Skip to main content

पचनसंस्थेतील वायूनिर्मिती

लेखक हेमंतकुमार यांनी सोमवार, 03/01/2022 09:06 या दिवशी प्रकाशित केले.
सर्व सभासदांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा ! सर्वांना उत्तम आरोग्य लाभो. …………………………………………………………………………………. अन्न ही आपली जगण्यासाठीची प्राथमिक गरज. आपण जे अन्न खातो ते जसेच्या तसे शरीर पोषणासाठी वापरता येत नाही. प्रथम त्याचे पचन करून ते सुलभ स्वरूपात आणावे लागते, जेणेकरून ते पेशींपर्यंत पोचते. त्या महत्त्वाच्या कामासाठी आपली पचनसंस्था कार्यरत असते. त्या संस्थेचे प्रमुख भाग म्हणजे तोंड, अन्ननलिका, जठर, लहान आणि मोठी आतडी. आपल्या खाण्याच्या क्रियेबरोबर काही प्रमाणात हवा सुद्धा पोटात जाते. तसेच अन्नपचनाच्या दीर्घ प्रक्रियेत आतड्यांमध्ये काही वायू तयार होतात. साधारणपणे प्रौढांच्या पचनसंस्थेत रोज ७०० मिली. वायू तयार होतो आणि कोणत्याही वेळेस त्यातील सुमारे १०० ते २०० मिलिलिटर वायू तिथे अस्तित्वात असतो. वायूच्या नैसर्गिक प्रवृत्तीनुसार तो फार साठून न राहता शरीराबाहेर पडतो. त्याचे बाहेर पडण्याचे दोन मार्ग म्हणजे तोंड आणि गुदद्वार. अशाप्रकारे शरीरातून जे वायू उत्सर्जन होते ते मुळातून समजून घेण्यासाठी हा मर्यादित लेख. पोटातील वायूनिर्मितीची कारणे : पचनसंस्थेत वायू तयार होण्याचे दोन स्त्रोत असे आहेत: १. तोंडातून जठरात गिळली गेलेली हवा आणि २. मोठ्या आतड्यांमध्ये अन्नपचनपदार्थांवर सूक्ष्मजंतूंच्या झालेल्या प्रक्रियेतून निर्माण होणारे वायू. वरील पहिल्या प्रकारे जी हवा जठरात जाते तो बाहेर टाकण्याचा प्रमुख मार्ग म्हणजेच ढेकर देणे. याउलट आतड्यांमध्ये तयार झालेले वायू बाहेर टाकण्याचा नैसर्गिक मार्ग म्हणजे पाद सुटणे. आता या दोन प्रक्रियांविषयी स्वतंत्रपणे सविस्तर समजून घेऊ. ढेकरनिर्मिती आपण तोंड उघडले की काही प्रमाणात हवा आत शिरतेच. पण ती जर मोठ्या प्रमाणात ‘गिळली’ गेली तर ती जठरात जाऊन बसते. असे होण्यासाठी खालील घटक कारणीभूत ठरतात : १. भरभर खाणे व पिणे २. च्युईंगम चघळणे ३. धूम्रपान ४. फसफसणाऱ्या शीतपेयांचे सेवन (बिअर, इ.) यातील १ ते ३ मध्ये ढेकर आली असता त्यातून मुख्यत्वे नायट्रोजन व ऑक्सिजन बाहेर पडतात. पण चौथ्या कारणाचे बाबतीत बाहेर पडणारा मुख्य वायू हा कार्बन-डाय-ऑक्‍साईड असतो. गिळलेल्या हवेपैकी बरीचशी हवा ढेकरेच्या स्वरूपात बाहेर निघून जाते. परंतु थोड्या प्रमाणात जठरातील ती हवा पुढे आतड्यांमध्ये सरकते. ok पादनिर्मिती जेवणानंतर जठर विस्तारते आणि लहान आतडी उत्तेजित होतात. त्यामुळे जठरात उरलेला वायू पुढे सरकतो. लहान आतड्यात अन्नाचे पचन व शोषण होते. परंतु अन्नातील अर्धवट किंवा न पचलेले घटक पुढे मोठ्या आतड्यात शिरतात. इथे अनेक उपयुक्त सूक्ष्मजंतूंचे वास्तव्य असते. या जंतूंच्या एन्झाइम्सची या अन्नघटकांवर रासायनिक प्रक्रिया होते. त्यातून काही प्रकारचे वायू तयार होतात. त्यांमध्ये मुख्यत्वे हायड्रोजन, कार्बन डाय-ऑक्साइड, हायड्रोजन सल्फाइड आणि मिथेन या वायूंचा समावेश होतो. हायड्रोजन सल्फाइड व अन्य काही सल्फरयुक्त पदार्थांमुळे या वायुस दुर्गंधी येते. इथले काही सूक्ष्मजंतू हायड्रोजन व कार्बन-डाय ऑक्‍साईड हे वायू वापरुन टाकतात. त्यामुळे वायूसाठा काहीसा