Skip to main content

मी आज केलेला व्यायाम - फेब्रुवारी २०१७ - सायकलिंग / रनिंग चॅलेंज

लेखक मोदक यांनी बुधवार, 01/02/2017 15:22 या दिवशी प्रकाशित केले.
. नमस्कार मंडळी. "मी आज केलेला व्यायाम" या धाग्यांना उदंड प्रतिसाद मिळत आहे आणि अनेकांनी यातून प्रेरणा घेऊन व्यायाम सुरू केला आहे. व्यायाम सुरू केलेल्या आणि व्यायामात सातत्य ठेवलेल्या सर्वांचे अभिनंदन. आपण सर्वांनी केलेला व्यायाम पुढीलप्रमाणे - नोव्हेंबर २०१६ - सायकलिंग - ८,०१० किमी आणि रनिंग / वॉकिंग - २४८ किमी. डिसेंबर २०१६ - सायकलिंग - ९,६१३ किमी आणि रनिंग / वॉकिंग - ५४७ किमी. जानेवारी २०१७ - सायकलिंग - १०,७५५ किमी आणि रनिंग / वॉकिंग - ६९५ किमी. ****************** सायकलिंग ग्रुपवर अनेक दिवस विशेष असे कांही घडत नव्हते. नियमीतपणे सायकल चालवणारे चालवत होते, मात्र अनेक जणांची सायकल उगाचच बंद झाली होती आणि जुन्या राईडचेच विषय चघळले जात होते. मग अचानक एक दिवस तिथल्या चावडीवर बोलताना डॉक्टर श्रीहास यांनी एक कल्पना मांडली. आपण नियम तयार करू आणि कांही आव्हाने ठेवू. या कारणाने का होईना पण लोकं पुन्हा सायकल चालवू लागतील..! देशपांडे मामा, सागर पाध्ये, प्रशांत सरपंच, डॉक्टर श्रीहास, मानसभौ आणि बाबा योगिराज.. आंम्ही सगळे जण लगेच यावर काम करू लागलो. आपआपल्या सुपीक डोक्यातून अनेक नियम काढले, हा नियम असावा का, नसावा का यावर चर्चा झाल्या, आंम्ही काढलेली आव्हाने (दिवसा ५० किमी सायकलिंग - असे सलग ७ दिवस) बाकी लोकांनी हाणून पाडली. त्या दृष्टीने विचार सुरू झाला. मध्येच सागर पाध्येंनी "एलिटिस्ट होवू नका रे" असा टोलाही हाणून घेतला. मग शेवटी असा निर्णय घेतला की एक तर ही आव्हाने टीम बनवून पार करायची किंवा एकेकट्याने पार करायची. सायकलश्री, सायकल रत्न अशा पदव्याही तयार झाल्या. ;) सायकल नसणार्‍यांना या उपक्रमात भाग घ्यायचा असेल तर त्यांच्यासाठी पळण्याचे आव्हान तयार केले गेले. मूळ कल्पक डॉक्टर श्रीहास आणि बाकी टीमने भरपूर चर्चा करून पुढील नियम फायनल केले. १) कोणत्याही दिवशी चॅलेंज सुरू झाले तरी चालेल मात्र नक्की कोणते चॅलेंज आणि किती तारखेला सुरू करणार आहात याची माहिती स्ट्रावा किंवा व्हॉट्सप ग्रूपवर "चॅलेंज सुरू करण्यापूर्वी" द्यावी. २) कोणतेही चॅलेंज सलग ७ दिवस (कॅलेंडर डेज) पूर्ण झाले तरच गृहीत धरले जाईल. ३) टीम बनवून चॅलेंज पार पाडायचे असेल तर कमाल ४ लोकांची टीम तयार करावी लागेल, टीमचे रोजचे सायकलिंग ५० किंवा १०० किमी करावे लागेल, टीम मधील सर्वांनी रोज किमान ५ किमी सायकलिंग करणे आवश्यक आहे उदा. टीम मध्ये ३ सायकल स्वार असतील तर प्रत्येकाने रोज किमान ५ किमी सायकल चालवणे बंधनकारक आहे. दोघांनी २५ किमी आणि तिसऱ्याने ० असे झाले तर टीमला पुन्हा चॅलेंज सुरू करावे लागेल. ४) ७ दिवसांपैकी एखादा दिवस कांही कारणाने सायकलिंग झाले नाही तर संपुर्ण टीम चॅलेंजसाठी पात्र राहणार नाही, मात्र पुढील दिवसापासून नियम क्रमांक १ नुसार नवीन चॅलेंज सुरू करता येईल. उदा. समजा मी १ मार्च ते ७ मार्च ५० किमी करण्याचे ठरवले आणि ५ मार्चला सायकलिंग झालेच नाही तर मी ६ तारखेपासून नवीन चॅलेंज सुरू करू शकतो जे १२ मार्चला संपेल. ५) वरील कोणताही नियम न बदलता - १०० किमीचे चॅलेंज घेतल्यानंतर अचानक कांही कारणाने ते ५० किमी मध्ये बदलता