जन्मजात दुखणे येता (३) : ओठ व टाळू
लेखनप्रकार
भाग २ इथे
गर्भावस्थेच्या चौथ्या ते सातव्या आठवड्यादरम्यान ओठ तयार होतात. किंबहुना या काळातच खऱ्या अर्थाने चेहरा तयार होत असतो. ही प्रक्रिया होत असताना जर संबंधित पेशीसंयोगात काही बिघाड झाले तर बाळाचा वरचा ओठ दुभंगलेला राहतो. ओठाला पडलेली फट काही वेळेस छोटी असते तर अन्य काही वेळेस ती मोठी होऊन थेट नाकात घुसलेली असते. ह्या प्रकारचे दुभंगणे शरीराच्या एका किंवा दोन्ही बाजूंनाही असू शकते. अगदी बरोबर मध्यभागी असणारी फट तशी दुर्मिळ आहे.
टाळू हे आपल्या तोंडाच्या पोकळीचे छत आहे. त्याची वाढ गर्भावस्थेच्या सहाव्या ते नवव्या आठवड्यामध्ये होत असते. त्या दरम्यान पेशींचा संयोग नीट न झाल्यास तिथे फट राहते. त्याची रुंदी कमी-अधिक असू शकते.
या प्रकारचा दोष सुमारे २,००० जन्मापैकी एक बालकात आढळतो. आशियाई वंशात याचे प्रमाण सर्वाधिक आहे. ओठाचे दुभंगलेपण मुलग्यांमध्ये तर टाळूचे दुभंगलेपण मुलींमध्ये अधिक प्रमाणात दिसते.
कारणमीमांसा
१. जनुकीय बिघाड: काही बालकांत या दोषाबरोबर गतिमंदत्व देखील असू शकते. तर अन्य काहींत सांधेदुखी, दृष्टीदोष किंवा रक्तवाहिन्यांचे दोष आढळतात.
२. मातेची जीवनशैली किंवा आजार: यामध्ये खालील गोष्टींचा समावेश आहे:
A . गरोदर अवस्थेतील धूम्रपान : यामुळे गर्भाचा ऑक्सीजन पुरवठा कमी होतो.
B . गरोदरपूर्व मधुमेह झालेला असणे. त्याच्या जोडीला लठ्ठपणा असल्यास धोका अधिक वाढतो.
C . औषधांचे दुष्परिणाम : फिट्सच्या विकारावर देण्यात येणारी topiramate / valproic acid ही औषधे जर गरोदरपणाच्या पहिल्या तिमाहीत दिली गेली तर या दोषाचा धोका वाढतो.
हा दोष असलेल्या मुलांमध्ये खालील दोष देखील असू शकतात:
· कर्णबधिरता आणि कानाचा जंतुसंसर्ग
· खाणेपिणे व बोलणे सदोष असणे
· दातांचे दोष : यामध्ये अधिकचे दात किंवा दातांचा संयोग होणे इत्यादी गोष्टी आढळतात.
या प्रकारच्या दोषांचे निदान गर्भावस्थेत असताना सोनोग्राफीच्या मदतीने करता येते.
उपचार
दुभंगलेले ओठ अथवा टाळू शल्यक्रिया करून दुरुस्त करता येतात. ओठ दुरुस्तीचे काम मूल एक वर्षाचे होण्याच्या केले जाते तर टाळूचे काम पुढील सहा महिन्यांच्या आत करतात. या मुलांचे वय वाढल्यावर अन्य पूरक शल्यक्रिया कराव्या लागतात. गरजेनुसार दंतवैद्यकीय उपचारही केले जातात. या मुलांचे मनोधैर्य उंचावणे आणि त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करण्यासाठीही विविध समुपदेशकांची मदत घेतली जाते.
अशा बालकांना अंगावरचे दूध पाजणे हेसुद्धा एक आव्हान असते. निरोगी बालकाप्रमाणे ही बालके तोंडाने द्रव व्यवस्थित ओढू शकत नाहीत. अंगावरचे दूध वेगळे काढून ते त्यांना पाजण्यासाठी काही विशिष्ट प्रकारच्या (हाताने सहज दाबता येणाऱ्या) बाटल्या किंवा सिरिंजेस वापराव्या लागतात. शल्यक्रिया केल्यानंतरही याबाबत प्रशिक्षण द्यावे लागते (बाळाला बसवून दूध पाजणे, इत्यादी).
...................................................................................................
...................................................................................................
वाचने
2199
वाचनखूण
प्रतिक्रिया
6
उत्कृष्ट लेखमाला .........
In reply to उत्कृष्ट लेखमाला ......... by सुधीर कांदळकर
सुधीरभाऊ,
In reply to उत्कृष्ट लेखमाला ......... by सुधीर कांदळकर
सुधीरभाऊ,
शाळेत माझ्या वर्गात होता असा एक मुलगा
In reply to शाळेत माझ्या वर्गात होता असा एक मुलगा by टर्मीनेटर
बरोबर,
भाग ४