कमी होतो. या सर्व दीर्घ प्रक्रियेनंतर जो काही वायू उरतो तो सगळा गुदद्वारामार्गे पादरूपात बाहेर पडतो. या वायूचे दर 24 तासातले प्रमाण हे जेवणातील अन्नघटकांच्या प्रकारावर अवलंबून असते. निरोगी अवस्थेत ते साधारणपणे 200 ते 700 मिलिलिटर या दरम्यान राहते. इतका वायू बाहेर पडण्यासाठी 24 तासात सुमारे 14 ते 18 वेळेस पाद सोडला जातो. आतड्यातील वायूनिर्मितीचे प्रमाण अन्नघटकांच्या प्रकारावर अवलंबून असते. असे अन्नघटक आणि त्यातील विशिष्ट रासायनिक पदार्थ यांचा आता विचार करू. समतोल आहारात पोळी/भाकरी, भात, भाज्या, डाळी, उसळी, तेल, दूध, तूप, अंडी आणि मांसाहार यांचा समावेश असतो. या सगळ्यामधून आपल्याला मुख्यत्वे कर्बोदके, मेद आणि प्रथिने ही मूलभूत पोषणद्रव्ये मिळतात. यातील काही ठराविक प्रकारच्या द्रव्यांपासून अधिक वायूनिर्मिती होते. त्याची काही उदाहरणे आता पाहू. अधिक वायूनिर्मितीस उत्तेजन देणारे विविध अन्नपदार्थ आणि त्यातील संबंधित रसायने अशी आहेत : १. बटाटा, मका व गहू : यातील कर्बोदके (Starches) ‘जड’ प्रकारची असतात. २. कडधान्ये (चवळी, वाटाणा इत्यादी) : यात stachyose व raffinose ही जड कर्बोदके असतात. कडधान्यांना भिजवून मोड आणताना त्या भांड्यातील पहिले पाणी फेकून दिले असता ही बऱ्यापैकी निघून जातात. त्यामुळे मोड आलेली कडधान्ये ही साध्या कडधान्यांपेक्षा कमी वायूनिर्मिती करतात. ३. विविध प्रकारचे बीन्स : यातले काही तंतुमय पदार्थ पचत नाहीत. तसेच त्यांच्यात अन्य एक रसायन असते जे आपल्या आतड्यातील कर्बोदक पचविणाऱ्या एंझाइमला विरोध करते. ४. शीतपेयातील गोड पदार्थ : अशा बऱ्याच पेयांत ‘साखरमुक्त’ या नावाखाली अन्य गोड पदार्थ घातलेले असतात उदाहरणार्थ : xylitol, mannitol, sorbitol. ही रसायने आतड्यातील जंतूसाठी मोठे ‘खाद्य’ ठरतात. ५. दूध व दुग्धजन्य पदार्थ : यातील Lactose या शर्करेचे पचन आशियाई वंशात प्रौढपणी बर्‍यापैकी कमी असते. पचनसंस्थेमध्ये दररोज निर्माण होणाऱ्या वायूंचे उत्सर्जन ढेकर व पाद यांच्यातर्फे होते हे आपण पाहिले. कधीकधी जेवणानंतर २-३ ढेकरा येणे हे नैसर्गिक आहे. एक प्रकारे ते पोट भरल्याचेही लक्षण असते. तीच गोष्ट ठराविक प्रमाणातील पादालाही लागू होते. मात्र जेव्हा काही कारणांमुळे पचनसंस्थेत बिघाड होतो तेव्हा वायूनिर्मिती आणि त्यांचे उत्सर्जन खूप प्रमाणात होते. अशी काही महत्त्वाची कारणे किंवा आजार आता थोडक्यात पाहू. अतिरिक्त ढेकर दिवसाकाठी वारंवार ढेकर येणे हे खालील आजारांचे/ बिघाडांचे लक्षण असू शकते : १. जठरदाह किंवा पेप्टिक अल्सर : यामध्ये ढेकरांच्या जोडीने मळमळ, छातीत जळजळ आणि अपचन ही लक्षणे दिसतात. २. पित्ताशयाचे आजार ३. काही गोळ्यांचे दुष्परिणाम : यामध्ये मधुमेह उपचारासाठी मोठ्या प्रमाणावर दिली जाणारी गोळी metformin हिचा समावेश आहे. पाद उत्सर्जन समस्या गुदद्वारातून वायु सुटत राहणे हे नैसर्गिक आहे. काही व्यक्तींमध्ये इतरांच्या तुलनेत वायूनिर्मिती जास्त होते. नक्की किती मर्यादेच्या पुढे अतिरिक्त वायूनिर्मिती म्हणायची याची ठोस व्याख्या नाही. आतड्यांच्या काही आजारांमध्ये वायू उत्सर्जन नीट न झाल्यामुळे संबंधित रुग्णास वारंवार पोट फुगल्याची भावना होत राहते. अशा आजारांमध्ये आतड्यांच्या हालचालींचे