खरे तर रामकृष्ण हे त्याचे खरे नाव. पण आम्हा पोरांमधे तो रामू किंवा राम्या नावानेच फेमस होता. म्हणजे तो अजुनही आहे पण आता मी तिथे नाहिये.
रामू माझ्यापेक्षा नक्की किती वर्षांनी मोठा आहे हे मला नीटसं ठाऊक नाहिये पण साधारण आमच्यामधे ७-१० वर्षांचे अंतर असावे. मात्र बारीक अंगयष्टीमुळे रामुचे वय अजुनही कळून येत नाही.
रामू ला राजकारणाची आवड आहे की खाज आहे हे मला नीटसं अजुन उमगलं नाहिये पण कदाचित दोन्ही असावं असं मला अजुनही वाटतं.
रामूचं घर चाळीच्या पुढच्या बाजुला तर माझं मागच्या बाजुला. रोज सकाळी साधारण चाळीतल्या बायका कपडे धुवायला पुढच्या ओट्यावर बाहेर बसल्या की रामूची चाळीत नित्यनियमनाने एक फेरी होई. मग ताई, मावशी यांच्याशी बोलत बोलत घराघरातल्या पोरीबाळींवर नजर फिरवत फेरा पुर्ण करुन तो एखाद्या घरात घुसायचा. कोणताही विषय काढून त्याचा शेवट राजकारणात करण्याचा रामूचा हात कोणीही पकडू शकत नाही. रामू आला त्याच्या निमित्ताने काका मावशी, मामा मामींना पुन्हा नव्याने चहा मिळायचा.
साधारण घाटावरील कोणत्याही जास्त सलगी नसलेल्या तरुण बाईस आणि बाप्यास मामा-मामी म्हणावे आणि कोकणी असतील तर काका मावशी म्हणावे हा महत्त्वाचा धडा रामूनेच मला शिकविला. घाटी माणसास चुकुन काका-मावशी म्हटले तर त्यांना वावगे वाटत नसे मात्र तेच जर कोकणी माणसाच्या बाबतीत झाले तर मग काही खैर नसायची.
९२ च्या दंगलीत मी फार घाबरुन गेलो होतो. कुठेही जरा खुट्ट झाले की मी घरात पळत असे आणि घरच्यांनाही ओढून ताढून घरात आणत असे. बाकी पोरं मात्र मज्या बघायला बाहेर पळायची. रामू फार सभ्य आणि साधाभोळा आहे असा माझा समज होता मात्र ९२ च्या दंगलीत त्याने माळ्यावर लपवलेली गुप्ती पाहून माझा अंदाज चुकल्याचे माझ्या लक्षात आले तसे मी त्याच्याबरोबर थोडे अंतर ठेऊनच वागायला लागलो. त्याकाळी तलवारीपेक्षा जास्त भाव रामपुरी आणि गुप्तीला होता. ज्यांना हे परवडत नसे त्यांच्यासाठी सुपरमॅक्स दाढीचे ब्लेड हे एक उपयुक्त शस्त्र होते. घोडा फक्त ऐकूनच माहित होता. मात्र जसजसी दंगल पेटत गेली तसतसी रस्त्यांवर दिसणार्या तलवारींची वाढती संख्या दिसू लागली. आपण ज्या कोणाला ओळखतो असे मला वाटत होते तो माझा एक भ्रमच होता असे मला नंतर चांगले पटले.
असो.
