Skip to main content

आज काय घडले ... पौष व. ९ तैमूरचा राक्षसी प्रताप !

लेखक Ashutosh badave यांनी रविवार, 07/02/2021 या दिवशी प्रकाशित केले.
taimur taimur शके १३२१ च्या पौष व. ९ रोजी तैमूरलंग भारतांतून अगणित लूट घेऊन आणि मनसोक्तपणे रक्तपात करून आपल्या मायदेशी गेला. दिल्ली शहर हस्तगत झाल्याबरोबर तैमूरच्या सैन्यांत विजयोत्सव सुरू झाले. पकड, लूट, मारहाण या प्रकारांना ऊत आला. पंधरा दिवसपर्यंत तैमूरलंगाचा मुक्काम दिल्लीस होता. भारतातील कलाकौशल्यावर तो फार खुष होता. कित्येक कारागीर त्याने स्वतःबरोबर घेतले. जातां जातांहि त्याने पुष्कळच अनन्वित प्रकार केले. मिरत शहरी त्याच्या सैन्याची थट्टा कोणी केली म्हणून त्याने सर्वांची कत्तल केली. आग्नि व तरवार यांच्या साह्याने तैमूरचा तुफानी प्रचार होत होता. हरद्वार येथे आल्यावर त्यास समजले की, गोमुखांतून गंगा पडते. या 'पाखंडीपणा'वर तो खूपच संतापला आणि त्यामुळे त्यावर विश्वास ठेवणारांना कडक शासन भोगावे लागले. लक्षावधि लोकांना त्याने मृत्युलोकांत पाठविले. "मनुष्यजातीचे महान् शत्रु म्हणून इतिहासांत जे नावाजलेले आहेत त्यांच्यांत तैमूरची गणाना केली जाते. तो एखाद्या नवीन शहरी आला म्हणजे तेथील लोकांजवळ सर्व संपत्तीची दरडावून मागणी करीत असे. नंतर ती लुटून आणण्यास आपली फौज पाठवी. सर्व लोकांना पकडून तो एका ठिकाणी जमा करी. अशा लोकांतून कोणी कारागीर किंवा विद्वान् असतील तर तो त्यांना निवडून दूर करी. इतरांचा जीव घेऊन त्यांच्या शिरांचा एक मोठा ढीग शहराबाहेर रचण्यांत येई. बगदाद शहर घेतले त्या वेळेस अशा शिरांचे मनोरे एकशेवीस झाले होते. केव्हां केव्हा जिवंत माणसांना चुन्याने व विटांनी चिणून त्यांचा तट बांधण्याचे काम तैमूरचे कुशल कारागीर करीत. हिंदुस्थानांत मोंगली जुलमास व्यवस्थितपणे सुरुवात तैमूरनेच केली. त्याच्या नांवाने बादशाहीहि चालू होती. तो जिवंत असेपर्यंत त्याच्या नावाने खुत्बा वाचण्यांत येत असे. तैमूरलंगाची स्वारी म्हणजे एक प्रकारचा ईश्वरी क्षोभच असे भारतीय समजत असत. -१ जानेवारी १३९९
लेखनविषय:

वाचने 929
प्रतिक्रिया 0

प्रतिक्रिया