बिघाड(IBS), पचनात बिघाड करणारे काही ऑटोइम्युन आजार, दुग्धशर्करेचे अपचन आणि काही जंतुसंसर्ग यांचा समावेश होतो. वैद्यकात वापरल्या जाणाऱ्या काही औषधांमुळे (ibuprofen, statins) सुद्धा अशा वायुसमस्या निर्माण होतात. अशा विविध आजारांमध्ये सुटणाऱ्या पादास बर्‍यापैकी दुर्गंधी असते. जेव्हा ढेकर अथवा पाद यांचे प्रमाण त्या व्यक्तीस सहन होण्यापलीकडे असेल तेव्हा वैद्यकीय सल्ला जरूर घ्यावा. पचनसंस्थेसंबंधी अन्य जी लक्षणे दिसत असतील त्यानुसार डॉक्टर योग्य त्या तपासण्या सुचवतात. त्यानुसार योग्य ते निदान आणि उपचार करता येतात. संबंधित आजारांवरील विस्तृत विवेचन हे स्वतंत्र विषय असून या लेखाच्या व्याप्तीबाहेरचे आहेत. सामाजिक संकेत व मनोरंजन ढेकर व पाद या दोन्ही क्रियांदरम्यान विविध छटांचे आवाज येतात. त्यामुळे त्या लक्षवेधी ठरतात. एखाद्या समूहात त्यांच्या आवाजा/वासानुसार ज्या काही प्रतिक्षिप्त क्रिया उमटतात त्यातून संबंधितास लाजल्यासारखे व नकोसे वाटते. त्यामुळे समूहात असताना या नैसर्गिक क्रियांची ऊर्मी दाबण्याकडे कल राहतो. वेळप्रसंगी त्यात यशस्वी होण्यासाठी बरीच कसरत करावी लागते. त्यातल्या त्यात ढेकर हे प्रकरण काहीसे समूहमान्य असते. पोटभर जेवणानंतर आलेली ढेकर हे तृप्तीचे लक्षण मानले जाते. लहान मुलांच्या जडणघडणीत या क्रियांच्या आवाजांचा चेष्टा आणि मनोरंजनासाठी भरपूर वापर केला जातो. साहित्यक्षेत्रात या क्रियेला विनोद, म्हणी आणि वाक्प्रचारांमध्ये बर्‍यापैकी स्थान मिळालेले आहे. समाजात काही जणांनी या क्रियांची भीड आणि संकोच कमी व्हावा यासाठी काही मनोरंजनाचे कार्यक्रमही आयोजित केलेले दिसतात. याचे काही मजेशीर किस्से जालावर वाचण्यास उपलब्ध आहेत. अधून-मधून मोठ्यात मोठी ढेकर काढण्याच्या स्पर्धा घेतल्या जाता.त त्यात त्या आवाजाची तीव्रता उपकरणाद्वारे मोजली जाते. आतापर्यंत अशा मोठ्या आवाजाच्या तीव्रतेचा जागतिक विक्रम ११० डेसिबल या तीव्रतेचा असून त्याची गिनीज बुकात नोंद झालेली आहे ! आणि हे एक भलतेच.... 😉 2019 मध्ये सुरतमध्ये मोठ्याने पादण्याची स्पर्धा आयोजित केली होती. त्यासाठी आधी ६० जणांनी नाव नोंदवले होते. परंतु आयत्या वेळेस अनेकांनी लाजून माघार घेतल्याने शेवटी फक्त तीन स्पर्धक उरले ! एकंदरीत ही स्पर्धा म्हणजे फुसका बार निघाली. तरीदेखील संबंधित संयोजक आशावादी असून भविष्यात त्यांचा अशा स्पर्धा पुन्हा घेण्याचा मानस आहे. आपल्या पचनसंस्थेत दररोज वायूनिर्मिती होते. एका प्रमाणाबाहेर तो वायू साठू लागला की त्याचे ढेकर व पाद अशा दोन्ही प्रकारे उत्सर्जन होते. त्यातून आपल्याला मोकळेपणाची भावना येते. अशा या दोन प्रक्रियांविषयी काही मूलभूत माहिती इथे लिहिली. समाजात या नैसर्गिक क्रियांबद्दल चारचौघात बोलणे हे काहीसे निषिद्ध मानले जाते. परंतु त्याच बरोबर या क्रियांचा उपयोग करमणूक आणि मनोरंजनासाठीही काही क्षेत्रात केलेला आढळतो. नेहमीप्रमाणेच उत्साही चर्चेचे स्वागत आहे. ......................................................................................................................................................................
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 32068
प्रतिक्रिया 104

