मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

बाधा

बिपीन सुरेश सांगळे · · जनातलं, मनातलं
बाधा ------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------ संध्याकाळची वेळ . गोकुळात तरुण आणि अवखळ गोपींचा खेळ रंगात आला होता . त्या झोके खेळत होत्या . फेर धरत होत्या आणि गाणीही म्हणत होत्या . मनभावन श्रावणऋतु होता ना . राधा मात्र सख्यांची नजर चुकवून पळाली . तिला आता यमुनाकाठ गाठायचा होता . हुरहूर लावणारीच ती वेळ . हवेत सुखद गारवा . सोनेरी पिवळसर ऊन . झाडांच्या शेंड्यांशी सलगी करणारं . घरी जाण्यापूर्वी प्रियाच्या गळ्यात लडिवाळपणे झुलणाऱ्या अभिसारिकेसारखं . पक्ष्यांचा किलबिलाट चाललेला . घरट्यांकडे परतण्यापूर्वीचा . गुरं आपापल्या घराकडे निघालेली . त्यांचा हंबरण्याचा आणि गळ्यातल्या घंटांचा गोड किणकिणाट . प्रत्येकालाच एक ओढ लागलेली ... यमुना वहात होती . श्रावणसरींनी नुकतंच एक हलकं शिंपण घातलं होतं . गवतावर पाण्याचे थेंब होते , मोत्यांसारखे . तर काही थेंब हळदुल्या उन्हामुळे सोनेरी भासत होते . सोनसरींनी न्हायलेलं इतकं निसर्गरम्य वातावरण की भान हरपून जावं ! राधेचंही भान तस्संच हरपलेलं होतं ; पण तो निसर्ग पाहून नव्हे ,तर ते तिच्या प्रियासाठी - कृष्णासाठी ! तिलाही ओढ लागली होती, त्याच्या भेटीची. ती अभिसारिका लगबगीने एका सुनिश्चित कदंबवृक्षापाशी चालली होती. तिला तो निसर्ग जणू दिसतच नव्हता . तिचा निसर्ग , तिचं विश्व म्हणजे फक्त कृष्णच ! श्रावणसरी बरसून गेल्या तरी राधेच्या तापल्या मनाला त्यामुळे शीतलता लाभणार नव्हतीच . ती कदंबापाशी पोचली , पण तिथे कुणीही नव्हतं . ती बिचारी एकदम बावरली. तिचे कावरेबावरे नेत्र भिरभिरले . पण तो खरंच आला नव्हता . तिने कदंबामागे , आजूबाजूच्या झाडांमागे डोकावून पाहिलं . कदाचित , तिची फिरकी घेण्यासाठी तो कुठे दडून बसला असेल , तर त्याला शोधण्यासाठी . कान्हाच तो , काही कमी खोडकर नव्हता ! आकाशी सप्तरंगी इंद्रधनू उमटलं होतं . पण त्या चित्तकठोराची पावलं अजून तिथे उमटायची होती . ती कदंबाच्या झाडाला टेकून उभी राहिली . स्तब्ध , चिंताक्रांत . तिची शांतता भंग पावली ती वर उडालेल्या बगळ्यांच्या पांढऱ्या माळेने . तिने त्रासून वर पाहिलं आणि तिच्या कपाळावरच्या आठ्या पाहून यमुना खळखळून हसली . त्यावर राधेने तीच त्रासिक नजर तिच्याकडे वळवली . " यमुने, भारी गं ! अजून आवाज कर . मला तो एरव्हीचा तुझा नादमधुर खळाळसुद्धा नकोसा वाटतोय . तू मला आणखी छळ . हस मला . माझ्या जीवाला अगदी नकोसं झालंय तर तू माझ्या अणिकच खोड्या काढ ," राधा तिला दुःखाने आणि रागाने म्हणाली. तिच्या त्या बोलण्यावर यमुना अवखळ खळखळली . खोडीलसारखी ती आणिकच लचकत - मुरडत वाहू लागली . ते पाहून राधेचा राग वाढला . आणि दुरून बासरीचे कर्णमधुर स्वर कानी आले. स्वर्गीय संगीताने आसमंत भरून गेला . वेडी राधा मनी मोहरली . तिचा राग कुठे पळून गेला. कृष्णमीलनासाठी तिचं मन , तिचा देह रोमांचितपणे थरथरू लागला . तिकडे त्या स्वरांनी यमुनाही क्षणभर थबकली आणि म्हणाली , " राधे , आलाय गं तो ! ... आता झालं ना समाधान ? त्याच्यामुळे तुझं मन अस्थिर असतं . तुला दुसरं काही सुचत नाही अन काही कळत नाही . मला तर तुझी मनोवस्था पाहून तुला चिडवून द्यावंसं वाटतं . मजा वाटते गं मला . लहान आहेस तू माझ्यापेक्षा . अगं वेडे, त्याची वाट तर मीही पहातच असते . तो येईपर्यंत मलाही काही सुचत नाही . त्याच्या विचारांमध्ये मग मीही वाहवत जाते. वेड्यासारखी ! जसं तुझं नातं त्याच्याशी , तसंच माझंही . तुला झालेली बाधा तर मलाही आहे . अगदी आधीपासून ! “ घनदाट झाडांच्या गर्दीमध्ये कृष्ण नीट दिसत नव्हता . पण पानांमधून, त्याने खोचलेलं मोरपीस मात्र हळूहळू जवळ येताना दिसत होतं . राधा यमुनेच्या बोलण्याने भय पावली होती . तेव्हा यमुना खळखळून म्हणाली , " अगं राधे , घाबरू नकोस . मी काही तुझ्या प्रेमात वाटेकरी नाही गं . तो जसा तुझा प्रियकर आहे तसा तो माझाही भगवंत आहे ! " आता कान्हा , त्या दोघींच्या समीप आला होता . ---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

वाचने 3005 वाचनखूण प्रतिक्रिया 5

गणेशा 10/08/2020 - 23:26
वर्णन जबरदस्त.. आवडले.. मला गेल्यावेळेसच्या आरसा सारखी कथा वाचायला मिळेल असे वाटले होते.. एखादी मस्त कथा द्या की वाचायला..

बिपीन सुरेश सांगळे 12/08/2020 - 10:31
गणेशा आभार प्रयत्न करतो सध्या गलेमा साठी लेखन चालू आहे कळावे