Skip to main content

कडव्या हिंदूंनी ते "पुण्यकर्म' करावेच

लेखक अन्वय यांनी शनिवार, 29/11/2008 21:56 या दिवशी प्रकाशित केले.
बाबरी मशीद हिंदुत्ववाद्यांनी पाडल्यानंतर मुंबईत जे बॉंबस्फोट झाले, तेव्हापासून देशविघातक कारवायांत स्थानिक मुस्लिमांचा सहभाग असल्याची चर्चा सुरू झाली. पुढे ज्या ज्या कारवाया करण्यात आल्या त्यात प्रामुख्याने मुस्लिम नावेच समोर येत होती. वृत्तपत्रांमधून रकानेच्या रकाने भरून त्यावर चर्चा, टीका होत होती. मुस्लिमांमधील निरक्षरता, गरिबी यामुळे ते गुन्हेगारीकडे वळतात. त्यांना मुख्यप्रवाहात आणण्यासाठी बहुसंख्याकांनी प्रयत्न करावेत, असे मतही अनेक विचारवंतांनी प्रकट केले होते. त्यासाठी कुणी किती प्रयत्न केले, हा चर्चेचा मुद्दा आहे. परंतु वारंवार टीका झाल्याने प्रत्येक मुस्लिम नागरिकाला कमीपणा वाटू लागला. त्यातून आम्हालाच लक्ष्य केले जातेय, अशी त्यांची मानसिकता बनून गेली. याचा नेमका फायदा या धर्मातील मूलतत्त्ववाद्यांनी घेतला आहे. जागतिकीकरणाच्या रेट्यामुळे प्रचंड वेगात बदलणाऱ्या परिस्थितीत चांगले काय, वाईट काय याचा विचारही करू न शकणाऱ्या कोवळ्या तरुणांच्या मनात विद्वेषाची ठिणगी टाकण्याचे काम हे मूलतत्त्ववादी करीत आहेत. मुस्लिमांवर होणाऱ्या (?) अत्याचाराच्या चित्रफिती त्यांना दाखविल्या जातात. जिहादचा "बारूद' त्यांच्या मनात ठासून भरला जातो. त्यांच्यातील विवेक मारून टाकला जातो आणि त्यातूनच सुशिक्षित म्हणा किंवा "हायटेक' दहशतवादी जन्माला घातला जातो. गेल्या काही महिन्यांतील बॉंबस्फोट पाहिले, तर वस्तुस्थिती लगेच लक्षात येईल की अनेक बॉंबस्फोटांचे मास्टरमाइंड हे उच्चशिक्षित आहेत. शिवाय त्यांचे वार्षिक उत्पन्नही लाखो रुपये आहे. नोकरी आहे, पैसा आहे आणि ज्ञानही आहे. मग देशविघातक कारवाया करण्याची दुर्बुद्धी त्यांना का सुचते, असा प्रश्‍न कुणाच्याही मनात येऊ शकतो. त्याची उत्तरे शोधण्याचा प्रयत्नही अनेकांनी केला असेल. मीदेखील त्याच प्रश्‍नाचे उत्तर शोधत आहे. ते शोधता शोधता मी बाबरी मशिदीपर्यंत येऊन पोचलो आहे. चित्रलेखाचे संपादक ज्ञानेश महाराव यांचे "असं घडलं' नावाचे पुस्तक फार पूर्वी वाचले होते. त्यातील एका लेखात एका मुस्लिम गाइडची भावना त्यांनी उद्‌धृत केली होती. सय्यद नक्वी असे त्या गाईडचे नाव होते. ते म्हणाले होते की वादग्रस्त वास्तूमध्ये मुस्लिम लोक नमाज पढत नाहीत. या वास्तूवर हिंदूंनी दावा केला आहे, याला बहुसंख्य मुस्लिमांचा आक्षेप नाही. भाजप आणि तत्सम संघटना या मुद्द्याचे राजकारण करून वातावरण तापवित आहेत. त्यांनी शांततेने या मुद्दा हाताळला असता, तर तिथे आतापर्यंत राम मंदिर उभे राहिले असते. मला वाटते प्रत्येक मुस्लिम नागरिकाची ही प्रातिनिधिक प्रतिक्रिया असावी. असे असतानाही बाबरी पाडण्याचा अट्टहास का करण्यात आला. अयोध्येत राम मंदिर झाले नाही, तर चालणार नाही का? बरं बांधायचेच होते, तर आतापर्यंत का बांधले गेले नाही. केवळ मशीद पाडून देशाच्या एकात्मतेची वीण सैल करून हिंदुत्ववादी संघटनांनी काय मिळवले? मंदिर तर झालेच नाही; पण मशीद पडल्याने मुस्लिमांचा दृष्टिकोनच बदलून गेला आहे. हेच मुस्लिम मूलतत्त्ववाद्यांना हवे होते. मुस्लिम दहशतवाद्यांनी निर्मिती करण्यासाठी यापेक्षा चांगली संधी त्यांना कधी मिळणार होती? त्या संधीचा फायदा त्यांनी बरोबर घेतला. गरीब, दुबळे, अनपढ मुस्लिमांची मने कलुषित करता करता त्यांनी आता उच्चविद्याविभूषित तरुणांना "अंध' बनविले आहे. धर्माची गोळी चारली की समाज बेभान होतो, याची त्यांना पुरेपूर कल्पना आहे. मला असे वाटते की या वास्तवाचे भान हिंदू संघटनांनीच मुस्लिम तरुणांना द्यायला हवे. ही जबाबदारी या संघटनांनी हेतूशुद्धपणे पार पाडली, तर फारच मोठा परिणाम दिसून येईल. पण त्याआधी हिंदुत्ववाद्यांनीही "शुचिर्भूत' व्हावे लागेल. तसे करण्याची त्यांची इच्छा नसेलच. पण त्यांनी हे पुण्यकर्म करावेच. कारण खरे दोषी तेच आहेत; त्यांनीच बाबरी पाडली असून, त्याचे परिणाम सारा देश भोगत आहे.
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 18453
प्रतिक्रिया 73

