मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

राव गेले

श्रीकृष्ण सामंत · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
"रावसर" म्हणून प्रसिद्ध असलेला हा माणूस खरच मनाने आणि ह्र्दयाने पण "राव" होता. माझ्या चुलत बहिणीशी लग्न झाल्यावर माझे ते "रावभाऊजी"झाले.खूप पैसे असलेल्याला आपण "मालदार" म्हणतो.रावभाऊजी वृत्तिने मालदार म्हणूनच "ओळखीचे" होते. पार्ल्याच्या पार्ले टिळक विद्यालयात ते पि.टी.चे शिक्षक होते.बरेचसे उंच,तब्यतीने उत्तम, कांतीने निमगोरे, सरल नासीका असं हे उमदार व्यक्तीमत्वाचे रावसर जेव्हां पार्ल्याच्या रस्त्यावरून चालत जात तेव्हां, "रावसर,रावसर,रावसर" असे प्रतिध्वनी जणू होत आहे, असं आजू बाजूने येणारे आवाज ऐकून, आणि रावसरांचा उजवा हात सतत सलाम करायला वर झालेला पाहून ,मी गमतीत त्याना म्हणालो, "रावभाऊजी,तुमचा उजवा हात दुखत कसानाही?" यावर मला ते म्हणाले, "लोकांकडून येणाऱ्या प्रतीसादाने दुखणं विरून जातं. " रावभाऊजी मूडमधे आले की ते शाळेतल्या गोष्टी सांगत.आणि नंतर त्यांचा समारोपाचा विषय म्हणजे ते मला म्हणायचे, "तुम्हाला माहीत आहे तो अमका अमका माझा विद्यार्थी. तो आता अमूक अमूक आहे." असं सांगताना रावांच्या चेहऱ्यावर आत्मप्रौढी पेक्षा कर्तव्याची प्रचिती जास्त दिसून यायची.रावसर निवृत्त झाल्यावर सुद्धा स्वस्त बसले नाहीत. आपल्या ओळखीचा आणि आपल्या ज्ञानाचा कुणाला फायदा होत असेल तर ते स्वखर्चाने त्याठिकाणी जाऊन मदत करत राहीले. मला त्यांची प्रकर्षाने आठवण येण्यासारखी घटना म्हणजे १९९१ हे वर्ष. रावसर त्यावेळी ६४/६५ वर्षाचे असावेत.माझी पत्नी, वर्षाच्या सुरवातीला गंभीर आजाराने एक महिना तरी दवाखान्यात होती.रावभाऊजीना ते कळताच ते मला भेटले. इतर नातेवाईक पण आम्हाला भेटून जात.मी तसा त्यावेळी एकटाच होतो.ते मला चक्क म्हणाले, "तुम्ही रात्रपाळी करा मी दिवसा दवाखान्यात राहीन तुमची इतर कामं तुम्ही करून घ्या". त्या वयावर त्यांनी म्हटल्यासारखं केलं.आणि ते पण कसली आशा न ठेवता. नंतर माझी पत्नी पुर्ण बरी होऊन घरी आल्यावर एक दिवस ते मला आणि तिला भेटायला म्हणून आले. मी पण त्यांचे खूप आभार मानले.त्यावेळेला मला ते काय म्हणाले ते मला अजून आठवतं. "तुम्ही कसले माझे आभार मानता?मी तसं काहीच केलं नाही.मी ज्याच्या त्याच्या मदतीला धावतो. तुम्हाला मी कसा विसरेन.ज्या पत्नीशी मी आता सुखाने संसार करतोय,ते हे सुखाचे दिवस यायला तुम्ही तिच्या आयुष्यात कसे कारणीभूत झालात ते तिच्याच तोंडातून ऐकलेलं वर्णन मी अशावेळी विसरूं कसा शकेन?" काय म्हणावं या माणसाला? कसलं ही निमीत्त काढून मदतीची जरुरी असलेल्याला मदततीचा हात पुढे करून, जीवन जगणारा हा अजातशत्रू माणूस, रावसर, परतीच्या प्रवासाला आम्हासर्वांना सोडून ईहलोकी निघून गेले.माझी खात्री आहे की त्यांचा मदतीचा हात तिथेही पुढे करायला ते मागेपुढे पहाणार नाहित. त्याना माझीही छोटीशी श्रद्धांजली श्रीकृष्ण सामंत

