"हॅलो,मॅम, अरविंद बोलतोय."
"बोल."
"उद्या सहा वाजता मैफील आहे."
"ह्यावेळी कोणाचं आहे गायन?.. की वादन?"
"सरप्राइज."
"ओके.उद्या कळेलच."
"येस."
अरविंदचं आणि माझं संभाषण दर मैफिलीच्या वेळी ठरलेलं. गायन किंवा वादन कुणाचं हे तो कधीच आधी सांगायचा नाही. ते ऐनवेळी कळायचं.
त्याच्याकडच्या सगळ्या गानमैफिली माझ्या लक्षात आहेत. विसरण्याजोग्या नाहीतच त्या.
अरविंदचं घर म्हणजे टुमदार बंगला. भोवती बाग. दृष्ट लागावी अशी देखणी. मुद्दाम आखून केलेली. डिझायनर. अरविंद आणि त्याची बायको सविता. दोघेही हसतमुख. त्यांना मूलबाळ नव्हतं. त्याचं दुःख त्यांना नक्कीच वाटत असणार. पण ते त्यांनी कधीच चेहऱ्यावर दाखवलं नाही. बोलण्यात तर नाहीच नाही. दोघेही चांगलं आयुष्य घालवत होते. मित्रपरिवार मोठा. नातेवाईक भरपूर. सगळ्यांचं घरी येणं जाणं. दोघंही खूप प्रवास करायचे. अरविंद चित्रकार होता. त्याला जुन्या, पुरातन वस्तू जमविण्याचा छंद होता. सविता चांगलं गायची.
असं ते रसिक जोडपं. त्यांच्या बंगल्याच्या हाॅलमधे ही मैफिल रंगायची. संध्याकाळी सहाला सुरू व्हायची आणि रात्री आठला संपायची. श्रोते मोजकेच असायचे. वीस, तीस. गायला कुणी गायक यायचा नाही,तर जुन्या टेक्नोलॉजीच्या स्पूलवाल्या रेकाॅर्डरवर त्या गोल टेपवर किंवा कॅसेट प्लेयरवर गाणं ऐकायचं. मोबाईलवर गाणी हा प्रकार अजून खूपच दूर होता. स्पूल टेप हा प्रकार त्याही वेळी कालबाह्य झाला होता. पण त्यावर रेकॉर्ड झालेला दुर्मिळ गाण्याचा संग्रह अरविंदकडे होता. त्याच्या टेप्सची आणि कॅसेट्स ची नीट लायब्ररी केली होती त्यानं. पण एक जोशी (वाटल्यास कुलकर्णी किंवा देशपांडे म्हणू) नावाचे गृहस्थ होते त्यांच्याकडेही अशा स्पूल टेप्स असायच्या. त्याही टेप्स आम्ही ऐकायचो. ह्या जोशींच्या निष्काळजीपणाची आणि आळशीपणाची एक गंमत ऐकण्याजोगी आहे.
कोणत्याही ठिकाणी शास्त्रीय संगीताची मैफल असो. हे जोशी त्या हाॅलवर, नाट्यगृहात जायचेच. आणि टेपवर मैफिल रेकॉर्ड करायचे. खूप दुर्मीळ संगीत रेकाॅर्डेड होतं त्यांच्याकडे. पण रेकॉर्डिंग संपल्यावर त्यांचा उत्साह संपे. ते ती टेप साधी रिवाइंड सुद्धा करायचे नाहीत. फ्लॅग लावायचे नाहीत. टेपमधे क्यूशीट नसायचं. कुणाचं गाणं,कोणता राग,अवधि किती मिनिटं हे लिहिलेला कागद नसायचा. मला नुसतीच नाणी गोळा करणाऱ्या,स्वाक्षऱ्या गोळा करणाऱ्या आणि मग अडगळीत टाकणारया हौशी पोरांची आठवण व्हायची. मी जोशींना म्हणायची ,"काका,मी तुमच्या सगळ्या टेप्सची नीट लायब्ररी करुन देते." तर ते हात झटकून म्हणायचे,"कुठं ते करत बसायचं? जाऊ दे."
एवढा दुर्मिळ गानसंग्रह असा अस्ताव्यस्त असलेला पाहून मला खूप वाईट वाटायचं. तर अशा ह्या जोशींकडच्या टेप्सही आम्ही ऐकायचो.
