वर्ल्डकप क्लासिक्स - १९८७ - भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया
लेखनप्रकार
१९८३ मध्ये भारताने वर्ल्डकप जिंकल्यावर वर्ल्डकपचे यजमान म्हणून इंग्लंडची मक्तेदारी संपुष्टात आली. १९८७ च्या वर्ल्डकपचं यजमानपद भारत आणि पाकिस्तानला संयुक्तपणे बहाल करण्यात आलं त्यामागे १९८३ मधल्या भारतीय विजयाचा फार मोठा हातभार होता. या वर्ल्डकपमधला आणखीन एक महत्वाचा बदल म्हणजे पूर्वीच्या तीनही वर्ल्डकपप्रमाणे एका इनिंग्जच्या ओव्हर्स ६० वरुन ५० वर आल्या. तसंच इनिंग्जच्या मध्ये लंच आणि टी-टाईमला फाटा देण्यात आला.
९ ऑक्टोबर १९८७
चेपॉक, मद्रास
मद्रासच्या चेपॉक मैदानावर (आत्ताचं एम ए चिदंबरम स्टेडीयम) भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात ग्रूप ए मधली मॅच रंगणार होती. अॅलन बॉर्डरचा ऑस्ट्रेलियन संघ मद्रासच्या वातावरणाशी जुळवून घेण्याच्या इराद्याने मॅचपूर्वी तब्बल ९ दिवस तिथे मुक्काम ठोकून होता. ऑस्ट्रेलियाच्या संघात स्वत: बॉर्डर, डेव्हीड बून, जेफ मार्श, डीन जोन्स असे बॅट्समन होते. बॉलिंगचा भार प्रामुख्याने होता तो क्रेग मॅकडरमॉटवर. त्याच्या जोडीला ब्रूस रीड, सायमन ओडोनेल असे बॉलर्स आणि सर्वात महत्वाचं म्हणजे स्टीव्ह वॉ सारखा ऑलराऊंडर होता! टॉम मूडीला बॅट्समन म्हणून वन डे मध्ये पदार्पणाची संधी देण्यात आली होती.
कपिल देवचा भारतीय संघ वर्ल्ड्कप स्वतःकडे राखण्याच्या इराद्यानेच मैदानात या स्पर्धेत उतरला होता. भारतीय संघात गावस्कर, श्रीकांत, दिलिप वेंगसरकर, अझरुद्दीन, रवी शास्त्री असे बॅट्समन होते. कोणत्याही क्षणी मॅच फिरवण्याची क्षमता असलेला कपिलसारखा कॅप्टन होता. कपिलच्या जोडीला १९८३ च्या वर्ल्डकप मधला अनुभवी रॉजर बिन्नी, मनोज प्रभाकर आणि मणिंदरसिंग असे बॉलर्स आणि किरण मोरेसारखा विकेटकीपर होता. टॉम मूडीप्रमाणेच भारतानेही या मॅचमध्ये एका बॅट्समनला वन डे मध्ये पदार्पणाची संधी दिली होती. नवज्योत सिंग सिद्धू!
अवघ्या वर्षाभरापूर्वीच याच मैदानावर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातली मॅच टाय झाली होती. ऑस्ट्रेलियाच्या संघातले बून, मार्श, जोन्स, बॉर्डर, स्टीव्ह वॉ, मॅकडरमॉट, ब्रूस रीड आणि भारताचे गावस्कर, श्रीकांत, अझरुद्दीन, शास्त्री, कपिल, मोरे आणि मणिंदरसिंग टाय टेस्टमध्ये खेळलेले होते. टाय टेस्टचा हिरो ग्रेग मॅथ्यूज मात्रं ऑस्ट्रेलियाच्या संघात नव्हता. मद्रासच्या कडक उन्हाळ्याची आणि वातावरणाची त्यामुळे ऑस्ट्रेलियन खेळाडूंना चांगली कल्पना होती.
डीन जोन्स म्हणतो,
"Having played the tied Test just over a year earlier had helped us to get used to the conditions. We learned how to play in the heat, and we actually had an affection for Madras because of it."