वाचने 3622 वाचनखूण प्रतिक्रिया 8

चंबा मुतनाळ 28/09/2008 - 01:23
रावसर माझ्या हृदयात भिनलेले आहेत. ते आणि कीर सर पाटिवीचे चॅपेल होते. मी मात्र ह्या सगळ्यात नोबडी होतो. आमचा ग्रुप जरा गुंडागर्दिवाला म्हणुनच जास्त प्रसिद्ध होता, म्हणून फँटम पण आम्हाला शिव्या घालायचा. असो, ह्या सगळ्या शिक्षणमहर्षींना म्या पामराचा कुर्निसात

चंबा मुतनाळजी, आपल्या प्रतिक्रिये बद्दल आभार www.shrikrishnasamant.wordpress.com श्रीकृष्ण सामंत "कृष्ण उवाच" shrikrishnas@gmail.com

नि३ 28/09/2008 - 22:37
सामंत साहेब्... तुम्ही वयाची पंचाहत्तरी गाठली आहे ...तरी रोज कीती उत्साहाने,दमाने नवनवीन लेख लीहता.तुम्ही लेखाची शंभरी आधीच गाठ्ली आहे..तुमचा प्रत्येक लेख हा खुप माहीतीपुर्ण ,वाचणीय आणी रोचक असतो.तुम्ही तुमच्या लेखाला मिळालेल्या प्रतीसादाची तमा न बाळगता नियमीतपणे लेख लीहीत असतात्...आणी विषेश म्हणजे तुम्ही तुमच्या लेखाला मीळालेल्या प्रत्येक प्रतीसादाला रीप्लाय करता. मी तुमचा प्रत्येक लेख वाचला आहे (मिपा वरील्)..आणी मला तो खुप खुप आवडला ...फक्त एवढ्च की मि त्यातल्या बहुतेकाला प्रतीसाद दीला नसेल पण त्याचा अर्थ असा होत नाही की तो लेख मला आवडला नाही. तर आतापर्यंत तुम्ही मिपा वर जे काही लीखाण केले असेल त्या सर्व लेखांसाठी माझा हा प्रतीसाद..... तुमचे मानावे तेवढे आभार कमीच आहे... तुम्ही माझ्यापेक्षा मानाने,वयाने ,बुद्धीने खुप मोठे आहात माझ्या आजोबा सारखे.. तुम्हाला माझे दंडवत.. --नि३ ---नि३.

