मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

कोरोना लसींची चाचणी

केदार भिडे · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
कोवॅक्सिन फेज १ - या मध्ये ३७५ व्यक्ती (वय १८-५५ ) ४ गटात विभागण्यात आल्या. प्रत्येकी १०० चे तीन गट करण्यात आले आणि त्यांना ३ निराळ्या प्रमाणात कोवॅक्सीन देण्यात आले आणि उरलेले ७५ लोक हे प्लेसिबोवर होते. लसीचे प्रत्येकी दोन डोस १४ दिवसांच्या अंतराने देण्यात आले. लस मिळालेल्या गटांत प्रतिपिंड तयार होण्याचे प्रमाण (seroconversion rate) ८२% ते ९२% असे ३ निराळ्या मात्रांमध्ये आढळले (१०० पैकी ८२ लोकांमध्ये प्रतिपिंडे निर्माण झाली). लस घेतल्यावर व्यक्तींवर होणारे परिणाम तपासण्यात आले. ताप, डोकेदुखी, इंजेक्शन घेतलेल्या जागी वेदना अशा घटना एकूण ५%-१४% व्यक्तींमध्ये आढळून आल्या. या तक्रारींचे परिमार्जन २४ तासात झाले. आणखी छुपे आणि थोडे उशिराने दिसणारे परिणाम जाणून घेण्यासाठी या व्यक्तींच्या रक्तातील साखर, हिमोग्लोबिन इत्यादी घटकांची मोजणी लस घेण्यापूर्वी आणि २८ दिवसांनी करण्यात आली. या घटकांमध्ये झालेले वाईट बदल हे प्लॅसिबो गट आणि लस घेतलेला गट यांच्यात फार वेगळे नाहीत. हे सर्व काम १३ जुलै 2020 पासून पुढे करण्यात आले. फेज २ आणि फेज १ मधील व्यक्तींचा अधिक अभ्यास - यामध्ये ३८० (वय १२-६५) नव्या व्यक्तींना २ गटात विभागले (१९०) आणि त्यांना फेज १ मधून निवडलेल्या दोन प्रमाणानुसार २८ दिवसांच्या अंतराने दोनदा लस देण्यात आली .तसेच फेज-१ मधील व्यक्तींची परत एकदा तपासणी केली. फेज २ मधील नवीन व्यक्तींमध्ये प्रतिपिंड तयार होण्याचे प्रमाण प्रमाण जास्ती आहे आणि वाईट परिणाम पहिल्या फेज प्रमाणेच आहेत. १०४ दिवसांनी फेज १ मधील लोकांना तपासले असता ७०-८०% व्यक्तींमध्ये प्रतिपिंड आढळले. ५ सप्टेंबर 2020 पासून पुढे हे काम करण्यात आले. फेज ३- फेज ३ चा प्राथमिक अहवाल नुकताच प्रसिद्ध झाला. या फेज मध्ये २५,८०० व्यक्तींना २ गटात विभागले (अर्ध्यांना लस आणि अर्ध्यांना प्लेसिबो). या फेज मध्ये लसीचा सामना थेट विषाणूशी आहे असे दिसते. प्राथमिक अहवालात ८१% प्रभावी ठरलेली लस यचा अर्थ आहे असा आहे की लस घेतलेल्या लोकात लसीमुळे आजार होण्याचे प्रमाण ८१% कमी होते. सध्या या २५८०० मधील ४३ व्यक्तींना लागण झाली. त्यातील ३६ व्यक्ती या प्लेसिबो गटातील आहेत आणि ७ व्यक्ती लस घेतलेल्यांपैकी आहेत . (१ - ७/३६ = ०. ८०५६ किंवा ८०.५६%) तसेच या लसीमुळे तयार होणारे प्रतिपिंड UK स्ट्रेन आणि भारतातच मिळालेला आणखी एक स्ट्रेन यांनाही निष्प्रभ करण्यात उपयुक्त असल्याचे सांगितले आहे. कोविडशिल्ड फेज १ आणि २ - या चाचण्या UK मध्ये १००० व्यक्तींवर केल्या. एक फरक म्हणजे प्लेसिबो ऐवजी इथे अर्ध्या व्यक्तींना MenACWY नावाची UK मध्ये आधी पासून वापरात असलेली लस देण्यात आली. ही लस घेतल्यावर ताप, डोकेदुखी इत्यादी त्रास होतात असा अनुभव आहे. तसेच दोन्ही गटातील काही व्यक्तींना prophylactic paracetamol देण्यात आले. प्रतिपिंड तयार करण्यात ही लस यशस्वी आहे. ताप डोकेदुखी इत्यादी तक्रारींचे प्रमाण कोवॅक्सीन पेक्षा जास्ती आहे. मात्र prophylactic paracetamol घेतलेल्या व्यक्तींमध्ये ते कमी आहे. prophylactic paracetamol चा प्रतिपिंड निर्माण करण्यात अडथळा होत नसल्याचे म्हटले आहे. आणि कोविड लस घेतलेल्या व्यक्तींमध्ये काहींना एकदाच लस दिली आणि काहींना २८ दिवसांनी दुसऱ्यांदा लस दिली. फेज ३- या फेज मध्ये ११६३६ व्यक्तीवर चाचणी घेतली (ब्राझील आणि UK येथील). एकूण उपयुक्तता ७०% अशी दिली आहे. या फेज मध्ये मात्र सर्वांना दोनदा लस देण्यात आली आणि यातील अंतर मात्र ६ आठवडे ते १२ आठवडे असे निरनिराळे आहे.

वाचन 3382 प्रतिक्रिया 0