मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

भूक

ज्योति अळवणी · · जनातलं, मनातलं
 भूक  सुप्रियाची सुनंदा आत्या नाशिकमध्ये एकटीच राहात होती. सुनंदा आत्याने नुकताच एक लहासा तिच्यापुरता असा फ्लॅट घेतला होता एका नवीन होणाऱ्या कॉम्प्लेक्समध्ये आणि या वयात देखील अगदी हौसेने सजवला होता. सुप्रियला तिच्या सुनंदा आत्याचं खूप कौतुक वाटायचं. एकटी राहात होती तरी एकदम खुश असायची. या वयात देखील तिने whatsapp, facebook कसं वापरायचं ते शिकून घेतलं होतं आणि ती ते अगदी सफाईदारपणे वापरत देखील होती. सुप्रिया देखील तिच्या आत्याची अत्यंत लाडकी भाची होती. भावाला उशिरा का होईना पण गोंडस बाळ झालं याचा आत्याला खूप आनंद होता. त्यात सुप्रिया अत्यंत गोड आणि साधी सरळ मुलगी होती. एकुलती एक आणि उशीरा झालेली असल्याने खूप लाडात वाढली होती; पण तरीही तिने तिचं करियर खूप छान वाढवलं होतं. आज सुप्रिया सुनंदा आत्याकडे राहायला येणार होती. सुप्रियाने नुकतीच नोकरी बदलली होती. नवीन जॉबला जॉईन होण्या अगोदर तिने दोन दिवसांचा ब्रेक घेतला होता आणि दोन दिवस सुनंदा आत्याकडे राहायला जायचं ठरवलं होतं. त्यामुळे आत्या सकाळपासूनच खुश होती. सुप्रिया संध्याकाळी पोहोचणार होती. त्यामुळे आत्याने दिवसभर खपून सुप्रियाला आवडणारे लाडू, चकली, गुळपोळी असे अनेक पदार्थ केले होते आणि ती अगदी अधिरपणे सुप्रियची वाट बघत होती. साधारण सातच्या सुमाराला घराची बेल वाजली आणि आत्या स्वयंपाकघरातून लगबगीने दाराकडे धावली. दारात सुप्रियला बघून सुनंदा आत्या एकदम खुश झाली. सुप्रिया दारातच आत्याच्या गळ्यात पडली आणि तिची पापी घेत म्हणाली;"बघ, म्हंटल्याप्रमाणे आले की नाही तुझ्याकडे राहायला?" आत्या देखील तिला मिठीत घेत म्हणाली;"हो ग माझ्या लाडोबा. तुला बघून खूप खूप बरं वाटतंय ग. बरं झालं आलीस. ये आत ये." असं म्हणत आत्याने तिला आत घेतलं. सुप्रिया आत येऊन आत्याचा लहानसा पण सुंदर सजवलेला हॉल बघून एकदम खुश झाली. "आत्या मस्तच सजवला आहेस ह फ्लॅट. केवढा हा उत्साह ग तुला. तुझ्या इतकी एनर्जी मला पण मिळाली पाहिजे. मी तर नोकरी ऐके नोकरी करून देखील दमून जाते." सुप्रिया आत्याचं कौतुक करत म्हणाली. त्यावर मनापासून हसत आत्या म्हणाली;"अग one BHK तर आहे हा. त्यात जसं जमलं तसं केलंय ग. अभय-अंजली होतेच न मदतीला." अभय दादाचं नाव ऐकून सुप्रियाने विचारलं;"अरे हो. कसा आहे ग दादा? अंजली वहिनीची नोकरी कशी आहे? अजूनही फिरावं लागतं का ग तिला?" स्वयंपाकघराकडे जात सुनंदा आत्या म्हणाली;"हो ग. हा फिरतीचा जॉब म्हणजे फार कठीण. तरी बरं. अभय असतो शहरातच. त्यामुळे विपुलकडे पाहाणं सोपं जातं. मला देखील मनात येतं जावं तिथेच राहायला. पण दुरून प्रेम जास्त टिकतं ग; आणि त्यात एकदा हात-पाय चालेनासे झाले की जायचंच आहे त्यांच्या