प्रतिक्रिया

In reply to by Bhakti

काहीशा अशाच माहितीतून छ.शिवाजी महाराजांच्या काळात मावळ्यांसाठी मसालेदार प्रथिनयुक्त मिसळ निर्माण झाली
त्याकाळी फरसाण महाराष्ट्रात उपलब्ध असायचे का ?

In reply to by तर्कवादी

सुरतेवर छापा मारून परत येताना मावळ्यांनी तिथून आणली असेल गोण्या भरून :=)

गर्वाने पादा ! हे पहा आमच्या आवडत्या फाऊंडिंग फादरने अर्थात बेंजामिन फ्रंकलिनने लिहिलेला लेख: फार्ट प्राऊडली https://en.wikipedia.org/wiki/Fart_Proudly =))))

वर फुटाण्यावरून मनोरंजक चर्चा झाली आहे. त्यातील एक मुद्दा घेतो. डाळींमध्ये बघता हरभरा आणि उडीद डाळी या वायुनिर्मितीच्या बाबतीत शिरोमणी म्हणता येतील. या डाळिंपासून केलेले काही पदार्थ खाताना त्याच्या जोडीने चांगले मेद पदार्थ आपण आहारात घेतो. याची दोन सुंदर उदाहरणे देतो: १. इडली किंवा मेदुवडा यांच्याबरोबर नारळाची चटणी २. पुरणपोळी बरोबर तूप किंवा दूध ह्या दोन्ही उदा.मध्ये आपल्याला जड प्रथिना बरोबर चांगला मेद पदार्थ असा सुरेख संयोग झालेला दिसतो. त्यामुळे पचन सुलभ होते. इथे मला एका गोष्टीचे आश्चर्य वाटते. या प्रकारच्या खाद्य सवयी परंपरेने शतकानुशतके चालू आहेत. याउलट प्रथिने, मेद हे आधुनिक वैज्ञानिक संशोधन तसे अलीकडील 1-2 शतकामधील आहे. काही हजार वर्षांपूर्वी जेव्हा आपल्या पूर्वजांनी असे सुरेख खाद्यसंगम आहारात योजिले त्याचे मला कौतुक वाटते. ते अनुभवजन्य पारंपरिक ज्ञान पाहून आपण थक्क होतो.

पादण्यासारख्या विषयावर एवढा माहितीपूर्ण लेख लिहिल्याबद्दल अभिनंदन आणि कौतुकही. लेख नेहमी प्रमाणे अतिशय छान झाला आहे.