येईल. मात्र ५० किमीचे चॅलेंज १०० किमी मध्ये बदलण्यासाठी सगळे दिवस १०० किमी + सायकलिंग होणे आवश्यक आहे. उदा. समजा मी १ मार्च ते ७ मार्च १०० किमी करण्याचे ठरवले आणि ५ मार्चला ७५ किमी सायकलिंग झाले तर मी ५० किमीच्या चॅलेंजला पात्र असेन. तसेच समजा मी १ मार्च ते ७ मार्च ५० किमी करण्याचे ठरवले पण माझे पहिले चार दिवस प्रत्येकी १०० किमी सायकलिंग झाले तर मी ५० किमीचे चॅलेंज १०० किमीमध्ये बदलू शकतो. ६) ज्यांना रनिंग / वॉकिंग करायचे आहे त्यांनी टीम बनवुन चॅलेंज पूर्ण करावे. रनिंग साठीचे अंतर १० किमी, आणि प्रत्येक टीम मेंबरने किमान २ किमी रनिंग करणे आवश्यक. ******************** हे नियम ग्रुपवर टाकले आणि एकच हलकल्लोळ सुरू झाला, कांही तासातच टीम तयार झाल्या. टीम त्रिदेव - नितीन पाठक, मानस चंद्रात्रे आणि बाबा योगिराज - ५० किमी सायकलिंग ७ दिवस टीम F1 - अंजनेय, नाजुक पाटील आणि प्रतिक कुलकर्णी - ५० किमी सायकलिंग ७ दिवस लोन रेंजर - डॉ श्रीहास - ५० किमी सायकलिंग ७ दिवस टीम लोड रनर - प्रसाद दाते, इरसाल कार्ट, मोदक - १० किमी रनिंग ७ दिवस यातील "लोन रेंजर" डॉक्टर श्रीहास यांनी आज सकाळी ५० किमीचे चॅलेंज पूर्ण केले. त्रिदेव आणि F1 जबरदस्त सायकलिंग करत आहेत. त्रिदेवांचे ५ दिवसात तब्बल ६६३ किमी सायकलिंग झाले आणि टीम F1 ४५१ किमी अंतर कापून त्यांना साथ देत आहे. चॅलेंज स्वीकारल्यानंतर दुसर्‍याच दिवशी मला भटकंतीसाठी बाहेर पडावे लागले त्यामुळे एकच दिवस ५ किमी पळणे जमले व दुसर्‍या दिवशी चॅलेंज गुंडाळावे लागले. मात्र प्रसाद दाते आणि इरसाल कार्ट यांनी नाउमेद न होता दोघांतच आव्हान पूर्ण करायचा चंग बांधला आणि सध्या नियमीतपणे पळत आहेत. **************************** पुढील टप्पाही आता चर्चेत आहे. थोडी अवघड पण कस बघणारी आव्हाने सागर पाध्येंनी सुचवली आहेत. मासिक आव्हाने १. एक सलग फेरी ५० किमी (१०० किमी) २. एक सलग फेरी १०० किमी (कितीही) ३. एकूण अंतर ५०० किमी ४. एकूण अंतर १,००० किमी (*) ५. एकूण चढण ३,००० मी ६. एकूण चढण ७,००० मी (*) वार्षिक आव्हाने १. ५० किमी दररोज असे कोणतेही ४ आठवडे २. १०० किमी दररोज असा १ आठवडा ३. महिन्यात २२ वेळा ४०किमी + फेऱ्या (कसाही कॅलेंडर महिना) ४. महिन्यात २२ वेळा दिवसाचे ४० किमी (ऑफिस ऑफिस)⁠⁠⁠⁠ ५. किमान ५ घाट (*) **************************** सध्या या चॅलेंजमुळे ग्रुपवर सर्वजण एकदम उत्साहित आहेत, धमाल करत आहेत आणि अनेकजणांचे नियमीत सायकलिंग सुरू झाले आहे. **************************** @@@@@@@@@@@@@@@@@@@@ येथे विशेष उल्लेख म्हणून ज्यांनी ज्यांनी चॅलेंजे पूर्ण केले त्यांची माहिती देत आहे. १) लोन रेंजर - डॉ श्रीहास - ५० किमी ७ दिवस - एकूण सायकलिंग - ४३० किमी. २) टीम त्रिदेव - नितीन पाठक, मानस चंद्रात्रे आणि बाबा योगिराज - ५० किमी ७ दिवस - एकूण सायकलिंग - ८८० किमी. ३) टीम F1 - अंजनेय, नाजुक पाटील आणि प्रतिक कुलकर्णी - ५० किमी ७ दिवस - एकूण सायकलिंग - ५०२ किमी. ४) टीम लोड रनर - इरसाल कार्ट आणि प्रसाद दाते - १० किमी रनिंग ७ दिवस - एकूण रनिंग - ७९ किमी. ५) टीम सायक्लोमेनीयाक्स - सागर PDY, स्थितप्रज्ञ आणि नकुल पाठक - ५० किमी ७ दिवस - एकूण सायकलिंग - ६४८ किमी. @@@@@@@@@@@@@@@@@@@@
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 38664
प्रतिक्रिया 184

