चेंज ऑफ गार्ड
लेखनप्रकार
आज (३१ ऑक्टोबर) महाराष्ट्र टाईम्स आणि सामना मधे वाचलेल्या बातम्यांप्रमाणे बाळासाहेब ठाकर्यांनी माहीती असलेली बातमी, "उद्धवच्या हाती शिवसेनेची सूत्रे दिली असताना मला भेटायला येण्याचे काय प्रयोजन ? " असे म्हणत काही प्रमाणात अधिकृत केली.
जो पर्यंत शिवसेना हा किमान महाराष्ट्रासाठी प्रबळ पक्ष आहे, तो पर्यंत त्यांच्यातील अंतर्गत घडामोडींचा प्रभाव कमी अधिक प्रमाणात महाराष्ट्रावर सहज पडू शकतो. त्यामुळेच या घटनेचे महत्व.
उद्धव ठाकर्यांबद्दल बरेच काही ऐकत आलो आहे - त्यांच्या मितभाषीपणा बद्दल, तसेच राजकारणी असण्यापेक्षा व्यवस्थापकीय दृष्टीकोन असल्याबद्दल वगैरे... शिवसेनेला एक अधुनिक दिशा देण्याची ही संधी एकाअर्थी बाळासाहेबांनी त्यांच्या डोळ्यासमोरच दिली आहे. केवळ वडापाव संस्कृती आणि मॉलमधील नोकर्या यांच्यावर भांडायचे का मराठी समाजाला विविध क्षेत्रात पुढे आणण्यासाठी, त्याचा त्यांनास्वतःला, समाजाला, देशाला (आणि अर्थात शिवसेनाला) फायदा करून घेण्यासाठी दृष्टी देयची ह्याचा विचार करायला लागेल.
वयाच्या ८-१० वर्षांपर्यंत मुलांनी रडारड केली तर ती योग्य असो वा नसो समजू शकतो, १० ते २० पर्यत टवाळक्या पण सभ्यतेच्या मर्यादेत असल्यातर वयपरत्वे म्हणू शकतो, पण चाळीशीचा माणूस जर लहान मुलासारखा आरडाओरडा अथवा विशीतील टवाळक्या करत वागू लागला तर त्याला प्रौढत्व (मॅच्युरीटी) आले असे म्हणता येणार नाही... जे माणसांचे तेच शिवसेनेसारख्या विशिष्ठ हेतूने तयार झालेल्या राजकीय पक्षाचे आहे.
शिवसेना निवडणुकीत नसलेला नगण्य पक्ष होती, पुढे महापालीका मिळवली... नंतर "एकच लक्ष" म्हणत विधानसभा लढली पण जनतेच्या दुर्लक्षाने स्वतःचेच "लक्ष" करून घेतले...सरते शेवटी युतीच्या आधाराने का होईना पण विधानसभा मिळवली - पण बर्याच अंशी जनतेच्या किमान अपेक्षांचापण भंग झाला... "त्यांनी चाळीस वर्षे खाल्ले, मग आमची पाच वर्षे असली तर काय बिघडले?" हे ऐकण्यासाठी काही मते दिली नव्हती... त्याचे वाईट परीणाम त्यांच्या राज्यात झाले नसतील इतके गेले दहा वर्षे त्यांच्या (शिवसेनेच्या आणि या संदर्भात भाजपाच्या) कमकुवत होण्याने झाले. स्वतःच्या फायद्यासाठी दूरदृष्टी ठेवताना स्वतःच्या राज्यासाठी मात्र लघूदृष्टी (शॉर्टसाईटेडनेस) ठेवली गेली... असे का व्हावे हा प्रश्न अनेक सामान्यांना पडला असेल, जरी आश्चर्य वाटले नसले तरी...
नंतरच्या काळात घरातील आणि घरभेद्यांच्या वादळाने शिवसेनेची नौका भरकटणार असे वाटले, पोटनिवडूका हरल्या पण नंतर स्वकर्तुत्वाने त्यांची भरपाईपण पण करून दाखवली आणि महानगरपालीका पण मिळवून दाखवल्या...अर्थात हे यश उद्धवचे आहे असे म्हणता येईल. त्यांचा चेहरा, नाव आणि नेतृत्व म्हणून शिवसेनेशी असलेली संलग्नता या काळात व्यवस्थित पुढे आणली गेली. दुरून पहात असताना त्याला त्यांनी न्याय दिला असे पण वाटते...
आता अर्थात त्यांच्या हातात पक्षिय सत्ता आली आहे, कदाचीत पुढच्या विधानसभा निवडणूकीत विधानसभेवर पण भगवा फडकवत "चेंज ऑफ गार्ड" पहायला मिळेल. पण ते सर्व होत असताना मला राहून राहून एक अब्राहम लिंकनचे , मला आवडणारे एक वाक्य आठवते: "Nearly all men can stand adversity, but if you want to test a man's character, give him power."
आज शिवसेनेच्या संदर्भात वरील अर्थाने उद्धवच्या "कॅरेक्टर"ची चाचणी चालू झाली आहे. त्यात ते किती यशस्वी ठरतात यावर त्यांचे आणि शिवसेनेचे भवितव्य अवलंबून आहेच पण तुम्हा-आम्हाला आवडो-न आवडो, पटो - न पटो पण सुरवातीस म्हणल्याप्रमाणे, महाराष्ट्राचे भवितव्यही अवलंबून आहे.
त्या अर्थी हा "चेंज ऑफ गार्ड" महाराष्ट्रासाठी फायद्याचा ठरोत ही आशा - वेडी का वास्तव ते काळच ठरवेल.
डिसक्लेमरः मी कुठल्याच पक्षाचा सदस्य नाही. अमेरिकन भाषेत "स्वतंत्र" आहे. आपल्याकडे राजकीय उत्क्रांती घडवून आणायची असेल तर प्रत्येक सुजाण मतदाराने मतदान करून गरज असेल तर दरवेळेस सत्तांतर घडवून आणण्यात मदत करावी. जातीच्या, धर्माच्या राजकारणाला बळी न पडता निव्वळ पाच वर्षात आपण निवडून दिलेल्या नगरसेवकाने, आमदाराने, खासदाराने, मंत्र्याने नक्की काय केले आणि त्याचा मला, माझ्या सभोवतालाला नक्की काय फायदा अथवा तोटा झाला, ह्याचा विचार करून मग मतदान करावे..जेंव्हा आपल्याकडील राजकारण्यांना कळेल की राजकारण हे साडी, भांडी आणि बाटली देऊन विकत घेता येत नाही तेंव्हा खरा बदल घडायला सुरवात होईल.
वाचने
2595
वाचनखूण
प्रतिक्रिया
7
सुंदर आढवा
शिवसेना
In reply to शिवसेना by सुनील
कुठेतरी...
मस्त आढावा
आढावा छानच.......
In reply to आढावा छानच....... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
महाराष्ट्राचे चांगले दिवस...
काळाच्या