अरविंद, सवितानं हाॅल नीटनेटका ठेवलेला असायचा. उगीच जास्त डेकोरेट केलेला नसायचा. शानदार बैठक अंथरलेली असायची. लोड, तक्के असायचे. खुर्च्या,बिर्च्या काही नाही. सगळ्यांनी गालिच्यावर बसायचं. हाॅलमधले दिवे मालवलेले. आणि......आणि.. सगळीकडे समया लावलेल्या. शांत तेवणाऱ्या. अरविंदकडे अनेक वेगवेगळ्या आकाराच्या जुन्या समया आणि लामणदिव्यापासून असंख्य आकाराचे दिवे होते. सविता हे दिवे लखलखीत करायची. ते चमकायचे. त्यांत तेलवात करायची. त्या मैफिलीत अरविंद ते दिवे लावायचा. मेणबत्त्या नाहीत. विजेचे दिवे नाहीत. फक्त समया! फक्त तेलाचे दिवे. आणि दोन नक्षीदार झुंबरं! तीही तेलवातीची. काय सुरेख वातावरणनिर्मिती व्हायची. वाटायचं स्वर्गात आहोत आपण!
मग टेप लोड व्हायची. टेप्सची,प्लेयरची अरविंदनं नीट निगा राखलेली असायची. आवाजाची तांत्रिक सफाई उच्च दर्जाची. स्पष्ट, काळजात आरपार घुसणारा सूर!... गाणं सुरू व्हायचं. स्वरांच्या बरसातीत आम्ही सचैल भिजायचो. सगळीकडे नीरवता. सगळे मूक.निःशब्द. फक्त गाणं ऐकताहेत. कान तृप्त व्हायचेच नाहीत. कितीतरी जणांना ऐकलं. भीमसेन जोशी,प्रभा अत्रे,अंजनीबाई मालपेकर,शोभा गुर्टू,बडे गुलाम अली खाँ,बेगम अख्तर, झाकीर हुसेन,अब्दुल करीम खान, गंगूबाई हंगल,किशोरी आमोणकर,मोगुबाई कुर्डीकर, असे कितीतरी!
मध्यंतर व्हायचं. कुणीच भानावर नसायचं. तृप्तीनं भरलेली एक मंद कुजबूज ऐकू यायची. कुणीही मोठ्यांदा बोलून त्या भारलेपणाला बाधा आणायचं नाही. मध्यंतरात काॅफी व्हायची. सविताने केलेल्या त्या काॅफीसारखी काॅफी मी नंतर कधीही प्यायले नाही. मग मध्यंतर संपायचं. पुन्हा मैफिल रंगायची. सगळे बेभान व्हायचे.
प्रत्येक चांगल्या गोष्टीलाही शेवट असतो,तसाच त्या मैफिलीलाही असायचा. वाईट वाटायचं तो सूरमहाल सोडताना. जातानाही कुणी बोलायचं नाही. प्रत्येकजण नजरेनंच अरविंद,सविताचा निरोप घ्यायचा.
नंतर माझी तिथून बदली झाली. अनेक गावांत असे माझे अनेक ग्रुप्स होते. पुलंच्या "रावसाहेब"मधे त्यांच्या बेळगावच्या मित्रगटाचा उल्लेख आहे तसे. कवींचा, लेखकांचा, जुनं सिनेसंगीत ऐकणाऱ्यांचा ग्रुप. त्या सगळ्यांनाच सोडताना मला वेळोवेळी वाईट वाटलं. त्या सर्वांचीच आठवण अचानक कधीही येते.
पण सर्वांत जास्त मला काय आठवत असेल तर अरविंद सविताच्या त्या गानमैफिली! त्या आठवणी मला उदास करत नाहीत. नवी टवटवी देतात..
तुमच्याही अशा काही मैफिलींच्या आठवणी असतीलच..
...
(व्यक्तींची सर्व नावे काल्पनिक)
वाचने
6654
प्रतिक्रिया
17
मिसळपाव
प्रतिक्रिया
भारी!
अगदी हेच्च लिहायचे होते.
In reply to भारी! by तुषार काळभोर
वाह ! आजी वाह...!
In reply to भारी! by तुषार काळभोर
सुरेख !
गाण्याच्या मैफिलीच नव्हे तर
एखादी कॉमन आवड नसूनही केवळ गप्पांना एकत्र येणारेही ग्रुप बनतात.
In reply to गाण्याच्या मैफिलीच नव्हे तर by गवि
पुर्वी लोक हौशी होते
सुरेख आठवणी .
खुपचं सुंदर लिहिलंय आजी..हो
आठवणी मला उदास करत नाहीत. नवी टवटवी देतात..सुरेख.एके काळी अशा मैफिली माझ्या
संध्याकाळी माफक मद्य,
In reply to एके काळी अशा मैफिली माझ्या by सुबोध खरे
टवटवीत, मन प्रसन्न करणारी
माझी आठवण
@ सौन्दर्य, +१
In reply to माझी आठवण by सौन्दर्य
एक कुतुहलःत्यात पैसे टाकून
In reply to माझी आठवण by सौन्दर्य
ज्युकबॉक्स... एक स्मरणरंजन
तुषार काळभोर-मी मनापासून