कुमारेक सर, तुमच्या लेखांचे वैद्यकीय आणि इतर विषय नेहमी हटके, वेगळे असतात त्यामुळे सामान्यज्ञानात तर भर पडतेच परंतु त्या बरोबरीने मनोरंजन देखील होते. सध्या microbiota चा खूप बोलबाला आहे आणि त्याबद्दल नवनवी माहिती उपलब्ध होते आहे. काहींनी तर microbiota ला शरीराचा एक अवयवच समजले जावे असा आग्रह धरला आहे. तुम्ही तुमच्या लेखात उल्लेख केला आहेच परंतु ह्या विषयावर स्वतंत्र लेख लिहावा ही विनंती. Microbiota चे प्रतिकार शक्ती साठी महत्वाचे योगदान असते असे कळल्यामुळे सध्याच्या वूहानच्या चिनी विषाणूच्या साथी मध्ये ह्या लेखाचा मिपाकरांना खूपच फायदा होईल असे वाटते.

चर्चेत सहभागी होऊन अभ्यासपूर्ण योगदान देणाऱ्या वरील सर्वांचे मनापासून आभार ! आपल्या दैनंदिन जीवनातील हा महत्त्वाचा विषय बरेच दिवस मनात घोळत होता. अखेर यंदा त्याचा योग आला.
microbiota चा खूप बोलबाला आहे
होय, हा खूप महत्त्वाचा आणि रंजक विषय आहे. मानवी शरीरात सुमारे (१ कोटी) कोटी एवढे सूक्ष्मजंतू वास्तव्य करत असतात ! तूर्त हा विषय प्रतीक्षा यादीत ठेवत आहे. सवडीने बघू

In reply to by हेमंतकुमार

डॉक्टर साहेब, व्यनि आत्ताच वाचला. तुमची सूचना मान्य आहे (नाखुषीने). वरती म्हटल्या प्रमाणे microbiota बद्दल लिहावे हि विनंती.

पदण्याच्या संदर्भातील एक मनोरंजक बातमी.... A reality star who says she made $200K from selling her farts in Mason jars is pivoting to selling them as NFTs https://www.insider.com/reality-star-made-200k-fart-jars-selling-them-a…

या विषयाशी संबंधित माझा वैद्यकीय शिक्षणा दरम्यानचा एक अविस्मरणीय अनुभव : एका रुग्णाचे पोट बरेच टम्म फुगले होते. पोटात खूप वायू साठलेला आहे हे निदान डॉक्टरांनी केले. आम्ही विद्यार्थ्यांनी त्याच्या पोटावर विशिष्ट पद्धतीने बोटावर बोट ठेवून टिचकी मारून त्याचा अभ्यास केला. नंतर आमच्या प्राध्यापकांनी त्या रुग्णावर एक सोपा प्रयोग आमच्या देखत केला. त्याच्या गुदद्वारातून एक रबरी नळी आत घालण्यात आली. तिकडे बाजूला घमेल्याएवढ्या आकाराच्या भांड्यात पाणी घेतले होते. जशी ती नळी पाण्यात बुडवली गेली तसा त्याच्या पोटातून बाहेर पडलेला वायू छानपैकी पाण्यात बुडबुड्यांच्या रूपाने भसाभस बाहेर पडला. जवळजवळ ५ मिनिटे तो बाहेर निघत होता !

छोट्यांना रोज २ ते ३ वेळां १ ते २ चमचे ग्राईप वॉटर वायुसारक म्हणून पाजावयास सांगत. अजूनही वुडवर्ड्सची जाहिरात चित्रवाणीवर येते. यात बाळशोपा आणि बडीशेप यातली तेले असत. (ऑइल ऑफ अ‍ॅनिसी आणि ऑईल ऑफ अ‍ॅनिथी). हे वैद्यकीय दृष्ट्या बरोबर आहे का. २. आमच्या निरोगी चि. ला तर ग्राईप वॉटरबरोबर कार्मिसाईड नावाचे औषध त्यायला सांगितले होते. त्यात पोटॅशिअम क्लोराईड असे. सोडियम डिप्लीशन वगैरे होईल या शंकेने मी ते बंद केले. हे खरोखरच शास्त्रीय/वैद्यकीय दृष्ट्या उपयुक्त आहे काय? ३. जंगलातील अनुभव वाचतांना लेखकाला एकदा बाँबस्फोटांसारखे आवाज ऐकू आले. स्थानिक सोबत्याने लेखकाला ते आवाज हत्तींच्या पादण्याचे म्हणून सांगितले. लेखक जिम कॉर्बेट की जॉन अँडरसन की मारुती चितमपल्ली ते आठवत नाही.

