दुहेरी ब्राह्मण ?
लेख प्रस्तावना:
ग्राहकाच्या दृष्टीने सहसा एका चांगल्या विक्रेत्याकडून असलेली अपेक्षा, ग्राहकाची गरज आणि क्षमता लक्षात घेऊन विक्रेत्याने योग्यते मार्ग दर्शन आणि साहाय्य करावे अशी असते. पण प्रत्यक्षात एस्कीमोंच्या गळ्यात फ्रीज, टकल्याच्या गळ्यात कंगवा लटकवणारा, मातीस सोने म्हणून विकणारा किंवा आधी तर्कसुसंगत समजावून द्या, समजले नाही तर पैसे द्या (करप्ट करा) आणि तेही शक्य नसेल तर ग्राहकास कन्फ्यूज करणारा तो विक्रेता अशा प्रकारची इमेज जनमानसात उभी रहाण्यास बाकी समाजा सोबत बहुतांश विक्रेते स्वतःही जबाबदार असतात. तदानुभूती ठेवून आपला मुद्दा तर्कसुसंगत पद्धतीने गळ्यात उतरवण्याची कला विक्रेत्यांनाही सहजसाध्य नसते ज्यांना येते त्यांनाही प्रत्येक वेळी यश येते असे नाही. संस्थात्मक विक्री असेल तर पर्चेस ऑफीसरला करप्ट करणे जमेल पण ग्राहकास गोंधळात टाकणे अधिक सोपे असते. मानवी स्वभावाचीही कमाल आहे, बहुसंख्य ग्राहक अगदी इररॅशनल अर्ग्यूमेंटही स्विकारतील तर्कसुसंगत दावे नाकारतील आणि आपण तर्कसुसंगत दावे नाकारत आहोत आणि इररॅशनल अर्ग्यूमेंट स्विकारत आहोत हे सांगूनही पटण्याची शक्यता बहुतां बाबतीत नसतेच. ज्यांना समजतेही त्यातील बहुते निमूटपणे सहन करत असतात.
इररॅशनल अर्ग्यूमेंट कश्या स्विकारल्या जातात याची गंमत वाटते, राजीव गांधीच्या समोर श्रीलंकन सैनिकांची परेड चालू असताना एका श्रीलंकन सैनिकाने त्याची बंदूक उलटी करुन राजीव गांधींवर मारल्यावर राजीव गांधी त्या हल्ल्यातून बाल बाल बचावले. श्रीलंकेच्या त्यावेळच्या अध्यक्षांना त्या बद्दल पत्रकारांनी विचारले तर त्यांनी त्या सैनिकाला उन लागले असावे असे उत्तर दिले. उन लागल म्हणून कुणी कुणावर हल्ला करत नसते.
काही मिपा वाचकांनी मागील काही महिन्या पुर्वी येऊन गेलेली 'माहौलीक सत्य' नावाची मिपावरील चर्चा घागा वाचला असेल एकुण काय तर बहुसंख्य वेळेस वस्तुस्थिती काय आहे याचे मानवास खूप देणे घेणे असते असे नसावे. तर सांगण्याचा मुद्दा हा की इररॅशनल गोष्टी खपवून घेतच मनुष्य प्राणी जगत असतो. मागच्या दोन चार वर्षात सोशल मिडीयातील काही उपद्व्यापींनी कलश स्थापना उपडी असेल तर शुभ असते तर मग गुढीवर बसवलेला उलटा तांब्या अशूभ नसतो का असा काहीसा प्रचार केला. तांब्याच तांब्या जगात कोणत्याही दिशेने ठेवल्याने त्यात शुभ अशूभ काय ? - गुढी किंवा ध्वजावर कापड बांधल्या नंतर शोभिवंत वस्तुचे काम काय ते उपडा तांब्या करते. आता गुढी ध्वजावर कुम्भ बसवण्याचा उल्लेख अग्निपुराणात आहे इतपत जुनी प्रथा असावी पण हे पुढील किर्तनकारास माहित होते का माहित नाही; आणि मुक्य म्हणजे तर्कसुसंगतात पुरेल तो मानवी श्रोता कसला तर्कसुसंगत अभ्यासपूर्ण उत्तर देईल तो वक्ता कसला ? आता हा प्रसंग (प्रश्न) एका किर्तनकारास विचारला गेला असावा आता त्यांनाही त्याचे नेमके उत्तर सुचले नसावे त्याचे त्यांनी दिलेले प्रश्नोउत्तर आम्हास आंजावर सापडले ते असे