प्रतिक्रिया

दहशतवाद हा जर का एका विशिष्ट धर्मातील लोकांवर केलेल्या अन्यायाचा बदला आहे असे म्हणायचे असेल तर शतकानुशतके झालेल्या अन्यायांमुळे समस्त हिंदू जमात दहशतवादी बनली असती. काशी, मथुरा, सोमनाथादि मंदिरे , जिझिया कर , शतकानुशतकांचा सुलतानांचा इतिहास , पाकिस्तानात फाळणीच्या वेळी घडलेले प्रकार आणि फाळणीनंतरचे आय एस आय ने केलेली घृणास्पद कृत्ये आपल्याला या संदर्भात वगळता येणार नाहीत. थोडक्यात , दहशतवादाची मीमांसा करताना "अमुक घटनांचा सूड" हे कारण पुरेसे नाही. हा "एक-दिशा मार्ग" नाही. दोन्ही बाजूंनी हे प्रकार घडलेत. दहशतवाद कुणी माजवला ते बोला. इतिहासाची थडगी उकरली तर दोन्हीकडची मढी बाहेर येतील.

अमेरिकादी देशांत मुस्लिम दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यांची तुलना भारताशी करता येणार नाही. कारण हे देश वर्चस्वासाठी हापापलेले आहे. इस्लामी राष्ट्रांतील तेलांच्या विहिरी अमेरिकेला ताब्यात घ्यायच्या आहेत. राजकीय वर्चस्वाचीही काहींना इर्षा आहे. भारताला ना कुणावर वर्चस्व गाजवायचे आहे, ना मुस्लिमांचे उच्चाटन करायचे आहे. भारताचा इस्लामलाही विरोध नाही. मग या दहशतवादी कारवाया भारतात का होतात, याचा विचार कुणी करणार आहे की नाही. बाबरीजवळ येऊन थांबयचे कारण एवढेच आहे की त्यांनतरच खऱ्या अर्थाने भारत दहशतवाद्यांच्या "लिस्ट'वर आला. त्याला कारणेही तशीच आहेत. बॉंबस्फोट घडविल्यानंतर दाऊद इब्राहिम आणि त्याची पिलावळ भारतातून पसार झाली. परंतू भारतविरोधी त्यांच्या कारवाया थांबलेल्या नव्हत्या. या कारवाया कुणामुळे शक्‍य झाल्या? स्थानिक मुस्लिमांमुळेच. भारतविरोधी कारवायांत सहभागी व्हावे, असे त्यांना का वाटले, याचाही विचार इथे प्रतिक्रिया नोंदविणाऱ्याने करावा. आता पाकिस्तानातील अतिरेकी भारतात येऊन हल्ले करीत आहेत. जे यापूर्वी कधीच भारतात आले नसतील. मग त्यांनी आपली कामगिरी "चोखपणे' कशी काय बजावली? दाऊदच्या नेटवर्कशिवाय हे शक्‍य होते काय? दाऊदला मुंबईत बॉंबस्फोट घडविण्याची इच्छा का झाली, याची उत्तरे आहेत का कुणाकडे? बाबरी प्रकरणापूर्वी देशात किती बॉंबस्फोट झाले, त्यात स्थानिक मुस्लिमांचा किती सहभाग होता, याची आकडेवारही कुणाकडे असेल, तर तीही इथे द्यावी. काही लाख लोक जमून अयोध्येला जातात, बाबरी जमीनदोस्त करतात. यामुळे मुस्लिमांमध्ये असुरक्षिततेचीच भावना निर्माण झाली आहे. त्यातूनच दहशतवादी कारवायांमध्ये ते सहभागी झालेत.

अतिशय फालतू लेख.
>>बाबरी जमीनदोस्त करतात. यामुळे मुस्लिमांमध्ये असुरक्षिततेचीच भावना निर्माण झाली आहे. त्यातूनच दहशतवादी कारवायांमध्ये ते सहभागी झालेत.
विनोदी वाटतयं हे वाक्य. बाबरी मशिद पाडली नसती तर काय अतिरेकी निर्माण च झाले नसते असे तुम्हाला म्हणायचे काय? त्या आधीहि हिंदू मुस्लिम दंगे होत होते. पाकिस्तान ने भारताबरोबर युध्द हि केले होते. शिवाय अधूनमधून भारताविरुध्द त्यांच्या कारवाया चालूच होत्या. काश्मिर प्रश्न ही धगधगत होता आणि अजूनही तो सुटलेला नाही.
>>दाऊदला मुंबईत बॉंबस्फोट घडविण्याची इच्छा का झाली, याची उत्तरे आहेत का कुणाकडे?
अहो इच्छा वगैरे झाली ते ठिक आहे पण मग त्याने का नाही सबुरीने घेतले. बाबरी मशिद पाडली म्हणुन बॉबस्फोट करून निरपराध माणसे मारण्याऐवजी त्याने शांतपणे झाल्या घटनेचा निषेध करायचा होता की. >>
त्यांनीच बाबरी पाडली असून, त्याचे परिणाम सारा देश भोगत आहे.
सध्या देशात जे चालू आहे त्याला इतरही अनेक कारणे आहेत. निव्वळ बाबरी प्रकरणामुळे हे घडत आहे हे साफ चुकीचे आहे. लेखातील वरील वाक्याचा त्रिवार निषेध !!! मुक्तसुनित , विकास यांचे काही विचार पटण्यासारखे आहेत.