कासव
लेखनप्रकार
"ए बामणा, मुत्त्या बोलावतंय बघ आमचं तुला. बघ काय म्हणतंय येड्या भोकाचं"
"तुझैला तुझ्या तीन एकर. बापंय कीबे तुझा"
"बाप नाय डोस्क्याला ताप हाय"
आप्पा कोरे म्हणजे अॅक्चुअली डोस्क्याला ताप कॅटेगरीतलाच. पण त्याच्या पध्दतीने विचार केला तर ताप. नायतर मुत्त्या वागायला सरळ. दिवसभर बारक्या दुकानात गोळ्या चॉकलेटं अन कुरकुरे विकायचा. खरा धंदा व्ह्यायचा पुड्या सिगरेटीवर पण पाटी यल्लम्मा किराणा दुकान अशीच. सकाळी कपाळाला फासलेली इबित्ती घामाच्या ओघळात वाहून जाईपर्यंत धंदा व्ह्यायचा. जसा दिवस बुडायला लागायचा तसं दुकान आप्पाच्या मित्रांनी भरायचं. येस्टीड्रैव्हर बाशा, आर्मीमन आवचार, पुजारी ग्रामोपाध्ये आणी अशाच चारसहा बिलंदरांनी दुकान भरवलं की झ्याट गिर्हाईक फिरकायचं नाही तिकडं. ह्यांच्या सगळ्यांच्याच बुध्द्या अचाट. कुणाला कसं घोळात घेतील सांगता येणार नाही. बायाबापड्यां तर संध्याकाळच्याला तिकडं फिरकायच्याच नाहीत. असल्या आप्पा कोरेचंं गाबडं म्हणजे श्रीशैल. आमचं दोस्त. बापाचा इरसालपणा जरा कमीच उतरलेला लेकात. बापलेकाचं पटलंही नाही कधी.
"का बे शिर्या, मोबाईल शॉपीचं काय झालं"
"शेट्ट्ट, मुत्त्या काय दीना रोक्का"
"चैला, चारपाच लाख जड हैत का बे तेला?' कुट ठेवतंय दुकानचा गल्ला साठवून?"
"काय करतंय की काय की. एकच चावी तेच्या पेटीला. ती बी गळ्यातल्या लिंगाला बांधून ठेवतंय"
दोघं गेलो दुकानात तर आप्पा कसल्यातर पोथीत डोस्कं घालून बसलेला. आम्हाला बघून पटदिशी पेटीत ठेवली. कुलुप लावून चावी लिंगात अडकली मग आप्पाने श्रीशैल्याला हुकूम सोडला.
"होग री सुळ्ळीमगा. जरा प्रायव्हेट बोलायचं तुझ्या दोस्तासंगट. चा बी सांग म्हणं. काय देवा? बोलू न्हवं?"
"बोला की आप्पा. काय विषेष?"
"काय नाय ते तुम्ही डिस्कोरी बिस्कोरी बघताम्हणं की टीवीवर?"
"आप्पा त्यात काय एवढं. चांगलं असतंय ते. प्राण्यांच्या शोधांच्या झालंच तर विज्ञानाच्या स्टोर्या असतेत"
"बघा की हो. नको कोण म्हणतंय. बामणं हुशारंच ओ. काय बघायचं ते बी हुशारीनं बघतेत. नायतर आमचं कर्टून. रात्रभर मस्ती चनेल बघतंय दिवसा छताला बोचा दाखवत पडतंय"
"आप्पा, द्या की मोबाईल दुकान काढून त्याला. दिवसभर तिथं बसंल"
"ते बघू म्हणं नंतर, पैले सांगा एक्वीसनख्याची तुम्हाला काय म्हैती"
"काय एक्वीस? कसली नखी?"
"कासव असतंय. एक्वीस नख्याचं."
"आप्पा इत्क्या प्रोग्रामात कासवाची नखं काय दाखवली नाहीत बघा. त्याचं काय?"
"ते मिळालं की लक्ष्मी पाणीच भरती हो देवा घरात. तुम्हाला म्हैत नाही व्हय"
"ह्या.. काय बी उगी"
"देवा...उगी न्हवं. आता आपले बापू. त्येंच्या संस्थेचं चिन्ह काये?"
"कासव"
"तेच. आधी बापू काय होतं? उगी आपल्या चारचौघागत हो. एकदा का त्येंना ते एक्वीस नख्यावालं कासव गावलं. निस्ता रोक्काच रोक्का. हटता हटंना लक्ष्मी. मागंल ती इच्छा पूर्ण करतं म्हणं ते कासव."
