शशक | तीर
भावकीने मोठ्या भावाचा झोपेतच गळा घोटल्यावर बिथरलेला तो मृगजिनधारक साधूवेषात उत्तरेकडे पळत होता. ज्यांच्या वैभवासाठी त्याने आयुष्य दिले, तिसऱ्या पिढीतच ते परस्परांच्या उरावर उठलेले. एका नदीकाठी झाडाखाली थकून पहुडल्यावर त्याचा लगेचच डोळा लागला. जिवलग मित्रासोबत केलेले धमाल अग्निकांड स्वप्नात आले. गोमांस-घृताने परिपुष्ट हजारेक आर्यपुत्र घेऊन; अनार्य असंस्कृत मातृसत्ताक वनवास्यांना जिवंत जाळत केलेला धर्मसंस्थापनेचा थरार! सोळा संस्कार झुगारणाऱ्या, मनमर्जीने आवडीच्या पुरुषाशी रत होणाऱ्या नागस्त्रियांच्या, त्यांच्या कोवळ्या मुलींच्या जळताना किंकाळ्या! अगदी ताजे आर्यसत्र परवाच घडल्यासारखे.
इतक्यात कचकन तळपायातून वेदनेची अतितीव्र रक्तिम सणक त्याच्या शरीरभर झणाणली.
महाजनयादवांनी बायको लुटता प्रतिकार करताना एका डोळ्याने अधू झालेला गावकुसाबाहेरचा जारपारधी संतापदग्ध वेडापिसा होऊन जंगलात उपाशी घुमत होता. नदीकाठी झाडाखालच्या हरणाच्या दिशेने त्याने तीर सोडला होता.
याद्या
2178
प्रतिक्रिया
6
मिसळपाव
प्रतिक्रिया
छान. शेवटल्या वाक्यातून खुलासा झाला.
जारपारधी- त्या पारध्याचे नाव
In reply to छान. शेवटल्या वाक्यातून खुलासा झाला. by चित्रगुप्त
आवडली
शशक शब्दबंबाळ वाटली.
संदर्भ वेगळ्या स्वरूपात ठाऊक असतात.
छान शशक.. आवडली!