Skip to main content

औषध-प्रवेश (२) : इंजेक्शन्सचे अस्त्र

लेखक हेमंतकुमार यांनी सोमवार, 23/05/2022 05:07 या दिवशी प्रकाशित केले.
भाग १ इथे : https://www.misalpav.com/node/50235 .................... या भागात आपण औषधे देण्याचे जे शरीरमार्ग बघणार आहोत ते असे : · इंजेक्शनद्वारा दिलेली औषधे · इंजेक्शनचे अतिविशिष्ट मार्ग · स्थानिक मार्ग ok इंजेक्शन इंजेक्शन हा मुळातच लहानांपासून मोठ्यांपर्यंत कुणालाच नकोसा वाटणारा प्रकार ! त्याची कमी-अधिक भीती प्रत्येकाच्या मनात असते. इंजेक्शनचे नाव काढतात भोकाड पसरणारी मुले हे तर सार्वत्रिक दृश्य. परंतु, एरवी व्रात्य मुलांना इंजेक्शनवाल्या डॉक्टरांची भीती दाखवणारे पालक, जेव्हा स्वतःवर इंजेक्शन घ्यायची वेळ येते तेव्हा त्यांची अवस्था थोडीफार लहान मुलासारखीच झालेली असते. :) या प्रकारात त्वचेतून सुई टोचून औषध शरीरात सोडले जाते. खालील परिस्थितीत या मार्गे औषध देण्याचा निर्णय घेतला जातो: १. काही औषधे पचनसंस्थेद्वारे शोषली जाऊ शकत नाहीत. तर अन्य काही (उदा. इन्सुलिन) पचनसंस्थेतच नाश पावतात. २. बेशुद्धावस्थेतील रुग्ण ३. जेव्हा औषधाचा परिणाम तातडीने होण्याची गरज असते तेव्हा. या प्रकारे औषध देण्याचे ३ उपप्रकार आहेत : १. सामान्य इंजेक्शन : जेव्हा औषध द्रव स्वरूपात लहान प्रमाणात द्यायचे असते तेव्हा ते सिरींजमध्ये भरून सुईद्वारा टोचले जाते. २. इन्फ्युजन : जेव्हा द्रव औषध मोठ्या प्रमाणात द्यायचे असते तेव्हा ते अन्य द्रावणात मिसळून रक्तवाहिनीतून हळूहळू सोडले जाते. ३. इम्प्लांट : यात एखादे औषध त्वचेवर छेद घेऊन तिच्याखाली ठेवले जाते. सामान्य इंजेक्शन : हा प्रकार तिघांमध्ये सर्वाधिक वापरला जाणारा असल्याने त्याबद्दल सविस्तर पाहू. सामान्य इंजेक्शन शरीरात ४ प्रकारे देता येते : १. स्नायूंमध्ये. २. रक्तवाहिनीत ३. त्वचेखालच्या निकटच्या भागात ४. त्वचेमध्येच १. स्नायूंमध्ये (IM) : ok हा प्रकार खूप औषधांच्या बाबतीत वापरला जात असल्याने सर्वपरिचित आहे. आपल्यातील प्रत्येकाने कधी ना कधी या प्रकारचे इंजेक्शन घेतलेले असते. अलीकडील उदाहरण म्हणजे कोविडची लस. या प्रकारे इंजेक्शन देताना शरीरातील तीन जागा गरजेनुसार निवडता येतात : अ) दंडाची बाहेरील बाजू : इथे २ ml पर्यंत द्रव टोचता येतो. इथून टोचलेल्या औषधाच्या शोषणाची गती चांगली असते. आ) खुब्यावर : इथे ८ ml पर्यंतचा द्रव टोचता येतो. मात्र येथून होणारी शोषणाची गती वरील १ पेक्षा कमी असते. इ) मांडीची बाहेरील बाजू : इथे ५ ml पर्यंत द्रव टोचता येतो. ही जागा लहान मुलांमध्ये निवडली जाते. स्नायूमध्ये टोचलेले औषध हळूहळू झिरपत रक्तप्रवाहात पोचते. जी औषधे स्नायूदाह करणारी असतात ती या प्रकारे देता येत नाहीत; ती थेट रक्तवाहिनीतच द्यावी