"काय मागंल ते देतंय?"
"अन मंग. "
"अओ आप्पा त्यांनी वेगळ्या हिसोबानं ठेवलंय ते सिम्बॉल."
" असं कोन ठेवतंय व्हय शिंबॉल? अर्थय देवा त्यात. लक्ष्मी हाय त्यात"
"काय नसतं हो आप्पा तसलं. उगी कायतरी काढू नका. हाय ती लक्ष्मी बक्कळ हाय तुम्हाला. मग तुम्हाला कशाला काय पाहीजे?"
"देवा. मला म्हणजे लेकराबाळासाठीच ओ. दुसरं हाय काय आपलं"
"मग द्या की त्याला दुकानला पैसे"
"जावा देवा, तुम्ही काय उपेगाचं नाही आम्हाला"
...............................
असल्या बाबतीत आप्पा सटीकच. वाघाचं नखच आण, ते चांदीत जाळलं की सोनं होतय म्हण. उदाच्या मागं तर चार वर्षं फिरला. उदाच्या मेंदूची राख लाल कापडात गुंडळून वडाखाली पुरली की पौर्णीमेला त्याच्या आकाराएव्ढा हिरा मिळतंय म्हण. नाही नाही तसल्या पोथ्या अन पुस्तकं आणणार. चार टोळभैरव मित्र कायतरी सांगणार आन हे मुत्त्या करत बसणार. खरंच येड्या भोकाचं. पोरगं साधं दुकान मागतंय ते देईना आणि असले धंदे.
"शिर्या, बाप काय देत नाय पैसे तुला दुकानासाठी"
"तिज्यायला बघ की. आता रात्री कुटं त्या बाशाबरोबर कर्नाटकात चाललंय"
"कशाला म्हणं?"
"ह्ये कासवचंच म्याटर असणार कायतर. येकदाचं ते मिळालं तरी आमचं आप्पा देईल का पैसे कुणास म्हैत."
...............................
दुसर्या दिवशी आप्पाचं दुकान बंद. संध्याकाळी पण बंद. रात्री शिर्या आला.
"चल पटकन. आप्पाचं निरोप आलंय. बिदरला जायचंय"
पटदिशी निघालो. उमरगा, आळंद, बसवकल्याण करुन बिदरला त्याच्या सोयर्याकडं पोचस्तंवर सकाळ झालेली. गेल्यागेल्या सोयर्यानी क्रुझर काढली. नीट सिव्हिलात गेलो. येस्टीच्या अपघातातले मयत लायनीत पांढर्या कपड्यात होते. गळ्यातल्या लिंगाला घट्ट कवटाळून आप्पा शांत झालेला होता. कवटी फुटल्याने आलेले रक्ताचे ओघळ पुसूनही त्याची जाळी उरलेली होती. कागदोपत्री सोपस्कार उरकून बॉडी ताब्यात यायला दोन तास गेले. क्रूझरमध्ये मागे मयतबापा शेजारी श्रीशैल मख्खासारखा बसला. मागचं दार लावताना चार जण सरकारी कानडी आले. परत श्रीशैलच्या सह्या झाल्या. कागदं देण्यात आली.
"कसली कागदं रे श्रीशैल? काय म्हणलं ते कानडीत?"
"अॅक्सीडेंटचा चेक दिलाय पाच लाखाचा"
बापाची प्रेतकळा आता पोरगा घेऊन बसलेला होता.
..................................................
..................................................
..................................................
खुलासे:
मुत्त्या: आमचं बुढं, आमचं म्हतारं ह्या स्टाइलीत.
रोक्का: पैसे, रक्कम
लिंगः वीरशैव लिंगायत लोक गळ्यात चांदीचे लिंग परिधान करतात.
इबित्ती: विभूती. वीरशैव लिंगायत लोक कपाळावर लावतात. तीन पट्टे व एक ठिपका असल्याने त्यांना चेष्टेत तीन एकर एक गुंठा म्हणतात.
सुळ्ळीमगा: रांडेच्या
उदः उदमांजर. रानमांजर. झाडावर राहते. झाडाखाली झोपलेल्या माणसाचा मेंदू खाते अशी दंतकथा आहे.
.
(काही वाचकांना 'मंकीज पॉ' ची आठवण येईल पण ही सत्यकथा आहे.)
