आठवणीतील काश्मीर : लालेदी छोले -पुरी
लेखनप्रकार
आठवणीतील काश्मीर : लालेदी छोले -पुरी
आता तसे पहिले तर या घटनेला अनेक वर्षे होऊन गेली .मला अजून देखील तो दिवस चांगला आठवतो .मी जेव्हा कॉलेजच्या पहिल्या वर्षात शिकत होतो, त्या वेळी मला, माझे सिनियर्स या लालाच्या दुकानात छोले पुरी खाण्यासाठी घेऊन आले होते .लाल चौकात पॅलॅडियम टॉकीज जवळ, जी भाजी मंडई आहे ,त्या मंडईत आत शिरल्या वर डाव्या बाजूला हे दुकान होते. दहा बाय दहा फुटाच्या छोटयाशा दुकानात,बाजूच्या तिन्ही भितींना साधारण आठ इंचाची सभोवती एक लाकडी पट्टी लावण्यात आली होती . त्या पट्टीवर आपली प्लेट ठेवून,उभे राहूनच लोक मोठ्या मज्जेने छोले पुरी,टिक्कीया,सामोसे,चाट याचा आनंद घेत असायचे. काश्मिरी ,पंजाबी,मिलिटरीवाले लोक या दुकानाला जरूर भेट देत असायचे या दुकानात इतकी गर्दी होत असे कि चुकून एखादा,बाजूस असणाऱ्या माणसाच्या प्लेट मधील घास खाऊन रिकामा होत असे. जे कांही पदार्थ बनवले जात ते अतिशय स्वच्छ व आपल्या समोर तयार केले जात असत .दुकानाच्या बाहेर वरील बाजूस,एक ताडपत्री बांधलेली होती आणि पुऱ्या तळण्याचे काम या ताडपत्री खाली चाले . पुऱ्या मोहरीच्या तेलात तळत असल्या मुळे त्याचा उग्र असा वास सगळी कडे पसरलेला असायचा .सुरवातीला हा मोहरीच्या तेलाचा वास मला अजिबात आवडत नसे .या पूर्वी मी आयुष्यात मोहरीच्या तेलातील पदार्थ कधीच खाल्ले नव्हते. वासाने खुप मळमळायचे पण जशी सवय होत गेली तसे पदार्थ आवडू लागले .जेव्हा जेव्हा मी कॉलेज मधून लाल चौकात येत असे ,तेव्हा प्रथम माझे पाय,या लालाच्या दुकानकडे खेचून आणत असत ,मग एकदा का अल्पोपहार झाला कि मग बाकीच्या सगळ्या महत्वाच्या कामाची आठवण येत असे .
शुभ्र पांढऱ्या रंगाचा तीन बटणाचा शर्ट व तितकेच स्वच्छ पांढऱ्या रंगाचे धोतर नेसलेले ,चार्ली चॅप्लिन प्रमाणे मिशी असणारे साधारण सत्तरीतील ,गोरेपान पंजाबी गृहस्थ ,मोठया गंभीर भावाने येणाऱ्यांचे स्वागत करीत असत .एकदा दोनदा त्यांनी तुम्हाला पहिले ,कि बरोबर ते तुम्हाला ओळखत असत ."बाबूजी आप बहोत दिनसे नही आये ? ओ छोटू बाबुजीदी प्लेट विच बल्ले कट पाव जी ".तुमच्या आवडी निवडी देखील त्यांनी लक्षात ठेवलेल्या असायच्या .
काळ्या ,तपकिरी रंगाची छोले पुरी ज्या वेळी समोर येत असे ,त्या वेळी त्यातील अनेक मसाल्यांचा वास खरोखरच स्वर्गीय आनंद देऊन जात असत. काय ! काय ! या मसाल्यात हे लोक घालत असतील बरे ! दालचिनी ,जिरे,पुदिना मनात उगीचच विचार येत असत,बहुतेक आपली आज्जी करायची तसला काळा मसाला तर नाही . तस बघितलं तर प्लेट मध्ये छोलेचे दहा -पंधराच दाणे असायचे मात्र त्यांच्या सभोवती इतका दाट मसाला पसरलेला असायचा कि ज्याच्या चवीची तुलना दुसऱ्या कुठल्या चवीशी होणे शक्य नाही.बरोबरीने दिल्या जाणाऱ्या त्या मोठ्या मोठ्या पांढऱ्या शुभ्र मैद्याच्या पुऱ्या, लाटल्या वर लालाजी दोन हाताचे फटके देऊन त्या हळूच तेलात सोडत,पुऱ्या तळताना असे वाटायचे कि ए -४ साईजचा शुभ्र पातळ पेपर प्रिंटर मधून बाहेर येतो आहे. पुरीचा एक घास जरी घेतला ,तरी तोंडात पुरी विरघळून जात असे .
मी कमीत कमी तीन चार प्लेट छोले पुरी खात असे . कदाचित हे लाले पंजाबी वैष्णव असल्या मुळे कांदा खात नसावेत .छोले बरोबर ते नेहमी मुळ्याचा किव्हा मिरचीचा तुकडा देत असत.यांच्या मुळेच जेवताना मुळा खाण्याची आवड मला लागली असावी .आयुष्यात एकदा तरी ह्या संतरामच्या दुकानातील छोलेपुरी खाण्याची इच्छा आहे .मला माहित आहे ,हे आता कठीण आहे .बाकीच्या वातावरणा मुळे ते आता तिथे आहेत कि दुसरी कडे कुठे गेले आहेत देव जाणे .
वाचने
4296
वाचनखूण
प्रतिक्रिया
11
वाह! छान लिहिलय. छोले भटुरे खायची इच्छा झाली एकदम :)
In reply to वाह! छान लिहिलय. छोले भटुरे by अनुप ढेरे
छोले भटूरे खायची इच्छा झाली.
खूप छान लिहिलंय. तुमच्या काश्मीर च्या अनुभवांवर अजून लिहा प्लीज.
In reply to खूप छान लिहिलंय. तुमच्या by पद्मावति
मलाही वाचायला आवडेल.
संजय यांची वर्णनशैली छान आहे.
वाचते आहे..
वाह, मस्त लिहिलंय ! मजा आली हा छोटासा अनुभव वाचायला !
लालाजींचं चित्र झकास रंगवलंय !
लिहिते रहा, संजय उवाच !
वर्णन अगदी सुरेख
वाचून पुन्हा एकदा अस वाटलं की ही फालतू टेन्शन वजा केली तर काश्मिर कीती लोभस वाटेल.
बाकी राजकीय बाजू जरी बाजूला ठेवल्या तरी कलम 370 असेच ठेवून वर्षभर रोजगार निर्मिती शक्य तरी आहे का आणि नसेल तर असंतोष धुमसत ठेवणं किती सोप आहे.
एकदा अम्रुतसर येथे छोले भटुरे मुद्दाम आठवण ठेवुन खाल्ले होते ती आठवण जागी झाली लेख वाचल्यानंतर. छान वर्णन. आवडले. पुलेशु.
@ Sanjay Uwach,
पर्यटकी छापाचं सोडून काश्मीरबद्दल 'प्रत्यक्ष अनुभवांचं' वर्णन फारसं वाचायला मिळत नाही.
तुमचे अनुभव वाचायला आवडतील, अवश्य लिहा.
अनिंद्य
वाह! छान लिहिलय. छोले भटुरे