लागतात. २. रक्तवाहिनीतून दिलेले इंजेक्शन (IV): याप्रकारे दिलेले औषध थेट रक्तप्रवाहात जात असल्याने त्याची पूर्ण मात्रा शरीरासाठी उपलब्ध होते. सर्वसाधारणपणे या प्रकारचे इंजेक्शन नीलावाहिन्यांमधून (veins) देतात. या वाहिन्या त्वचेखालोखाल असतात आणि त्या त्वचेवरून सहज दिसतात. बहुतेक वेळा कोपर किंवा मनगटाच्या पुढील बाजूच्या नीलांची निवड केली जाते. या इंजेक्शनचे दोन प्रकार आहेत : a. एका दमात दिलेले इंजेक्शन : यात सिरींजमध्ये द्रव भरून तो रक्तवाहिनीत सोडला जातो. अशा प्रकारे जास्तीत जास्त १० ml द्रव देता येतो. रक्तात शिरलेले औषध आधी हृदय, मग फुफ्फुसे आणि मग रोहिणी वाहिन्यांद्वारा सर्व शरीरात पोचते. अशा औषधी इंजेक्शनचा परिणाम सुमारे 20 ते 40 सेकंदात दिसतो. अशा इंजेक्शनचे एक उदा. म्हणजे Calcium gluconate. b. हळू दिलेले इन्फ्युजन : जेव्हा एखादे औषध मोठ्या प्रमाणात बऱ्याच वेळासाठी द्यायचे असते तेव्हा या पद्धतीचा वापर केला जातो. यात मूळ औषध एखाद्या सलाईनच्या बाटलीमध्ये मिसळले जाते. आणि मग हे मिश्रण थेंब थेंब स्वरूपात रक्तात सोडले जाते. रुग्णालयात दाखल झालेल्या विविध प्रकारच्या रुग्णांच्या बाबतीत अशा प्रकारे औषधे दिली जातात. c. रोहिणीवाहिन्यांतून (arteries) दिलेले इंजेक्शन (IA): याचा वापर अत्यंत मर्यादित असून काही ठराविक आजारांतच केला जातो. अशा प्रकारे दिलेले औषध फक्त निवडक पेशींपुरते काम करते. उदाहरणार्थ, एखाद्या कर्करोगाची गाठ. अशा प्रकारे इंजेक्शन दिल्याने त्याचा जास्तीत जास्त परिणाम संबंधित गाठीवर होतो आणि संपूर्ण शरीरावर होणारे दुष्परिणाम कमीत कमी राहतात. तसेच विशिष्ट रोहिणीमध्ये रक्ताच्या गुठळ्या झाल्यासही या प्रकारे इंजेक्शन देतात. ३. त्वचेच्या खालच्या निकटच्या मेदथरात (SC): अशी इंजेक्शन्स सहसा दंड/मांडीच्या बाहेरील बाजूस किंवा पोटावर देतात. स्नायूमध्ये दिलेल्या इंजेक्शनपेक्षा यात कमी प्रमाणात औषध टोचता येते. त्या औषधाचे शोषण स्नायूपेक्षा कमी गतीने परंतु तोंडाने घेतलेल्या औषधापेक्षा जास्त गतीने होते. या प्रकारात ३ उपप्रकार असून त्यांची उदाहरणे अशी आहेत : a. एका दमात दिलेले इंजेक्शन: इन्सुलिनचा एक डोस किंवा रक्तगुठळ्यांच्या उपचारासाठी दिलेले हेपारिन ही त्याची परिचित उदाहरणे. b. इन्फ्युजन : सध्या विविध प्रकारचे इन्शुलिन पंप उपलब्ध आहेत. त्यातून गरजेनुसार इन्शुलिन शरीरात सोडले जाते. c. इम्प्लांट : यात त्वचेवर छोटीशी शस्त्रक्रिया करून औषध आत छोट्या वडीच्या स्वरूपात ठेवले जाते. गर्भनिरोधक हॉर्मोन्स हे याचे उत्तम उदाहरण आहे. अशा वडीतून संबंधित औषध सुमारे 3 ते 5 वर्षे हळूहळू शरीरात सोडले जाते. ४. त्वचेमध्ये दिलेले इंजेक्शन (ID) : साधारणपणे ते हाताच्या कोपर ते मनगट या पट्ट्यातील पुढच्या