In reply to by नि३

नि३(म्हणजेच नितीन) मला तूं तुझा आजोबा समजून सन्मान दिलास त्याबद्दल मला मनःपूर्वक आनंद झाला. माझे लेख तुला आवडतात,मिपावरील सर्व लेख तू वाचलेस,आणि वाचतोस हे वाचून मला फार बरं वाटलं. "तुम्ही तुमच्या लेखाला मिळालेल्या प्रतीसादाची तमा न बाळगता नियमीतपणे लेख लीहीत असतात्...आणी विषेश म्हणजे तुम्ही तुमच्या लेखाला मीळालेल्या प्रत्येक प्रतीसादाला रीप्लाय करता." ह्याची दोन कारणं आहेत, माझे सर्व वाचक आणि अन्य सर्व लेखक माझे "मायबाप " आहेत अशी माझी धारणा आहे.त्यामुळे त्यानी केलेल्या प्रशंसनीय किंवा अप्रशंसनीय प्रतिक्रियेचा मी सारखाच आदर करतो. प्रशंसनीय प्रतिक्रिया मला आनंद देतेच पण त्याबरोबरीने माझी पुढील लेखनं त्यांना अशीच आवडत राहावी यासाठी लिहिण्याची माझी जबाबदारी वाढते असं नेहमीच मनात आणत असतो. आणि अप्रशंसनीय प्रतिक्रिया मला माझ्या पुढील लेखनात सुधारणा करायला प्रतिसाद देते.ही पण दुसर्‍या प्रकारची जबाबदारी आहे असं समजून मी माझ्या दोन्ही प्रकारच्या प्रतिक्रिया देणार्‍या वाचकाबद्दल मनात आदर बाळगून असतो. दुसरं कारण असे की, जे माझ्या लेखाला प्रतिसाद देतात ते प्रेमापोटी वेळात वेळ काढून तसं करतात.असा त्यांच्या जागी जाऊन मी विचार करतो.त्यामुळे त्यांच्या प्रतिसादाला मी रिप्लाय दिलं नाही तर मी माझ्या कर्तव्याला चूकेन आणि ती माझी त्यांच्या बद्दल बेपर्वाई होईल ह्याची मनात भिती ठेऊन तसं करतो. मात्र तुझ्या ह्या ऑब्झर्वेशनची वाखाणणी केल्याशिवाय राहावत नाही. तुझ्या सारख्या माझ्या प्रत्येक प्रेमळ वाचकाला मला माझ्या प्रत्येक लेखाला प्रतिसाद देणं शक्य नाही हे मी जाणूण आहे.लेखाची अमूक अमूक "वाचने" झाली त्याचा काऊंट बघून मी ती एकप्रकारची प्रतिक्रियाच समजतो. काही नुसते वाचक असतात.त्यांना वाचायला खूप खूप आवडतं आणि वाचकाने लेखक होण्याची त्यांना इच्छा नसल्यास आवश्यक्यता नाही.पण लेखकाला मात्र वाचक असण्याची नक्कीच आवश्यक्यता आहे असं मला वाटतं. आज लताताईचा जन्मदिवस आहे.तिने एकदा एका प्रश्नाला उत्तर दिलं ते मला आठवतं. "आपलं कुठचं गाणं आपल्याला चांगलं झालं असं कळतं?" लताताई म्हणाली, "जे गाणं ऐकताना माझे श्रोते आपसूपच माना डोलावतात ते गाणं चांगलं झालं आहे असं मला वाटतं." असंच लेखनाचं असावं असं मला वाटतं. "तर आतापर्यंत तुम्ही मिपा वर जे काही लीखाण केले असेल त्या सर्व लेखांसाठी माझा हा प्रतीसाद....." असं सगळं चटका लागण्यासारखं तुझ्याकडून लिहून झाल्यावर ते वाचून एका ओळीत तुला प्रतिसाद देऊन कसं चालेल?म्हणूनच हा एव्हडा प्रपंच. " तुमचे मानावे तेवढे आभार कमीच आहे...तुम्ही माझ्यापेक्षा मानाने,वयाने ,बुद्धीने खुप मोठे आहात माझ्या आजोबा सारखे.." नितीन,तू हे लिहून तुझ्या माझ्या अंतरातलं "अंतर" कमी करून जवळीक आणलीस हे मात्र निश्चित.माझ्या पेक्षा लहान असलास तरी तुझ्याकडून हे शिकण्यासारखं आहे. www.shrikrishnasamant.wordpress.com श्रीकृष्ण सामंत "कृष्ण उवाच" shrikrishnas@gmail.com

शिवा जमदाडे 29/09/2008 - 13:50
सामंत काका, सुंदर.... रावसरांचे व्यक्तिचित्र उभे राहिलय..... - शिवा जमदाडे भोकरवाडी (बुद्रुक)

In reply to by शिवा जमदाडे

शिवा जमदाडेजी, आपल्या प्रतिक्रिये बद्दल आभार www.shrikrishnasamant.wordpress.com श्रीकृष्ण सामंत "कृष्ण उवाच" shrikrishnas@gmail.com