संसारात. बरं ते जाऊदे. तू तुझी बॅग आत ठेव आणि हात-पाय धुवून घे बघू. तुझ्यासाठी किती काय काय केलं आहे." बेडरूमच्या दिशेने जात सुप्रिया म्हणाली;"मला खात्रीच होती ग आत्या तू माझ्या आवडीचं सगळं करून ठेवलं असशील. मस्त चहा ठेव दोघींसाठी. मी फ्रेश होते. आईने देखील तुझ्यासाठी काही काही दिलं आहे. माझी बॅग त्यानेच जास्त भरली आहे." त्यावर मनातून खुश होत आत्या म्हणाली;"कशाला उगाच सुनीताने त्रास करून घेतला. इथे तसं सगळंच मिळतं ग. बरं, ये तू फ्रेश होऊन. मी चहा ठेवते." सुप्रिया आतल्या खोलीत गेली आणि तिने तिची बॅग खोलीतल्या एकुलत्या एका पलंगावर ठेवली. आत्याने तिची बडेरूम देखील छान करून घेतली होती. बेडच्या वरच पुस्तकं ठेवायचं शेल्फ होतं. बेड समोर TV आणि बाजूला कपाट. एका व्यक्तीसाठी सगळं काही होतं त्या खोलीत. सुप्रियाने गाऊन काढला बॅगेतून आणि तिचं लक्ष आत्याच्या पुस्तक साठ्याकडे गेलं. समोरच नारायण धारपांच्या पुस्तकांची चळत बघून सुप्रियला हसायलाच आलं. फ्रेश होऊन बाहेर येताना नारायण धारपांच्या पुस्तकांमधली दोन पुस्तकं उचलून आणत आणि ती आत्याला दाखवत सुप्रिया म्हणाली;"आत्या, अजूनही नारायण धारपांची ही भुताटकीवाली पुस्तकं तू वाचतेस? कमाल आहे ह. तुला भिती नाही का ग वाटत? एकतर या नवीन कॉम्प्लेक्समध्ये आली आहेस राहायला. त्यात हा सहावा मजला आणि अजून शेजारी कोणी आलेलं दिसत नाही. त्यात घरातसुद्धा तू एकटीच आहेस. तरीही वाचतेस असली पुस्तकं?" चहा घेऊन बाहेर येत आत्या हसत म्हणाली;"प्रियु बेटा भुतं पुस्तकात नसतात; आपल्या मनात असतात. भ्यायचंच असेल न तर आपल्या मनाला भ्याव माणसाने. या पुस्तकांना नाही ग; आणि एकटी कुठे? खालच्या मजल्यावरच्या काळे वाहिनींशी मस्त मैत्री झाली आहे माझी. आम्ही दोघी एकत्रच बाजारहाट वगैरे करत असतो." चहाचा कप हातात घेत सुप्रिया म्हणाली;"आत्या, भुतं नाहीत हे मला नाही पटत. अग इतके लोक त्यांचे अनुभव सांगत असतात भुतं बघितल्याचे. ते काय खोटे असतील?" सुप्रियच्या पुढ्यात चकलीची प्लेट करत आत्या म्हणाली;"कसले अनुभव घेऊन बसलीस ग. माझा नाही यावर विश्वास; आणि तू सुद्धा हे सगळं मनातून काढून टाक बघू. एक लक्षात ठेव बेटा, मनी वसे ते स्वप्नी दिसे बरं!" आत्याच्या या बोलण्यावर दोघीही हसल्या आणि मग इकडच्या तिकडच्या गप्पांमध्ये रंगून गेल्या. रात्री जेवणं आटोपून सुप्रिया आणि आत्या दोघी बेडरूममध्ये झोपायला आल्या. आत्याने सुप्रियासाठी खाली गादी घातली होती. सुप्रिया आडवी पडली. दिवसभराच्या दगदगीने तिचे डोळे मिटत होते; ते आत्याच्या लक्षात आलं आणि ती आपणहूनच म्हणाली;"पियु बेटा झोप तू. दमली असशील आज खूपच. उद्या मस्त भटकायला जाऊया आपण." हसून 'बरं' म्हणत सुप्रियाने डोळे मिटले. आत्या देखील दिवा बंद करून आडवी झाली. किती वाजले होते कोणास ठाऊक... पण