बाजूस दिले जाते. अशा प्रकारे दिलेले औषध रक्तप्रवाहात जवळजवळ शोषले जात नाही. याची ठळक उदाहरणे : a. काही रोगांसाठी लसीकरण b. रोगनिदान चाचण्यांसाठी टोचलेला द्रव. …. पारंपरिक इंजेक्शन पद्धतीत सिरींजमध्ये औषध भरले जाते आणि तिला जोडलेल्या सुईमार्फत शरीरात सोडले जाते. यामध्ये रुग्णाला सुई टोचणे हा भाग वेदनादायी असतो. त्या दृष्टीने सुईविरहित इंजेक्शन ही संकल्पना गेल्या दशकात मांडली गेली. त्यावर अव्याहत संशोधन चालू आहे. या तंत्रज्ञानात विशिष्ट औषध खालील प्रकारे त्वचेतून आत वेगाने सोडले जाते : · धक्का लहरींचा वापर · वायुदाबाचा वापर · सूक्ष्म वीजवापर · लेझर तंत्र ok या नव्या पद्धतीचे फायदे आणि तोटे दोन्ही लक्षात घ्यावे लागतील. · फायदा : काही औषधे मुळातच घट्ट व चिकट स्वरूपाची असतात. ती पारंपरिक इंजेक्शनने देता येत नाहीत. ती देणे आता शक्य होईल. · तोटा : औषध त्वचेखाली सोडण्यासाठी उच्च दाबाचा वापर केला जातो. त्यातून त्वचेखालील थरांना इजा होऊ शकते. · एक महत्त्वाचे : या नव्या तंत्राने रक्तवाहिनीतून इंजेक्शन देता येत नाही. इंजेक्शनचे बाकी वर वर्णन केलेले इतर मार्ग या प्रकारे हाताळता येतील. ........................ औषधे देण्याचे अतिविशिष्ट मार्ग काही आरोग्य समस्यांमध्ये एखादे औषध संपूर्ण रक्तप्रवाहात मिसळण्याऐवजी शरीराच्या ठराविक भागापुरतेच आणि तातडीने तिथे पोचणे आवश्यक असते. अशा प्रसंगी या विविध मार्गांचा अवलंब केला जातो. A. पाठीच्या कण्यातील मज्जारज्जू त्याच्या अंतर्गत भागात इंजेक्शनच्या माध्यमातून औषधे देता येतात. मुख्यत्वे हे मार्ग ठराविक शस्त्रक्रियांच्या पूर्वी भूल देण्यासाठी वापरतात. यामध्ये दोन उपप्रकार आहेत : १. Epidural : हा प्रकार बाळंतपणाच्या वेदना कमी करण्यासाठी बऱ्यापैकी वापरला जातो. २. स्पायनल : यात औषध मज्जारज्जूच्या आत असलेल्या द्रवात सोडले जाते. काही आजारांमध्ये रुग्णास असह्य वेदना होत असतात तेव्हादेखील या मार्गाद्वारे वेदनाशामक औषध देता येते. B. थेट मेंदूच्या अंतरंगात (पोकळीत) इंजेक्शन: मेंदूच्या विशिष्ट ट्युमरमध्ये हा मार्ग वापरतात. C. थेट हृदयात दिलेले इंजेक्शन जेव्हा काही कारणाने अचानक हृदयक्रिया बंद पडते तेव्हा Adrenalineचे इंजेक्शन एका लांब सुईतून थेट हृदयात देता येते. एकेकाळी या मार्गाचा वापर करण्यात येत असे. परंतु अलीकडे अशा प्रसंगात वापरण्यासाठी अन्य चांगले मार्ग उपलब्ध झाल्यामुळे सहसा या मार्गाचा वापर केला जात नाही. तसेही हा मार्ग कटकटीचा व इजा पोचवणारा असतो. D. सांध्यामध्ये दिलेले इंजेक्शन काही प्रकारच्या संधिदाहांत स्टिरॉइड्सचे इंजेक्शन हे विशिष्ट सांध्यांमध्ये देता येते. E. लिम्फ ग्रंथींमध्ये काही ऑटोइम्यून आजारांमध्ये इथे इंजेक्शनद्वारा मूळ पेशी देण्यात