प्रतिक्रिया

मध्यंतरी बाहेरगावी असल्यामुळे ओपन एअर सायकलिंग बंद असल्याकारणाने अधून मधून जिममधील सायकलवर थोडे सायकलिंग केले. पण तुम्ही म्हणता तसे माझेही गुडघे दुखले म्हणून सायकलिंग सोडून ट्रेडमिलवर धावणे सुरु केले. जिममधल्या सायकल्स एकाच फ्रेम साईझच्या असतात. आपल्या उंचीला (तो फ्रेम साईझ) फिट होईलच याची शाश्वती नसते. त्यातून त्याचे बाईक-फिट पराकोटीचे गंडलेले असते. त्यामुळे पायडल पुढे असताना गुडघा आणि चवड्याचा पुढचा भाग एका रेषेत येत नाहीत. तसेच हॅन्डल adjustable नसल्यामुळे जिथे आहे तिथे धरून चालवावी लागते. या सगळ्याचा परिणाम म्हणजे सांधेदुखी. त्यामुळे जिम मधल्या सायकलवर दीर्घकाळ सायकल चालवू नका. त्यापेक्षा थोडी वॉर्मअप म्हणून सायकल चालवून उरलेला वेळ ट्रेडमिल वर धावणे उत्तम. सर्वात उत्तम मोकळ्या हवेत धावणे/सायकलिंग.