कपिलने टॉस जिंकल्यावर फिल्डींगचा निर्णय घेतला. कपिल आणि प्रभाकरचे बॉल चांगले स्विंग होत असल्याने बून आणि मार्श यांनी सुरवातीला सावधपणे घेत भारतीय बॉलर्सना खेळून काढण्याचं धोरण पत्करलं. पण कपिलच्या जागी रॉजर बिन्नी बॉलिंगला आल्यावर मात्रं आक्रमक पवित्रा घेत बून - मार्शने फटकेबाजीला सुरवात केली. या दोघांनी शंभरावर रन्सची ओपनिंग पार्टनरशीप केल्यावर फिल्डींगचा कपिलचा निर्णय भारताच्या अंगाशी येणार अशी चिन्हं दिसत होती. अखेर रवी शास्त्रीला ड्राईव्ह करण्याच्या नादात बून एलबीडब्ल्यू झाला. ६८ बॉल्समध्ये ५ बाऊंड्रीसह बूनने ४८ रन्स तडकावल्या. ऑस्ट्रेलिया ११० / १!
डीन जोन्सने सुरवातीपासूनच आक्रमक पवित्रा घेत फटकेबाजीला सुरवात केली. खासकरुन शास्त्री आणि मणिंदरसिंगला फटकावण्याचं त्याने धोरण अवलंबलं होतं. शास्त्रीला त्याने लाँगऑनवर सिक्सही ठोकली. जोन्स - मार्श भारतीय बॉलर्सची धुलाई करत असतानाच...
मणिंदरसिंगचा बॉल जोन्सने क्रीजमधून पुढे येत मिडऑफ बाऊंड्रीच्या दिशेने उचलला..
मिडऑफ बाऊंड्रीवर असलेल्या शास्त्रीने हवेत उडी मारत त्याचा कॅच घेण्याचा प्रयत्नं केला..
बॉलचा टप्पा शास्त्रीच्या मागे पडला..
अंपायर डिकी बर्डला बाऊंड्री किंवा सिक्स याबद्द्ल शंका होती. त्याने शास्त्रीकडे विचारणा केल्यावर शास्त्रीने बाऊंड्री गेल्याची खूण केली!
डीन जोन्सला मात्रं आपला शॉट बाऊंड्रीपार गेल्याची पक्की खात्री होती. तो म्हणतो,
"I went down the pitch and hit Maninder over the straightish mid-off boundary. Ravi leaped but missed, and the ball carried over the rope by at least a metre. Dickie asked Ravi, who signalled it as a four. I had a word with Dickie, and he told me we'd talk about it after the innings."
ऑस्ट्रेलियाचा कोच बॉब सिंप्सन म्हणतो,
"I was very disappointed with Ravi over that. We were not very far from where that ball crossed the boundary. There was no doubt at all that it was a six."
किरण मोरेच्या मते मात्रं जोन्सचा शॉट बाऊंड्रीपार गेला नव्हता. तो म्हणतो,
"Dean liked to step out, and he was a good player of spin. That shot which he stepped out and hit off Maninder was outstanding. But from behind the wicket I was sure it was not a six."
मणिंदरसिंगलाच पुन्हा फटकावण्याच्या नादात लाँगऑफ बाऊंड्रीवर सिद्धूने जोन्सचा कॅच घेतला. ३५ बॉल्समध्ये ३ बाऊंड्री आणि १ सिक्ससह जोन्सने ३७ रन्स फटकावल्या. ऑस्ट्रेलिया १७४ / २!
जोन्स आऊट झाल्यावर आलेल्या अॅलन बॉर्डरने फटकेबाजीच्या मोहात न पडता मार्शला जास्तीत जास्तं स्ट्राईक देण्याचं धोरण पत्करलं. मार्शने आक्रमक पवित्रा घेत शास्त्री - मणिंदरसिंग - बिन्नी यांना फटकावण्यास सुरवात केली. हे दोघं खेळत असतानाच...
शास्त्रीचा बॉल क्रीजमधून पुढे येऊन फटकारण्याचा बॉर्डरचा प्रयत्नं पार फसला...
विकेटकीपर किरण मोरेने बॉल कलेक्ट केला आणि बेल्स उडवल्या...
भारतीय खेळाडूंनी स्टंपिंगसाठी जोरदार अपिल केलं...