तर सांगायची गोष्ट ही की रामूला राजकारणाचे वेड फार. चित्रपटात दाखवितात त्याप्रमाणे राजकारणी बाई-बाटलीचे आशिक असतात हे मला माहित होते पण रामू बाटलीच्या वाटेला कधीच गेला नाही आणि बायकांच्या देखील नाही ! हो, मात्र त्याला पोरीबाळींची आवड होती असे म्हटले तर वावगे ठरु नये. चाळितल्या एक दोघींबरोबर तो रात्रीचा कोपर्यावर तासनतास गप्पा मारताना दिसे मात्र आम्ही कोणी तिथे कधी पोहोचलो तर आम्हाला तो इशार्याने कटवत असे. त्या काळात पोरींबरोबर बोलायचे म्हणजे xxत फारच दम असावा लागतो असा आपला एक समज होता. त्यामुळे तो आम्हाला हिरोच वाटायचा. मात्र चाळीतल्याच सविताचे लग्न दीड दोन वर्षात मोडल्यामुळे आणि त्याला रामूच जबाबदार असल्याचे आडून आडून समजलयामुळे तो मला व्हिलन वाटू लागला.
मात्र हे सगळे सोडल्यास, रामू म्हणजे एक चांगला प्राणी होता. गणपती असो किंवा अजून कोणता कार्यक्रम असो, रामू झाडू मारण्यापासून सगळ्यात पुढे असायचा. मात्र लोचा एकच होता की त्याला झाडू मारणे, मंडळाचा अध्यक्ष होणे आणि माईक सतत स्वत:च्याच ताब्यात ठेवणे ह्या सगळ्या क्रिया एकाच कार्यक्रमात करायच्या असत. मग स्वतःचा सत्कार करुन झाला रे झाला की तो माईकचा ताबा घेत असे. विविध सांस्कृतिक कार्यक्रमात फेमस व्यक्तींना स्वखर्चाने आणणे आणि हा त्याचा आवडता कार्यक्रम ! त्याच्यामुळेच मला मिनि तब्बसूम, राज ठाकरे, छगन चौगुले आणि इतर काही प्रसिद्ध माणसांना १० फुटाच्या अंतरावरुन बघता आले.
तसा रामूचा जनसंपर्क दांडगा आहे. एरीयात शेकडो लोक त्याला ओळखतात. तो लोकांची छोटीमोठी कामे देखील पैसा न घेता करत असतो हे मी जवळून पाहिले आहे. पोलीस स्टेशनात देखील त्याची बर्यापैकी चालते. एरीयात युपी बिहारी जास्त म्हणून मग त्याने आवर्जुन गणपतीच्या दहा दिवसांपैकी एका रात्री 'बिरहा का मुकाबला" चालु केला. नवरात्र उत्सव चालू केला.
अनेक वर्षे राजकारणात नगरसेवकांच्या मागे फिरुन कार्यकर्तागिरी केल्यानंतर त्याने तिकिट मागितले तेव्हा ते नाकारले गेल्यावर त्याने अपक्ष म्हणून निवडणूक लढविली. कोणीतरी त्याचे फेसबुक पेज बनवून दिले त्यात त्याचे २८ फॉलोअर्स आणी फोटोंवर ५-२५ काँमेंटस दिसल्यावरच त्याचे काय होणार याचा अंदाज आला होता. तसेच झाले. निवडणूकीत तो पडला !
तसे म्हटले तर आमच्या एरीयाचा नगरसेवक यापेक्षा काही वेगळे काम करतो असे नाही. रस्त्याने प्रत्येक ओळखीच्या माणसास हात जोडणे, म्हातार्या कोतार्यांना रस्त्यात नगरसेवकपणाचा माज न दाखवता "पाय लागु करणे" कोणत्याही चाळीतील सत्यनारायण आणि मैय्यत न चुकता अटेंड करणे एवढय पुण्याईवर तो ३ वेळा निवडून आला आहे. आता त्याच्या बायकोला तिकिट हवे आहे.
मात्र वर्षानुवर्षे पक्षकार्यात गांड घासणार्यांना काही भवितव्य नाही हे खिन्न वास्तव रामूच्या निमित्ताने परत अधोरेखीत झाले एवढेच !
वाचने
1829
प्रतिक्रिया
5
मिसळपाव
प्रतिक्रिया
छान व्यक्तिचित्र
चांगलं आहे.
चांगलं आहे अजून लिहा की...
साधारण घाटावरील कोणत्याही
मस्त