In reply to by स्थितप्रज्ञ

सादर उत्तर पिलियन रायडर यांच्या एका प्राशनाला द्यायचे होते पण चुकून नवीन कमेंट पोस्ट झाली :(

In reply to by स्थितप्रज्ञ

माहितीसाठी धन्यवाद! जिममध्ये सायकल चालवताना मलाही हाच त्रास झाला. एलिप्टिकल मात्र आवडली.

In reply to by स्थितप्रज्ञ

धन्यवाद! मला जिममध्ये ट्रेडमिलवर पळायला अजिबात आवडत नाही. ते खूप अनैसर्गिक आणि गुडघे खराब करणारे वाटते. म्हणून मी सायकलिंग करणार होतो. पण आता हि माहिती मिळाल्यावर त्या वाटेला नाही जाणार. मला वाटते एलिप्टीकल सर्वात उत्तम! पण ते करून धावण्या किंवा सायकलिंगपेक्षा कमी उष्मांक (कॅलरीस) जळतात असे वाटते....

In reply to by आषाढ_दर्द_गाणे

असं मला काही आर्टीकल्स मध्येही लिहीलेलं सापडलं. पण मी पाहतेय तर मला तेवढ्याच कॅलरीज जळलेलय दिसतात. अर्थात ते क्रॉसरॅम्प आणि रेझिस्टन्सवरही अवलंबुन आहे. तो वाढवला की १३-१५ मिन मध्ये १ माईल होतो आणि १०० कॅलरीज जळतात. मी काल क्रॉसरॅम्प २० आणि रेझिस्टन्स १५ करुन पाहिला. म्हणजे वाढवत नेला. तर १३ मिनिटं कसं तरी करु शकले. हेच १० क्रॉसरॅम्प आणि ४ रेझिस्टन्सवर कॅलरी खूप कमी जळाल्या, पण मी कितीही वेळ मग एलिप्टीकलवर बागडु शकते.

In reply to by पिलीयन रायडर

त्या मशीनवर लिहून येणाऱ्या कॅलरीजवर फार विश्वास ठेवू नका. विशेषतः एलिप्टीकल तर जवळपास ४२% पर्यंत आकडा फुगवून सांगू शकतो असे सापडले आहे. धाप लागेपर्यंत, म्हणजे एक अख्खे वाक्य बोलता येणार नाही इतक्या तीव्रतेने (इंटेन्सिटी) व्यायाम करावा असे म्हणतात. तेव्हा नुस्तेच बागडण्यापेक्षा श्वासाकडे असू द्या

In reply to by आषाढ_दर्द_गाणे

वर स्थितप्रज्ञ ह्यांनी आधीच धाप लागण्याविषयी लिहिले आहे, ते विसरलो चूभूद्याघ्या

In reply to by आषाढ_दर्द_गाणे

धाप लागोस्तोवर सुद्धा व्यायाम करू शकता पण ते HIIT प्रकारात मोडते. त्यात जास्तवेळ न घालवता जास्त उष्मांक जाळले जातात. हे थोडं अघोरी प्रकरण आहे (कारण इंज्युरी व्हायची शक्यता जास्तप्रमाणात असते) पण याचे इफेक्टस लौकर दिसून येतात. लांबपर्यंत पल्ला गाठायचा असेल आणि विशेषतः चरबी जाळायची असेल तर धाप लागून उपयोग नाही म्हणून तसे लिहिले.

In reply to by आषाढ_दर्द_गाणे

काय???? अरे देवा!!! मी १०० कॅलरीज जळाल्या म्हणुन खुष होते.. पण मग तसं तर कुठलीच मशीन १००% बरोबर दाखवत नसेल.