स्क्वेअरलेग अंपायर डेव्हीड आर्चरचं बोट वर झालं नाही.
टीव्ही रिप्लेमध्ये बॉर्डरची बॅट क्रीजमध्ये परतण्यापूर्वीच मोरेने बेल्स उडवल्याचं स्पष्टं दिसत असूनही अंपायरच्या कृपेने बॉर्डर वाचला!
मार्श - बॉर्डर यांनी ५४ रन्सची पार्टनरशीप केल्यावर बिन्नीला फटकावण्याच्या नादात बॉर्डर बोल्ड झाला. आणखीन ९ रन्सची भर पडल्यावर मनोज प्रभाकरच्या बॉलवर मिडविकेट बाऊंड्रीवर अझरुद्दीनने जेफ मार्शचा कॅच घेतला. १४१ बॉल्समध्ये ७ बाऊंड्री आणि बिन्नीला मारलेल्या सिक्ससह मार्शने ११० रन्स फटकावल्या. ऑस्ट्रेलिया २३७ / ४!
जेफ मार्श म्हणतो,
"It was important to bat first and create pressure. For that, one of us had to stay there, which I managed to do."
मार्श परतल्यावर प्रभाकरला फटकावण्याच्या नादात कपिलने पहिल्याच वन डे मध्ये खेळणार्या टॉम मूडीचा कॅच घेतला. शेवटच्या ओव्हर्समध्ये कपिल आणि प्रभाकरच्या अचूक बॉलिंगमुळे स्टीव्ह वॉ आणि ओडोनेल यांना फारसं काही करता आलं नाही. ऑस्ट्रेलियाच्या इनिंग्जच्या अखेरच्या बॉलवर वेंगसरकरच्या अचूक थ्रोमुळे दुसरी रन घेण्याच्या प्रयत्नात ओडोनेल रनआऊट झाला.
५० ओव्हर्समध्ये ऑस्ट्रेलियाने २६८ रन्सपर्यंत मजल मारली होती.
ऑस्ट्रेलियाची इनिंग्ज संपल्यावर बॉब सिंप्सन आणि मॅनेजर अॅलन क्रॉम्प्टन याने दोन्ही अंपायर्सची गाठ घेऊन जोन्सने मारलेल्या शॉटबद्दल तक्रार केली. जोन्सचा तो शॉट बाऊंड्री नसून सिक्स असल्याबद्दल ऑस्ट्रेलियाला २ रन्स वाढवून देण्याची त्यांनी मागणी केली. दोन्ही अंपायर्सनी कपिलची गाठ घेऊन ऑस्ट्रेलियाची मागणी त्याच्या कानावर घातल्यावर कपिलने उदार मनाने ऑस्ट्रेलियाला २ रन्स बहाल करण्यास होकार दिला!
डीन जोन्सच्या ३७ रन्समध्ये २ रन्सची भर पडून त्याच्या नावावर ३९ रन्स नोंदवल्या गेल्या.
ऑस्ट्रेलियाचा स्कोर २६८ वरुन २७० करण्यात आला!
गावस्कर आणि श्रीकांत यांनी सुरवातीपासूनच आक्रमक पवित्रा घेत ऑस्ट्रेलियन बॉलर्सची धुलाई करण्यास सुरवात केली. श्रीकांतच्या तोडीस तोड फटकेबाजी करत गावस्करने मॅकडरमॉट - रीड यांना बाऊंड्री तडकावल्या. मॅकटरमॉटच्या पहिल्या ४ ओव्हर्समध्ये ३१ रन्स फटकावल्या गेल्यावर बॉर्डरने त्याच्या ऐवजी ओडोनेलला बॉलिंगला आणलं, पण गावस्कर - श्रीकांतला आवरणं त्यालाही जमत नव्हतं. पीटर टेलरच्या ऑफस्पिनवर गावस्करने लाँगऑनला दणदणीत सिक्स ठोकली.
डीन जोन्स म्हणतो,
"It was surprising to see Sunny take the lead, as he was not such a great one-day player. But on that day he set the tempo and got into a mood, and a whole wave of confidence and aggression lifted the Indian team."
