्याना रंग विकत आणायला सांगुन मजुरीवर एक कोट मारायचे. स्वस्त आणि मस्त. टॅक्सीवाल्याच्या दृष्टिने एकेक पैसा मोलाचा! तसे ड्युको, आणि अ‍ॅडिसन ब्लॅक जोरात चालायचे. पण त्या एरियात इस्माईल भाईच्या दुकानातला म्हणजे नॅशनल पेंट मार्ट मध्ये मिळणारा काळा रंग स्वस्त आणि फेमस होता. काळ्या रंगाचा मोठा दिलासा म्हणजे १ लिटर मध्ये पूर्ण गाडीवर ओवरकोट व्हायचा. तर हा इस्माइलभाईचा रंग इस्माईल ब्लॅक म्हणून टेक्सिवाल्यांमध्ये लोकप्रिय होता. दुकानाच्या आजुबाजुला सगळी गॅरेजेस. इस्माईलभाईकडे रंग, थिनर, पलटी, कारपॅच, पॉलिश पेपर, वईस असा सगळा माल मिळायचा. दुकानात इस्माईल्भाई गल्ल्यावर बसायचे, मुलगा अनिस गिर्हाईकं सांभाळायचा. रंगसामान मागच्या अंगाला होते. न्यायला गॅरेजमधल्या पोरांची, पेंटर लोकांची वर्दळ चालू असायची. त्या दिवशी मी गेलो तेव्हा इस्माईलभाई नेहेमी प्रमाणे गल्ल्यावर बसलेले होते. आम्ही बोलत असताना दहा बारा वर्षांची दोन पोरं वईस न्यायला आली. वईस म्हणजे कॉट्न वेस्ट चा अपभ्रंश. हे सुतड्यांचे गुंडे म्हणजे बहुधा सूत रिरण्यांमधलं जोड उत्पादन असावं. तेलकट व चिकट हात पुसायला मेकॅनिक लोकांना वईस लागायचा. माणसानं आतून वईसचे पुडे आणले आणि त्या पोरांना दिले. एका पोरानं थोडा सुतडा बाहेर काढला आणि अनिसकडे तो सुतडा नेत त्याने त्यावर थोडे थिनर ओतायची विनंती केली, म्हणाला हात साफ करायला हवं आहे. सिगरेट ओढता ओढता इस्माईलभाईनी ते ऐकलं आणि त्या पोराना एक अर्वाच्य शिवी देत जोरात खेकसले "भोसडीके, थिनर चाहिये तेरेको? ते पोरगं घाबरलं , गयावया करंत बोललं, " सेठ हात साफ करायचे आहेत". इस्माईलभाईंनी पोराना म्हणाले, कायको थिनर रे? ******** हात धोनेका हय? नोकराला हाक मारली आणि तो बाहेर येताच त्याला म्हणाले या पोराना बाहेर नळावर घेऊन जा आणि हातावर थोडी साबू पावडर टाक. मी चक्रावलो, हा इतका का भडकला? तितक्यात चहावाला पोर्‍या आला. इस्माईलभाईंनी चहाचा एक कप माझ्या हातात दिला, एक स्वतः घेतला. इस्माईलभाईंनी एक जोरदार झुरका मारत सिगरेट बाहेर टाकली आणि विझवली. माझ्याकडे पाहात हातानंच चहा पी अशी खूण करत मला म्हणाले, काय विचार करतोयस? मला शिव्या घालत असशिल ना? या इस्माईलला चुळकाभर थिनर द्यायची दानत नाही असं म्हणत असशिल? तुला माहित आहे मी थिनर का दिलं नाही? अरे या साल्यांना लत लागल्ये! वईसवर थिनर ओतून बोळा खिशात ठेवायचा आणि गपचुप हुंगायचा. हुंगलं की किक येते. म्हणून मी हराम्यांना थिनर देत नाही, हात बाहेर धुवायला सांगतो आणि हात धुवायला पावडर देतो. ऐकल्यावर अंगावर सरसरून काटा आला. एस्टर्स, झायलीन, टुलीन........संपूर्ण ऑरगॅनिक केमिस्ट्री आठवली. नावं वेगवेगळी, पण परिणाम एकच. मजासंस्था, फुफ्फुसं, त्वचा एकूण सगळ्या शरिराची बरबादी. बहुतेक करुन युपीतली गरीब कुटुंबातली ही पोरं घरात खायला नाही म्हणून आई बापांनी कामधंदा करायला कुणा ओळखीच्या माणसाच्या शब्दावर विसंबून मुंबईला पाठवलेली. गॅरेजमधल्या मोठ्या पोरांकडून ही व्यसनं शिकतात. भलत्या नादी लागतात. ज्या वयात छातीत वारा भरून हुंदडायचं त्या वयात ही पोरं आपलं शरीर उध्वस्तं करुन घेत होती. मुंबईत सगळ्यांना काम मिळतं, पोटाला अन्न मिळतं हे खरं . पण कधीकधी त्याची फार जबर किंमत मोजावी लागते.

वाचन 3808 प्रतिक्रिया 0