वाचने
11222
वाचनखूण
प्रतिक्रिया
52
पण ही सत्यकथा आहे :(
In reply to पण ही सत्यकथा आहे :( by सचु कुळकर्णी
:(
सत्यकथा...
लेखन भारी जमले आहे अभ्या !
ग्रामीण जीवनाचा जवळून घेतलेला अनुभव अतिषय मस्त उतरला आहे ।
सत्यकथा आहे हे वाचून वाईट वाटले .
आणि हा 21 नख्या कासव प्रकार मी देखील साताऱ्यात पाहिला आहे.
बाकी आप्पा ज्या पेटीची चावी लिंगाला लावून ठेवायचा त्या पेटीचा संदर्भ क्लोज करायला हवा होता असे वाटले.
कथा उत्तम जमली आहे. लेखकाचे कथाकथन आणि त्याला जोडून येणारे त्या त्या प्रसंगानुरूप संवाद उत्कृष्ट वातावरणनिर्मिती करतात. याच फॉर्म मध्ये अजून लेखन येऊ द्या.
आधी वेलकम ब्याक!
In reply to बाकी नंतर... by तुषार काळभोर
पण ती सोलापूरी ष्टाईलमध्ये मस्स्त सांगितली आहे.
असे नसत्या धंद्याच्या मागे लागून वाया जाणारे बरेच बघितलेत.
(अशा अंधश्रद्धा अन् येमेलेम सारखेच की!)
सत्यकथा आहे हे वाचून वाईट वाटले.
लेखन भारी आहे मात्र! लिही अजून.
गावाकडची मस्त कथा.
अजून येऊंदेत.
ल्हानपणी आमच्या गावात चिटकुळं ऐकलंवतं. ते जवळ असलं की कायपण मिळतं म्हणे!
झक्कास लिहीलंय.
पण ही खास अभ्याष्टाईल सत्यकथा साॅलिड आहे. वाचून मजा आली असं मात्र म्हणवत नाही :(
In reply to Monkey's Paw ची आठवण झालीच. by बोका-ए-आझम
+१११११११११
In reply to Monkey's Paw ची आठवण झालीच. by बोका-ए-आझम
अगदी हेच म्हणते !
In reply to Monkey's Paw ची आठवण झालीच. by बोका-ए-आझम
+२२२२२२२
सोल्लिड!!!
गोष्ट चांगली आहे
बाकी अभ्याशेठ भाषेचा टोन मस्त पकडला आहे.
पैजारबुवा,
राख ठिवल्येली वडाखाली पन टिम्पोचा टरक नाय झाल्ला.
लिहीत राहा रे भावा...
छान लिहितोस.
भारीच ना भाउ.
गोड वाटली भाषा कानाला
लिहित रहा.....
भाषेवर प्रचंड हुकूमत.
जियो अभ्या.
कडू लिहितोस भावा..एक डाव आलो कि भेटू सोलापूर लातूर नळदुर्ग हुमनाबाद बिदर. मस्त पट्टा आहे मध्ये उस्मानाबाद आणि नांदेड राहिलं .
अवांतर -२१ नख वाली कासव ह्या अजूनही अफवा चालू आहेत .मध्ये पनवेल ला ४ murdar झालेले ह्यावरून .
येन्ना रास्कला भारी लिवलं कि ओ तुमी अभ्या शेठ...
संवाद लिवण्यात तुझा हात कोण धरणार नाही. (तसाही तुझा हात धरायची हिम्मत कोण करणार ? :D )
जबरदस्त शैली, सगळा प्रसंग अगदी डोळ्यांसमोर उभा राहतोय.
+१११११११११
कथा आवडली
अप्रतिम! छान जमली आहे
अभ्या अन् केवळ अभ्याच.....येलकम ब्याक...!
जबरा!
यू कम कम!
Sandy
वाईट हैस अभ्या.
अनुभव
लिखाणाची शैली
भाषेवरची पकड
सगळंच झकास
पण सत्यकथेचा शेवट फारच टोकदार :(
खूप छान लिहिलंय.
थ्यांक्स अ लॉट वाचक आणि प्रतिसादकांनो.
आभार गविराज, ननि, सॅन्डी, बोकेश, मापं, जव्हेर, माऊली, स्नेहातै सारख्या श्रेष्ठांचे. आणी बाकी सार्या आप्तमित्रांचे.