अखेर टेलर फटकावण्याच्या नादात लाँगऑफ बाऊंड्रीवर ब्रूस रीडने गावस्करचा कॅच घेतला. ३२ बॉल्समध्ये ६ बाऊंड्री आणि टेलरला मारलेल्या सिक्सच्या जोरावर गावस्करने ३७ रन्स फटकावल्या. भारत ६९ / १!
गावस्कर आऊट झाल्यावर श्रीकांत आणि पहिल्याच वन डे मध्ये खेळणारा सिद्धू यांनी ऑस्ट्रेलियन बॉलर्सना फटकावण्याचंच धोरण अवलंबलं होतं. स्टीव्ह वॉ - ओडोनेल यांना आरामात फटकावत दोघांनी ६२ रन्स फटकावल्यावर स्टीव्ह वॉचा बॉल अॅक्रॉस द लाईन खेळण्याच्या प्रयत्नात श्रीकांत एलबीडब्ल्यू झाला. ८३ बॉल्समध्ये ७ बाऊंड्रीसह श्रीकांतने ७० रन्स फटकावल्या. भारत १३१ / २!
श्रीकांत परतल्यावर बॅटींगला आलेल्या दिलीप वेंगसरकरने थंड डोक्याने स्ट्राईक रोटेट करण्यावर भर दिला. अर्थात दुसर्या बाजूने सिद्धूची फटकेबाजी सुरु असल्याने वेंगसरकरला कोणतीही रिस्क घेण्याची आवश्यकताही नव्हती. टेलर - बॉर्डर या दोघांना मिळून सिद्धूने ५ सिक्स तडकावल्या होत्या! सिद्धूच्या या आतषबाजीमुळे ३५ ओव्हर्सनंतर भारताचा स्कोर होता २०२ / २! मॅच जिंकण्यासाठी भारताला शेवटच्या १५ ओव्हर्समध्ये केवळ ६९ रन्सची आवश्यकता होती.
नेमक्या याच वेळेला बॉर्डरने 'बिली द किड' मॅकडरमॉटला बॉलिंगला आणलं...
मॅकडरमॉटच्या स्लो यॉर्करचा अजिबात अंदाज न आल्याने सिद्धूचा ऑफस्टंप उडाला!
७९ बॉल्समध्ये ४ बाऊंड्री आणि ५ सिक्स तडकावत सिद्धूने ७३ रन्स फटकावल्या.
भारत २०७ / ३!
डीन जोन्स म्हणतो,
"McDermott was a racehorse - once he got his confidence, he would grow an extra leg and become stronger and bigger and better. That's what happened in that second spell. All of a sudden he started showing his 'gorilla teeth', especially when he got a wicket. And those teeth were starting to show some bite."
सिद्धू आऊट झाल्यावर वेंगसरकर - अझरुद्दीन यांनी २२ रन्सची पार्टनरशीप केली. हे दोघे आरामात मॅच जिंकणार असं वाटत असतानाच मॅकडरमॉटने इनकटरवर अझरचा मिडलस्टंप उखडला! आणखीन ३ रन्सनंतर मॅकडरमॉटलाच फटकावण्याचा वेंगसरकरचा प्रयत्नं पार फसला आणि मिडऑनला जोन्सने त्याचा कॅच घेतला. ४५ बॉल्समध्ये २ बाऊंड्रीसह वेंगसरकरने २९ रन्स काढल्या. भारत २३२ / ५!
वेंगसरकर परतल्यावर बॅटींगला आलेल्या शास्त्रीने मॅकडरमॉटला मिडविकेटला २ बाऊंड्री मारल्या, पण मॅकडरमॉटच्याच स्लो बॉलवर ड्राईव्ह मारण्याच्या नादात शास्त्रीने त्याच्याच हातात कॅच दिला! किरण मोरेने स्टीव्ह वॉला मिडविकेटला बाऊंड्री तडकावली, पण भारताला खरा हादरा बसला तो कपिल आऊट झाल्यावर. ओडोनेलला फ्लिक करण्याच्या नादात मिडविकेटला डेव्हीड बूनने कपिलचा कॅच घेतल्यावर भारताला हादरा बसला. भारत २५६ / ७!