अचानक सुप्रियला जाग आली. खोलीत मिट्ट अंधार होता; पंखा बंद होता आणि वारा देखील पडलेला होता. सुप्रिया घामाघूम झाली होती. ती उठून बसली आणि तिचं लक्ष खोलीच्या मोठ्या खिडकीकडे गेलं आणि सुप्रियच्या तोंडून मोठी किंचाळी बाहेर पडली. खिडकीच्या बाहेर कोणीतरी उभं होतं... एक किडकिडीत मुलगा.... किंवा माणूस! सुप्रिया पार घाबरून गेली आणि त्याचवेळी तिला आत्याचा आवाज हॉलमधून आला.... "दिसला का तुला तो? घाबरू नकोस. ये बाहेर." सुप्रिया घाईघाईने उठून बाहेर हॉलमध्ये आली. बाहेरून जेमतेम उजेड येत होता त्या उजेडात सुप्रियला आत्या हॉलमधल्या सोफ्याच्या मोठ्या खुर्चीमध्ये बसली दिसली. तिच्या समोर बसत सुप्रियाने विचारलं;"अग, वीज गेली आहे वाटतं. पंखा बंद म्हणून मला जाग आली तर एकदम अंधार की ग. आणि काय होता तो प्रकार आत्या? अग सहाव्या मजल्यावर ना तुझा हा फ्लॅट? मग? कोण होता तो इतक्या वर चढून आला. आणि तू थंडपणे म्हणते आहेस दिसला का? घाबरू नकोस!" सुप्रियाने एका दमात आत्याला विचारलं. आत्या शांतपणे सांगायला लागली;"काय सांगू? तो... तो कोण आहे? तो म्हणजे भूक!" सुप्रिया;"म्हणजे?" "या कॉम्प्लेक्सचं काम चालू होतं तेव्हा तो इथे आई सोबत राहायचा. वेडा होता डोक्याने; त्यामुळे त्याला काम सुचायचं नाही. आईच काय ती काम करून थोडं काहीतरी कमवायची आणि दोघे रात्री एकत्र जेवायचे. तो असाच दिवसभर कोणत्या ना कोणत्या खिडकीबाहेर उभा राहून फ्लॅटच्या आत बघत बसायचा. कोणी समोर आलं की 'भूक... भूक...' म्हणायचा. एक दिवस त्याची आई काम करता करताच गेली. कशी गेली.... काय झालं... कोणालाही कळलं नाही. कामावरच्या मुकादमाने अंगावर बालंट नको यायला म्हणून इतर मजुरांच्या मदतीने तिचं सगळं क्रियकर्म करून घेतलं. इतक्या घाईने की मुलालासुध्दा घेतलं नाही सोबत. मुलगा काय ग.... उभा होता कुठल्यातरी खिडकीमध्ये... त्याच्या आईची वाट बघत. रात्र झाली.... दुसरा दिवस... तिसरा दिवस... आणि तो मुलगा तसाच उभा होता खिडकीत. इतर कामगार बघायचे त्याला; पण प्रत्येकाचं पोट हातावर. कोण काय मदत करणार? आणि एक दिवस तो वेडा देखील तिथेच पडला. मग त्याचं क्रियकर्म देखील असंच उरकलं गेलं. पण त्यानंतर तो अनेकांना दिसतो असा खिडकीत उभा राहिलेला. नीट ऐकलं तर त्याने म्हंटलेलं ते 'भूक...भूक...' देखील ऐकायला येतं. आणि जर ते नाही तर........" इतक्यात एकदम वीज आली आणि अचानक घराची बेल वाजली. बेल ऐकून सुप्रिया दचकली आणि गर्रकन वळून पटकन उठून तिने दार उघडलं. समोर आत्या उभी होती कोणाशीतरी मोबाईलवर बोलत!!! सुप्रियच्या तोंडचं पाणी पळालं..... ती धडपडत मागे सरकली आणि परत गर्रकन मागे वळत तिने आत्या होती त्या सोफ्याकडे बघितलं..... सोफ्याची खुर्ची डोलत होती आणि सुप्रियला आवाज आला.... जर ते नाही तर..... आई येते त्याचं दुःख सांगायला.!!" समाप्त