येतात. F. हाडाच्या गाभ्यात इंजेक्शन: आणीबाणीच्या परिस्थितीत, विशेषतः लहान मुलांमध्ये जेव्हा नीलारक्तवाहिनी इंजेक्शनसाठी सापडू शकत नाही तेव्हा या मार्गाचा अवलंब करता येतो. G. अन्य मार्ग : उदरपोकळी तसेच फुप्फुसे आणि त्यांच्या आवरणांच्या मधल्या पोकळीत थेट औषध देता येते. H. विविध स्थानिक मार्ग : डोळे, कान, योनी, गुदद्वार आणि त्वचा या अवयवांच्या सौम्य आजारांत काही औषधे थेंब किंवा मलम स्वरुपात दिली जातात. डोळ्यांच्या मोतीबिंदूच्या शस्त्रक्रियेपूर्वी डोळ्यामध्ये स्थानिक भूल देणारे थेंब आता नित्यनेमाने वापरले जातात. त्वचेवर लावायची औषधे तेल, मलम आणि औषधी पापुद्रा या स्वरुपात असतात. अलीकडे काही वेदनाशामक औषधे अशा पापुद्र्याच्या स्वरूपात मिळतात, जो त्वचेवरची लावून ठेवता येतो. त्यातून औषध हळू गतीने दीर्घकाळ बाहेर पडत राहते. I. शरीराच्या एखाद्या भागाची छोटी शस्रक्रिया करताना स्थानिक भूलकारक औषध इंजेक्शन किंवा फवाऱ्याच्या स्वरुपात दिले जाते. J. योनीमार्गे गर्भाशयात बसवलेली गर्भनिरोधक साधने : या साधनांद्वारा काही प्रकारची गर्भनिरोधक औषधे तिथे दीर्घकाळ साठवून ठेवली जातात. 1980- 90 च्या दशकात ‘तांबी’ (Copper T) हे खूप वापरात होते. अलीकडे अशा साधनांमध्ये प्रोजेस्टेरॉनशी संबंधित रसायने वापरलेली असतात. ........................................................ औषध आणि दवाखाना - अगदी नकोनकोसे वाटणारे शब्द ! पण करता काय ? जन्मापासून ते मृत्यूपर्यंत प्रत्येकाला कधी ना कधी कुठले तरी औषध घ्यायची वेळ येतेच. आधुनिक वैद्यकानुसार औषधे घेण्याचे तब्बल २३ मार्ग/ प्रकार आपण या लेखद्वयात पाहिले. अर्थात हा आकडा अंतिम समजू नये ! सामान्यज्ञानाच्या मर्यादेत एवढे पुरे म्हणून विवेचन थांबवले आहे. काही औषधे गोळी/ फवारा/ इंजेक्शन या सर्व स्वरूपात उपलब्ध असतात (उदा. स्टिरॉइड्स). पण काही औषधे त्यांच्या शोधापासून आजतागायत इंजेक्शन स्वरूपातच उपयुक्त ठरली आहेत. (उदाहरणार्थ इन्सुलिन). अर्थात त्यामागे जैवरासायनिक कारणे आहेत. अशी औषधे गोळीरूपात आणण्याचे संशोधकांचे आटोकाट प्रयत्न अनेक दशकांपासून चालू आहेत. त्याला भविष्यात यश येवो. आपल्या वाचकांपैकी...... · जे तरुण आहेत त्यांना कुठलाही दीर्घकालीन आजार मागे न लागो ही इच्छा; · जे मध्यमवयीन आहेत त्यांच्यातील काहीजणांना कुठला तरी आजार झालेला असू शकेल. त्याचे उपचार मोजक्या गोळ्या /फवाऱ्यापुरते मर्यादित राहोत ही सदिच्छा; आणि · ज्यांच्यावर दीर्घकालीन इंजेक्शनरुपी औषध घेण्याची वेळ आलेली आहे, त्यांना ते सहन करण्याची ताकद मिळो ही प्रार्थना. ................................................................. समाप्त
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 25431
प्रतिक्रिया 76