ओडोनेलच्या त्याच ओव्हरचा शेवटचा बॉल बिन्नीने मिडऑनला फ्लिक केला आणि एक रनसाठी कॉल दिला...
मिडऑनला डीन जोन्सने बॉल पिकअप केला आणि दिसत असलेल्या एकमेव स्टंपचा अचूक वेध घेतला...
बिन्नी रनआऊट झाला!
भारत २५६ / ८!
जेफ मार्श म्हणतो,
"We had put so much emphasis on our fielding. We knew every single run we saved was going to create pressure. It wasn't just the bowling and the batting - our fielding made a difference. Dino hit bull’s eye from side on to run Roger Binny out and India panicked."
बिन्नी आऊट झाल्यावर मोरे आणि मनोज प्रभाकर यांनी ९ रन्स जोडल्या, पण...
४९ व्या ओव्हरचा ओडोनेलचा शेवटचा बॉल प्रभाकरने ड्राईव्ह केला आणि १ रनसाठी तो धावत सुटला...
मोरेने प्रभाकरच्या कॉलला प्रतिसाद दिला पण...
शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला असलेल्या बॉर्डरचा थ्रो अचूक स्टंपवर लागला तेव्हा प्रभाकर अर्ध्या पीचपर्यंतही पोहोचला नव्हता!
भारत २६५ / ९!
किरण मोरे म्हणतो,
"Border used to position himself at short extra-cover and short midwicket. That would always put you in two minds. Prabhakar played a shot to the area where Border was stationed and just took off when there was no run and ran himself out."
शेवटच्या ओव्हरमध्ये भारताला मॅच जिंकण्यासाठी ६ रन्सची आवश्यकता होती.
स्टीव्ह वॉसमोर स्ट्राईकवर होता मणिंदरसिंग!
स्टीव्ह वॉचा पहिला बॉल मणिंदरसिंगने स्क्वेअरलेगला फ्लिक केला आणि २ रन्स काढल्या!
दुसरा बॉल मणिंदरसिंगने बॅकवर्ड पॉईंट आणि थर्डमॅनच्या मध्ये खेळला आणि पुन्हा २ रन्स काढल्या!
शेवटच्या ४ बॉलमध्ये भारताला जिंकण्यासाठी केवळ २ रन्स बाकी होत्या!
स्टीव्ह वॉच्या तिसर्या आणि चौथ्या बॉलवर मणिंदरला काहीच करता आलं नाही...
पाचवा बॉल टाकण्यासाठी रनअप घेताना अडखळल्यामुळे स्टीव्ह वॉ परत आपल्या मार्कवर गेला..
प्रेक्षकांच्याच काय, खेळाडूंच्या नजरेसमोरही वर्षाभरापूर्वी अशाच परिस्थितीत टाय झालेल्या टेस्टच्या स्मृती रेंगाळत होत्या!
डीन जोन्स म्हणतो,
"We started to think, 'God, we might have a tie here again.' It was a feeling of 'been there, done that'. We had bowled last in that game, and we didn't panic here in a similar situation. When Maninder took guard against Waugh with two runs to win, all I was thinking was, 'Hit the ball in the air to me.'!"
स्टीव्ह वॉचा पाचवा बॉल...
लेगला बॉल मारण्याच्या हेतूने मणिंदरसिंगने बॅट फिरवली पण...
बॅट आणि बॉलची गाठ पडलीच नाही...
मणिंदरसिंगचा ऑफस्टंप उडाला!
भारत २६९ ऑल आऊट!
अवघ्या १ रननी ऑस्ट्रेलियाने मॅच जिंकली!
किरण मोरे म्हणतो,
"I knew it was over. It was a disappointing finish, just like the tied Test."
बॉब सिंप्सन म्हणतो,
"In the end the six did make the difference. It may have seemed like good fortune for us, but it was right."
ऑस्ट्रेलियाची इनिंग्ज संपल्यावर त्यांना वाढवून दिलेल्या त्या २ रन्सच अखेर निर्णायक ठरल्या होत्या!
कपिलच्या औदार्याचा भारताला असा फटका बसला होता!
वाचने
1580
वाचनखूण
प्रतिक्रिया
2
अविस्मरणीय सामना
थोडासा उंटावरून शेळ्या हाकायचा प्रकार