In reply to by सुधीर कांदळकर

१. ग्राईप वॉटर मधील बडीशेप तेलाबद्दल पारंपरिक भारतीय आणि युरोपीय औषधशास्त्रांमध्ये पुरावे आहेत. विकिपीडियावर 1878 चा एक संदर्भ आहे पण तो उघडत नाही. आमच्या औषधशास्त्राच्या पुस्तकात बडीशेपचा वातहारक गुणधर्म दिलेला होता. २. बाळशोपाबद्दल काही कल्पना नाही. ३. Carmicide मध्ये मुख्यत्वे Sodium Citrate & Citric Acid हे घटक दिसत आहेत. त्यांचा खरा गुणधर्म लघवी अल्कलाइन करणे हा आहे. वातहारक म्हणून कितपत उपयुक्त आहेत याचा संदर्भ मला तरी मिळाला नाही.

अपचनामुळे पोटात वायू धरणे आणि स्वादुपिंडाचा कर्करोग यांचा काही परस्पर संबंध आहे का? आशिष विद्यार्थी यांचा एक हिंदी चित्रपट आहे ज्यात त्यांना अपचनामुळे पोटात वायू धरण्याचा त्रास असतो आणि पुढे त्यांचा स्वादुपिंडाचा कर्करोग होऊन मृत्यू होतो असे दाखविले आहे.

In reply to by चेतन सुभाष गुगळे


In reply to by चेतन सुभाष गुगळे

बॉलिवूड डायरीज हा चित्रपट पाहिला. मध्यमवर्गीय घरांमधील लोकांची बॉलिवूड प्रवेशासाठीची तीव्र इच्छा, कष्ट, धडपड पण शेवटी घोर अपयश हा विषय चांगला आहे. त्यातला वेश्येच्या भूमिकेतील रायमा सेनचा भाग आवडला. आशिष विद्यार्थी चांगले अभिनेते आहेत. परंतु त्यांची भूमिका नाही आवडली. कर्करोगाने मरता मरता " ओम मुंबई बॉलिवूड स्टाराय नमः" हा जप करीत मरणे, तशा घरात पुनर्जन्माची इच्छा वगैरे प्रकार अजिबात आवडले नाहीत. तिसरा सलीम दिवानचा भाग आहे तो तर खूपच आक्रस्ताळा वाटला.

In reply to by हेमंतकुमार

हो. सिनेमा फार काही चांगला नाहीच आहे, पण स्वादुपिंडाचा कर्करोग आणि पचनसंस्थेतील वायू समस्या यांचा परस्परसंबंध निदान यानिमित्ताने समजला म्हणून मला हा चित्रपट दखलपात्र वाटला इतकेच.

चांगला प्रश्न. स्वादुपिंडाच्या कर्करोगाची बरीच कारणे आहेत. त्यापैकी दीर्घकालीन स्वादुपिंडाचा दाह हे कारण अल्पशा रुग्णांत आढळते. जर संबंधित रुग्णास स्वादुपिंडाचा दीर्घकालीन दाह असेल तर त्याचा अन्नपचनावर विपरीत परिणाम होतो. त्यातून वायूसमस्या उद्भवू शकतात.

In reply to by हेमंतकुमार

म्हणजे वायू समस्या ही स्वादुपिंड बिघाडाच्या लक्षणांपैकी एक असू शकते व तिकडे दुर्लक्ष करणे योग्य नव्हे. स्पष्टीकरणाबद्दल धन्यवाद.

भौतिक शास्त्रानुसार पदार्थांच्या तीन अवस्था असतात. स्थायू (घन) - निश्चित वस्तुमान, निश्चित आकारमान व निश्चित आकार - तिन्ही आहेत. द्रव - निश्चित वस्तुमान व निश्चित आकारमान आहे पण निश्चित आकार नाही. वायू - निश्चित वस्तुमान आहे पण निश्चित आकारमान व निश्चित आकार नाही. ही वस्तुस्थिती असताना
या वायूचे दर 24 तासातले प्रमाण हे जेवणातील अन्नघटकांच्या प्रकारावर अवलंबून असते. निरोगी अवस्थेत ते साधारणपणे 200 ते 700 मिलिलिटर या दरम्यान राहते. इतका वायू बाहेर पडण्यासाठी 24 तासात सुमारे 14 ते 18 वेळेस पाद सोडला जातो.
वायूचे प्रमाण मिलीलीटर मध्ये मोजणे कसे शक्य आहे? म्हणजे समजा आपल्याकडे १०० मिली द्रव आहे व आपण तो १०० मिली च्या मोजपात्रात ओतला तर तो पूर्ण मोजपात्र व्यापेल पण तोच द्रव आपण २०० मिलीच्या मोजपात्रात ओतला तर तो फक्त अर्धेच मोजपात्र व्यापेल. वायू बद्द्ल असे सांगता येत नाही. कितीही आकाराचे मोजपात्र असेल तर उपलब्ध वायू पसरला जाऊन ते संपूर्ण मोजपात्र व्यापेल. त्यामुळेच आपण पेट्रोल / डिझेल जरी लीटर मध्ये मोजून खरेदी करत असलो तरी एल पी जी / सी एन जी सारखे वायू किग्रॅ मध्ये मोजून खरेदी करतो. तरी शक्य असल्यास वायूचे प्रमाण ग्रॅम मध्ये नमूद करावे. तसेच १०० ग्रॅम चणे / मटकी असे पदार्थ खाल्ल्यास किती ग्रॅम वायूनिर्मिती होऊ शकेल याचा अंदाज दिल्यास ते अजुनच फायदेशीर ठरेल.

