Skip to main content

साऊंड डिझाईनिंग

साऊंड डिझाईनिंग

Published on 20/12/2017 - 22:26 प्रकाशित मुखपृष्ठ
क्षमायाचना: साऊंड डिझाईनिंग बद्दल माहिती मिळेल या आशेने जर धागा उघडला असेल तर आपली निराशा झाली असेल. हा लेख सदर विषयासंदर्भात अज्ञानमूलक असा आहे. स्लम डॉग मिलिओनेरसाठी रसूल पुलकुट्टीला साऊंड डिझाईनिंगचे ऑस्कर मिळूपर्यंत सिनेमासंदर्भात अशी काही गोष्ट असते हे मलातरी ठाऊक नव्हते. कलाकार, दिग्दर्शक, संगीतकार, गीतकार, निर्माता, डान्स डायरेक्टर, पोस्टर लावणारे, मशीन ऑपरेटर, पडदे ओढून अंधार करणारे आणि उशिरा येणाऱ्यांना कुठे तरी अंधारात सोडून देणारे टॉर्च बेअरर एवढीच सिनेमा संदर्भात माझी माहिती. यात खालील घटनांनुसार माझ्या ज्ञानात भर पडत गेली:
  • द्वारका दिवेचा यांनी शोलेची अफलातून अशी फोटोग्राफी केली तेंव्हा नुसते भिंगातून बघायचे आणि शूट करायचे यापेक्षा हा काही तरी वेगळा प्रकार आहे हे समजले.
  • गांधी साठी भानू अथैय्या यांना ड्रेस डिझाईनिंगचे ऑस्कर मिळाले तेंव्हा कपडेपट हा काही तरी कौशल्याचा प्रकार आहे हे समजले.
  • टायटॅनिक मधला समुद्राच्या तळाशी असलेली आणि गंजलेली बोट शोधणे आणि त्यातील जुनाट तिजोरी वर आणल्यानंतर साठून राहिलेले चिखलाचे पाणी बाहेर येणे आणि शेवाळ साठलेले चित्र बाहेर काढणे हा नेहमीच्या प्रॉडकशन डिझाईनिंगपेक्षा उच्च प्रकार आहे हे समजले.
हि यादी बरीच वाढवता येईल पण असो. तर नुकताच शादीमें जरूर आना हा सिनेमा पाहण्याचे निमित्त झाले आणि आपल्याला नेमका कशाचा त्रास झाला याचा विचार करता हे साऊंड डिझाईनिंगचे कारण लक्षात आले. अलीकडे पाश्र्व संगीतामध्ये नाट्यपूर्ण आणि भावपूर्ण प्रसंगांमध्ये झांजा वाजविणे या खेरीज सतत बांग दिल्यासारखा एखादा आवाज, हार्मोनी किंवा सिम्फनी सारखा वाद्य मेळ असा प्रकार ऐकण्यात येतो. हा फार सहन करण्यापलीकडचा प्रकार आहे. सिनेमा संपल्यानंतर अगदी सुन्न झाल्यासारखे वाटते. मी जरी साऊंड डिझाईनिंगमध्ये याचा समावेश केला असला तरी हे साऊंड डिझाइनर आणि पाश्र्व संगीतकार यांचे एकत्रित पाप असणार. या सारखाच पण कमी त्रासदायक प्रकार म्हणजे तू नळीवर असणाऱ्या छोट्या फिल्म्स. म्हणजे रस्त्याला जवळ जर घर असेल तर सतत वाहनांचा बारीकसा आवाज, कधी इंदौरी सायलेन्सर लावलेल्या मोटार सायकलीचा आवाज यातून वास्तवतेचा आभास निर्माण केला जातो. त्याची खरेतर आवश्यकता नसते. आवाजाला महत्व असणारे प्रसंग मोजकेच असतात आणि ते देखील प्रत्येक सिनेमामध्ये असतातच असे नाही. तुम्हाला देखील असाच अनुभव आला असेल तर या लेखाचे सार्थक झाल्यासारखे वाटेल.
लेखनप्रकार

याद्या 1869
प्रतिक्रिया 2
खरंच साऊंड डिझाईनिंग बद्दल माहिती मिळेल या आशेनेच धागा उघडला होता.. पण असो. हाही विषय चांगला आहे :) त्रासदायक पार्श्वसंगीत तसे बर्‍याच वेळा अनुभवायला मिळते. शिवाय विनाकारण कर्कश आवाजात असते. आवाज कमी करावा तर मध्येच काही संवाद असेल तर ऐकू येत नाही. 'रईस' हा एकूणच त्रासदायक प्रकार होता, पण पार्श्वसंगीत असे होते जसं काही खूप भनाट काहीतरी होतंय. मुळात कथेत मात्र तसे काही नव्हते तरी. विरुद्ध उदाहरण द्यायचे तर 'डोर' हा चित्रपट. कथा वगैरे सगळंच छान आहे, पण मला याचं पार्श्वसंगीतही अतिशय आवडलं. सलीम-सुलेमानचं पार्श्वसंगीत असं काही आहे, की माझ्यासाठी तरी चित्रपट आवडण्यामागे त्याचा खूप मोठा वाटा आहे. आर्ट डिरेक्शन हा अजून एक महत्त्वाचा घटक. 'पिंजर' चित्रपटात त्या काळानुसार बरेच बारकावे दाखवलेत आणि त्यासाठी त्याला अ‍ॅवॉर्डही मिळालंय. सध्या एवढंच.. आणखी काही लिहिण्यासारखं आठवलं तर पुन्हा लिहीन. मला एकंदरीत या विषयांत फार गती नाही, त्यामुळे ही वरची उदाहरणे माझ्या आकलनक्षमतेनुसार :)

आजकालच्या हिंदी चित्रपटात अनेकदा पार्श्वसंगीताच्या गोंधळात काही संवाद ऐकू येत नाही आणि काही पात्रही अनेकदा काही संवाद पुटपुटल्यासारखे बोलतात.. घरी टीव्हीवर (DTH /pen drive वरुन) बघताना मागे घेवून पुन्हा संवाद ऐकावा लागतो. आजकाल ते क्लायमॅक्सला एखादं गाण /जिंगल आणि जोडीला स्लो मोशन बघितलं की डोक्यात जातं.. अरे काय प्रत्येक सिनेमात तशाच पद्धतीचं चित्रीकरण का ? कुणीतरी एखाद्याने केलं असेल एकदा म्हणून प्रत्येकाने काय तेच पुढे रेटावं... एकूणाताच संवाद नीट आणि सुस्पष्ट ऐकायला मिळण्याचा आनंद हिंदी सिनेमात बराच कमी झालाय. मराठी चित्रपटात सहसा असं होत नाही. संवाद छान स्पष्ट आणि खणखणीत आवाजात म्हंटलेले असतात..(अपवाद असतील).. 'भेट' हा मराठी चित्रपट मला संवादाच्या अशा सुखद अनुभवासाठी विशेष आवडला असता (असे अनेक असतील , पण हा लक्षात राहिला)