वाचने 8788 वाचनखूण प्रतिक्रिया 25

अचानक मिळालेल्या कलाटणी मुळे कथा परिणाम कारक झालीय. साधे सोपे पण छान लिहिले आहे.

नेत्रेश 06/03/2021 - 05:42
सुप्रियाला आतल्या खोलीत झोपउन, तीला न सांगता, ईतक्या रात्री आत्या चावी न घेता बाहेर जाते. लाईट गेला असताना बाहेर उभे राहुन कुणबरोबर तरी फोनवर बोलत रहाते. व लाईट आल्यावर बेल वाजवते?

In reply to by नेत्रेश

वर्ज का गेली हे बघण्यासाठी आत्या बाहेर गेली होती. अंधारात कदाचित किल्ल्या नाही मिळाल्या तिला. वीज येईल याची खात्री करून परत आलेल्या आत्याला वीज आल्याचे लक्षात आल्याने बेल वाजवतानाच तिने ज्यांच्याजडे चौकशी केली होती त्यांना फोन करून सांगितले असण्याची शक्यता असूच शकते की वीज आली आहे

In reply to by ज्योति अळवणी

नेत्रेश 06/03/2021 - 14:00
पण रात्री उशीरा लाईट गेल्यावर ६ व्या मजल्यावर एकटी रहाणारी महीला शक्यतो घराबाहेर पडत नाही. जास्तीत जास्त सगळीकडची वीज गेली का ते खिडकीतुन पाहील आणी झोपुन जाईल. आणी अगदी बाहेर जायचेच तर टॉर्च वा मोबाईलचा फ्लॅश वापरुन किल्ल्या शोधुन घेउन जाईल. तुमच्या कथा खुप छान असतात. नेहमी वाचतो व आवडतात. या कथेचा शेवटही बर्‍याच जणांना आवडला आहे. तेव्हा मीच नको तीतके जास्त लॉजीक लावतो आहे असे वाटते :)

In reply to by नेत्रेश

मुळात आत्या मुलासोबत राहण्याचा option असूनही एकटी राहाते आहे. ती नक्की सत्तरीची आहे पण एकटी राहात असताना नारायण धारपांच्या कथा वाचते. म्हणजे बरीच धीट आहे. वीज गेल्यावर कदाचित ती खालच्या काळे वहिनींकडे गेली असेल. सुप्रिया घरात आहे; असा विचार करूनच किल्ल्या नेल्या नसतील. काळे वहिनींकडे कळलं असेल की एवढ्यात वीज येईल म्हणून परत आली असेल स्वतःच्या घरी. नेमकी त्याचवेळी वीज आल्यामुळे बेल वाजवू शकली. नाहीतर फोन करून सुप्रियाला उठवलंच असतं तिने. वीज आली आहे आणि सुप्रियाने दार उघडलं आहे हे ती काळे वहिनींना कळवत असेल. म्हणून फोन केला असेल. हातात फोन आहेच... त्याच उजेडात ती चालत खालच्याच मजल्यावरच्या काळे वहिनींकडे जाण्याची शक्यता मला जास्त वाटते. तुमच्या मनात अजून काही शंका असतील तर जरूर विचारा

In reply to by ज्योति अळवणी

नेत्रेश 09/03/2021 - 13:23
काही प्रश्न, आणी मीच दीलेली उत्तरे - बरोबर आहेत का ते सांगा :) प्रश्न १. सत्तरीची म्हातारी रात्री उशीरा लाईट गेली तर खालच्या मजल्यावरच्या काळे बाईंना फोन करेल, की त्या जाग्या आहेत की झोपल्या आहेत याची पर्वा न करता त्यांच्या स्वतः जीना उतरुन त्यांच्या घराचा पर्यंत जाईल. त्यांच्या दरवाजा ठोकउन, त्यांना उठउन लाईट कधी येणार हे विचारील? उत्तर - काळेबाईंचा फोन सायलेंटवर होता म्हाणुन त्यांनी उचलला नसेल. त्या रात्री १२ च्या आधी झोपन नाहीत हे माहीत असल्यामुळे आजी जीना उतरुन त्यांच्या घरापर्यंत गेल्या. प्रश्न २. काळेबाईंना काय माहीत लाईट कधी येणार ते? उत्तर - त्यांचे मिस्टर वीजमंडळात वायरमन आहेत प्रश्न ३. आता एवढ्या रात्री लाईट गेली तर म्हातारीने गप्प झोपायचे सोडुन घराबाहेर कशाला पडावे? उत्तर - त्यांना रात्री पंख्याशिवाय झोप येत नाही. प्रश्न ४. चावी न घेता बाहेर जाताना घराच दरवाजा फक्त ओढुन घ्यायचा, कींवा आलेल्या पाहुणीला उठवायचे. नाहीतरी लगेच घरी येणार होती व एकतर दरवाजा ठोकउन कींवा बेल मारुन पाहुणीला दरवाजा उघडायला उठवणारच होती. उत्तर - दरवाजा नुसता लोटुन ठेवला आणी कुणी चोर आला तर ? (या भुताटकीच्या बिल्डींगमध्ये अंधारात कोणी चोर येण्याचेश्क्यता कमीच) आणी बाहेर जाण्या आधी पाहुणीला उठवले तर ती एकटीच अंधाराला घाबरुन म्हातारीला घराबाहेर जाउ देणार नाही. - कृपया हलकेच घ्या.