मार्केशा: पेटी तर आता श्रीशैलाच्याच ताब्यात. माझा अंदाज आहे त्यात वाघनख्या, उदाची केसं, नकली कस्तुरी, अंगठ्या, गंडेदोरे, धागे अन जीर्ण पुस्तके याशिवाय काही सापडणार नाही. सो नो एक्स्प्लेनेशन.
पैलवाना अन वरुनः या कवाबी सोलापूरास. म्या हाय इथंच. पार्टी मारु जोरात.
पुनः धन्यवाद.
In reply to थ्यांक्स अ लॉट वाचक आणि by अभ्या..
असला तर आवतान धाडा जरा !
In reply to थ्यांक्स अ लॉट वाचक आणि by अभ्या..
लै भारी लिवलंय!
श्रीशैलवरून एश्शेशीची फी भराची म्हणून म्हातारीकडून ऐंशी रूपे घेऊन किल्ल्यात जाऊन लाभलक्ष्मी खेळणाऱ्या दिपक देशपांडेंच्या "शिरशैलची" उगाचच आठवण झाली.
In reply to लै भारी लिवलंय! by हतोळकरांचा प्रसाद
+++१११
थ्यांक्स अ लॉट वाचक आणि प्रतिसादकांनो.
आभार गविराज, ननि, सॅन्डी, बोकेश, मापं, जव्हेर, माऊली, स्नेहातै सारख्या श्रेष्ठांचे. आणी बाकी सार्या आप्तमित्रांचे.
मार्केशा: पेटी तर आता श्रीशैलाच्याच ताब्यात. माझा अंदाज आहे त्यात वाघनख्या, उदाची केसं, नकली कस्तुरी, अंगठ्या, गंडेदोरे, धागे अन जीर्ण पुस्तके याशिवाय काही सापडणार नाही. सो नो एक्स्प्लेनेशन.
पैलवाना अन वरुनः या कवाबी सोलापूरास. म्या हाय इथंच. पार्टी मारु जोरात.
पुनः धन्यवाद.
उत्कृष्ट मांंडणी.
सत्यकथा आहे हे वाचुन वाईट वाटले.
खास सोलापुरी एस्टाईल डायलॉग हायती बागा ते.
पार्टी माडाळ्याग नमग बी हेळरी. नाऊ बी हजर आगतिवू री अभ्याशेठ.
काय काय नाद असतो लोकाना :( लिखाणाची शैली प्रभावी आहे एकदम :)
सत्यकथा आहे हे वाचुन वाईट वाटले...
सत्यकथा आहे हे वाचुन वाईट वाटले...
झकासच, तुमच्या भागातक्या भाषेवर तुझी असलेली पकड दिसते लेखात.
In reply to झकासच, तुमच्या भागातक्या by सूड
हेच म्हणतो. जिथे वास्तव्य आहे तिथे अधिवासाशी एकरुप होणारी माणसंच असं लिहू शकतात.
In reply to हेच म्हणतो. जिथे वास्तव्य by गवि
तिथे अधिवासाशी एकरुप होणारी माणसंच असं लिहू शकतात.खरंय, मला अजूनही म्हणावं तितकं खवचट लिहीता येत नाही.
नेहमीसारखेच खिळवुन ठेवणारे लेखन . शेवट दु:खद . अलिकडेच उमरगा येथे महाराष्ट्र मंडळाची एसटी बस ( उमरगा - सोलापुर ) आणी कर्नाटक मंडळाची बस ( उमरगा - बसवकल्याण )यांची धडक होउन दोन्ही बसचे चालक व काही प्रवासी यांचे अपघाती निधन झाले . हि कथा वाचताना कुठेतरी तो संदर्भ आठवला.
येक लंम्बर लीवलंय बग. असाच लिवत रा.
बाबा योगीराज
अभ्यादादा, लई भारी.. शेवट फारच अंगावर आला.
येकच नंबर राव, आपन बी तुम्च्या लिखानाचा पंखा हाये बरं का
शेवट वाईट झाला पण :(
शोलीड लिहिलंय.. शेवट वाईट्ट. त्यात सत्यकथा आहे हे वाचून आणखीनच वाईट वाटलं.
कथा सांगण्याची स्टाईल मात्र मस्तच.
छान लिहलय !
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- twenty one pilots: Heathens (from Suicide Squad: The Album) [OFFICIAL VIDEO]उत्कृष्ट लिहिलयं... आवडली कथा!
पण ही सत्यकथा आहे :(