In reply to by पिलीयन रायडर

कुठल्याही मशीनवर आधी वजन एंटर करावे लागते ते बरोबर असेल तर दाखवलेल्या कॅलरीजच्या आकड्यावर विश्वास ठेवु शकतो. जर वजन माहीत नसेल तर कुठल्या आधारावर कॅलरीज मो़जणार. कॅलरी मोजणे म्हणजे साध्या भाषेत.. किती वजनाची वस्तू किती वेगाने किती वेळ ढकलली यासाठी लागणारी उर्जा.. त्यातला वेग आणि वेळ आपण पहात असतो मशीनवर.. राहीले वजन ते माहीत असायला हवे.. बर्‍याच वेळा डीफॉल्ट ६० किंवा ७० किलोसाठी कॅलरीजचा आकडा दाखवला जातो.. तुमचे वजन याच्या जवळपास नसेल तर तो आकडा तुमच्यासाठी नव्हता असे समजा.. :-)

In reply to by बाळ सप्रे

मी टाकते ना म्हणूनच.. वजन आणि वय. मग हे आकडे रेफरन्स म्हणुन वापरायला हरकत नाही ना?

HIIT मध्ये दोन महत्वाचे भाग आहेत १. High Intensity २. Interval त्यामुळे यात alternate रिकव्हरी Cycles असतात. (आणि थोडीशी धाप लागली तरी या रिकव्हरी सेशन मध्ये श्वास पुन्हा जाग्यावर येतो) त्यामुळे HIIT चा स्टॅमिना वाढवायला उत्तम उपयोग होतो अर्थात यौग्य पद्धतीने केले तर इन्जुरीची शक्यता नाही. आठवड्यातून एकदा HIIT जरूर करा

एक प्रश्न: काही काळ नियमित व्यायाम, चालणं इ. केल्यावर अचानक खंड पडणं आणि मग परत सुरु करायला महाप्रचंड कंटाळा येणं अशी फेज कोणालाच येत नाही का? अशावेळी पुन्हा पूर्वीसारखं सुरु करायला कोणत्या प्रकारे विचार करता? स्वतःला धक्के मारुन कसं उभं करता? आत्मताडन टाळून सहजतेने परत सुरुवात करताच येत नाही का? आपण परत एकदा फेल झालो ही भावना निराशाजनक वाटत नाही का? ते कसं झटकता? ..निदान परत सुरुवातीचा गियर पडेपर्यंत. ?

In reply to by गवि

अशावेळी एक काम करा. पहिले म्हणजे गिल्टी वाटून घ्यायचं नाही. गिल्टमुळे मनाची ताकद कमी होते. तुम्ही जसे आहात तसे स्वतःवर प्रेम करा. शरीराला नावे ठेवू नका (जर तसे करत असाल तर). तुम्ही प्रामाणिकपणे शरीराला मदत करणार आहात. आता मी रोज व्यायाम करेन, यापेक्षा मी आजचा एकच दिवस चालणार आहे, उद्याचं उद्या बघू (व्यसनमुक्ती करताना जे टेक्नीक वापरतात तेच, मी आजचा एक दिवस सिग्रेट ओढणार नाही) त्यामुळे टास्क अचीवेबल वाटायला लागतं! शुभेच्छा! :)

लेकाबरोबर १५ + १० पुशप्स १५ सिट्प्स ४५ सेकंद प्लँक १० सेकंद आणि २१ सेकंद असे दोन वॉल सिट्स आज सकाळी २४ सूर्यनमस्कार.

मी १९ मार्च ला २०० km brm करणार आहे तेच माझे वयक्तिक चाललेन्जे आहे कोणी १९ मार्च ची brm करणार आहे का ?

In reply to by आशिष काळे

माझे दोन मित्र आणि मी या BRM चा विचार करतोय (पुण्यात असल्यास). तुमचा दूरध्वनी क्रमांक व्यनि करा. पुढील संभाषण कायप्पावर करू.

चॅलेंजचा धुमाकूळ चालू झाल्यापासून न चुकता रोज सायकलिंग होत आहे. त्याचा परिणाम कि काय आज हापिसात येताना बऱ्याच महिन्यांनी २५.८ किमी प्रति तास वेग गाठू शकलो. तसा २१-२२ मध्ये रेंगाळणारा मी.