In reply to by नेत्रेश

तर कथेमधील थ्रिल अनुभवण्यापेक्षा कथेची चिरफाड करून स्वतः किती शहाणे आहोत हे दाखवायचा प्रयत्न आपण करत आहात. आपल्या वैचारिक गरीबतेची कल्पना मला आली आहे. त्यामुळे यापुढे माझ्या कोणत्याही कथे/लेखावरील आपल्या कोणत्याही प्रश्नाचे उत्तर देण्याचा त्रास मी करून घेण्याची गरज नाही; हे देखील मला लक्षात आले आहे. धन्यवाद

In reply to by ज्योति अळवणी

नेत्रेश 10/03/2021 - 01:36
मी फक्त कथेतली विसंगती दाखउन दीली होती. ती मान्य करण्या ऐवही तुम्ही त्याहुन विसंगत स्प्ष्टीकरणे द्यायला सुरवात केलीत. आणी ती सुद्धा संपल्यावर वैय्यक्तीक पातळीवर टीका करु लागलात. मी सभ्यपणा सोडुन कुणावर अशी वैय्यक्तीक टीका करु शकत नाही. तेव्हा तुमच्या टीकेला काही उत्तर देत नाही. तसेच मला कोणताही प्रश्न विचारायचा नाही, तेव्हा उत्तराची अपेक्षाही नाही. गुडबाय!

छानच लिहीलीय शेवट आवडला. माझा विश्वास आहे भूतांवर ते काही करत नाहित आपणच घाबरतो.

In reply to by टर्मीनेटर

प्रियु बेटा भुतं पुस्तकात नसतात; आपल्या मनात असतात. भ्यायचंच असेल न तर आपल्या मनाला भ्याव माणसाने आत्याचं मतच आहे असं! त्यामुळे तिला भुतं दिसणं अवघडच नाही का बाकी टर्मिनेटर तुला कथा आवडली हे मस्त! ट्रिप कशी झाली? कोकणावरचा एक झकास लेख होऊन जाऊ दे की. तुझ्या झक्कास फोटोसंग्रहासकट

In reply to by ज्योति अळवणी

टर्मीनेटर 19/03/2021 - 21:04
ट्रिप कशी झाली? कोकणावरचा एक झकास लेख होऊन जाऊ दे की. तुझ्या झक्कास फोटोसंग्रहासकट
ट्रिप मस्तच झाली! गोव्यातले किल्ले आणि कोकण-तळ कोकण विषयी अनुक्रमे 'दुर्गविहारी' आणि 'गोरगावलेकर' ह्या दोन मिपाकरांनी खुप छान लेखमाला मिपावर लिहिल्या असल्याने मी पुन्हा त्यावर लिहिणार नाहीये. पण निवडक फोटोंचा एक चित्रलेख लिहिण्याचा विचार चालू आहे, बघू कधी जमतंय ते, 'दुबई' वरची मालिका अजून रखडलीच आहे 😉

मराठी_माणूस 07/03/2021 - 11:23
अभय असतो शहरातच.
म्हणजे कुठे ? आत्या "भुक" बद्दल सांगत असते , त्या परिछेदाचा शेवट "नीट ऐकलं तर त्याने म्हटलेलं ते 'भूक...भूक...' देखील ऐकायला येतं. आणि जर ते नाही तर........" आणि
इतक्यात एकदम वीज आली आणि अचानक घराची बेल वाजली. बेल ऐकून सुप्रिया दचकली आणि गर्रकन वळून पटकन उठून तिने दार उघडलं. समोर आत्या उभी होती कोणाशीतरी मोबाईलवर बोलत
आणि तीचे पुढील वाक्य "आई येते त्याचं दुःख सांगायला.!!", हे आधीच्य वाक्याला जोडुन आहे ना ? मग आत्या तर तिथेच असायला पाहीजे ना ? ती तिथुन केव्हा गेली ?

In reply to by मराठी_माणूस

अभय शहरातच असतो. म्हणजे वेगळा राहातो. सुप्रियाला वाटत असतं की तिची आत्याच तिला त्या मुलाची गोष्ट सांगत आहे. पण सत्य हे आहे कीवाट्या मुलाची आई त्याची गोष्ट सांगायला आली आहे. कारण सुप्रियाचा मुळात भूतांवर विश्वास आहे.

सौन्दर्य 19/03/2021 - 23:25
कथा आवडली तरी एक प्रश्न मनात रुंजी घालत आहेत. जर त्या मुलाची आई येऊन त्या मुलाविषयी सांगत असेल तर कोणतीही आई आपल्या मुलाचा उल्लेख 'वेडा' (आणि एक दिवस तो वेडा देखील तिथेच पडला.) असा करणार नाही, फार फार तर "तो मुलगा" असा त्याचा उल्लेख करील.