१. गुढीवरील तांब्या उपडा का ठेवतात ? तांब्याचे तोंड जमिनीकडे असल्याने तांब्याच्या कलशाच्या पोकळीतून प्रक्षेपित होणार्या लहरींमुळे तांब्यात असलेली कडुलिंबाची पाने आणि रेशमी वसन (गुढीवरील रेशमी वस्त्र) हे सात्त्विक लहरींनी भारीत बनते.... हे असे आणखी बरेच मुद्दे त्यांनी बनवलेले असावेत इथे उदाहरणा दाखल एवढा एक पुरे.धागा लेखाचा मुख्य विषय एकुण भारतातील 'जात' हि संकल्पना कशी तयार झाली असावी ? कशी रुजली असावी ? आणि त्यातील 'ब्राह्मणांचा रोल' प्रभाव इत्यादी इत्यादी बद्दल बरेच उलत सुलट तर्क, संशोधन आणि चर्चा झडत असतात. देश विदेशच्या विद्वानां कडून नवनवीन विचार मांडले जात असतात. 'ब्राह्मणी प्रभाव' या विषयावरील त्यातल्या त्यात नविन/वेगळी तरीही गेल्या दहा वर्षातील एक नविन मांडणी 'Brahmin double' अशी नवी संकल्पना मांडत 'ख्रिस्टीअन ली नोव्हेत्झके (Christian Lee Novetzke ) यांनी २०११ मध्ये त्यांच्या The Brahmin double: the Brahminical construction of anti-Brahminism and anti-caste sentiment in the religious cultures of precolonial Maharashtra या लांबलचक शीर्षक असलेल्या शोधनिबंधातून केली आहे. त्याची एक चांगली समिक्षा Crossing the Lines of Caste:Visvamitra and the Construction of Brahmin Power in Hindu Mythology (दुवा) या २०१५सालच्या ग्रंथातून अधीश ए. साठे. यांनी केली आहे. जातींची निर्मिती कशी झाली हा मानववंशशास्त्र आणि भारतीय समाजशास्त्राच्या इतिहासाच्या जिज्ञासामुलक शोधासाठी महत्वाचा भाग असू शकतो. भारतातील जाती व्यवस्था घालवण्यास कठीण जाते म्हणून या चर्चेत पडणारा आपापले सहज तर्क जोडणाराही एक मोठा वर्ग आहे. वस्तुतः अंधश्रद्धा कमी झाल्या, जुन्या व्यवस्थेची जागा नवीन व्यवस्थेने घेतली की जुनी व्यवस्था काळाच्या ओघात मागे पडते. आणि जाती व्यवस्थाही निश्चीत मागे पडेल. मानवी इतिहासातल्या असंख्य घटनांच्या नोदी होत नाहीत. जे माहितच नाही त्याचा कितीही शोध घेतला तरीही एका मर्यादेच्या पुढे हाती काही लागणार नाही हे माहित असते तेव्हा उत्तर देण्याच्या अहमाहमीकेत अचाट तर्कांची निर्मिती होत रहाते. आणि त्यातलेच काही अचाट तर्क घोळून घोळून चर्चीले जातात. त्यातलाच एक तर्क म्हणजे एका विराटपुरुषाच्या वेगवेगळ्या अवयवातून चातुर्वण्याची निर्मिती झाली. ज्याला एखाद्या प्रश्नाचे उत्तर माहित नाही तोच उत्तर देण्याच्या घाईत असे काहीसे इररॅशनल उत्तर देऊ शकतो कमाल म्हणजे समर्थक असोत का विरोधक अशा अचाट तर्कांवर प्रचंड वेळ आणि मानसिक श्रम घालवत असतात. तर एकुण चातुर्वण्य अथवा ब्राह्मण जाती एखाद्या पुरुषाच्य (कितीही विराट असलातरीही) अंगातून बाहेर पडण्याची शक्यता नाही. मग हे ब्राह्मण आले कुठून विस्तारले कसे आणि आपले जाती/वर्ण वर्चस्व समाजाच्या मनात ठसवले कसे ? मानवी मनातील असुरक्षीततांना वैज्ञानीक उपाय-उत्तरे माहित नसलेल्या काळात, पौरोहीत्य करुन त्यावर उपजिवीका करण्याची संधी समाजातील एका गटाने घेतली असणार, ज्ञ्माधारीत जाती व्यवस्था निर्माण होण्यास विशेषते काय लागते ? सहज उपजिवीका जे वडील करतात तेच आपण करायचे एवढेच. ब्राह्मण म्हणजे काय तर काही तरी विशेष 'ब्रह्म' जाणणारा आणि काही समाज मान्य आदर्शे स्विकारणारा अशा विशेषत्वाचा गौरव समाजाने स्विकारण्यास सुरवात केली. हे हे विशीष्ट गूण असतील तर विशेष म्हणजे