मागील आठवड्यात स्थितप्रज्ञ, मी आणि नकुल मिळून 100x7 चे आव्हान उचलले होते. डॉ श्रीहास यांनी 50x7 केल्यापासून माझ्या मनात देखील विचार होता कि आपणही 50x7 करावे. त्याप्रमाणे १६ ते २२ फेब दरम्यान रोज ५० किमी सायकल हाणून झाली. ५० किमी रोज चालवणे आपल्याला शक्य आहे हे माहित होते, पण सकाळी ऑफिस ला जायला ८ ला तयार व्हावे लागते, ती वेळ सांभाळून हे आव्हान खरंच कठीण होते. त्यामुळे मागचा आठवडा (वीकांताच्या सुट्ट्या वगळता) रोज सकाळी ४:३० ला उठून ५ ला सायकलिंग सुरु केली. आणि काही करून ७-७:१५ ला परत यायचे म्हणून जोरदार दामटली. परिणामतः बहुतेक दिवशी २५ किमी/तास चा वेग मिळाला. विकांताला मात्र थोडा आळस/विश्रांती घेत ६:३० पर्यंत तरी झोपलोच. शिवाय आरामात सायकल चालवली. आणि दुपारी पण किमान तासभर झोप काढली. टीम च्या 100x7 च्या आव्हानाचा सविस्तर वृत्तांत स्थितप्रज्ञ देतीलच.

In reply to by sagarpdy

मी रोड बाईक वर केल्यामुळे थोडं सोप गेलं म्हणेन... पण तुमची हायब्रीड आणि त्याहून सगळं सांभाळून (सकाळी ४:३० ला उठणं हे ५० किमी चालवण्यापेक्षा अवघड आहे) २५ किमी/तास ही स्वप्नवत स्पीड काढणं... हॅट्स आॅफ आणि प्राउड आॅफ यू !! किप रायडींग ....

In reply to by डॉ श्रीहास

तेच..सगळं सांभाळून सकाळी ४:३० ला उठणं, ५० किमी चालवणं, २५ किमी/तास ही स्पीड काढणं..सगळच खतरनाक..___/\___

In reply to by sagarpdy

सर्वप्रथम ५०x७ चे आव्हान पूर्ण केल्याबद्दल sagarpdy चे जाहीर अभिनंदन!!! The Cyclomaniacs टीम ने उचललेल्या १००x७ आव्हानांचा सविस्तर वृत्तांत पुढीलप्रमाणे. The Cyclomaniacs - Challenge 2 - 100x7 Day 1 stats sagarpdy: 53 km Nakul: 15.6 km स्थितप्रज्ञ: 32.4 km Total: 101 km Day 2 stats sagarpdy: 52.6 km Nakul: 16.7 km स्थितप्रज्ञ: 34.1 km Total: 103.4 km Day 3 stats sagarpdy: 55.1 km Nakul: 18.9 km स्थितप्रज्ञ: 36.1 km Total: 110.1 km Day 4 stats sagarpdy: 50.0 km Nakul: 20.5 km स्थितप्रज्ञ: 31.9 km Total: 102.4 km Day 5 stats sagarpdy: 51.8 km Nakul: 16 km स्थितप्रज्ञ: 34.1 km Total: 101.9 km Day 6 stats sagarpdy: 51.8 km Nakul: 16.7 km स्थितप्रज्ञ: 34.9 km Total: 103.4 km Day 7 stats sagarpdy: 53.8 km Nakul: 18 km स्थितप्रज्ञ: 36 km Total: 107.8 km Grand Total: 730 km Personal totals sagarpdy: 368.1 Nakul: 122.4 स्थितप्रज्ञ: 239.5 Personal challenges sagarpdy: 5 ghats + 50x7 both complete स्थितप्रज्ञ: 2 ghats ओंगोईंग (सध्या गुडघा किर किर करत असल्यामुळे हा चॅलेंज पुढच्या महिन्यात नव्याने सुरु करणार आहे)