In reply to by चेतन सुभाष गुगळे

मानवी शरीरातील वायूची मोजणी हा पदार्थ विज्ञानाच्या अखत्यारीतील विषय राहील री प्रत्यक्षात ती मोजणी कशी केली जाते याची कल्पना नाही. परंतु सर्व वैद्यकीय साहित्यात शरीरातील ऑक्सिजन, कार्बन डाय-ऑक्साइड आणि इतर अनेक वायूंचे एकूण प्रमाण (content) लिटर आणि मिलिलिटर या स्वरूपात व्यक्त केले जाते. कदाचित तो equivalence असेल.

In reply to by चेतन सुभाष गुगळे

@ चेतन सुभाष गुगळे ते "काय" लिहीत आहेत ते लक्षात घ्या. काटेकोर पणे वजन करण्याची, आकार मापण्याची गरज नाही समुद्र सपाटीला (१ बार) वातावरणाच्या दाबाला ३७ अंश सेल्सियस तापमाना ला १ ग्रॅम पाण्याच्या वाफेचे आकारमान २३७४ मिली असते. पादातून निघणाऱ्या वायूचे आकारमान मोजणे च कठीण आहे तर वजन कशाला मोजायचे आणि इतके काटेकोर गणित करून काय करायचे आहे. उदया एखाद्या रुग्णाला तुम्हाला गॅसेस सुटत आहेत ते किती मिली किंवा ग्राम आहेत हे "मोजून या"सांगायचे कि काय? साधा काट्यावर उभे राहून वजन किरायचे ते रुग्ण करुन येत नाहीत. कारण प्रत्यक्ष माणसाचे वजन आणि आकारमान वेगळे असते त्याच्या मानाने हा "गॅस" कमी आहे का जास्त आहे हे साधारण अनुमान धपक्याने पाहणे पुरेसे आहे उगाच वितंडवाद( बाल कि खाल) घालून काय सिद्ध होणार आहे? १०० ग्रॅम चणे / मटकी असे पदार्थ खाल्ल्यास किती ग्रॅम वायूनिर्मिती होऊ शकेल. हे प्रत्येक माणसाच्या वजन, वय, आकारमान, दातांची स्थिती, लाळेतील,आतड्यातील पाचक रसातील घटकांचे प्रमाण आतड्यात असलेल्या जिवाणूंची संख्या आणि जातीवर अवलंबून असेल. याशिवाय आपण वेळ (सकाळ दुपार संध्याकाळ) आदल्या दिवशी काय खाल्ले आहे, शौचास झाले आहे कि नाही. आतड्याचे चलनवलन अशा असंख्य घटकांवर अवलंबून असेल. बाकी चालू द्या

निरोगी स्वयंसेवकांमध्ये पादाची मोजणी कशी केली हे या शोधनिबंधात वाचता येईल तिथे वायुमोजणी या सदराखाली electrochemical cell in a hydrogen monitor, a katharometer अशा काही तांत्रिक उपकरणांचा उल्लेख आहे.

In reply to by हेमंतकुमार

आपण दिलेल्या लिंकमधील शोधनिबंधात सर्वच ठिकाणी वायू मोजणी मिली लीटरमध्येच केलेली दिसत आहे. बहुदा जीवशास्त्रात भौतिकशास्त्राचे नियम लागू होत नसावेत.