ब्राह्मण व्याख्येस पात्र असू शकतील अशी भूमीका अगदी वैदीक पौरोहीत्य न स्विकारणार्या बौद्ध धर्मीयांनीही घेतली म्हणजे एकी कडे पौरोहीत्याच्या मर्यादांवर टिका दुसरीकडे ब्राह्मणत्वात विशेष असेल तर गौरव. लोकसंख्येने अल्प असलेल्या ब्राह्मण समाजाचा प्रभाव कसा वाढत गेला हे पहाताना इतरांची केलेल्या चर्चेतील कदाचीत सुटलेल्या काही गोष्टी लक्षात घेणे उपयूक्त ठरु शकते. भारतातील व्यापार उदीम वाढण्यास जैन आणि बौद्धधर्मीय अहींसावादी प्रयत्नांनी सुरक्षेचा भार नक्कीच हलका केला असणार त्यामुळे जेव्हा बौद्ध धर्मीय घरटी एक मुलगा प्रचारक म्हणून मागत होते तेव्हा समाजाने ते सुरवातीस स्विकारले असावे. पण ज्या ऐतिहासिक काळात मृत्यूदर प्रचंड असेल घरातल्या असंख्य जन्मलेल्या मुलातून काहीच वाचत असतील तेव्हा घरटी एक मुल प्रचारार्थ बाहेर पाठवणे आणि तेही वाढत्या शेतीच्या संधी दुर्लक्षून ही सामाजिक दृष्ट्या महाग गोष्ट राहीली नसेल का ? (या बाबत सुस्पष्ट विरोधाच्या स्पष्ट नोंदी भारतात नाही आढळल्या तरी चीन बद्दल आढळतात - इंग्रजी विकिवरील संदर्भ चूक असू शकतात तेव्हा चुभूदेघे) पण या विरोघात भारतात जे पौराणिक साहित्य निर्माण झाले त्यातील मांडणीच्या दोन ठळक बाजू लक्षात घेता येतील की मोक्ष हे अंतिम लक्ष्य कायम असले तरीही गृहस्थाश्रम आणि मूल असणे आवश्यक केले गेले म्हणजे समाजाची एक तत्कालीन गरज भागली पण त्या मुलाने पालकांच काळजीही तर घेतली पाहीजे तर माता पित्यांच्याच आज्ञांच्या पालनास श्रेष्ठत्व दिले गेले इथे दुसरी व्यवस्थेची आणि भावनिक गरज भागवली गेली. दुसर्या बाजूला राज्यकर्त्यांना स्वतःचे इगो असतात, अहंगंड असणार्यांना सोबत अहंगंड असणारे लोक लागतात पण ते स्पर्धक असू नयेत अथवा स्पर्धक बनू नयेत, त्यांचे स्वतः सारखाच इगो असलेल्यां दुसर्या राज्यकर्त्यांपेक्षा स्वतः अंहगंड बाळगणारे पण काव्ये रचून इगो भागवणारे , त्यांना आणि त्यांच्या मुलांना चातुर्य कथा आणि प्रशिक्षण देणारे आणि अध्यात्मिक अधिष्ठान देत मानवी मनाच्या असुरक्षीततांची काळजी घेणारी कर्मकांडे करणारा एक गट म्हणूनही हा पुरोहीत वर्ग उपलब्ध झाला. भारतातील ग्रंथ प्रसार कसा होत घेला याबद्दलची मराठी विश्वकोशातील एक नोंद लक्षात घेतली तर राजे आणि त्यांच्या पुत्रांच्या गरजा भाग्वण्यासाठी जे लेखन चालू झाले ते भक्तीमार्गीय प्रवचने/ किर्तने यांच्या परफॉर्मन्स सोबतच्या प्रवासातच लिहिलेले ग्रंथही वितरीत केले जात म्हणजे केवळ छपाईची साधने नसलेल्या काळात ग्रथंलेखन आणि प्रवचनांवर उपजिवीका जी चालू झाली या कलांमधून येणारा राजाश्रय आणि जनाश्रय जाऊ नये त्यासाठी आत्मसात झालेले ज्ञानार्जन कौशल्य इतरांना देण्यावर बंधने स्विकारली गेली राज्यकर्त्यांनीही त्याला आपल्या सोईचे मानल्याने ती दीर्घकाळ टिकलीही. इथ पर्यंत माझे विचार. इथून पुढे ख्रिस्टीअन ली नोव्हेत्झके यांची 'दुहेरी ब्राह्मण' ही रोचक मांडणी विचारात घेता येते. या पौरोहीत्या प्रकारातील मर्यादांना विरोध झाला नसेल तरच नवल होते तो तसा झालाही किंबहूना ख्रिस्टीअन ली नोव्हेत्झके यांच्या मतानुसार कथा किर्तने नाटय इत्यादी कौशल्ये आत्मसात केलेल्या ब्राह्मण