खूप दिवसांनी सवडीनी मिपावर आलो आणि धाग्यावरचा उत्साह बघून खरोखर धन्य वाटलं! मोदकभाऊंची कल्पना, त्याला डॉक्टरांनी चॅलेंजचा रायडर काय लावला, धाग्याचं लग्नघरंच झालं! सही रे सही! एकमेका सहाय्य करू, अवघे धरू सुपंथ।

भराभर चाललं की भरपूर दमतो पण तसंच न थांबता चाललं की एक प्रकारची सुखद "हाय" नशासदृश जाणीव होते. असा अनुभव आणखी कोणाला आहे का? .......हो. टेकडी चढताना हा अनुभव आला आहे. एका क्षणी सगळं शरीर हलकं होउन जातं.

In reply to by चष्मेबद्दूर

याला runners high असे म्हणतात .... रक्तात वाढणाऱ्या एंडोर्फिन मुले असे होते ...

परंतु हवा चांगली असल्याने जेवण ब्रेकात १२ मिनिटे भराभर चाललो. २२ फेब्रु - आज पहाटे २४ नमस्कारांनी सुरुवात झालीये. फीलिंग गुड! :)

गेला सव्वा महिना आठवड्यातून ५ दिवस '३ किमी धावणे + २ किमी चालणे' हा व्यायाम करतोय. जोडीला डायट प्लॅन घेतलाय डॉक्टर कडून. २ किलो वजन कमी झालेय सव्वा महिन्यात. १ मार्च पासून पोहणे सुरु करतोय. आता पोट पूर्ण सपाट होईपर्यंत माघार नाही :)

असे दिसते. ब्रेव्हे नंतर आळस झाला, आळसच आराम नाही. आठवडाभर काहीच नाही. २४ फेब्रु - ४४ किमी २५ फेब्रु - ८५ किमी. (नॉन स्टॉप ७०, ORR - AIRPORT - ORR, मजा आली खूप, सर्व धरुन घर ते घर चार तासात, उन्हाच्या आधी ९ वाजता घरी.) आधीचे सायकलींग ३ फेब्रु - २५ किमी ४ फेब्रु - ४० किमी ५ फेब्रु - १०५ किमी (७७ + १८+ १०) ८ फेब्रु - ३६ किमी ११ फेब्रु - ४३ किमी १२ फेब्रु - १०१ किमी १४ फेब्रु - ३८ किमी १८ फेब्रु - २०३ किमी (ब्रेव्हे पूर्ण ) एकूण- ७१९ किमी आता हजार किमी महिन्यात चॅलेंज पूर्ण होनार नाही.

उन्हात चालवायची सवय रहावी म्हणून शनिवारी आणखी दोन मित्रांबरोबर कामशेतला सायकलवर जाऊन आलो. जाऊन येऊन १००री झाली. लॉन्ग राईड्सना उन्हामुळे मला नेहमी डोकेदुखीचा त्रास होतो. एका मित्राने सांगितले त्यालाही तसेच होते. त्याच्या डॉ ने त्याला सांगितले होती कि शरीरातले "पोटॅशियम" कमी झाले कि हा त्रास होतो. त्यामुळे भरपूर पोटॅशियम असलेले पदार्थ खात रहा. गूगलबाबाला विचारून या वेळी बरोबर अर्धा डझन केळी घेतली (एका केळ्यात अंदाजे ४०० मिलिग्रॅम पोटॅशियम असते). राईडला ३ फस्त केली. (ठिकाणावर असून सुद्धा) डोके अजिबात दुखले नाही. सोबत डीहायड्रेशन होऊ नये म्हणून पाणी, इलेक्ट्राल आणि नीरा होतेच.

In reply to by स्थितप्रज्ञ

म्हणुन होते का डोकेदुखी? मला नेहमीच हा त्रास होतो. अत्यंत धन्यवाद ही माहिती दिल्याबद्दल.