प्रतिक्रिया

इंजेक्शनचा आत्महत्येसाठी असा झालेला वापर पाहून दुःख झाले आदरांजली.

हाडांच्या जंतुसंसर्गासाठी स्थानिक औषध रोपण करण्याचे नवे तंत्रज्ञान विकसित होत आहे. यामध्ये एखादे प्रतिजैविक बोन सिमेंटमध्ये मिसळून या मिश्रणाचा implant हाडांमध्ये केला जातो त्यातून उपयुक्तता खूप वाढते

तामिळनाडूतील ग्लोबल फार्मा या कंपनीने बनवलेले डोळ्यांचे औषधी थेंब अमेरिकेतील लोकांसाठी बऱ्यापैकी वापरले गेले. या औषधी थेंबांमधून सुमारे 68 जणांना Pseudomonas या जंतूचा संसर्ग झाला आणि तो गंभीर स्वरूपाचा होता. परिणामी तीन जणांचा मृत्यू आणि आठ जणांना आपले डोळे गमवावे लागले आहेत. ग्लोबल फार्मा उद्योगाची अमेरिकी औषध प्रशासनाकडून तपासणी झाली असता तिथल्या औषध निर्मितीमध्ये अनेक त्रुटी आढळलेल्या आहेत. निर्जनतुकीकरणाविषयी बेफिकिरी ही त्यातील महत्त्वाची बाब. त्या कंपनीच्या डोळ्यांच्या औषधी थेंबांमधून संबंधित लोकांना Pseudomonas या जंतुसंसर्गाचा त्रास झाला. हा जिवाणू चांगल्यापैकी घातक आहे. जर त्याने व्याधीग्रस्त लोकांच्या शरीरात शिरकाव केला तर अनेक अवयवांना गंभीर इजा होतात. डोळ्यांना झालेली इजा खूपदा शोकांतिक ठरते. या जंतू विरोधात औषधे असूनही अलीकडे तो पारंपरिक औषधांना दाद देईनासा झालेला आहे.

In reply to by हेमंतकुमार

आता कंपनीने बाजारातील सर्व बाटल्या परत मागवल्यात. https://www.fda.gov/safety/recalls-market-withdrawals-safety-alerts/glo… …. या दुर्घटनेनंतर भारतात केंद्रीय आणि राज्य पथकांनी अप्रमाणित औषधांचे उत्पादन करणाऱ्या कंपन्यांच्या विरोधात धडक कारवाई चालू केली आहे. 76 औषध कंपन्यांची तपासणी होऊन त्यापैकी 18 जणांचा परवाना रद्द झाला आहे.

उपयुक्त माहिती . --- D. सांध्यामध्ये दिलेले इंजेक्शन काही प्रकारच्या संधिदाहांत स्टिरॉइड्सचे इंजेक्शन हे विशिष्ट सांध्यांमध्ये देता येते. -- माझ्या माहितीप्रमाणे पेन मॅनेजमेंट तज्ञ जास्त करुन त्यांच्या संधिदाहांत संबंधी pain management clinical procedures मध्ये या स्टिरॉइड्सचे इंजेक्शन चा वापर करतात . बरेचदा शरीरातील अनेक विशिष्ट सांध्यांमध्ये खुप वापर झाला / झीज झाली तर तेथील बाह्य भागावर सुज येते . हि सुज सांध्यांच्या आतील भागांमधे दुषित पाणी / synovial fluid / joint inflammation / joint effusion या स्वरूपात जमा होते . अल्ट्रा सोनोग्राफी , एम आर आय या माध्यमांमधुन याचा तपास करता येतो . अल्ट्रा सोनोग्राफी , एम आर आय यांच्या रीपोर्ट मधे याचा उल्लेख effusion / joint effusion किंवा fluid असा होतो. हि सुज शोधणे व ती extract करणे / शरीराबाहेर काढण्यामधे orthopedic तज्ञांपेक्षा pain management तज्ञांचा जास्त उपयोग होतो . हि सुज extract करणे / शरीराबाहेर काढ्ण्याच्या कृतीला joint aspirate procedure असे म्हणतात . त्यानंतर joint inflammation कमी व्हावे म्हणुन मेडिकल मान्यताप्राप्त स्टिरॉइड्सचे इंजेक्शन चा वापर केला जातो . गुडघेदुखी व अन्य सांधेदुखी कमी होण्यासाठी या pain management clinical procedures चा उपयोग होतो . अनेक मोठ्या hospitals मधे pain management तज्ञांचा वेगळा विभाग असतो तसेच त्यांची क्लिनिक्सही असतात . या विभागातर्फे गुडघेदुखी व अन्य सांधेदुखी या संबधी operations postpone करणे वा टाळण्यासाठी अनेक पर्याय उपलब्ध असतात जसे की - स्टेम सेल थेरपी , प्लासमा सेल थेरपी , पी आर पी इंजेक्शन्स .