समाजाने स्वतःच आदर्श नसलेली ब्राह्मण पात्रे मोठ्या प्रमाणावर रंगवली आधी नकारात्मक किंवा कम अस्सल काय आहे ते दाखवून मग अस्सल म्हणजे काय याच्या व्याख्या केल्या व जनमानसाची सहानुभूती आणि पाठींबा मिळवला. यासच ख्रिस्टीअन ली नोव्हेत्झके यांची 'दुहेरी ब्राह्मण' Brahmin Double हा शब्द प्रयोग करतात. अर्थात अधीश साठे यांच्या मते ख्रिस्टीअन ली नोव्हेत्झके यांची मते मुख्यत्वे एकनाथादी मराठी संत साहित्य आणि कला परंपरा ते ब्राह्मण समाजातील आधुनिक सुधारणावादी यावर आधारीत आहेत. पण माझ्या मते रामायण असो वा महाभारत वा इतरही पौराणिक साहित्य ब्राह्मणांचे रंगवलेले सर्वच वागणे आदर्श नाही. म्हणजे आम्ही उठसूठ कुणालाही आदर्श म्हणत नाही आणि मग आदर्शांची हि व्याख्या असेल तर आम्हाला आदर्श / वरीष्ठ म्हणा आणि स्विकारा हा खाक्या. या विषयाकडे अधिश साठे विश्वामित्राचे उदाहरण घेत जरासे वेगळ्या पद्धतीने पहातात व Brahmin double एवजी brahmin other अशी काहीशी संकल्पना वापरताना दिसतात. अधिश साठेंचेच्याच ग्रंथाचे उदाहरण द्यायचे झाले तर त्यांच्या स्वतःच्या ग्रंथातील उल्लेखांबाबत ते आवर्जून म्हणतात की माझ्या ग्रंथातील सर्व उल्लेखांची जबाबदारी माझी स्वतःची आहे इतर कूणाचीही नाही.' २००३ च्या काळातील एका ग्रंथातील उल्लेखांवरुन उफाळलेला वाद आणि ग्रंथ लेखक ते त्याचे मार्गदर्शक यांनी जबाबदारी टाळण्याच्या पार्श्वभूमीवर अधिश साठे जबाबदारी घेणारी भूमिका घेतात तेव्हा उठून दिसतात आणि एक जबाबदारी न घेणारे वागणे ते काही झाल्यास एक जबाबदारी स्विकारणारण्यास तयार असण्यास तयार असलेले वागणे ब्राह्मण मर्यादांवर मातकरत स्वतःस पुढे करत जातात म्हणजेच ब्राह्मणांची हि दुहेरी प्रतिमा जगवत टिकाकारांनी केलेली टिका स्विकारत कधी सावकाश बदलत ब्राह्मण समाज टिकून आहे. सोबतीला टिकाकारांच्या टिका नकारात्म्क झाल्यास वर गुढीचे उदाहरण दिले तसे मूळ प्रश्नासच तार्कीकमर्यादा असल्यामुळे आलेले उत्तर समाधानकारक नसले तरीही नकारात्मकतेपेक्षा चुकीचे पण आश्वासक उत्तर स्विकारण्याकडे समाजाचा कल असतो का ? आणि मिळालेल्या ओसरीवर हातपाय पसरण्याच्या कौशल्याचे गमक आहे का ? सरते शेवटी आपल्या उपजिविकेसाठी पौरोहीत्य करताना इतर विक्रेत्यांप्रमाणे प्रत्यक्ष वस्तू विकली नसेल पण अॅबस्ट्रॅक्ट संकल्पना कधी तर्काने तर कधी तर्कांशी जूळत नसताना गोंधळात गोंधळ वाढवणारी वक्तव्ये करुन गळी उतरवण्याचे कौशल्य तुलनेसाठी गंमत म्हणून नोंदवले. ख्रिस्टीअन ली नोव्हेत्झके आणि अधिश साठे यांचे पूर्ण लेखन वाचण्यास अवधी देणे शक्य नव्हते पण एक वेगळी संकल्पना दिसली ती मिपाकर वाचकांना मला जशी समजली तशी शेअर करण्याचा प्रयत्न केला आहे. अपूर्ण वाचनामूळे माझ्या लेखनात आपसूकच त्रुटी असू शकतात. जिज्ञासूंनी त्यांचे लेखन मूळातून वाचावे हेच श्रेयस्कर असावे. माझ्या लेखनात फॅक्ट्यूअल चुका असल्यास निर्देश करावा. सोबतच दुहेरी ब्राह्मण या संकल्पना विषयाचा सर्व आवाका कव्हर करण्याची शक्यता कमी पण दखल घेण्या जोगी वाटली. त्यांचे लेखन मुळातून वाचणे झाल्यास संकल्पनांबद्दल आपापली मते जरुर मांडावीत. चुभूदेघे.
वाचन
4669
प्रतिक्रिया
0